सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 हद्दपार करून दोन वर्षे (निकाल सप्टेंबर 2018) होऊन गेली. त्या निर्णयाने क्वीअर एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायाच्या जीवनात बरेच बदल झाले आहेत.
लोक त्या विषयाकडे संवेदनशील नजरेने पाहू लागले. त्या समुदायाला सार्वजनिक आणि नागरी जीवनात प्रतिनिधित्व मिळण्यास सुरुवात होत आहे. त्या निकालाआधीच क्वीअर व्यक्तींनी लोकसभा निवडणुका (2016) लढवल्या होत्या. चित्रपटांमध्ये क्वीअर, विशेषत: ट्रान्स व्यक्तींची भूमिका आणि प्रतिमा काहीशी उपरी दाखवली जाते, त्यात बदल होत आहे. ‘मेड इन हेवन’सारख्या वेब सीरीज क्वीअर व्यक्ती, त्यांचे भावविश्व दाखवत आहेत. नवीन शिक्षण धोरणामध्ये ट्रान्सजेण्डर बालकांचा समावेश करण्यासाठीचा विचार आणि कृती मांडली आहे. ते बदल शासकीय, सार्वजनिक आणि योजना यांच्या पातळीवर आहेत. वैयक्तिक पातळीवरील संवेदनशीलता वाढवण्यासाठी काय करता येईल हे कार्यकर्त्यांनी बघायचे आहे. आम लोकांचे वैयक्तिक जीवन सुरू होते, ‘मी’ आणि ‘माझे कुटुंब’ यांपासून. त्यामुळे मी, माझा पाल्य, पाल्याची सुरुवातीची वाढीची वर्षें, शाळा, शिक्षण या परिघामध्ये संवेदनशीलता आणण्यास हवी.
एलजीबीटीक्यू समुदायाला ‘क्वीअर’ संबोधणे सहसा सर्वमान्य असते. ‘क्वीअर’ या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘वेगळे’, ‘अ सामान्य’ असा आहे. रूढपणे स्त्री आणि पुरुष अशी फक्त दोन लिंगे आणि तत्स्वरूप लिंगभाव मानले जातात. त्यांपासून वेगळे असणारे ते ‘अ सामान्य’. लिंग/सेक्स (Sex) आणि लिंगभाव/जेंडर (Gender) हे समानच असेल असे ग्राह्य धरणे अयोग्य ठरेल. जागतिक आरोग्य संघटनेने ‘जेंडर’ची व्याख्या करताना स्पष्टपणे नमूद केले आहे, की जेंडर हे त्या त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जनमानसातून निर्मित झालेल्या नियम आणि रूढी यांतून उगम पावते. ते समाज ठरवतो. समाज म्हणजे अर्थात मी, तुम्ही, आपण असे सर्व मिळून. समाज नॉर्म्स अलिखित तयार करतो आणि त्या नॉर्मनुसारच मुलग्या-मुलगीने विशिष्ट पद्धतीने चालणे, बोलणे, वागणे अपेक्षित धरले जाते. प्रत्येक मुलाने/मुलीने त्यात फिट्ट बसावे असा आग्रह धरला जातो आणि मुलगा/मुलगी जर त्यात बसत नसेल तर ‘तो/ती जरा विचित्र आहे’ असा शेरा मारून कळत-नकळत भेदभावाची वागणूक सुरू होते. जेंडरची व्याख्या संस्कृती आणि प्रदेश यांनुरूप बदलते. अमुक अमुक वागते ती मुलगी असे भारतात मानत असतील तर ते तसेच इतर देशांत मानत असतील असे नाही. जेंडरच्या व्याख्या आदिवासी आणि बिगरआदिवासी लोक यांच्यादेखील वेगवेगळ्या असतात.
मूल चार वर्षांचे असल्यापासून समाजाकडून ‘जेंडर रोल्स’ लादले जातात. मुलगा रडत असेल तर पालक त्याला हमखास बजावतात, की ‘मुलगे रडत नाहीत’, म्हणजे मुली रडक्या असतात असे गृहित धरले जाते. त्याच्यासाठी जे कपडे, खेळणी मुलग्यांसाठी असतात तेच घेतले जातात. एका तरुण क्वीअर व्यक्तीचा अनुभव असा आहे, की ती व्यक्ती चार वर्षांची असताना तिच्यावर जेंडर अनुसार वर्तन लादले गेले. एका क्वीअर व्यक्तीच्या मते, तो चार वर्षांचा असताना इतर मुलांप्रमाणे, रूढीबद्ध रूपाने जे करणे योग्य मानले जाते ते मी काहीच पाळले नाही. मला आठवते, मी अशा गोष्टींकडे आकर्षित होत असे, जे मुलग्यांकडून होणे सर्वमान्य नसते- जसे, की वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालणे किंवा मुलांना परवानगी नसते असे काहीतरी करणे, तसे बोलणे, वागणे. मी सातवीत असताना विशेषत: असे जाणवले, की माझ्यावर पुरुषी लिंगभाव लादला जात आहे. मी या पुरुष किंवा स्त्री अशा ‘बायनरी’ व्याख्येत बसत नाही. मी माझे वय तेरा/चौदा वर्षे असताना खोलीचे दार बंद करून माझ्या गळ्यामध्ये ओढणी टाकून नाचत असे. मला जाणीव झाली, की जेंडरचे प्रमाणित नियम माझ्यावर अत्याचारी ठरत आहेत. मी लिंगभावाचा जो नियम पाळणे अपेक्षित आहे, तो माझ्या स्वत:च्या वैयक्तिक गरजा आणि इच्छा पूर्ण करत नाही. मला माझा अनुभव व माझे निरीक्षण यांबद्दल कोणाशीही बोलता आले नाही. लोकांना अशा गोष्टींची माहिती 2006 साली नव्हती; अगदी मुंबईतही नव्हती.
एक पालक म्हणून त्यांचा पाल्य जर वेगळा असेल तर पालकांना ते स्वीकारण्यात काय काय अडचणी आणि चिंता असतात यावर विचार होणे गरजेचे आहे. एक क्वीअर तरुण सांगतो, “मी स्वत:ला पुरुष म्हणून ओळखतो. माझ्या कुटुंबाला त्यात काही अडचण नाही. परंतु माझी पुरुष म्हणून जी वर्तणूक असते, ती त्यांना मान्य होत नाही. मी त्यांच्या लिंगभावाच्या नियमांत, व्याख्येत बसत नाही. जेव्हा मी फॉर्मल कपडे घालतो, तेव्हा ते म्हणतात, की आता मी एक प्रॉपर पुरुष दिसत आहे. मी माझ्या विस्तारित कुटुंबाला काय वाटते याचा विचार करत नाही. मी ‘गे’ (समलिंगी) रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितल्यावर ते त्यांना मान्य होत नाही.
भारतीय पालकांना समजावणे हे महाकठीण काम आहे. कारण भारतीयांना सर्वप्रथम ‘समाज काय म्हणेल’ याची चिंता वाटत असते. मी जेव्हा वडिलांकडे लैंगिकतेविषयी बोललो तेव्हा ते म्हणाले, की “भारतीय समाजात असे काही घडत नाही.” त्यांचा पहिला संदर्भ समाज हा होता. मला असे बोलल्यावर त्यांच्याच लक्षात आले, की समाजात असे कोठे, कधीच घडले नाही हे काही खरे नाही, समलिंगी असणे समाजात पूर्वापार अस्तित्वात आहे. त्यांनीही तशी उदाहरणे पाहिली आहेत. पण तरीही त्यांचा आग्रह असा असतो, की त्यांच्या घरात, त्यांच्या कुटुंबात तसले काही घडत नाही, घडू नये आणि म्हणून चालणारही नाही!
‘ग्रामीण भागातील पालक आणि समाज यांच्यात पूर्वग्रह अधिक घट्ट असतात आणि शहरी भागातील लोक ते चालवून घेतात असाही गैरसमज जनमानसात आढळतो. एक समलिंगी व्यक्ती स्वत: छोट्या खेड्यात राहणाऱ्या आणि दुर्लक्ष झालेल्या ‘क्वीअर’ लोकांसाठी काम करते. त्या व्यक्तीचे म्हणणे आहे – मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकेन की पूर्वग्रह शहरी भागात खूप जास्त आढळतात. गर्दीने भरलेल्या आधुनिक, शहरी वातावरणात लोकांच्या मनात पूर्वग्रह ठासून भरलेले आहेत. त्या मागील कारणे बरीच असू शकतात. संशोधन असेही सूचित करते, की पूर्वग्रहातून उद्भवलेल्या हिंसाचाराच्या बहुतेक घटना भारतातील खेड्यांऐवजी शहरांमध्ये घडलेल्या आहेत.
शाळेत आल्या आल्या प्रवेश घेतलेल्या व्यक्तीचे प्रथम वर्गीकरण ‘मुलगा’ आणि ‘मुलगी’ असे केले जाते. त्यांनी वेगवेगळ्या रांगांत उभे राहण्याची, वेगवेगळे बसण्याची अपेक्षा असते. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या जेंडरच्या सीमेत राहून त्यानुसार विशिष्ट भूमिका साकारायच्या असतात. बोर्डिंग स्कूलमध्ये तर ती ‘शिस्त’ अधिक प्रमाणात असते. विद्यार्थी बोर्डिंगमध्ये मित्रांसोबत किती वेळ घालवतो त्यानेदेखील फरक पडतो. शाळेतील सर्व स्पर्धात्मक गोष्टी या ‘जेंडर बायनरी’ (दोनच लिंगभाव – एक तर स्त्री किंवा पुरुष) चश्म्यातून पाहिल्या जातात. सर्व खेळांमध्ये लिंगभाव लादला जातो. मुलग्यांनी स्पर्धात्मक अधिक असावे अशी अपेक्षा असते. शाळेत ‘हेड बॉय’ किंवा ‘हेड गर्ल’ अशी संकल्पना असते आणि सर्वांना नेहमी त्यांच्याकडे आदर्श मुलगा किंवा मुलगी म्हणून पाहण्यास सांगितले जाते. एका क्वीअर व्यक्तीला ती कोण आहे? तिचे जेंडर आणि लैंगिकता काय आहेत याचा शोध तिचा तिला घ्यायचा असतो. तो प्रचंड मानसिक संघर्ष असतो. क्वीअर व्यक्तीस सतत ‘छक्का’, ‘बायल्या’ यांसारखे टोमणे दिले जातात. त्याचा एकूण परिणाम संबंधित मुलाच्या मानसिक आरोग्यावर होतो. कारण तो/ती आजुबाजूच्या कोणाशीही त्या विषयावर चर्चा करू शकत नाही.
महाराष्ट्र राज्य सरकारी ‘एसएससी’ बोर्डांतर्गत असणाऱ्या शाळेत शिकलेल्या व्यक्तीचे म्हणणे आहे, की ‘एसएससी’चे बोर्ड उच्चभ्रू नाही. शाळेकडे त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेसे स्रोत नाहीत. अकरावी आणि बारावी इयत्तांत त्याला प्रत्यक्षात मदतीची गरज होती. पण त्याचे शिक्षक आधीच ‘ओव्हरलोड’ होते. तो जर आयसीएससीई शाळेत असता, तर त्याला खात्री आहे, की तेथे काही सोय असावी. त्याला आठवते, एक शिक्षिका होत्या. त्यांनी त्यांचा नंबर विद्यार्थ्यांना देऊन सांगितले, की कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी त्यांना फोन करता येईल. परंतु त्याचा अर्थ अभ्यासाशी संबंधित काहीही बोलता येईल असा होता. इतर विषय तेथे चर्चेसाठी वर्ज्य होते.
लिंगभावासंबंधी रूढीवादी (स्टिरिओटाइप्स) कल्पना पाठ्यपुस्तके, खेळ, शिक्षकवर्गाच्या सूचना अशा विविध ठिकाणांहून लादल्या जातात. पाठ्यपुस्तके, त्यांतील चित्रे, कहाण्या, स्त्री आणि पुरुष यांची वर्णने- त्यांना जी कामे करताना दाखवले जाते ते ते सर्व पठडीबाज असते. काही वेळा वाटते, की शिक्षकांचा वाटाही जेंडर नॉर्म्स (नियम) लादण्यात मोठा असतो. त्यामुळे शिक्षकांवर संवेदनशील राहण्य़ाची मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थी पुरुष शिक्षक आणि महिला शिक्षक ज्या पद्धतीने वागतात त्या पद्धतीचेच अनुकरण करत असतात.
पालक, शिक्षक हे सर्वप्रथम नागरिक आहेत. प्रत्येक नागरिकाने चिकित्सक असावे. सर्व नियमांना, रूढींना तो प्रत्येक नियम, समज कोठून आला - कोणी बनवला असे प्रश्न करावेत. काही नवीन ऐकले तर त्याचा शोध घ्यावा, गूगल करावे (व्हॉट्स अॅपवर, युनिर्व्हसिटीमध्ये नाही). पालक, शिक्षक म्हणून मला काय वाटते, आजुबाजूच्यांना काय वाटते, शाळा संस्थापक/चालक यांना काय वाटते या सर्वांच्या पलीकडे पाहणे गरजेचे आहे. समजा, एक मूल पालकाला सांगू पाहते, की मी ‘मी’ नाहीये, मी तिच्या/त्याच्यासारखा नसून वेगळा/ळीच कोणीतरी असल्यासारखे वाटते आणि पालकांनी त्यावर प्रतिसादात छडी दिली, ‘वेडा आहेस काय, काहीही काय बोलणे सुरू केलेस. जा, अभ्यासाला बस’ असे काही सांगितले, तर मुले आणि पालक यांत संवाद उरणार नाही. मोठी ‘जनरेशन गॅप’ जाणवेल. तसे होऊ नये यासाठी पालकांनी ‘अपटुडेट’ राहण्यास हवे. नवनवे ट्रेंड्स, माहिती, जगाच्या पाठीवर काय वारे वाहत आहेत ते माहीत असणे आवश्यक आहे. पाल्याची लक्षणे ‘क्वीअर’ असल्यासारखी वाटू लागली, की पालकांना ते स्वीकारण्यास अवघड जाते. पालक स्वत:ला दोषी समजतात, पालक म्हणून ते पाल्याला वाढवताना कमी पडले, चुकले असे त्यांना वाटते. पण एखादी व्यक्ती क्वीअर निसर्गत: असते. ते काही केल्याने होत नाही किंवा जातदेखील नाही. सर्वच पालकांनी त्यांचे कोणाचेही मूल वेगळे असू शकेल ही शक्यता गृहित धरण्यास हवी.
क्वीअर समुदायाचे प्रतीक सप्तरंग मानले जाते.
शाळांमध्ये ‘सेक्स एज्युकेशन’ असावे. ते पहिलीपासून कित्येक देशांमध्ये असते. ‘सेक्स एज्युकेशन’ म्हणजे बायोलॉजी, शारीरिक बदलांची माहिती देणे इतकेच नव्हे. त्यामुळे ‘सेक्स एज्युकेशन’ या शब्दाऐवजी काही वेगळा शब्द, जसे की ‘जीवन- शिक्षण’ असे म्हणुयात. त्यामध्ये ‘मी’ म्हणजे नक्की काय? माझे शरीर, मला योग्यपणे लागू होणारा लिंगभाव कोणता? त्याखेरीज भावना, इच्छा, गुड टच, बॅड टच वगैरे असंख्य गोष्टींबद्दल बोलता येईल. शाळेतील सर्व सोयी सुविधा या अपंगत्व, क्वीअर यांसह सर्वांना डोळ्यांसमोर ठेवून केलेल्या असाव्यात. सर्वांना गणवेश एकसारखा असावा. सर्व खेळ सर्वांना असावेत. पाहण्यात असे आहे, की मुली जरा मोठ्या होऊ लागतात तशा त्या मैदानी खेळ खेळत नाहीत. त्यासाठी त्यांना विशेष प्रोत्साहन द्यावे. शाळेत उद्घाटन गीत, प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ, चहा वगैरे देण्यास मुलींना पुढे करणे टाळले पाहिजे. जरी शाळांकडे निधी मर्यादित असला तरीही त्यांनी विविध गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत सर्जनशीलपणे पोचवण्याचा विचार करण्यास हवा.
क्वीअर समुदायाचे प्रतीक ‘सप्तरंग’ मानले जाते. पालक, शाळा, मित्र, समाज हे त्यांतील एकेक रंगासारखे आहेत. या सप्तरंगांनी अनुकंपनेने एकत्र येऊन सर्व समाजात आनंदाचे आणि समतेचे इंद्रधनुष्य उमटावावे, बहरावावे.
(‘पुरुषस्पंदन’, दिवाळी 2019 अंकावरून
उद्धृत, संपादित-संस्कारित)
(छायाचित्रे इंटरनेटवरून साभार)
- रखमा हेमा श्रीकांत 9028080008 rakhmahs@gmail.com
रखमा या वंचितांचे शिक्षण आणि जीवन कौशल्यांचा विकास या संदर्भात अभ्यास करतात. त्यांनी मुंबईच्या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ येथून एम ए इन एज्युकेशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्या सध्या सातारा येथे स्थायिक आहेत.
- प्रियांश हिरुडकर priyanshirudkar@gmail.com
प्रियांश हिरुडकर यांनी मुंबईच्या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ येथून एम ए इन एज्युकेशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते सध्या 'पल्याड' या मराठी सिनेमाचे असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत. ते चंद्रपूरमध्ये वास्तव्यास असतात.
----------------------------------------------------------------------------------------------
2 टिप्पण्या
छान
उत्तर द्याहटवाक्वीअर लोकांविषयीची माहिती मिळाली.अशा लोकांना सहजतेने समजून घेण्याची भावना असावी.त्यांच्याविषयी तिरस्कार किंवा कमीपणाची भावना नसावी.अजूनही समाजात त्यांच्या विषयी खूप अज्ञान आहे.त्यांच्याविषयीची सखोल माहिती अभ्यासक्रमात असावी.
उत्तर द्याहटवा