सुरेश लोटलीकर हा हौशी व्यंगचित्रकार आहे. त्याचे विचार प्रगल्भ असतात आणि टिप्पणी मार्मिक. त्यामुळे तो अचूक वर्म पकडून व्यक्तीचे वा घटनेचे मर्म सूक्ष्मतेने चितारून टाकतो. त्या दृष्टीने त्याची राजकीय व्यंगचित्रे व अर्कचित्रे पाहण्यासारखी आहेत. मराठीत अर्कचित्रे काढणाऱ्यांची मोठी परंपरा आहे. ती दलाल-ठाकरे यांच्यापासून सुरू होते. प्रभाकर भाटलेकर व लोटलीकर यांनी त्या प्रकारांत रेखाटनाची वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण शैली विकसित केली. पैकी भाटलेकर यांनी दैनिकांत काम केल्यामुळे त्यांना त्यांची कला हुकमी राबवावी लागली. लोटलीकर हौशी चित्रकार आहे आणि त्याची कला तो नोकरीतून निवृत्त झाल्यावर व संगणक आल्यानंतर बहरली. त्यामुळे ती बहुरंगांनी खुलली. किंबहुना, त्याच्या अर्कचित्रांमध्ये रेषांचा खेळ जेवढा सूक्ष्मपणे व्यक्त होतो तेवढे रंगछटांचे विभ्रम हळुवारपणे बोलतात. लोटलीकर याची आणखी खासीयत म्हणजे त्याने तो प्रकार कलात्मक पातळीवर नेला. त्याची चित्रे व्यक्तिवैशिष्ट्य टिपत असतातच, परंतु त्याचबरोबर ती संबंधित व्यक्तिमत्त्वांपेक्षा विशाल रूपात व्यक्त होतात – जणू ‘झूम’ होतात, म्हणा ना! अर्कचित्रांची परंपरा गेल्या पंचवीस वर्षांत बरीच पुढे गेली आहे. काही व्यंगचित्रकार ती कला चोखंदळपणे हाताळताना दिसतात. त्यामध्ये प्रभाकर वाईरकर, निलेश जाधव, सतीश उपाध्ये या आजच्या व्यंगचित्रकारांचा उल्लेख करावा लागेल. लोटलीकर यास विचारसरणी आहे. तशी ती प्रत्येक व्यक्तीला व कलाकाराला असतेच; किंबहुना, त्याखेरीज माणसाच्या विचारक्षमतेला अर्थ उरत नाही. पण लोटलीकरची विचारसरणी जाणती व परिपक्व आहे. लोटलीकर गेल्या पन्नास वर्षांच्या पुरोगामी विचारवर्तुळात वाढला. त्याने वयाची पंच्याहत्तरी डिसेंबर 2018 मध्ये पार केली (जन्मदिन – 2 डिसेंबर 1944). तो मेकॅनिकल ड्राफ्ट्समन म्हणून फिलिप्स कंपनीत नोकरीला लागला. त्याने तेथील युनियनमध्ये काम केले. तो चळवळ्याच होता. त्यामुळे त्याचा मोर्चे-संप-बंद यांचा अनुभव दांडगा होता. माणूस शहाणा असेल तर जमावाच्या अशा कृतींतून फार शिकतो. लोटलीकर याने ते शहाणपण दाखवले. त्याने कामगार कायदे जाणून घेतले व त्याच्या कामगारकृतीला अर्थ दिला. त्याने निवृत्तीनंतर अनेक कामगारांची प्रकरणे, एकीकडे चित्रकलेचा ध्यास घेतलेला असताना धसास लावली. अशा समयी माणसाची कला आणि कृती, दोन्ही कसोटीला लागतात. लोटलीकर त्या कसोटीला वेळोवेळी उतरला आहे. लोटलीकर याने हॅम्लेट-2020 या नावाचे नाटक लिहिले आहे. त्या नाटकाला सध्याच्या न्यायालयीन प्रक्रियेची पार्श्वभूमी आहे.
लोटलीकर याच्या समाजातील सहज वावरामुळे त्याच्या कलेचे मोठेपण ध्यानी येत नाही. परंतु जगभरची व्यंगचित्रकला जाणलेला, त्या संदर्भात मराठी व्यंगचित्रकलेचे वैशिष्ट्य कळलेला आणि खुद्द चित्रकार असलेला मराठीत तो एकच माणूस. त्याने जागतिक व्यंगचित्रकलेचे संदर्भ देत महाराष्ट्रातील त्या कलेचे सामर्थ्य व तिच्या मर्यादा सांगणारे सदर लेखन साप्ताहिक सकाळमध्ये एक वर्षभर केले. त्या लेखनातून त्याच्या व्यंगचित्रकलेतील व्यासंगाचा प्रत्यय येतो. तो केवळ चित्रकार नाही, तर त्याने त्या कलेचा अभ्यास केला आहे हे जाणकारांच्या त्यानंतर लक्षात आले. वसंत सरवटे यांच्या चित्रांमुळे मराठी सुशिक्षित जनांना व्यंगचित्रकलेचे मर्म कळू लागले. महाराष्ट्र टाइम्समधील आर.के. लक्ष्मण आणि ‘मार्मिक’मधून बाळ ठाकरे यांनी व्यंगचित्रांतील उपहास मुख्यत: प्रकट केला, तोही त्या सुशिक्षित जनांपर्यंत पोचत राहिला. परंतु मराठी वाचक पुरेसा जिज्ञासू नाही हे पुन्हा एकदा लक्षात आले. तो या काही ठरावीक नावांच्या पुढे गेला नाही. व्यंगचित्रांचे अभ्यासक तर सरवटे सरवटेच करत राहिले आहेत. सरवटे यांच्यासंबंधी नऊ पुस्तके मराठीत आहेत!
लोटलीकर व्यंगचित्रातील विधायकता जाणीवपूर्वक आचरणारा बहुधा एकमेव कलाकार असावा. त्याने निवृत्तीनंतर तीन महत्त्वाचे प्रकल्प केले. एक म्हणजे सर्व मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांची अर्कचित्रे काढली. त्याची ती ‘लोकसत्ते’तील मालिका गाजली. नंतर त्या कृतींची काही ठिकाणी प्रदर्शनेही भरली. पैकी पुणे येथील बालगंधर्व कलादालनात भरलेले प्रदर्शन विशेष गाजले. दोन - त्याने ‘पुलं आणि आम्ही’ नावाचे व्यंगचित्रांचे मार्मिक पुस्तक लिहिले व चितारले आहे. त्यातील पुल दांपत्याची चित्रे व त्याखालील मार्मिक भाष्य पाहून-वाचून पुल-सुनिताबाई व मराठी समाज यांचे सुखद व सूक्ष्म दर्शन होते. त्यामधून वाचकांच्या मनावर नकळत कोरला जाणारा आशय महत्त्वाचा. तो पुलंचे या समाजातील स्थान दर्शवून देतो. तीन - लोटलीकर महात्मा गांधी यांच्या प्रेमात अनेक वर्षे आहे. त्याने वेळोवेळी त्यांची अर्कचित्रे काढली आहेत, परंतु तो गांधीजी यांच्या दीडशेव्या जन्मदिनापासून (2019) तशी चित्रे काढत सुटला आहे. गांधीजीवनातील वेगवेगळ्या प्रसंगानिमित्ताने लोटलीकर याच्या कुंचल्यातून निघालेले उद्गार आहेत ते. ती संख्या इतकी वाढत चालली आहे, की ना गांधीजींचे जीवनप्रसंग संपत, ना लोटलीकर याची बुद्धी व त्याचा हात थकत. त्याच्या गांधीचित्रांनी त्याचे घर भरले जाईल बहुधा! लोटलीकर संगणक आला तेव्हा त्यावर चित्रे खूप रेखाटत असे. परंतु त्याला जे रंगछटांचे खेळ करायचे असत त्यास संगणक कमी पडे. म्हणून त्याने संगणकाच्या सहाय्याने चित्रांकन एका टप्प्यावर बंद केले आणि तो हात व कुंचला यांच्या मदतीने रेखाटने व रंगकाम करू लागला. लोटलीकरने आता, 2 ऑक्टोबर 2020 या गांधी जयंतीच्या दिवशी संकल्प केला आहे, की 30 जानेवारी 2021 या गांधी स्मृतिदिनी गांधीजींबाबतचे त्याचे सारे काम लोकांसमोर मांडायचे! त्या दृष्टीने आम्ही मित्रांनी त्याचा पाठपुरावा करण्याची तयारी ठेवली आहे. लोटलीकरचे एकूण काम वेब साइटच्या माध्यमातून मांडायचा बेत आहे. लोटलीकर याची काही निरीक्षणे –
· व्यंगचित्रांबद्दलची समजूत वाढवण्यासाठी महाराष्ट्रात काही मंडळींनी गेल्या पन्नास वर्षांत विशेष प्रयत्न केले. त्यामध्ये वसंत सरवटे, मधुकर धर्मापुरीकर (नांदेड), शकुंतला फडणीस, मनोहर सप्रे (चंद्रपूर) यांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यास हवा.
· व्यंगचित्र, हास्यचित्र, अर्कचित्र, नि:शब्द की सशब्द व्यंगचित्र अशा विविध प्रकारांबाबत वेगवेगळी निरीक्षणे असतात, वाद झडतात. ते निरर्थकही असतात, कारण चांगले, अर्थपूर्ण चित्र कोणत्याही चांगल्या कलाकृतीप्रमाणे लोकांपर्यंत पोचतेच पोचते. अर्थात वाद निरर्थक असले तरी आवश्यक आहेत, कारण त्यामधून तत्त्वबोध होत जातो हे सनातन सत्य आहे.
· ख्याल गायकाला तीन मिनिटांचे गाणे गाण्याची आस असते, तशा प्रकारे प्रत्येक मोठ्या चित्रकाराला व्यंगचित्र काढण्याची ओढ असतेच असते.
· व्यंगचित्र समजते – न समजते हा वाद अलाहिदा; व्यंगचित्र लोकांना भुरळ घालते हे नक्की, अन्यथा प्रत्येक दैनिक, नियतकालिक व्यंगचित्र छापते ना. माणसाला त्याचा स्वत:चा सुदृढपणा जसा हवा असतो, तसे त्याचे उणेपण जाणून घेण्याचेही औत्सुक्य असते; किंबहुना ती त्याची पूर्णतेची आस असते. व्यंगचित्र माणसातील ती उणीव अचूक दाखवते आणि म्हणूनच कार्टून, कार्टून फिल्म, अॅनिमेशन या गोष्टी विकसित होत व विस्तारत गेल्या आहेत.
· व्यंगचित्र समजावून सांगण्याकडे वाढता कल आहे, परंतु व्यंगचित्र म्हणजे सुडोकूसारखे कोडे नव्हे, की ते सोडवावे. ते वाचकास समजते, समजत जाते.
सुरेश लोटलीकर 99200 89488 lotlikars@gmail.com
- दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत.)
----------------------------------------------------------------------------------------------
3 टिप्पण्या
लोटलीकरांची आणखी ८-१० व्यंगचित्रे, अर्कचित्रे या लेखात दिली असती तर बहार आली असती, त्यांना शुभेच्छा!
उत्तर द्याहटवामस्त लेख.
उत्तर द्याहटवालिखाणात चित्रकला आणि कलेचं महत्व अधोरेखित जाते आहे
उत्तर द्याहटवा