रामदासांची रामोपासनेतून बलोपासना (Saint Ramdas & His Work)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

रामदासांची रामोपासनेतून बलोपासना (Saint Ramdas & His Work)


समर्थ रामदास स्वामी हे संत पंचायनातील ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्या मालिकेतील त्यांच्याच तोडीचे समर्थ रामदास स्वामी हे संत होत. रामदास हे रामाचे दास होते. ते समर्थ होते, म्हणजे ते बलवान, प्रभावी, शक्तिशाली, कर्तृत्ववान असे पुरुषार्थी होते. त्यांचा आदर्शही कोदंडधारी, शूर, रणवीर, अजिंक्य योद्धा श्रीराम होता. तो जन्मभर दुष्ट प्रवृत्तींशी निकराने लढला, त्याने अनेक दुरितांवर विजय मिळवला.
रामदासांचे मूळ नाव नारायण. रामदास ज्या ठोसर घराण्यात जन्माला आले होते, ते सूर्योपासक घराणे होते. रामदासांचा जन्म रामजन्माच्या दिवशी आणि त्याच जन्मवेळेला मराठवाड्यात जांब येथे झाला. रामदासांच्या घरातील संस्कार तपश्चर्येचे आणि रामोपासनेचे होते. रामदासांना मारतीच्या मंदिरात ध्यानस्थ असताना रामानेच मंत्रोपदेश दिला आणि श्रीराम हेच त्यांचे गुरु झाले. रामाने त्यांना हनुमंताच्या स्वाधीन केल्यामुळे ते बलोपासकही झाले. त्यामुळेच नारायण रूपातील रामदास वयाच्या मानाने लवकर विचारी व परिपक्व बनत गेले. ते आईच्या आग्रहाखातर बोहल्यावर उभे राहिले. त्यांनी तसा शब्द आईला दिला होता. तो त्यांनी पाळला. मात्र त्यांनी सावधानहा शब्द ऐकताच, सावध होऊन बोहल्यावरन पलायन केले.
त्यांनी गायत्रीचे पुरश्चरण नाशिकजवळील टाकळी या गावी बारा वर्षे केले आणि त्यांनी रामनामाचा जप तेरा कोटी केला. त्यांनी बलोपासनेची सुरुवात स्वतःपासून केली. समर्थ स्वतः रोज बाराशे सूर्यनमस्कार घालत असत. समर्थांनी सूर्योपासनेच्या माध्यमातून तेजाची उपासना आणि आराधना केली. त्यामुळे त्यांचे मन, मनगट आणि मेंदू हे तिन्ही बळकट झाले. समर्थांनी त्या साधकावस्थेत असताना, करुणाष्टकांची रचना केली. ते श्रीरामाच्या दर्शनासाठी घरदार सोडून बाहेर पडले होते. परंतु श्रीरामाचे दर्शन होना. समर्थांनी त्या औदासिन्याच्या अवस्थेत रघूनायका काय कैसे करावे।से श्रीरामालाच विचारले. समर्थांची ती आर्त आणि उत्कट प्रार्थना ऐकली. त्यांना सगुण श्रीरामाचा साक्षात्कार झाला. त्यांना त्रैलोक्यनायक राम सन्मुख, चहकडे आणि अंतरातही दिसला!
त्यानंतर, ते देशाटनासाठी बाहेर पडले. वाटेत त्यांना शिखांचे धर्मगुरू भेटले. त्यांनीदेखील स्वसंरक्षणासाठी आणि धर्मरक्षणासाठी शस्त्रसज्ज असण्यास हवे असे रामदासांना सांगितले. त्यांना देशात फिरत असताना, विविध भागातील लोकांचे जीवन, सर्वत्र दुर्भक्ष्य, रोगराई, लाचारी, गरिबी, अज्ञान, बुवाबाजी, लोकांचे दैन्य, अगतिकता असे सारे दिसूआले. त्यांच्या मनाला कमालीच्या यातना झाल्या. ते कळवळून उद्गारले, निशिदिनी चिंतेमुळे, अंतरी कोंडमारा। रामदासांना तेव्हाच समाज उन्नत करण्यासाठी मठांची आवश्यकता जाणवली. त्यांनी त्यांचे मठ शक्य झाले त्या त्या ठिकाणी स्थापन केले; मठांवर महंतांची नियुक्ती केली.
समर्थांचा आध्यामिक आधिष्ठानावर विश्वास होता. ते जाणूनच समर्थांनी कोदंडधारी रामाचे अधिष्ठान निश्चित केले. त्यांनी सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे। परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥हा मंत्र दिला. त्यांनी श्रीरामाचे मंदिर चाफळ येथे शके 1570 मध्ये उभारले. समर्थांना असुरांचा विनाश करून रामराज्य स्थापन करणारा श्रीराम आणि त्या कामी त्यांना साहाय्य करणारा हनुमान या दोहोंचेही आकर्षण होते. समर्थांनी त्यांच्या पंथाला मारुतीच्या उपासनेचा जो क्रम लावून दिला तो बुद्धी, बळ, धैर्य, निर्भयत्व, आरोग्य, निरलसता आणि वाक्पटुत्व हे मारुतीच्या अंगी असणारे गुण उपासकाच्या अंगी यावेत याकरताच. त्यांनी सावध, साक्षेपी आणि कायम दक्ष रण्ास हवे हा संदेश समाजाप्रत पोचवला. ते ज्या गावात जात असत, तेथील तरुणांना एकत्र करून गोमयापासून हनुमंताची मूर्ती बनवण्ास त्याना मदत करत. बलोपासनेचे महत्त्व तरुणांना सांगत. तत्कालीन परिस्थितीविषयी तरुणांच्या मनात जागृती निर्माण करत. त्यांनी भीमरुपी महारुद्राहे स्फूर्तिदायक स्तोत्र रचले. ते स्तोत्र सर्वांना उपासनेच्या वेळी म्हणण्ास सांत.
त्यांना श्रीराम आणि मारुती यांच्या उपासनेने जे अनुभव आले होते, जे अपार धैर्य आले होते, त्यांचा परिचय ते रामोपासकांना करून देत. त्यांनी अनुयायांच्या ठिकाणी निर्भयता आणि आत्मविश्वास उत्पन्न करण्याकरता मनोबोधाची रचना केली. त्यांनी त्यांच्या मनाला केलेला बोध हा प्रत्येक रामभक्ताने त्याच्या मनाला करावा असा त्यांचा हेतू होता. त्याबरोबरच समर्थांनी स्वदेशातील नाना पंथ, नाना संप्रदाय, नाना तत्त्वज्ञाने व तत्त्वप्रणाली, धार्मिक संघटनांमधील मतभेद, वादविवाद याविषयीदेखील चिंतन केले आहे. समर्थांची चौकस वृत्ती त्यातून दिसून येते. रामदास हे नुसतेच ईश्वरभक्तीचा प्रसार व प्रचार करणारे सर्वसामान्य साधू नव्हते. ते वास्तववादी समाजचिंतन करू, धर्मरक्षणासाठी प्रत्यक्ष कार्य करणारे, समाजाला तेजस्वी, पुरुषार्थी, कृतीशील, बलशाली बनवणारे अध्यात्मवीर होते. समर्थ हे स्वयंनिर्मित, स्वतंत्र, स्वयंप्रज्ञ, तेजःपुंज, निर्भय असे एक ओजस्वी व्यक्तिमत्त्व होते. ते खरोखर समर्थ होते, कारण त्यांचे सामर्थ्य मोजण्यापलीकडी होते.
- सुजाता रिसबूड-बापट 9420481491
sujatabapat20@gmail.com 
सुजाता रिसबूड-बापट यांचे एम.ए, बी.एड, एम.फिल‌ आणि पीएचडीचे शिक्षण झाले आहे. त्यांनी 'उपनिषदांतील संवाद पद्धती' या विषयावर पुणे विद्यापीठाची विद्यापती ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी सांख्यदर्शनातील सत्कार्यवाद ह्या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली आहे. त्या दासबोध अभ्यासक आहेत. त्या ज्ञान प्रबोधिनीची पुरोहिता म्हणून कार्य करतात
, त्या आध्यात्मिक विषयांवर लेखन करतात. त्यांना काव्यलेखनाची व वाचनाची आवड आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या

  1. सुंदर लेख. पण संत रामदास स्वामींनी केवळ महाराष्ट्रक्षनव्हे देशातील अनेक राज्यात मठ स्थापन केले. या उल्लेख असायला हवा होता. अकरा मारुती मंदिरांचाही उल्लेख कुठे तरी गावांच्या नावांसह यायला हवा.

    उत्तर द्याहटवा