इस्लामी राष्ट्रांतील गणपती (Ganesh Worship, Worldover)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

इस्लामी राष्ट्रांतील गणपती (Ganesh Worship, Worldover)


गणेश ही केवळ भारताची देवता राहिलेली नसून, गणपतीचा देवता म्हणून स्वीकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही झाला आहे. त्याचे वर्णन जगातील काही संस्कृतींत मिळते. गणेश उपासना ही भारतीय संस्कृती जेथे पोचली त्या देशात प्रसारित झालेली दिसून येते. जगभर जेथे जेथे पुरातत्त्व शास्त्रज्ञांकडून खोदकाम केले जाते, तेथे तेथे विभिन्न आकाराच्या आणि शैलींच्या गणेशमूर्ती मिळाल्या आहेत. गणेश मंदिरे आणि त्यांतील गणेशमूर्ती जगातील सहासष्ट देशांत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विद्यमान आहेत.
तालिबानने त्यांची मूर्ती-विध्वंसनाची मोहीम अफगाणिस्तानात जेव्हा चालू केली तेव्हा तेथे गुप्तकालीन गणेशाच्या दोन मूर्ती अस्तित्वात होत्या. त्यांतील एक मूर्ती चोरली जाऊन विकण्यात आली. त्या मूर्तीतील गणेश चार हात असलेला होता आणि उंच होता. त्याच्या एका हातात कमळ तर दुसऱ्या हातात मोदक होता. जगात सुंदर अशा अनेक गणेशमूर्ती आहेत, पण त्या मूर्तीची सौंदर्यछटा काही वेगळीच होती असे सांगितले जाते. ज्या कोणी ती मूर्ती पाहिली तो पाहतच राही असेही सांगतात. दुसरी गणेशमूर्ती पाचव्या शतकात अफगाणिस्तानातील गारदेज शहरात मिळाली होती. ती मूर्ती आता अफगाणिस्तानमधील काबूल येथील पीर रतननाथ दर्ग्यात आहे. ती मार्बल दगडाची आहे. त्याचे नाव महाविनायक असे आहे. तो गणेश द्विभुज आहे आणि उजव्या सोंडेचा आहे. त्या मूर्तीचे शिल्पकाम हे हिंद अफगाण' शैलीचा परिपाक आहे असे दिसून येते. ती मूर्ती एकाहत्तर सेंटिमीटर उंच आणि द्विभंग अवस्थेत आहे. तिच्या कमरेला वाघाचे कातडे असून डोक्यावर सुंदर मुकुट आहे; गळ्यात माळ आणि डाव्या खांद्यावर सापाचे जानवे घातलेले आहे. मूर्ती ज्या बैठकीवर उभी आहे त्यावर लेख कोरलेला आहे. त्या लेखाच्या अनुसार त्या मूर्तीची स्थापना हेफ्थलाईट वंशाच्या खिंगल राजाने केली आहे. हेफ्थलाईट ही आदिवासी लढाऊ जमात आहे. त्यांचे वंशज हिंदू, बौद्ध, मॅनिचैझिझम आणि झोरोस्टेरिनियन अशा चार धर्मांत आढळतात. त्यांची सत्ता अफगाणिस्तानात इसवी सनपूर्व 493 पर्यंत होती. त्यांनी पुढे वायव्य भागात विस्तार केला.
त्या महाविनायक गणेशमूर्तीचे छायाचित्र पुण्याच्या बुधवार पेठेत राहणारे इतिहास संशोधक संजय गोडबोले यांच्याकडे आहे. छायाचित्रात स्पष्टपणे दिसून येते, की त्या मूर्तीचे दोन्ही हात तोडून तालिबानचे समाधान झालेले नाही. म्हणूनच, की काय इसवी सन 2001 मध्ये तालिबानी नेता मुल्ला याच्या हुकूमावरून सगळ्या मूर्तीच तोडून टाकण्यात आल्या! अफगाणिस्तानमधील तो गणेश अत्यंत दुर्मीळ व एकमेव महाविनायक म्हणून जगात प्रसिद्ध आहे.
बाकूमधील गणेश मूर्ती
गणेशमूर्ती इतर मुस्लिम राष्ट्रांतही उत्खननाच्या वेळी मिळतात. तुर्कस्तानच्या अंकारा शहरानजीक झालेल्या उत्खननात मिळालेल्या मूर्तीतील गणेश तुर्की पेहरावात आहे. त्याच्या डोक्यावर गोंडेदार तुर्की टोपी आहे आणि श्री गजानन लुंगी लावून बसलेले आहेत. बलुचिस्तानचे क्षेत्र इराण आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाटले गेले आहे. तेथे मिळालेली गणेशमूर्ती बलुची पेहरावात आहे. गणेशाच्या मस्तकी बलुची पगडी आहे आणि त्याच्या आसपासच्या स्त्रिया पारंपरिक बलुची घागरे नेसून गणेशाची आरती करताना दिसत आहेत. त्या मूर्तीचे कपडे इराणी आहेत. तो गणपती एका थाळीवरील शूर योद्धयाचे स्वरूप असून त्याच्या डाव्या हातात साप आहे, उजव्या हातात त्रिशूल आहे. त्याच्या डोक्यावर पर्शियन मुकुट असून त्या मूर्तीला दाढी दाखवलेली आहे. ते शिल्प पॅरीस येथील लूर या संग्रहालयात ठेवले गेले आहे. संशोधकांच्या मते, ते ख्रिस्तपूर्व एक हजार वर्षांपूर्वीचे वा अधिक जुने (दुर्मीळ व एकमेव?) असावे.
हे ही लेख वाचू शकता - 
गणेशमूर्तींचे अवशेष रशियाच्या ताश्कंद आणि बाकू येथील मंदिरांत आढळतात. तेथे शिवमंदिरे मोठ्या प्रमाणावर आहेत. तरी तेथे शिवपार्वतीच्या बरोबर गणेशमूर्तीही दिसतात. भारतीय संस्कृती काबूलपासून थेट कॅस्पियन समुद्रापर्यंत पसरली होती. तेव्हा त्या विभागात हिंदू मंदिरांचे अस्तित्व स्वाभाविक आहे. हिंदू देव-देवतांमध्ये शिव आणि गणेश यांचे स्थान वरचे असल्यामुळे त्या दोन देवतांच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. आग्नेय आशियाई देशांत गणेश स्थानिक कुर्ते आणि टोप्या पेहरून विराजमान झालेले दिसतात. व्हिएतनाम, चीन, जपान, मलेशिया आणि कोरिया या देशांमध्ये गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. चिनी कुर्ता पेहरलेली गणेशमूर्ती अत्यंत मनमोहक असते.
इंडोनेशियामधील वीस हजार मूल्याच्या चलनी नोटेवरील गणपतीचे चित्र
इंडोनेशियन जनता हिंदू देव-देवतांना त्यांच्या सांस्कृतिक ठेव्याचे प्रतीक मानते. ती त्यांची श्रद्धेय दैवते आहेत. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे हे ते त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य समजतात. इंडोनेशियामधील चलनाच्या वीस हजार मूल्याच्या चलनी नोटेवर गणपतीचे चित्र स्पष्टपणे दिसते. नोटेवर एका कोपऱ्यात उडता गरुडही दिसून येतो. मध्य आशियात झालेल्या संशोधनात संशोधकांना मोठे तैलचित्र मिळाले. त्याच्या चित्रांकनाची शैली मनीचिअनआहे. ते चित्र गणेशाचे असून ते तशा प्रकारचे एकमेव उपलब्ध चित्र आहे. ते बर्लिन (जर्मनी) मधील म्युझियममध्ये ठेवले गेले आहे.
- मुजफ्फर हुसेन
(लोकसत्ता, लोकरंग 19 ऑगस्ट 2001 वरून उद्धृत, संपादित -संस्कारित, विस्तारित)
(मुजफ्फर हुसेन यांचा हा जुना लेख. त्यासंबंधात अधिक माहिती मिळवावी म्हणून वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रयत्न केले आहेत. तरी फारसे काही हाती लागले नाही. पुण्याचे संजय गोडबोले यांच्याकडे चौकशीचा प्रयत्न केला. परंतु नीट संपर्क होऊ शकला नाही. वाचकांना आवाहन आहे, की जगभर पसरलेल्या गणेश देवतेच्यासंबंधात आणखी काही माहिती असेल तर जरूर कळवावी. मात्र ती सत्याधारित असावी.)
बाकूमधील आदेशगाह मंदिरातील शिलालेख. त्याच्या पहिल्या ओळीत श्री गणेशाय नम: लिहिले आहे
मध्य आशियात झालेल्या संशोधनात संशोधकांना मोठे तैलचित्र मिळाले. त्याच्या चित्रांकनाची शैली ‘मनीचिअन’ आहे. ते चित्र गणेशाचे असून ते तशा प्रकारचे एकमेव चित्र उपलब्ध आहे. ते बर्लिन (जर्मनी)मधील एका म्युझियममध्ये ठेवले गेले आहे.

 ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या