संविदानंदांची संजीवन चिकित्सा आजही प्रचलित (Sanvidananda's Sanjivan Chikitsa)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

संविदानंदांची संजीवन चिकित्सा आजही प्रचलित (Sanvidananda's Sanjivan Chikitsa)


वैद्य यशवंत परांजपे
वैद्य यशवंत काशिनाथ परांजपे हे योगी संन्यासी व जीवन्मुक्त असे संतमहात्मा होते. त्यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी ‘संजीवन चिकित्सा’ ही भारतीय वैद्यक पद्धत शोधून काढली. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्या राहत्या घरी समाधी घेतली! ती समाधी त्यांच्या मावळंगे येथील घराच्या आवारात पाहण्यास मिळते. मावळंगे हे गाव पावस (रत्नागिरी) येथून जवळच आहे. त्याच ठिकाणी वैद्य यशवंत यांनी संशोधन केले व नवीन शास्त्र उभारले. परांजपे यांच्या घरातील देवपूजेबरोबर समाधीचीही पूजा होते. दोन्ही वेळेला दिवाबत्ती लावली जाते. दुपारचा नैवेद्य दाखवला जातो.
डॉ.रा.य.परांजपे हे यशवंतराव यांचे ज्येष्ठ चिरंजीव. त्यांनी वडीलांचे जीवन जवळून अनुभवले. त्यांनी लिहिलेल्या ‘यशवंत संशोधक’ या पुस्तकातून वैद्य यशवंत काशिनाथ (स्वामी संविदानंद) ह्यांच्याविषयी बरीच माहिती मिळते. संविदानंदांना परमहंस दीक्षा वयाच्या बहात्तराव्या वर्षी मिळाली. तेव्हा त्यांनी ते "आता फार दिवस राहणार नाहीत असे घरातील मंडळींना सांगितले." संविदानंद दीक्षा मिळाल्यानंतर घराच्या पडवीतच राहत होते. त्यांनी वैशाख वद्य 14 या दिवशी शिवरात्रीचे पारणे फिटल्यावर, ते देह ठेवणार असे समाधी घेण्याच्या दहा-बारा दिवस आधी सांगितले होते.
संविदानंदांची  समाधी
          त्यांच्या घराच्या आवारात अजून दोन घुमट्या बांधलेल्या आहेत. त्या समाधी त्यांच्या पूर्वजांच्या आहेत असे त्यांचे नातू डॉ. उद्धव यांनी सांगितले. उद्धव हे परांजपे घराण्यातील संजीवन चिकित्सा चालवणारे सध्याचे वैद्य आहेत. संजीवन चिकित्सेत रोगाची उत्पत्ती कशी होते यासंबंधीचे विचार मूलगामी आहेत असे मानले जाते. डॉ. रा. य. यांनी त्याविषयी त्यांच्या पुस्तकात असे लिहिले आहे, की संविदानंद यांच्या मते अन्न, पाणी, हवा व सूर्य यांपासून मिळणारी उष्णता शरीराला उपकारक गोष्टींचा स्वीकार करते व ती जीवनशक्ती शरीराचे पोषण करते. तीच शक्ती उत्सर्जीय घटक शरीराबाहेर टाकते. पोषक घटक जर योग्य प्रमाणात मिळाले नाहीत तर शरीरघटकांचे पोषण कमी होते व जीवनशक्तीची वाढ होत नाही. मात्र शरीरक्रिया चालू ठेवण्यासाठी जीवनशक्ती सतत खर्च होत राहते. त्यामुळे शरीरातील उत्सर्जनयोग्य घटकांचे उत्सर्जन करण्याचे कार्य जीवनशक्तीला योग्य प्रकारे करता येत नाही. असे घटक शरीरात साठून राहू लागतात. जर रोगजंतूंचा, म्हणजेच विषारी कुपथ्यकारक द्रव्यांचा शरीरात प्रवेश झाला, तर त्यांना काढून टाकण्याचे प्रयत्न जीवनशक्तीकडून सुरू होतात. अशा वेळी रोगाच्या कारणांमुळे व जीवनशक्तीने सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे जी अस्वाभाविक लक्षणे दिसू लागतात त्यांनाच रोग म्हटले जाते. शरीरातील जीवनशक्तीला प्रत्यक्ष मदत पुरवली व रोगाचे निर्मूलन केले तर रोग बरा झाला असे म्हणतात. संविदानंद यांनी त्यासाठी आरोग्यदृष्ट्या उपयुक्त वनस्पतींवर प्रयोग केले आणि जीवितशास्त्राचे सिद्धान्त मांडले. तेच ‘संजीवन चिकित्सा पद्धत’ म्हणून ओळखले जाते.        
          संविदानंद यांनी काही औषधे तयार करून त्यांचा परिणाम पाहिला व  सात-आठ वर्षांच्या परिश्रमातून औषधे निश्चित केली. ते वनस्पती शोधण्यासाठी रात्रीअपरात्री एकट्याने डोंगरदऱ्यांतून हिंडत असत.
डॉ.उद्धव परांजपे
          संविदानंदांचा जन्म 7 जानेवारी 1882 रोजी मावळंगे येथे झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना प्रत्यक्ष दत्तात्रेयाने सगुण रूपात दर्शन दिले असे सांगतात. संविदानंद सरस्वती तथा वैद्य यशवंत काशिनाथ परांजपे (दादा) यांचे महाप्रयाण वैशाख वद्य चतुर्दशी शके 1876 (31 मे1954) ला झाले. समाधी घेण्यापूर्वी काही दिवस त्यांच्या अंगात बारीक ताप व थोडा कफविकारही होता. मात्र प्रयाणापूर्वी दोन दिवस आधी ताप पूर्ण बरा झाला, कफ गेला. वैशाख वद्य चतुर्दशीचा दिवस उजाडला. दादांनी समाधीची तयारी करण्यास सांगितले. दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास भटजी आले. दादांना खुर्चीवर बसवून समाधीस्थळी नेण्यात आले. ते स्वतः खड्ड्यातील आसनावर जाऊन बसले. त्यानंतर त्यांनी जमलेल्या मंडळींना चार शब्द सांगितले. भटजींना कोणते संस्कार करावेत हा प्रश्न पडला. त्यांनी विचारले, जितयति संस्कार की मृतयति संस्कार?” त्यावर संविदानंद म्हणाले, मृतयति संस्कार. पण भटजींना प्रश्न पडला, की जिवंतपणी ते संस्कार कसे करणार? तेव्हा संविदानंद म्हणाले, मी आता सिद्धासन घालून, पेच घालून ब्रम्हांडी प्राण नेतो व तत्काळ देहत्याग करतो. सर्वांनी तोपर्यंत प्रणवोच्चार करा. माझ्या पाठीवर एक कळशी पाणी ओता आणि सर्वांनी माती लोटा. असे म्हणून संविदानंदांनी देहत्याग केला. देहत्याग केल्याची खात्री पटताच सर्वांनी माती लोटली. ही हकिकत त्यांचे नातू उद्धव यांच्याकडून ऐकण्यास मिळाली. तेव्हा अंगावर काटा आला. सामाधीविषयी बोलले ऐकले जाते, परंतु काही दशकांपूर्वी समाधी प्रत्यक्ष घेण्याचा प्रकार झाल्याचे ऐकताना एकाचवेळी आश्चर्य वाटले आणि नतमस्तकही झाले.
नेमियले काम केले हरिइच्छे। यथाकालवशे लीन झाले।।

सांडिले शरीर लाधले आश्रम। अंती निजधाम गाठायासी।।

जन्मोनिया येथे सार्थक ते केले। जाणोनि घेतले आत्माराम।।
          डॉ.उद्धव म्हणाले, की संजीवन चिकित्सा ही आयुर्वेदावरच आधारलेली आहे आणि पंचमहाभूतांच्या विचारावर विश्वास ठेवते. महत्त्व आहे ते या चिकित्सेतून निर्माण झालेल्या औषधांना. उद्धव यांनी असेही सांगितले, की संजीवन चिकित्सा उपचारपद्धतीचा अवलंब परांजपे कुटुंबातील चौघेजण करतात. ते स्वतः रत्नागिरीजवळ, त्यांचा चुलत भाऊ वसंत बेळगावला, त्यांची मुले गौरांग व प्रणव रत्नागिरीला. त्यांनी कोरोना काळातील उपचारासाठी काही वेगळा विचार करतो आणि त्यानुसार औषध योजना रोग्यांना सुचवतो असेही सांगितले.
डॉ. उद्धव वा. परांजपे- 02352 -237206,
संजीवन चिकित्सा-
9422375711
- अंजली आपटे 9619608205

prachiaapte@googlemail.com


----------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

9 टिप्पण्या

  1. संजीवन चिकित्सा तसेच सद्य परिस्थितीला लागू पडेल चिकित्सेवर अधिक माहिती अपेक्षित होती

    उत्तर द्याहटवा
  2. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. थोडी जास्त माहिती मागवून जोडावी

    उत्तर द्याहटवा
  4. त्या चिकित्सेच्या बाबतीत ज्या कोणाला अधिक माहिती हवी असेल त्यांना त्या Dr चा फोन नंबर दिला आहे त्यावर संपर्क साधून विचारता येऊ शकेल .सौ.अंजली आपटे.

    उत्तर द्याहटवा
  5. अशी जिवंत समाधी घेणार्‍या महात्म्याला शतशः नमस्कार "संजीवन चिकीत्सा ""संशोधन करून समाजावर उपकार केलेत !

    उत्तर द्याहटवा
  6. अंजलीताई , लेख वाचला. छान आहे. ह्या संजीवन समाधीची माहिती नव्हती. या लेखात ज्यांचा उल्लेख केला ते डॉ. रा. य. परांजपे हे स्वामी स्वरूपानंदांच्या चरित्राचे लेखक आहेत.
    सौ. मनीषा अभ्यंकर

    उत्तर द्याहटवा
  7. पावस जवळील मावळंगे येथे मी प्रत्यक्ष भेट दिलेली आहे तो सर्वच परिसर आणि डॉक्टर उद्धव यांच्याबरोबर चे बोलणे ऐकण्यासारखे आहे कुणी पावसाला कधी भेट दिली तर जरूर मावळंगे येथे जावे सहा किलोमीटर इतका काहीतरी अंतर आहे रिक्षाने आम्ही गेलो होतो

    उत्तर द्याहटवा
  8. संविदानंदांबद्दल व संजिवन चिकित्से बद्दल फारशी माहिती नव्हती ,या तुमच्या लेखामुळे छान माहिती मिळाली ,अंजली तुमचे चौफेर वाचन व निरीक्षण असल्यामुळे तुम्ही इतकं सुंदर लिखाण करू शकता ,असंच निरनिराळ्या विषयावर तुम्ही लिहावे असे मला वाटते ,पुढील लेखनासाठी खूप शुभेच्छा ,...सौ.वनिता घैसास त्

    उत्तर द्याहटवा
  9. फार सुंदर लिहिले आहे. ओघवती शैलीत अप्रकाशित पण अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे.चांगल्या विषयावरिल चांगला लेख वाचायला मिळाला. धन्यवाद.
    सौ.अनुराधा म्हात्रे. पुणे.

    उत्तर द्याहटवा