कॅनडात कोरोनाविरुद्ध सरकार तत्पर (Canada's Govt. Controls Corona)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

कॅनडात कोरोनाविरुद्ध सरकार तत्पर (Canada's Govt. Controls Corona)


अभिषेक आणि आदिती पाठक
कोरोनाची साथ काही देशांत आटोक्यात येऊ लागली आहे. त्यांतील एक देश आहे कॅनडा. कॅनडा हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. तो भारताच्या तिप्पट मोठा आहे. पण तेथील लोकसंख्या आहे अवघी साडेतीन कोटी. त्यांना उरलेली अर्धी जमीनसुद्धा पुरेशी आहे. कॅनडाचा जवळपास अर्धा भाग कायम बर्फाच्छादित असतो. अमेरिका हे कॅनडाच्या दक्षिणेकडील मित्रराष्ट्र. मित्रराष्ट्र म्हणण्याऐवजी बंधूराष्ट्र म्हटले तरी चालेल इतकी त्यांच्यात एकी. कोरोनाचा विषाणू त्या दोन्ही देशांत एकाच वेळी शिरला. पण कोरोनाचा पुढील प्रवास मात्र त्या दोन देशांत वेगवेगळ्या गतीने झाला.
          मी त्या संदर्भात अधिक माहितीसाठी कॅनडात राहणाऱ्या काही व्यक्तींशी संपर्क साधला. पैकी अभिषेक आणि आदिती पाठक हे पतिपत्नी विंडझर येथे राहतात. विंडझर हे कॅनडातील टोरॅन्टो या प्रसिद्ध शहरापासून तीनशेसत्तर किलोमीटर अंतरावर आहे. अभिषेक पाठक इंजिनीयर आहेत व ते एका निर्मितीक्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहेत. ते भारतात सुट्टीसाठी डिसेंबर 2019च्या दुसऱ्या आठवड्यात आले होते. ते भारतात तीन आठवडे राहून जानेवारी 2020च्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेतील मिशिगन येथे परत गेले आणि लगेचच पुढच्या आठवड्यात ते विंडझरला परतले. अभिषेक सांगतात, 'मी ते तीन प्रवास केले, त्यावेळी कोरोना सगळ्यांना माहीत झाला होता. पण कोरोनाची भीती कोणत्याही देशात नव्हती. टोरॅन्टोमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण 25 जानेवारीला सापडला. ती व्यक्ती नुकतीच चीन येथील वुहानमधून आलेली होती. दुसऱ्या दिवशी, त्याची पत्नीही कोरोनाबाधित झाली. पुढे कोरोनाबाधितांची संख्या कॅनडात वाढू लागली. तेव्हाच, 15-16 मार्चपासून लोकांना कोरोना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याच्या सूचना मिळू लागल्या. अखेरीस, जगभर सर्व देशांनी जे केले तेच कॅनडानेही केले. कॅनडाने संपूर्ण लॉकडाऊन 21 मार्चला घोषित केला. देशाच्या सीमा बंद केल्या. 
     

          कॅनडा देश अस्तित्वात 1867मध्ये आला. कॅनडा आणि अमेरिका यांच्यामधील सीमारेषा 1867नंतर प्रथमच बंद करण्यात आली! कॅनडात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सोडला तर सगळे काही बंद झाले. त्या काळात कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी अतीव काळजी घेतली. रोज दिवसातून दोन वेळा टिव्हीवरून कोरोना संदर्भात माहिती दिली जायची. एका वेळेस पंतप्रधान बोलायचे आणि दुसऱ्या वेळेस प्रीमियर म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री. त्यात रोज किती नवीन रुग्ण आढळले, किती रुग्ण बरे झाले, कोठल्या भागात अधिक रुग्ण आहेत याची माहिती दिली जाई. विश्वासार्ह सूत्रांकडून, माहिती मिळाल्यामुळे वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांनी कोठल्या भागात जावे हे ठरवणे सोपे होत असे. काही उद्योगधंदे बंद पडले. लोकांच्या नोकऱ्या गेल्या. सरकारने त्या सर्वांना ताबडतोब आर्थिक मदत पुरवली. कॅनडाची जनता त्यांच्या उत्पन्नाच्या जवळपास चाळीस टक्के टॅक्स भरते. सरकार त्यांतील काही पैसा आपत्कालीन निधी, बेरोजगार निधी या स्वरूपात बाजूला ठेवत असते. सरकारने गरजूंना त्या निधीतून आर्थिक मदत पुरवली. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना दर महिन्याला दोन हजार कॅनेडियन पौंड दिले. कॅनडात एका कुटुंबासाठी तेवढे पैसे पुरतात. ज्यांचे उद्योग बंद झाले त्यांना पुन्हा ते सुरू करण्यासाठी निधी दिला गेला. कॅनडामध्ये पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, साठ वर्षांवरील विधवा आणि सहा वर्षांखालील मुले यांना दर महिन्याला सरकारकडून पैसे दिले जातात. लहान मुलांना मिळणारे पैसे अर्थातच त्यांच्या पालकांच्या खात्यांत जमा होतात. कोरोनाच्या काळात त्या निधीमध्ये वाढ झाली. मुले घरी असल्यामुळे त्यांना जास्त खेळणी लागतील हा त्यामागील विचार होता!'
          अभिषेक यांच्या पत्नी आदिती पाठक टोरॅन्टो येथे राहतात. त्या वस्त्रोद्योगाशी निगडित नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करतात. त्या सांगतात, 'आमच्या कंपनीला चीनकडून कच्चा माल पुरवला जातो. त्या मालाची आयात थांबल्यामुळे आमच्या कंपनीच्या धंद्यावर वाईट परिणाम झाला. नंतर कंपनीने 'वर्क फ्रॉम होम' सुरु केले. तेव्हा मी विंडझरला आले आणि तेथून काम करू लागले. मी आणि अभिषेक
विंडसर येथील नदीकिनारा
त्यामुळे एकत्र राहतो
, हा लॉकडाऊनचा आम्हाला झालेला फायदा. अभिषेकचे कामाचे स्वरूप असे आहे, की तो 'वर्क फ्रॉम होम' करू शकत नाही. त्याला लॉकडाऊन काळात वेळ मिळाला आणि त्याने त्या काळात ऑनलाईन कोर्सेस केले. आम्हाला त्या काळात औषधे, अन्नधान्ये यांचा सुरळीत पुरवठा होत होता. पण जगभर झाले तसे तेथेही सॅनिटायझर गायब झाले आणि जे मिळायचे ते नेहमीपेक्षा दहापट जास्त भावात मिळायचे. सरकारने लगेच LIQUR कंपन्यांना सॅनिटायझर तयार करण्याची परवानगी दिली. सॅनिटायझर बनवणे हे त्या कंपन्यांना सहज शक्य असते. त्या कंपन्यांचाही धंदा बंद झाला होता. त्यामुळे त्यांनाही काम मिळाले. काही बंद पडलेल्या कंपन्यांना मास्क, फेस-शील्ड, व्हेंटिलेटर्स तयार करण्याचे काम दिले आणि ते उद्योग जगवले. तरीही कॅनडात व्हेंटिलेटर्सची कमतरता भासली त्यावेळेस अमेरिकेने ते पुरवले आणि कॅनडाने त्यांच्या नर्सेस अमेरिकेत पाठवल्या.'   
         
कॅनडातील निसर्ग सौंदर्य
कॅनडामधील व्हॅनकुवर हे राज्य सौंदर्याने नटलेले आहे. ते पर्यटनस्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. तेथे राहणारे ओंकार टिकारे म्हणाले
, की मी पूर्वी अमेरिकेत Juniper Networks या कंपनीत काम करत होतो. माझ्या कंपनीने कॅनडातून काम करणार का असे विचारल्यावर मी लगेच होकार दिला. कारण अमेरिकेत कायमस्वरूपी व्हिसा मिळण्याची शाश्वती नाही. मी योग्य पर्याय निवडला याची आता मला खात्री पटली. आमच्या येथे बरेच पंजाबी लोक दोन-तीन पिढ्यांपासून राहत आहेत. ते लोक हॉटेल व्यवसायात कार्यरत आहेत. व्हॅनकुवरला लागून असलेली अमेरिकेची सीमारेषा इतकी जवळ आणि उघडी आहे, की एक पाय कॅनडात तर दुसरा पाय अमेरिकेत ठेवता येतो. पंजाबी जेवण जेवण्यास अमेरिकेतील भारतीय वीकएंडला सर्रास तेथे जातात. कॅनडातून रोज अमेरिकेत नोकरीसाठी जाणारे खूप लोक आहेत. आता ते सर्व थांबले आहे. मी आयटी क्षेत्रात असल्यामुळे मला या काळात फार झळ बसली नाही. ही सर्व परिस्थिती हाताळण्याबाबत पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांना मी थम्स अप देईन. त्यांच्या पत्नी सुफी ट्रूडो यांना मार्च महिन्यात कोरोनाची लागण झाली त्यावेळी पंतप्रधानांनी स्वतःचे विलगीकरण केले व विलगीकरणातील नियमांचे काटेकोर पालन केले. पंतप्रधान म्हणतात, 'जनतेसमोर माझा आदर्श राहिला पाहिजे.'         
         
ओंकार टिकारे
त्या काळात चिनी लोकांना काही त्रास दिला गेला का? या प्रश्नाचे उत्तर देताना ओंकार म्हणाले
, की 'तसे काही झाले नाही. कॅनडाच्या पंतप्रधानांनी सुरवातीलाच सांगितले होते, की हा विषाणू चीनमधून आला आहे. त्यात कॅनडात राहणाऱ्या चिनी लोकांचा दोष नाही. ती आपलीच माणसे आहेत.         
          कॅनडातील लोक शांत स्वभावाचे आहेत. त्यांची सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती आहे. ते सरकारच्या आदेशाचे पालन विनातक्रार करतात. तेथे अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूच्या निषेधार्थ रॅली काढली गेली. पण ती सर्व नियमांचे पालन करून व शांततेने पार पडली.'   
         
डॉ. ललिता आणि रवींद्र इंगळे
डॉ.ललिता इंगळे आणि त्यांचे पती रवींद्र इंगळे चार वर्षांपूर्वी भारतातून कॅनडाला त्यांच्या मुलाकडे गेले. ते आता कायमस्वरूपी व्हिसावर टोरॅन्टो येथे राहत आहेत. डॉ.ललिता सांगतात
, 'येथे एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी सरकारने चांगली घेतली. त्यांना जेवण, अत्यावश्यक वस्तू, औषधे घरपोच पुरवली. येथील लॉंग केअर सेंटर्समध्ये बरेच रुग्ण सापडले. तशा सेंटर्समध्ये वृद्ध व आजारी लोकांची काळजी घेतली जाते. रुग्ण सापडल्याबरोबर सरकारने तेथे भेटायला येणाऱ्या लोकांना मज्जाव केला. त्यातील काही सेंटर्स हॉस्पिटल्सना जोडली. त्यामुळे तेथील रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले. त्यांनी एकदोन सेंटर्स लष्कराच्या ताब्यातही दिली होती. या सर्व उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत झाली'.
         
कॅनडाची राजधानी ओटावा येथील संसद भवन
कॅनडातील लॉकडाऊन टप्याटप्याने उघडला जात आहे. धंदे हळुहळू चालू होत आहेत. आयटी क्षेत्रातील लोकांचे 'वर्क फ्रॉम होम' मात्र डिसेंबर 2020पर्यंत चालूच राहणार आहे. अभिषेक निर्मितीक्षेत्रात काम करतात. त्यांची कंपनी गाडीत लागणाऱ्या इंधनाच्या टाक्या बनवण्याचे काम करते. त्यांच्या हाताखाली अडीचशे कामगार काम करतात. त्या कामगारांकडून काम करून घेणे हे अभिषेक यांचे काम. अभिषेक सांगतात, 'सरकारने लॉकडाऊन घोषित करण्याच्या आधीपासून आमच्याकडील कामगार युनियनने कंपनी बंद करा अशी मागणी लावून धरली होती. त्याच वेळेस बाजारातील मालाची मागणी कमी झाली आणि कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. कामगारांना कामावरून कमी केले. त्यांचे दर आठवड्याला मिळणारे पगार थांबले. पण त्यांना सरकारकडून दर महिना दोन हजार डॉलर दोन आठवड्यांत मिळू लागले. त्याचा तोटा असा झाला, की कंपनी सुरु झाली तरी कामगारांना कामावर येण्याची इच्छा नाही. काम करून अडीच हजार डॉलर घेण्यापेक्षा घरी बसून दोन हजार डॉलर घेणे त्यांना पसंत आहे. ते कामावर हजर न होण्यासाठी पळवाटा शोधून काढत असतात. कॅनडातील कायदे कामगारांच्या बाजूचे आहेत. कामगारांची युनियन असते. लोकांकडून काम करून घेणे कठीण झाले आहे.'    
         
          आजमितीस कॅनडामध्ये एक लाख सहा हजार लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यातील आठ हजार सहाशेत्र्याण्णव मृत्यू झाले. बरे होणाऱ्यांचे प्रमाण सत्तर टक्के आहे. 3 मे रोजी सर्वाधिक नवीन रूग्ण आढळले. त्यांची संख्या दोन हजार सातशे साठ होती.  ते प्रमाण आता रोज जवळपास शंभर इतके खाली आले आहे. ते आणखी खाली येईल.
          सर्वसामान्य जनतेचे मत असे दिसते, की सरकारने आत्तापर्यंत स्थिती चांगली हाताळली आहे. काही दिवसांनी कॅनडा-अमेरिकेची सीमारेषा उघडेल. लोकांची दोन्हीकडून जा-ये सुरु होईल. त्या वेळेस रोग काय स्वरूप घेईल हा खरा प्रश्न आहे.   
ओंकार टीकारे tikareomkar9@gmail.com +1 (778) 723-7444
अभिषेक पाठक abhishek.s.pathak13@gmail.com  519-331-4916
ललिता इंगळे lalita1254@gmail.com
- विनीता वेल्हाणकर 9967654842 vineetavelhankar@gmail.com
विनीता वेल्हाणकर यांचे एम ए पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी बँकेत तेहेतीस वर्षे नोकरी केली आणि 2011 साली स्वेच्छानिवृत्ती पत्करली. त्यांचे पती चार्टर्ड अकाउंटट आहेत. त्यांची मुलगी मानसी वैद्य व तिचा परिवार अमेरिकेत आहे आणि मुलगा अमेय व त्याची पत्नी लंडनला वास्तव्यास आहेत. विनीता यांना वाचनाची आवड आहे. तसेच, त्यांचा शेअर मार्केटचाही अभ्यास आहे.  

-------------------------------------------------------------------------------------------------------------

 ------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. लेख अप्रतिम.Canadaसरकार जनतेच्या घेत असलेल्या काळजीचे यथार्थ वर्णन.जनता सुद्धा सरकारने दिलेल्या नियमांचे व सुचनांचे काटेकोरपणे पालन करीत आहे.

    उत्तर द्याहटवा