समाजशिक्षक गिरीश प्रभुणे – पद्मश्री! (Girish Prabhune: Social Reformer awarded Padmashree)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

समाजशिक्षक गिरीश प्रभुणे – पद्मश्री! (Girish Prabhune: Social Reformer awarded Padmashree)

 

गिरीश प्रभुणे

गिरीश प्रभुणे यांना समाजशिक्षक हा पुरस्कार कृ.ब.तळवलकर ट्रस्टतर्फे 2012 मध्ये देण्यात आला. मी माझ्या ट्रस्टी मित्रांसोबत त्या निमित्ताने त्यांच्या चिंचवड येथील समरसता गुरूकुलम या शाळेला भेट दिली होती. तो अद्भुत असा अनुभव होता. त्यांचे पारधीहे यमगरवाडी प्रकल्पाविषयीचे अनुभवकथन असलेले पुस्तक वाचले होतेच. पारधी समाजजीवन वाचताना मन हेलावून गेले. गिरीश प्रभुणे त्या समाजात अनेक वर्षे राहून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करत होते. केवळ एक समाजगट बदलावा या हेतूने केलेले ते कार्य मनाला स्पर्श करून गेले. त्या पुस्तकातून भटक्या विमुक्तांचे जगणे जसे समजत होते तसेच एक कार्यकर्ता कसा घडतो याचेही दर्शन होत होते. आम्ही पाच-सहा जण समरसता गुरुकुलममध्ये दाखल झालो. शाळेत प्रवेश करताच शाळेचे वेगळेपण जाणवले. शाळेच्या दर्शनी भागात ज्योतिबा फुले यांनी समाजाच्या दुर्दैवाच्या कारणमीमांसेचे केलेले यथार्थ वर्णन मोठ्या ठळक अक्षरांत लिहिले आहे.

विद्ये विना मती गेली

मती विना नीति गेली

नीति विना गती गेली

गती विना वित्त गेले

वित्ताविना क्षुद्र खचले

इतके अनर्थ एका अविद्येने केले


कावेचा रंग दिलेल्या विटांचे बांधलेले छोटे छोटे वर्ग. भिंतींना अर्धे वीटकाम आणि अर्धी बांबूच्या पट्ट्यांची जाळी. आत बसल्यावर त्या विमुक्त मुलांना बंदिस्त न वाटता मुक्त वातावरण राहील याची काळजी घेतेलेली. शाळेच्या भिंती आतून आणि बाहेरून वेगवेगळ्या शैक्षणिक तक्त्यांनी सजवलेल्या. एका शिक्षिकेने आम्हाला गिरीश यांच्या ऑफिसात आणून सोडले. मी ज्याला ऑफिस म्हणतो ती पुस्तकांनी खच्चून भरलेली एक खोली होती. काही मुले पुस्तके कपाटांतून मुक्तपणे काढून वाचत बसलेली. गिरीश स्वत: मध्ये बसलेले. त्यांची मुक्तपणे वाढू दिलेली ऋषीदाढी आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. त्यांनी आम्हाला बसण्यास साध्या खुर्च्या दिल्या. त्या खोलीची भिंत अर्धीच बांधलेली आणि वर लाकडी पट्टयांची जाळी- त्यातून शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात काय चालले आहे ते सहज दिसू शकेल अशी रचना. त्यांनी यमगरवाडीची कथा थोडक्यात सांगितली आणि एकेक गोष्ट स्पष्ट होऊ लागली. त्यांचा पारधी समाजात काम करून त्या समाजात बदल घडवून आणण्याचा अथक प्रयत्न अनेक वर्षे चालू आहे. यशापयश, आशानिराशा देणारे अनेक प्रसंग घडले, वर्षे गेली, समाज बदलण्यास तयार नव्हता; तसेच, व्यवस्था त्यांना बदलू देत नव्हती. भटक्या विमुक्तांची परिस्थिती बदलत नव्हती. अंधश्रद्धेचा प्रचंड विळखा, जात पंचायतीचे वर्चस्व आणि पोलिसांच्या वेळोवेळी होणाऱ्या कारवाया चालूच होत्या. गिरीश एका क्षणी थोडे उदास होऊन विचार करू लागले. इतकी वर्षे यमगरवाडी पालावरची शाळा प्रकल्प चालू होता. पण हाती काय आले?... तेथे नवी घडी पडली.

प्रभुणे हे संघाच्या मुशीतून घडलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते त्यांना थोडी उद्विग्नता आली म्हणून गप्प बसून चालणार नव्हते. त्यांनी केलेल्या कामाचे सिंहावलोकन केले आणि त्यांच्या एकदम लक्षात आले, की समाज बदलायचा असेल तर त्या समाजाच्या मुलांना संस्कारक्षम वयात पकडून, समाजापासून वेगळे करून शिक्षण आणि संस्कार देण्यास हवेत. समाजापासून मुले वेगळी करायची म्हणजे त्यांच्या आईवडिलांपासून वेगळी करायची. प्रयोग सुरू झाला. त्यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमही शाळा स्थापन केली. जो समाज एकेकाळी कुशल होता; त्याने त्यांच्या कुशलतेने सन्मान मिळवलेला होता, त्या समाजाच्या पूर्वीच्या कुशलतेला नवा आयाम देऊन त्यांचे पुनरुत्थान करायचे! समरसता या नावाप्रमाणे त्या समाजाच्या मुलांना मुख्य धारेत आणून, इतर समाजाशी त्याची एकरूपता घडवून आणण्याचे शिवधनुष्य पेलणे होते. दुसरीकडे, त्यांना आईवडिलांपासून दूर आणताना घरची आठवण येणार नाही असे वातावरण इकडे, पुण्याजवळ निर्माण करायचे होते. केवळ शाळा आकारून चालणार नव्हते तर मुलांना सभोवताली निसर्ग सतत दिसेल अशी आश्रमशाळा सुरू करावी लागणार होती. म्हणून गुरुकुलम स्थापन झाले!


आश्रमशाळेची स्थापना हे काम काही फार अवघड नव्हते, कारण गिरीश यांचे काम समाजात अनेकांना माहीत झाले होते. अनेक दाते पुढे आले. मोकळ्या प्लॉटपासून पूर्ण शाळा उभी राहिली. चाफेकर ट्रस्टने जागा दिली. इमारती बांधताना पारधी मुलांना आजूबाजूला निसर्ग दिसला पाहिजे, तेथे त्यांना होमलीवाटले पाहिजे याची काळजी घ्यायची होती. संस्थेचा संबंध संघाशी असल्याने अनेक कार्यकर्ते शिक्षक मिळाले आणि विद्यार्थी आणायचे होते सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड या भागातून. शाळेत येण्यास कोणी तयार होईना. आईवडील मुलांना सोडण्यास तयार होईनात. काही मुले कशीबशी जमली. मुले शाळेत एका जागी बसेनात. त्यांना लहापणापासून शिकारीचे बाळकडू मिळालेले. कोणी झाडावर चढून खारी पकडतोय, कोणी बिळात हात घालून उंदीर पकडतोय, कोणी उडत्या चिमण्या वा भिर्ड्या पकडतोय, कोणी पारवे. त्यांच्या समोर पुस्तक ठेवणे आणि त्यांच्याकडून अभ्यास करवून घेणे हे अवघड होऊन बसले. शहरी संस्कृतीचे शिक्षक गडबडले. त्यांचा उत्साह मावळू लागला. मध्येच एखादे पालक आईबाप येऊन मुलाला घेऊन जाऊ लागले. मुले बाजाराच्या दिवशी अचानक गायब होत आणि संध्याकाळी येत. त्यांच्या हाती कोणाच्या तरी खिशातून मारलेले पाकिट असे. मुले बाजारात जे काही मिळे ते घेऊन येत. खिसे उलटे करून बाजारात चोरलेल्या वस्तू खाली टाकत. ती मुले ज्या समाजात जन्माला आली होती त्या समाजात चोरी करणे हे पाप नव्हतेच मुळी! चोरी अथवा शिकार ही तर त्यांची जीवनपद्धत होती. त्यांच्या तोंडातून शिव्या सहज बाहेर येत. वाक्यावाक्यात शिव्या असत. त्यांना शिव्या देणे यात गैर काही वाटत नव्हते. शाळेतील शहरी शिक्षकांना ते समजणे अवघड होते.


गिरीश यांनी यमगरवाडीत त्यांच्या समवेत पालावर राहून ते सारे अनुभवले होते. गिरीश सहज म्हणाले, यमगरवाडीने मला काय शिकवले असेल तर संयम आणि समजुतदारपणा. भटक्या विमुक्तांची नीतिमत्तेची फुटपट्टी आणि नागरी समाजाची फुटपट्टी यात अंतर आहे. गिरीश यांची एका बाजूला शिक्षकांना सांभाळणे आणि मुले टिकवणे ही कसरत सुरू झाली. मुलांना पुस्तकी शिकवण्यापेक्षा खेळ आणि इतर गोष्टींत गुंतवणे सुरू झाले. मुलांच्यात जन्मत: अनेक गोष्टींचे कसब होते. एखाद्या उंच इमारतीच्या सहाय्याने काठीची मदत घेऊन उडी मारणे (Pole vault) मुले सहज करत. त्यांच्या अंगी चपळता, धडाडी हे गुण होते. त्यांना भीती नावाची शहरी गोष्ट माहीतच नव्हती ती अगदी लहान वयात सापदेखील पकडण्यास घाबरत नसत. त्यांच्यातील नैसर्गिक गुण शोधून त्यांना त्यात गुंतवणे सुरू झाले. त्यांच्याकडून शाळा बांधून घेतली, कोणी विटांचे बांधकाम करी, कोणी त्यावर रंग देई, कोणी सुतारकाम, अगदी वेल्डिंगदेखील आठवी-नववीची मुले सहज आत्मसात करत. कोणी स्वयंपाक करणे, कोणी जेवण वाढणे. कष्टाची कामे मुले पटापट करत. कामे करता करता गाणी, कविता म्हणण्यास सुरुवात केली. गाण्यांची लय आवडू लागली तशी मुले गाणी पाठ म्हणू लागली. आपण केलेल्या कामातून शाळा उभी राहत आहे, त्यामुळे मुलांना त्यांचे ते Creation’ आहे अशी भावना निर्माण झाली.

कधी कधी गावाकडून बातम्या येत. आईवडिलांना मारहाण झाली, पोलिसांनी कोठल्यातरी चोरीच्या आरोपाखाली सगळा समाज तुरुंगात टाकला. एखाद्या मुलाच्या आई वा वडिलांच्या खुनाची बातमीदेखील येई. पोलिस पालावर येऊन दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करत आणि सगळ्यांना पकडून नेत. आईवडिलांना पकडून नेताना काही लहान मुलेदेखील त्यांच्याबरोबर असत आणि मोठी म्हणजे दहा ते अठरा वयोगटातील मुले पालावर उरत. ती मुले कोणी गुरुकुलात आणून सोडत. त्यांना जगण्याची लढाई लहानपणापासून करावी लागत होती. संस्कार, शिक्षण अशा लक्झरीला त्यांच्या आयुष्यात वेळच नाही.

गिरीश त्यांच्या दाढीमुळे प्रथमदर्शनी उग्र वाटले तरी त्या चेहऱ्यामागे हळवा, संयमी आणि सहृदय माणूस आहे. ते बोलू लागतात तेव्हा त्यांच्या विचारांची झेप कळते. ते शांत आणि लयकारी भाषेत भटक्या विमुक्त समाजाचे प्रश्न समजावून सांगतात. तो समाज भटका विमुक्त का झाला? तर जेथे त्यांच्या कुशलतेची गरज होती त्या जागेवर तो समाज राहण्यास सहकुटुंब जात असे. त्या समाजाच्या कुशलतेतूनच एकेकाळी मंदिरे बांधली गेली, किल्ले बांधले गेले, लेणी कोरली गेली. लढाया जिंकल्या गेल्या. शिवाजी महाराजांनी त्या समाजाच्या कुशलतेचा उत्तम वापर केल्यानेच महाराज अजेय ठरले. ब्रिटिशांच्या काळात व्यवस्था बदलू लागली. इतर समाज स्थिरता मिळवू लागला आणि हा बदल त्यांच्यापर्यंत पोचेना, त्यांना काम मिळेना, तसे ते जगण्यासाठी गुन्हेगारी करू लागले. ते पिढ्यान् पिढ्या घडल्यावर ती जगण्याची रीत बनून गेली. गेल्या दोनशे वर्षांचा इतिहास त्यांना गुन्हेगार ठरवून गेला. ते ब्रिटिशांचे कारस्थान आहे. कारण त्या समाजाच्या कुशलतेची जोड जर भारतीय स्वातंत्र्यलढ्याला मिळाली असती तर... म्हणून त्यांना गुन्हेगार ठरवले. स्वातंत्र्यानंतर देखील त्या जातींचे दुष्टचर्य संपले नाही.

शाळेत मुलांचा वावर सतत गिरीश यांच्या सभोवताली असतो तो पुस्तकांमुळे! शाळेच्या वर्गांबरोबर आवारात एक वर्कशॉप होते. तेथे, लहान लहान मुले कोठे लाकडावर सुतारकाम करत होती, कोठे इमारतीसाठी लागणाऱ्या कॉलमसाठी सळ्या वाकवून त्या जोडत होती. सुसज्ज कॉम्प्युटर विभागात चौथी-पाचवीची मुले कॉम्प्युटरवर शिकत होती. कोठे मुले चित्रे काढत होती. एका वर्गात वीस-पंचवीस मुले संस्कृत श्लोक म्हणत होती. गिरीश यांनी ती मुले संस्कृतचे उच्चारदेखील उत्तम आत्मसात करतात हे सांगितले. अनेक ठिकाणी शिकण्यासाठी केलेली साधने लावलेली होती. ती मुलांकडून करवून घेण्यात आली होती. जे बघत होतो ते अगम्य होते. एक सहृदय माणूस गुन्हेगार असा ठप्पा लागलेल्या एका समाजात किती मुलभूत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय आणि तेही अगदी सहज! ते करण्यामागील प्रचंड कष्ट जाणवू लागतात. जगात काहीही करता येते पण माणूस बदलणे ही फार अवघड गोष्ट आहे!

होस्टेलमध्ये दिवसाला अडीचशे-तीनशे मुलांचा स्वयंपाक करणे हेदेखील अगडबंब काम, पण मुले स्वत: ते सहज करत. अर्थात मोठ्या माणसांच्या मार्गदर्शनाखाली. गिरीश यांना तळवलकर ट्रस्टतर्फे समाजशिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा बिंदुमाधव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली 2012 साली फेब्रुवारीमध्ये झाला. संघर्ष करा हे आंबेडकरांचे आणि महात्मा फुले यांचे सांगणे म्हणजे संघर्ष माणसांतील अंधश्रद्धेशी करा, वाईट प्रथांशी करा असा आहे. गिरीश यांनी त्यांचे लक्ष नेमके त्या संघर्षावर केंद्रित केले. राजकारण्यांनी संघर्ष म्हणजे वर्गभेद/जातिभेद असा स्वार्थी प्रसार केला. हा फरक आहे राजकारणी आणि समाजकारण करणाऱ्या कार्यकर्ते यांच्यात. गिरीश हे हाडाचे कार्यकर्ते आहेत.  

गिरीश यांना पद्मश्री जाहीर झाली. त्यांच्या कार्याला पावती मिळाली. त्यांच्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांच्या अथक प्रयत्नांना सरकारमान्यता मिळाली. गिरीश यांच्यासारख्या कार्यकर्त्याला या पुरस्काराचे अप्रूप किती असेल ते माहीत नाही. पण माझ्यासारख्या अनेकांना त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे अप्रूप खूप वाटते.

- श्रीकांत कुलकर्णी 9850035037 shrikantkulkarni5557@gmail.com

श्रीकांत कुलकर्णी हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयर. ते पुण्याचे. त्यांनी इंजिनीयर म्हणून सदतीस वर्षे काम करत असताना पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मशीन ऑटोमेशन आणि सॉफ्टवेअर या क्षेत्रात निर्मिती केली आहे. त्यांनी लेखन छंद वयाच्या पन्नाशीनंतर जाणिवपूर्वक जोपासला. त्यांचा उद्देश व्यवसायाला सामाजिक जाणिवेचे अधिष्ठान देणा-या व्यक्ती, तसेच सेवाव्रती व्यक्ती व संस्था यांचे योगदान लेखनातून मांडणे हा आहे. कुलकर्णी ललित लेख, राजकीय व्यंग, प्रवासवर्णने अशा त-हेच्या लेखनातून व्यक्त होतात. त्यांच्या माझ्या नजरेतून या ब्लॉगवर शंभराहून अधिक लेख प्रसिद्ध आहेत.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. एका चांगल्या सामाजिक कार्याची माहिती मिळाली.

    उत्तर द्याहटवा
  2. मोहोळच्या पारध्यांची वसाहत बसवण्यातही प्रभुणे याांची खुप मदत ...

    उत्तर द्याहटवा