
शिरपूर गावात पुरातन टेकडी असून भोवताली हिरवीगर्द वनराई आहे. टेकडीची उंची दीडशे फूट आहे. टेकडीवर
गोंडकालीन भुयार होते. ते
बंद करण्यात आले आहे. त्याला गावातील लोक ‘गोटा दरवाजा’ असे म्हणतात. टेकडीवर पंचवीस- तीस वर्षांपूर्वी महादेवाची मूर्ती भग्नावस्थेत सापडली होती. तिला
कारागिरांनी योग्य रूप देऊन, गावकऱ्यांच्या
मदतीने तिची विधिवत पूजा केली. नंतर
मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. तो परिसर
मध्य प्रदेशातील पचमढी येथील मोठ्या
महादेवासारखाच दिसत असल्यामुळे त्या परिसरातील रहिवासी त्याला ‘गरिबांची पंचमढी’ असे म्हणतात. शिरपूर
गावाच्या आजुबाजूला काही प्रसिद्ध मंदिरे आहेत. वरझडीचे हेमाडपंती अंबादेवीचे
मंदिर, जुगादचे महादेव मंदिर आणि चिखली, गोडगाव व वानोजा
येथील देवीची मंदिरे; त्याखेरीज मंदर
या गावातील सातवाहन, शालिवाहन आणि वाकाटक यांच्या काळात
खोदलेली लेणी ही मोठी आकर्षणे आहेत. शिरपूर या गावाला ऐतिहासिक वारसा आहे. चांदागडला (चंद्रपूर) पाचशे वर्षांचा इतिहास आहे. गोंड राजांनी चांदागड हे
राजधानीचे शहर केले. त्यामुळे त्यांच्या राज्याचा मोठा विस्तार झाला. चंदनखेडा, रामदेगी, सुरजागड, टीपागड
पवणीचा किल्ला, यवतमाळ जिल्ह्यातील माहुरगड, कायर, शिरपूर, कळंबचे
क्षेत्र इत्यादी परिसर चांदागड राज्याच्या अधिपत्याखाली होता. कालांतराने,
चांदागडचे एकाधिकार राज्य संपुष्टात आले आणि काही गोंड राजांनी स्वातंत्र्य घोषित
केले. त्यात शिरपूरची गढीपण होती.
चंदनखेड्याचे गोंड
राजे गोविंदशाह यांचे सोयरीक संबंध शिरपूरच्या राजघराण्याशी होते. शिरपूरचे राजे
गोविंदशाह यांची मुलगी शिरपूरचे गोंडराजे कन्नाके यांना दिली होती (नाव ज्ञात
नाही). शिरपूरच्या गढीला शिरपूरचा किल्ला म्हणतात; तो किल्ला वाकाटक, सातवाहनकालीन आहे. त्या
किल्ल्यावर गोंड राजांची सत्ता पाचशे वर्षें होती. किल्ल्याचे क्षेत्रफळ अंदाजे वीस
हजार चौरस फूट आहे. किल्ल्याची तटबंदी मध्यम आकाराच्या दगडांनी बांधलेली आहे.
बांधकामात विशिष्ट प्रकारची माती, रेती आणि विशिष्ट
प्रकारचे पुरातन रसायन वापरले आहे. तटबंदी जवळपास दोन ते तीन फूट रूंद आहे.
तटबंदीची उंची वीस फूट आहे. किल्ल्याला दरवाजा नाही. तो युद्धकाळात तोडला गेला असावा.
गढीचे फक्त अवशेष शिल्लक आहेत.
![]() |
किल्ल्यातील विहीर |
![]() |
बाघबा राजाचे समाधी स्थळ |
- धर्मेंद्र जी कन्नाके 9405713279
धर्मेंद्र कन्नाके
यांनी एमबीएचे शिक्षण घेतले आहे. ते चंद्रपूर येथे राहतात. त्यांना महाराष्ट्र शासनाचा
2015-16 सालचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
1 टिप्पण्या
एका प्रेमकहाणी चा अंत झाला
उत्तर द्याहटवा