अजात ही झाली जात (Ganpati - Bussing's Social reformer defeated by the Government)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

अजात ही झाली जात (Ganpati - Bussing's Social reformer defeated by the Government)

गणपती महाराज

जातिअंताची लढाई विदर्भात एका आध्यात्मिक महाराजाने शंभर वर्षांपूर्वी सुरू केली, तीही  स्वत:पासून. मंगरूळ दस्तगीर येथील (तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती) गणपती महाराजांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ते काम केले. त्यांची ओळख सुधारक संत म्हणूनच होती. त्यांचा काळ 1920 ते 1940 या दोन दशकांचा. त्यावेळी समाज अज्ञान, अंधश्रद्धा व गरिबी यांत खितपत पडला होता, गणपती महाराजांनी समाजातील जात, धर्म, रूढी, परंपरा, कर्मकांड यांविरूद्ध आवाज उठवला. समाजाच्या प्रत्येक प्रश्नाला कृतीतून उत्तर दिले. त्यांनी जात न मानणाऱ्यांचा 'अजात' संप्रदायच निर्माण केला! त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अठरापगड जाती-धर्मातील हजारो कुटुंबांनी त्यांच्या जातींची कवचकुंडले फेकून दिली आणि ते 'अजात' झाले! मात्र महाराष्ट्रात गणपती महाराजांचा समतावादी, सुधारणावादी इतिहास आजतागायत बेदखल राहिला आहे. शोकांतिका म्हणजे खुद्द शासनाने गणपती महाराजांच्या तिसऱ्या-चौथ्या पिढीला चक्क 'अजात' या जातीचे लेबल चिकटवले आहे आणि तो संप्रदाय अजात नावाच्या जातीच्या चौकटीत बंदिस्त झाला आहे! खुद्द गणपती महाराजांच्या वंशजांच्या जन्म-शाळा दाखल्यांवर जातीच्या रकान्यात 'अजात' म्हणून लेबल लागलेले आहे! अजात संप्रदायातील नवीन पिढी जात न मानणाऱ्यांच्या वंशातील आहे. तरी अजात म्हणून त्यांच्या वाट्याला आलेल्या विवंचना, त्यांच्या पूर्वजांनी जात न मानून गुन्हा केला की काय हा प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांना शिक्षणात, नोकरीत कोठे आरक्षण नाही की कोणत्या शासकीय योजनांचा लाभ नाही!


गणपती महाराजांनी मिश्र विवाहाची संकल्पना शंभर वर्षांपूर्वी रूजवून तिची अंमलबजावणी त्यांच्या अनुयायांकडून करून घेतली. त्यांनी स्वत: एका विधवेशी आंतरजातीय विवाह केला. मुलाचे लग्न दुसऱ्या जातीतील मुलीशी लावून दिले. पण त्यांच्या वंशातील मुलींना सून म्हणून सहज कोणी स्वीकारत नाही, तर मुलाच्या मुलाला कोणी मुलगी द्यायला बघत नाही! तो संप्रदाय अशा विचित्र द्वंद्वात अडकल्याने नाईलाजाने सांप्रदायिक पुन्हा त्यांच्या त्यांच्या मूळ जातींकडे वळू पाहत आहेत. त्यामुळे गणपती महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी केलेल्या सुधारणावादी कार्यावर पाणी फेरले जात आहे!

गणपती ऊर्फ हरी भबुतकर यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील काचनूर या गावात 1887 साली झाला. ते घोराडच्या केजाजी महाराजांच्या सात्रिध्यात आले आणि केजाजी महाराजांचे आवडते शिष्यही झाले. गणपती महाराजांनी तो भक्तिमार्ग 1900 ते 1915 पर्यंत अवलंबला. त्यांची आध्यात्मिक मांडणी भजन, कीर्तन, प्रवचन यांतून भक्ती आणि भक्तीतून मोक्ष अशी होती. गणपती महाराजांचे शिक्षण जेमतेम झाले होते. परंतु त्यांचे वाचन विविध होते. त्यांनी ज्योतिबा फुले यांचे साहित्य वाचून, त्या प्रेरणेतून सामाजिक वर्ण, द्वेष यांच्या अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला परिवर्तनवादी विचारांकडे नेण्यासाठी 1915 नंतरचे त्यांचे आयुष्य वाहून घेतले. ते मंगरूळ दस्तगीर येथे आल्यानंतर ते गावच त्यांची क्रांतिभूमी आणि कर्मभूमी झाली. त्यांनी गावात ब्राह्मण व सवर्ण समाज बहुजनांना, अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देत नाही, त्यांचा अनन्वित छळ करतो हे पाहिले. त्यांनी चळवळ अस्पृश्य, बहुजनांना ब्राह्मणांप्रमाणे समान वागणूक मिळावी म्हणून सुरू केली. त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेला बळ देणाऱ्या 'मनुस्मृती' ग्रंथावर सडकून टीका केली. ते म्हणतात, मनुस्मृतीची धडधड । होय ब्राह्मणी पिनलकोड ॥ त्यातील कलमा गोड । आहे सुगड रीतीच्या ॥

गणपती महाराजांनी सर्वप्रथम त्यांच्या घरात चुलीपर्यंत गावातील अस्पृश्य-दलितांना प्रवेश दिला. तो सन्मान राघवानंद माणिक, केजाजी व केकाजी इंगळे यांना मिळाला. नंतर त्यांची धडपड गावातील मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे यासाठी सुरू झाली. महाराजांच्या त्या कृतीने गावातील सवर्ण, ब्राह्मण खवळले. त्यांनी महाराजांना गावातून हुसकावून देण्याचा प्रयत्न केला. मात्र गणपती महाराजांनी थेट पंढरपूरहून विठ्ठलाची मूर्ती विकत आणली आणि त्यांच्या शेतात अस्पृश्यांच्या मदतीने मंदिर बांधून तेथे अस्पृश्य, बहुजन, दलितांच्या उपस्थितीत मूर्तीची प्रतिष्ठापना केली. मंदिर 11 नोव्हेंबर 1929ला गावातील सर्व लोकांसाठी खुले केले. त्याची व्यवस्थाही गावातील अस्पृश्य-दलितांकडे सोपवली. ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकून जीवे मारण्याचा कट रचला. मात्र महाराजांनी हार मानली नाही. तोपर्यंत ब्राह्मणेतर अनुयायी महाराजांच्या बाजूने उभे राहिले. सुधारणावादी विचारांचा विदर्भातील तो पहिला लढा. महाराजांनी जात आणि धर्म हेच समाजातील सर्व समस्यांचे मूळ आहे. तीच नष्ट केली पाहिजे हा विचार मांडला. ते म्हणतात, जातिभेद सारे मोडूनी जावेत । अभेद व्हावेत सर्व लोक ॥ गण्या म्हणे ऐसे भट याती मत | नाही ते दिसत मनातूनी ॥


गणपती महाराज त्यांचे विचार त्यांच्या कीर्तनातून गावोगावी मांडू लागले. सृष्टीत स्त्री आणि पुरूष या दोनच जाती असून, मानवता हा एकच धर्म आहे असे त्यांचे प्रतिपादन होते. त्यांनी मानवधर्माची पताका खांद्यावर घेऊन 'श्वेत निशाणधारी अजात मानवसंस्था' स्थापन केली. गणपती महाराजांनी स्वत: आंतरजातीय विवाह 1917 मध्ये केला, तो एका विधवेशी व अशा तऱ्हेने कृतीतून समाजाला उत्तर दिले. त्या निर्णयाला सवर्ण समाजाकडून विरोध झाला. त्यांना बहिष्कृत करण्यात आले. पण ते मागे हटले नाहीत. त्यांनी त्यांच्या विचारांची माणसे जोडली आणि जातिअंताची लढाई तीव्र केली. महाराजांनी मिश्र विवाहाला प्रोत्साहन दिले. मिश्र विवाह झाल्याशिवाय समाजातील जातिव्यवस्था नष्ट होणार नाही असे त्यांचे मत होते. त्यांनी त्यांच्या अनुयायांना मिश्र विवाहाची अटच घातली. महाराजांच्या मानवतावादी विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्या संपर्कात आलेल्या विविध जाती-धर्मांतील शेकडो, हजारो लोकांनी त्यांची जात कुटुंबांसह सोडली. मात्र त्या अनुयायी लोकांचा त्यांच्या गावात छळ सुरू झाल्याने त्यांनी त्यांचे बस्तान गणपती महाराजांच्या आधाराने मंगरूळ दस्तगीर गावात हलवले. ते गाव अजात संप्रदायाचे मुख्य केंद्र बनले. एकच जात मानवजात म्हणून त्या संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला. त्यात माळी, कुणबी, तेली अशा समाजांतील कितीतरी लोकांचा सहभाग होता. गणपती महाराजांनी त्यांच्या 'श्री पापलोप ग्रंथातून समाजातील रूढी-परंपरांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी हरीचा बीजमंत्र, अभंगवाणी, सहज सिद्धानुभव, हरिगीता अशी साहित्यसंपदा लिहून समाजाला सुधारणावादी विचार दिले.

त्यांनी स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य यांचा पुरस्कार केला. ते स्त्रियांनी नवऱ्याच्या नावाने मंगळसूत्र घालणे, कपाळावर कुंकू लावणे, जोडवी घालणे हे स्त्री दास्याचे प्रतीक आहे असे म्हणायचे. स्त्रियांची मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. स्त्रीला पाळीच आली नाही तर वंश वाढणार कसा? मग स्त्रीची पाळी ही विटाळ कशी होऊ शकते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून प्रतिगामी समाजमनावर आसूड ओढले. ते घरातील लक्ष्मीला पाळीचे चार दिवस घराबाहेर बसण्यास सांगणे हे भिकारचोटपणासोबतच हिंस्र आणि निर्दयीपणाचे कृत्य आहे असे परखडपणे सांगत.

त्यांनी मृत्यूनंतरच्या कर्मकांडावरही टीका केली. श्राद्ध, पितृपक्ष यांवरचा त्यांचा त्या काळातील शाब्दिक हल्ला त्यांच्या धाडसी विचारांची साक्ष पटवणारा आहे. ते म्हणतात, मृत वडील देहहीन, कैसे श्राद्धाचे भोजन ।  कराया येती स्वर्गातून, कैसे अन्न खाती ॥  मृत गाया दूध देईना, ऐसा ठरावच जाणा ।  तेसच वडील येईना, तळी भोजना वरून ॥

अजात संप्रदायातील स्त्री-पुरूष श्वेत वस्त्रे परिधान करतात. कपाळावर पांढरे गंध लावून पांढरा ध्वज घेऊन फिरतात, कारण पांढरा रंग हा सर्व रंगांचे मूळ असण्यासोबतच शांतीचे प्रतीक आहे असे गणपती महाराजांनी त्यांच्या अनुयायांना सांगितले. त्या संप्रदायातील कुटुंबे सर्व प्रसंगांत पांढरा रंग हमखास वापरतात.

गणपती महाराजांनी सावरकर (रत्नागिरी, 1927) आणि साने गुरूजी (पंढरपूर, 1947) यांच्याही पूर्वी अस्पृश्य व दलित यांच्यासाठी सत्याग्रह केला, पंरतु त्यांची नोंद इतिहासात झालेली नाही! गणपती महाराज सामाजिक समरसतेसाठी काम करत आहेत आणि त्यांनी गावातील विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले केले आहे ही वार्ता त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत सुद्धा पोचली. आंबेडकरांनी गणपती महाराजांच्या कार्याची दखल घेतली. अमरावती येथील 'अखिल भारतीय ब्राह्मणेतर बहिष्कृत परिषदे'चे (1925) अध्यक्षपद गणपती महाराजांना मिळाले. गणपती महाराजांच्या पुढाकाराने मंगरुळ दस्तगीर येथे वऱ्हाड मध्यप्रांत बहिष्कृत समाज परिषदेचे (1929) अधिवेशन झाले. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष विराटचंद्र मंडल हे होते, तर पंजाबराव देशमुख, पंढरीनाथ पाटील आदी सुधारणावादी नेते त्या अधिवेशनाला उपस्थित होते. गणपती महाराजांनी प्रबोधनाचे काम अस्पृश्यता निवारण, स्त्री स्वातंत्र्य, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, आंतरजातीय विवाह, सामूहिक विवाह मेळावे, अन्न काला अशा विविध क्षेत्रांत केले. पण गणपती महाराजांनी त्यावेळी शेती आणि शेतकरी यांचे महत्त्व अधोरेखित केले होते. ते म्हणतात, शेतकऱ्याविन जास्त, कोणाचेच काम चालेना ।  सर्व शेतकरी-शेतकरी म्हणा, लागा भजना त्याच्याच ॥ शेत म्हणजे शरीर, जीव होय शेतकरी । तो नसल्या व्यवहार, कैसा होणार जगाचा ॥

गणपती महाराजांनी अन्नदात्या शेतकऱ्याशिवाय जगराहाटी चालणार नाही, हे वास्तव मांडले. गणपती महाराजांचे निधन 19 जून 1944 रोजी झाले.

चैतन्य प्रभू आणि श्याम महाराज गणपती महाराज यांचे हयात असलेले नातू श्याम महाराज यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जातीच्या रकान्यात अजात अशी नोंद करण्यात आली आहे.

तो संप्रदाय त्यांच्या निधनानंतर बेदखल झाला. गणपती महाराजांची मुले ज्ञानेश्वरदादा, सोपान महाराज यांच्यासह श्याम महाराज, चैतन्यप्रभू महाराज, पंढरीनाथ निमकर यांनी त्यांचे कार्य पुढे नेण्याचे प्रयत्न केले. परंतु जातीचे जोखड नाकारणाऱ्या अजात संप्रदायाचा मार्ग अनेक संकटांनी व्यापला गेला. 'अजात' शिक्का बसल्याने कोणत्याच जाती-धर्माचे लोक त्या संप्रदायाला त्यांचा मानण्यास तयार नाहीत. अनेकांनी त्यांच्या मूळ जाती शोधून सरकारला माफीनामे लिहून दिले व त्यांच्या त्यांच्या जातींचे दाखले तयार केले. जातनिहाय जनगणना हवी की नको हा वाद टिपेला पोचला असताना जात न मानणारा तो संप्रदाय पुन्हा जातीच्या जोखडात अडकावला जाऊ लागला... प्रशासनाने त्या काळात व्यवस्थापकीय सोयीसाठी 'अजात' ही जात असल्याचा जावईशोध लावला. संप्रदायातील असंख्य विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दाखल्यावर 'अजात'ची 'जात' म्हणून नोंददेखील केली गेली! पण अजात ही नोंदणीकृत जात नसल्याने गणपती महाराजांच्या वंशजांसह अजात संप्रदायातील लोकांची शाळाप्रवेशापासून नोकरीपर्यंत सर्वत्र अडवणूक होते. मंगरूळ दस्तगीर व लगतच्या गावांमध्ये अजात संप्रदाय वास्तव्यास आहे. त्या संप्रदायाची गुजराण मोलमजुरी व छोटेमोठे व्यवसाय करून सुरू असते. गणपती महाराजांचे नातू, पणतूही त्याच गावात आहेत. त्या कुटुंबाची रोजीरोटी भाजीविक्रीच्या व्यवसायावर सुरू आहे. गणपती महाराजांचे कार्य सुरू राहवे म्हणून गावात श्वेतनिशाणधारी अजातीय मानवसंस्था हा ट्रस्ट स्थापन करण्यात आला. गावात गणपती महाराजांचे मंदिर असून तेथे जन्मोत्सव, पुण्यतिथी या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात.

गणपती महाराजांची पणती सुनयना हीसुद्धा शासनाच्या निर्णयाची बळी ठरली. सुनयनाने शासनाच्या या बेपर्वाईविरूद्ध आवाज उठवण्यासाठी लढा उभारला आहे. त्यासाठी जात न मानणाऱ्यांना पुन्हा गणपती महाराजांच्या विचारांनी एकत्र आणून तिने निर्जातिकरणाचे काम सुरू केले आहे. त्यासाठी ती महाविद्यालयांमध्ये फिरून, व्याख्याने देऊन अजात संप्रदायाचा विचार तरूणाईसमोर मांडत आहे. सुनयनाचे वडील आणि गणपती महाराजांचे नातू श्याम महाराज यांनीही अजात संप्रदाय शासकीय स्तरावरून मिटवण्यात येत असल्याचा आरोप केला.

मंगरूळ दस्तगीर येथे दिवाळीनंतर कार्तिक पोर्णिमेला मोठी यात्रा भरते. त्या यात्रेत सर्व अजात संप्रदाय एकत्र येतो. त्या यात्रेतूनच सुनयनाने पुन्हा सर्वांना संघटित करून 'विचार तोच, दिशा नवी' म्हणत तिचा लढा सुरू केला आहे. ती म्हणते, आडनावावरून संबंधित व्यक्तीची जात कोणती याचा अंदाज सुशिक्षित आणि अडाणी लोक घेतात. त्यातूनच जातिपातीचे राजकारण सुरू होते आणि समाज विखुरला जातो. जातिधर्माचा आधार घेऊन दंगे भडकावले जातात. हे चित्र विवेकवादी तरुणाईच बदलू शकते. त्यामुळे तरुणांच्या सहकार्याने गणपती महाराजांचे अजात कार्य पुढे नेण्याचा विश्वास तिने व्यक्त केला. माझे पणजोबा गणपती महाराज यांनी जो संदेश त्यांच्या कृतीतून शतकापूर्वी दिला त्याचे अनुकरण करण्याची हीच वेळ योग्य आहे. त्याची सुरूवात मी स्वत:पासून केली आहे. मी माझ्या माहेरच्या, सासरच्या, दोन्ही आडनावांची बिरूदावली काढून टाकली आहे. आता माझी ओळख केवळ 'सुनयना अजात इतकीच आहे! गणपती महाराज म्हणतात, मानवाचा धर्म एकच मानव । सर्व भावे देव मिळविण्याचा ॥ ठेवा समान करून ॥  धर्मबाबी सर्व जन ॥

या कार्याचा प्रसार आणि प्रचार यासाठी सुनयनाने यवतमाळला 'समर्पणनावाची संस्था स्थापन केली आहे.

सुनयना 8275289455 yeotkarsunayana@gmail.com

('मीडिया वॉच’वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)

- नितीन पखाले 9403402401 archneet@gmail.com

नितीन पखाले हे यवतमाळ लोकसत्ताचे जिल्हा वार्ताहर, दैनिक विदर्भ मतदार आवृत्तीचे संपादक आणि मीडिया वॉच या पोर्टलचे सहसंपादक आहेत. त्यांनी यवतमाळ येथे शब्दयात्राही वाचन चळवळ आणि उबुंटुया निसर्गशाळेची स्थापना केली आहे.  त्यांनी मुंबईत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात काम केले आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------


-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या