भारतीय गूढ तत्त्वज्ञानाने पाश्चिमात्य जगाला नेहमीच भारून टाकले आहे; तसेच, कुतूहल भारतीय जादूटोणा, तांत्रिक-मांत्रिक, साधू-फकीर यांनी तेथे निर्माण केले आहे. पाश्चिमात्य व्यंगचित्रांत राजकीय आणि सामाजिक, या दोन्हींमध्ये भारतीयांचे प्रतिनिधीत्व वाघ, हत्ती आणि मोर यांनी केले आहे; तसेच, ते दोरखंडाचा साप बनवणारी ‘इंडियन रोप ट्रिक’, नग्न साधू, विलासी राजे-महाराजे, खिळ्यांच्या बिछान्यावर झोपून तपश्चर्या करणारे फकीर यांनीही केले आहे. पण अखिल आधुनिक पाश्चिमात्य जगावर मोहिनी घालणारा खराखुरा ‘नंगा फकीर’ म्हणजे मोहनदास करमचंद गांधी! महात्माजींना ‘नंगा फकीर’ ही पदवी दिली, ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नसे अशा इंग्लंडच्या अत्यंत प्रभावी पंतप्रधानांनी, म्हणजे चर्चिल यांनी. त्या ‘नंग्या फकीरा’ने भारतीय जादूचा जो प्रयोग केला त्याने जगभरच्या राजकारणी, अर्थकारणी, समाजकारणी, ज्ञानी, विद्वान, विचारवंत, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, कलाकार आणि कलावंत अशा सर्वांनाच विचार करण्यास भाग पाडले. दुष्ट, दुर्जन, गुंडांचे राखीव खासगी कुरण गणल्या जाणाऱ्या राजकारणात एक किरकोळ माणूस येतो, सत्य-अहिंसेचे व्रत घेतो, स्वत: ते काटेकोरपणे पाळतोच आणि त्याच्या लक्षावधी अनुयायांना आचरणात आणण्यास लावतो; हा विरोधाभास देशोदेशीच्या व्यंगचित्रकारांना वर्षानुवर्षे व्यंगचित्रे काढण्यास विषय देऊन गेला होता. म्हणून चित्रपटातील महान व्यंगचित्रकार चार्ली चॅप्लिन आणि व्यंगचित्रकलेतील महनीय व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांना गांधीजी यांची प्रत्यक्ष भेट घेणे आवश्यक वाटले.
महात्माजींवर जगभर प्रसिद्ध झालेल्या चित्रांपैकी काही निवडक व्यंगचित्रांचा संग्रह नवजीवन प्रकाशन मंदिरने (अहमदाबाद) ‘गांधी व्यंगचित्र संग्रह’ (Gandhi in Cartoons) या नावाने 1969 साली प्रसिद्ध केला. तो अर्पण ‘जगातील व्यंगचित्रकारांना’ केला आहे. गांधी स्मारक निधीने महात्माजींवर व्यंगचित्रांचे प्रदर्शन 1969 साली भरवले होते. त्याचे उद्घाटन प्रसिद्ध अशा ‘पंच’ मासिकाच्या संपादकांनी केले होते. त्या प्रदर्शनावरून या पुस्तकाची कल्पना सुचली आणि निर्मिती झाली.
महात्माजी आणि त्यांचे तत्त्वज्ञान म्हटले, की सर्वसाधारण समजूत अशी असते, की त्यांचे विनोदाशी वावडे असणार; परंतु महात्माजी त्यांच्या मार्मिक विनोदाबद्दल प्रसिद्ध होते. मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी त्यांना कोणीतरी टोकले, की मिठाशिवाय जेवण बेचव लागेल. त्या वेळी महात्माजींचे उत्तर होते, ‘चव मिठाला नसते, जिभेला असते.’ गांधीजींचे असे अनेक चुटके गाजलेले आहेत. ‘लोकमान्य ते महात्मा’ या पुस्तकात सदानंद मोरे यांना ‘महात्माजींचा विनोद’ असा स्वतंत्र लेख लिहावा लागला यात आश्चर्य नाही.
तिसरे चित्र प्रसिद्ध व्यंगचित्रकार रेनॉल्डस यांनी 1931 साली काढलेले. चर्चिल आणि महात्माजी ही जोडी विनोदाला असंख्य विषय पुरवणारी. गांधीजींच्या विनोदाची एक तऱ्हा तर चर्चिल त्यांच्या फटकळपणासाठी आणि हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध. दोघेही अगदी भिन्न प्रकृती. त्यामुळेच त्यांच्या वेषांतराची कल्पना रेनॉल्डस याला सुचली असावी. त्याच्या या चित्रातील तपशील स्पष्ट आहेत. उदाहरणार्थ, चर्चिलच्या डोळ्यांतील भाव! ते कसे फसल्याचे आणि रूसल्याचे आहेत.
- सुरेश लोटलीकर 99200 89488
(सकाळ, सप्तरंग रविवार पुरवणी 1 ऑक्टोबर 2006 सीमारेषेपार या सदरावरून उद्धृत, संपादित-संस्कारित )
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
2 टिप्पण्या
अर्कचित्र संवाद या लेखात उलगडत जातोय
उत्तर द्याहटवाछान लेख.
उत्तर द्याहटवा