शिवमंदिरातील चौकटची नक्षी (Square Drawing in Shiv Temple)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

शिवमंदिरातील चौकटची नक्षी (Square Drawing in Shiv Temple)


शंकराची मंदिरे ही गावातील वस्तीपासून लांब, वर्दळीपासून दूर, निवांत अशी निसर्गरम्य ठिकाणी असतात. ती दऱ्याखोऱ्यांत, डोंगरमाथ्यांवर, पर्वतांच्या पायथ्यांशी, नद्यांच्या उगमांजवळ, नद्यांच्या संगमांजवळ, समुद्रांनजिक, घनदाट अरण्यांत दिसून येतात. जुन्या शिवमंदिरांत हमखास आढळणारी नक्षी म्हणजे चौकटची नक्षीहोय. ती शंकरपाळ्याच्या आकाराची असते. उत्तेरश्वराचे देऊळ हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे आहे. ते सहाव्या शतकातील आहे. त्या मंदिरात लाकडी चौकटीवर तशी चौकटची नक्षी आहे; तसेच, ती वेरूळ येथील कैलास लेण्याच्या दर्शनी ध्वजस्तंभावरही आहे. ती नक्षी बदामी ऐहोळे, पट्टदकल, हम्पी (विजयनगर) येथील शिवमंदिरांतील भिंतींवरही आढळते. त्या नक्षीचा पट्टा आठव्या शतकातील विरूपाक्ष मंदिराच्या (पट्टदकल येथील) दक्षिण भिंतीवर बाहेरच्या बाजूस भगवान शंकराच्या नृत्यमुद्रेतील मूर्तीच्या कटीभोवती आहे. तशी चौकट मराठवाड्यातील अनेक शिवमंदिरांतही गर्भगृहाबाहेर दिसते.
भुलेश्वर मंदिरातील नक्षी
चौकटच्या नक्षीचा अर्थ काय असावा? भक्त देवालयात शिवदर्शनासाठी येतात. भक्तांना शिवभक्ती कशी करावी, भक्तीचे उद्दिष्ट काय असावे याचे सूचन त्या नक्षीप्रतीकाद्वारे व्हावे, शैवसिद्धांताचा उलगडा सहज रीत्या व्हावा अशी चौकटच्या नक्षीमागील कल्पना आहे. म्हणून गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर (मंडोरावर), प्रवेशद्वाराच्या चौकटीवर ती नक्षी कोरली जात असावी. कालप्रवाहात त्या प्रतीकामागील अर्थ विसरला गेला. एक भौमितिक नक्षी या पलीकडे तिच्याकडे पाहिले जात नाही. पुणे जिल्ह्यातील यवत गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील डोंगरावर भुलेश्वर मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवर चौकटीची नक्षी विपुल प्रमाणात दिसते. चौकटच्या नक्षीच्या उत्तर-दक्षिणेकडील पाकळ्या (पाळ्या) मोठ्या असून, पूर्व-पश्चिमेकडील पाकळ्या त्या मानाने लहान आहेत. चार पाकळ्यांच्या मध्यात फुलात असतो तसा भरीव गोलाकार भाग (गेंद) आहे. बिंदू आहे. ते शिवमंदिर गर्भगृहाच्या अंतर्गत व बाह्य खुणांच्या आधारे विजयादित्य चालुक्य, दुसरा विक्रमादित्य चालुक्य यांच्या राजवटींच्या काळात (इसवी सन 696 ते 747) उभारले गेले असावे. त्याचा जीर्णोद्धार दोन वेळा पुढे झाला हे बांधकामातील बदलांवरून दिसते. तेथील मंदिरातील चौकटची नक्षी देखण्या रूपात शिस्तबद्ध केली गेलेली आहे.
 चौकटीच्या नक्षीमध्ये बिंदू हा मूलाकार रेखला जातो. बिंदू हा सर्व निर्मितीचे मूळ हिंदू धर्मकल्पनेत आहे. बिंदू म्हणजे त्रिज्याशून्य वर्तुळ होय. सर्व आकार बिंदूमध्ये सुप्तावस्थेत असतात. त्या चिन्हाला लांबी, रुंदी, जाडी असे काही नसते, पण अस्तित्व असते. बिंदू म्हणजे ब्रह्म. बिंदूमध्ये शिवशक्ती अव्यक्त रूपात सामावलेली असते; अर्थात, संपूर्ण विश्वही अव्यक्त रूपात असते.
स्थूलबिंदू म्हणजे शब्द होय.
बिंदुस्थान योगशास्त्रानुसार शरीरात आज्ञाचक्रानंतर दोन्ही भुवयांच्या मध्यावर येते. बिंदू हाच योग्याचा तृतीय नेत्र होय. ज्ञानचक्षू तो तोच होय.
मंदिरशिल्पात शास्त्र आणि ग्रंथातील विचार व कल्पना यांना स्पष्ट करण्यासाठी काही भौमितिक आकार व आकृती प्रतीके म्हणून स्वीकारल्या गेल्याचे आढळते. गूढ कल्पना, मोठा आशय, परंपरा किंवा तत्त्वविचार यांचे सूचन करणाऱ्या दृश्य वस्तूंना वा आकारांना प्रतीक म्हणतात. बिंदू, रेषा, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे आकार तर स्वीकारले गेलेच; पण इतरही काही वस्तू, रंग, पशू, पक्षी इत्यादींचा प्रतीकात्मक उपयोग केला गेला आहे.
(कै. मधुकर टांकसाळे यांच्या जागर पुस्तकावरून संकलित)
भुलेश्वर
---------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. शैव संप्रदाय व शिवमंदिर-चौकट नक्षीकाम याबद्दल नवीनच माहिती मिळाली. विशेषतः
    शैव संप्रदाय बद्दल इतकी अभ्यास पूर्ण विस्तृत माहिती पहिल्यांदाच वाचली, धन्यवाद!
    - प्रमोद शेंडे

    उत्तर द्याहटवा