दुष्काळाला द्या अर्थ नवा (Famine - may there be new meaning)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

दुष्काळाला द्या अर्थ नवा (Famine - may there be new meaning)

 


हिंदुस्थानातील दुष्काळया विषयावर निबंधस्पर्धा निर्णयसागर छापखान्याने 1903 मध्ये (एकशेअठरा वर्षांपूर्वी) आयोजित केली होती, त्यासाठी मोठे पारितोषिक घोषित केले होते. त्या स्पर्धेसाठी लिहिला गेलेला, पण शब्दमर्यादा ओलांडलेला आणि अंतिम तारखेच्या नंतर पोचलेला म्हणून एक निबंध स्वीकारला गेला नाही. तो पन्नास पानांचा म्हणजे पंधरा हजार शब्दांचा निबंध त्यानंतर दोन वर्षांनी राष्ट्रप्रमुख या त्रैमासिकात प्रसिद्ध झाला. त्या निबंधाचे लेखक होते गोविंद गोपाळ टिपणीस. त्यांच्यावर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अर्थशास्त्रीय विचारांचा प्रभाव होता.

तो निबंध लोकवाङ्मय गृह प्रकाशनाकडून आलेल्या दोन जुने अभिजात अर्थशास्त्रीय निबंध या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे, त्याचे संपादन नीरज हातेकर व राजन पडवळ यांनी केले आहे. त्यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे, की हिंदुस्थानातील दुष्काळ या निबंधाला अखिल भारतीय संदर्भात व स्वातंत्र्यपूर्व भारतात प्रसिद्ध झालेल्या अर्थशास्त्रीय परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे.


गोविंद गोपाळ टिपणीस यांनी लिहिलेल्या त्या निबंधात भारतातील दुष्काळाची अकरा कारणे सांगून, दुष्काळाच्या निराकरणाची दिशा सूचित केली आहे. त्या निबंधाचे अनेक संदर्भ बदलले आहेत आणि अर्थशास्त्रीय परिभाषाही बरीच पुढे सरकली आहे. परंतु तरीही दुष्काळाची ती अकरा कारणे केवळ माहितीकरता येथे देत आहोत. ती पुढीलप्रमाणे -

1.   पाऊस कमी वा जास्त झाल्याने पिकांचे होणारे नुकसान, सिंचनाचा अभाव.

2.   शेतीपिकांवर येणारी कीड, रोगराई, टोळधाड व हवामान बदलांमुळे होणारे परिणाम.

3.   शेतीतून निघणाऱ्या उत्पादनावर त्या-त्या समूहांचे वा प्रदेशांचे जास्तीचे अवलंबित्व.

4.   खते, बी-बियाणे, कीटकनाशके, शेतीसाठीची अवजारे यांचा अभाव किंवा कमतरता.

5.   शेतकऱ्यांचे अज्ञान, कोणत्या पिकांची लागवड/पेरणी कधी करावी येथपासून ते त्यांची निगराणी कशी करावी येथपर्यंतचे.

6.   सरकारकडून शेतसारा, कर्जवाटप इत्यादींबाबतची धोरणे. नव्या संदर्भात सब् सिडी वगैरे.

7.   वाहतुकीच्या/दळणवळणाच्या साधनांचा आणि अन्य पायाभूत सुविधांचा अभाव.

8.   अन्नधान्याची आयात व निर्यात या संदर्भात सरकारचे चुकीचे निर्णय व धोरणे.

9.   शेतीपूरक उद्योगांचा अभाव, शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग नसणे वगैरे.

10.  शेतकऱ्यांच्या हातात खेळता पैसा नसणे किंवा शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला वा बुडालेला असणे.

11.  बहुजन समाजाचे दारिद्र्य.

या सर्व कारणांवर दृष्टिक्षेप टाकला तर लक्षात एवढेच येते, की सद्य स्थितीच्या दुष्काळाची कारणेही यापेक्षा वेगळी नाहीत. काही तपशील व तीव्रता यांबाबत कमी-जास्त झाले आहे, इतकेच.

दुष्काळ' या प्रश्नाची समग्र चर्चा करायची तर ती अतिव्याप्त, अधिक गुंतागुंतीची होणार आणि त्यावरील उपाययोजना अनेक घटकांच्या सहभागाशिवाय व दीर्घकालीन नियोजनाशिवाय शक्य नाही. तशी चर्चा विविध स्तरांवरून सातत्याने चालू असतेही, पण गोविंद गोपाळ टिपणीस यांनी हिंदुस्थानातील दुष्काळया निबंधात वापरलेल्या दोन संज्ञांच्या अर्थाकडे लक्ष वेधणे आवश्यक वाटते. त्या दोन संज्ञा कोणत्या? ‘दुष्काळ आणि बहुजन समाज.

टिपणीस यांनी त्यांच्या निबंधाच्या पहिल्याच वाक्यात दुष्काळ या संज्ञेची साधी, सोपी व नेमकी व्याख्या केली आहे, ती अशी- ‘‘ज्या काळी लोकांमध्ये त्यांच्या नित्याच्या आवश्यक गरजा भागवण्याइतकेही त्राण राहत नाही, त्या काळास दुष्काळ असे म्हणतात.’’ आणि त्या निबंधाच्या समारोपाला दुष्काळाचे शेवटचे म्हणजे अकरावे कारण सांगताना म्हटले आहे, ‘‘हिंदुस्थानचा बहुजन समाज म्हणजे शेतकरी लोक.’’ पैकी दुष्काळ या संज्ञेच्या व्याख्येत सद्यकाळातही बदल करण्याची आवश्यकता नाही, कदाचित ती व्याख्या पूर्वीपेक्षा अधिक समर्पक म्हणता येईल. कारण सद्यकाली अनेक समाजघटकांना त्यांच्या नित्याच्या गरजा भागवण्यात फारशी अडचण येत नाही, त्यांना दुष्काळाची झळ बसत नाही, तीव्रता जाणवत नाही. म्हणजे दळणवळणाची साधने (देशात व विदेशात) ज्या प्रमाणात वाढलेली आहेत, ती पाहता खूप मोठ्या समूहाला सध्या दुष्काळाचा सामना प्रत्यक्षात तरी करावा लागत नाही, किमान त्यांना दुष्काळ सुसह्य तरी करून घेता येतो.

बहुजन समाज या संज्ञेच्या त्या व्याख्येचा विस्तार करण्याची मात्र गरज आहे. त्या संज्ञेला नंतरच्या काळात क्रमाक्रमाने येत गेलेली अवकळा संपुष्टात आणण्याची गरज आहे. त्याचा अर्थ, हिंदुस्थानचा बहुजन समाज म्हणजे शेतकरी लोकअसे न म्हणता उपजीविकेसाठी शेती हाच व्यवसाय मानणारे, उपजीविकेसाठी शेतीत काम करणारे आणि शेतीपूरक लहान-लहान उद्योग करणारे असे म्हणण्यास हवे. म्हणजे मोठे शेतकरी, शेती करणारे पण उपजीविकेसाठी तिच्यावर अवलंबून नसणारे यांना बहुजन समाजया संज्ञेत गृहित धरणे तितकेसे बरोबर नाही. शिवाय, अलिकडच्या काही वर्षांत बहुजन समाज या संज्ञेला आर्थिक नव्हे तर जातीय परिमाण घट्ट चिकटलेले आहे.

हिंदुस्थानचा दुष्काळहा निबंध लिहिला गेला तेव्हा, भारतात सिंचनाच्या सुविधा व शेतीमालावर प्रक्रिया करणारे मोठे उद्योग यांचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे मोठे वा श्रीमंत शेतकरी ही संज्ञा पुढे आली नसावी; आली असली तरी ते प्रमाण नगण्य असणार. शिवाय, शेती करणाऱ्यांमध्ये सर्व जाती कमी-अधिक प्रमाणात होत्या म्हणून किंवा अर्थशास्त्राच्या अभ्यासात जातीहा निकष गृहित धरणे योग्य नाही म्हणून, टिपणीस यांनी तो उल्लेख बहुजन समाज या संज्ञेच्या व्याख्येत केलेला नसावा. अर्थातच ते योग्य ठरते. परंतु त्यांनी केलेल्या व्याख्येत शेतीवर अवलंबून असणारे अन्य घटक व शेतीपूरक छोटे-छोटे उद्योग करणारे लोक यांचा उल्लेख नाही याचे आश्चर्य वाटते. कदाचित त्यांनी ते अन्य घटक त्या व्याख्येत गृहीत धरले असावेत किंवा शेतकरी अडचणीत आला तरी अन्य घटकांना नित्याच्या गरजा भागवणे तितकेसे कठीण जात नाही अशी त्यांची समजूत असावी किंवा त्यावेळची परिस्थिती तशी असावी.

ते काहीही असो... बहुजन समाजया संज्ञेचा अर्थ हिंदुस्थानचा दुष्काळया पुस्तकात केलेली दुष्काळया संज्ञेची व्याख्या प्रमाण मानून लावण्यास हवा. म्हणजे ज्यांना उपजीविकेसाठी नित्याच्या व अत्यावश्यक गरजा भागवणे जड जाते, तो बहुजन समाजअशी सर्वसाधारण व्याख्या रूढ करण्यास हवी. बहुजन समाजया संज्ञेची व्याख्या समाजशास्त्रीय किंवा जातीच्या निकषांवरच व्हायला हवी असा ज्यांचा आग्रह असेल. तो समजून घेता येईल, परंतु अर्थशास्त्रीय निकषांवर बहुजन समाजही व्याख्या वेगळी ठरेल.

- (साधना साप्ताहिक संपादकीय. 6 जुलै 2019वरून उद्धृत)

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. दुष्काळाची कारणे आजही तेच आहेत असे वाटते.तेंव्हाचा समाज शेतीवर जास्त अवलंबून होता.शेतीमालावर प्रक्रीया करणारे उद्योग शेताच्या बांधावर आणि शेतकऱ्यांच्या मालकीचे झाले तर शेतकरी सुखी होईल.पुर्वी दुष्काळाच्या झळा जास्त तीव्र असल्या पाहिजेत.लेख आवडला.

    उत्तर द्याहटवा