रेखा नार्वेकर हे नाव मुंबई-कोकण परिसरात तरी, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सर्वपरिचयाचे आहे. लेखिका-कवयित्री-ज्ञानेश्वरीच्या रसाळ प्रवचनकर्त्या आणि साहित्यिक समारंभातील जिव्हाळ्याचा वावर...सदैव हसतमुख आणि प्रसन्न चेहरा. त्या शिकल्या विज्ञानशाखेत, पण त्यांनी कास धरली साहित्यकलेची. त्यांनी हौसेने कथा, ललित गद्य लिहिले, कविता केल्या. त्यांच्या त्या साहित्याचे संग्रह प्रसिद्ध आहेत.
रेखा नार्वेकर
त्यांच्या
ज्ञानेश्वरीवरील प्रवचनांची हकिकत वेगळीच आहे. त्या म्हणाल्या, की माझी मुलगी
बारावीला गेली तेव्हा मी प्रथम ज्ञानेश्वरी वाचली -प्रथम साखरे महाराजांची, मग
दांडेकरांची. त्यानंतर मात्र मी त्या ग्रंथात रमून गेले. मला सारखे त्याबाबतच
बोलावेसे वाटे. तेव्हा माझ्या वडिलांनी मला सुचवले, की सावंतवाडीला विठ्ठलमंदिरात
प्रवचन कर, बरं. माझे वडील कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होतेच. माझे पहिले प्रवचन
सावंतवाडीच्या विठ्ठल मंदिरात झाले. त्यानंतर चमत्कार घडला. मला ठिकठिकाणाहून 'ज्ञानेश्वरी'वरील
प्रवचनांची बोलावणी येऊ लागली; अगदी सिंगापूर-अमेरिकेपर्यंत, मी तेथे गेले तेव्हा.
ज्ञानेश्वरी महात्म्य मला भावले तसे मी वर्णन केले आहे.
रेखा नार्वेकर
यांचे वडील दत्तात्रय उर्फ तात्या नेवगी हे सावंतवाडीचे मोठे समाजसेवक होते. ते
सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक वीस वर्षे सतत होते. त्यांच्यावर 'राष्ट्र सेवा दला'चे
संस्कार आणि ते स्वतः प्रजा समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते. एस एम जोशी, मधू दंडवते,
भाऊसाहेब रानडे हे त्यांच्या घरी येत. आणीबाणीतील काही बैठका त्यांच्या घरी झालेल्या
आहेत. त्याने वडिलांचे संस्कार मुलांवर झाले. त्यांचा मुलगा दीपक सावंतवाडीचा
प्रसिद्ध वकील आहे. त्याने वडिलांच्या कीर्तनाचा वारसा उचलला आहे. त्याने
वडिलांच्या समाज, संत या विषयांबरोबरच कायद्याची, न्यायकल्पनेची ओळखही कीर्तनातून
देणे सुरू केले आहे.
रेखा नार्वेकर
म्हणाल्या, की त्यांना कीर्तन करणे जमत नाही. त्यांनी प्रवचनाचा थाट उचलला आहे व
त्याचबरोबर वडिलांची कार्यकर्तावृत्तीही. त्यांचा मुंबईतील चव्हाण प्रतिष्ठान,
कुलाबा महिला संघ या संस्थांशी जवळचा संबंध आहे. त्या 'मुंबई मराठी साहित्य संघा'त
अनेक जबाबदाऱ्या उचलत असतात आणि 'कोकण मराठी साहित्य परिषदे'च्या तर त्या विश्वस्त
आहेत. ती परिषद गेली दोन-तीन वर्षे वेगवेगळ्या पेचप्रसंगांतून जात आहे. त्यामुळे
त्या व्यथित असतात. त्यात साहित्य संघाचे मुख्य आधारस्तंभ बाळ भालेराव यांचे निधन
अलीकडेच झाल्याने त्या दु:खी आहेत.
बाळ भालेराव यांच्याच आग्रहातून त्यांचे 'अमृतकण कोवळे' हे ज्ञानेश्वरीसंबंधीचे पुस्तक तयार झाले आणि त्या काळातील विविध संभाषणांमधून त्यांना तुकारामाचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली असे त्या सांगतात. रेखा नार्वेकर यांचे पती रमेश हे मूळ सावंतवाडीचे, परंतु, त्यांचे सासरे मुरारी नार्वेकर हे मुंबईला आले. त्यांनी अलिबागजवळ सूतगिरणी काढली. त्यांचे चिरंजीव रमेश यांनी नायलॉन धागा काढणे, त्याची जाळी बनवणे असा उद्योग वाढवला. त्यांच्याकडे तीनशे कामगार एका टप्प्यावर होते. रेखा व रमेश नार्वेकर यांना तीन मुली. दोघी अमेरिकेत असतात, एक मुंबईत डॉक्टर. त्यामुळे नार्वेकर यांनी त्यांचे वय वाढत गेले तेव्हा नायलॉनचा व्यवसाय छोट्या प्रमाणावर चालू ठेवला आहे.
बाळ भालेराव यांच्याच आग्रहातून त्यांचे 'अमृतकण कोवळे' हे ज्ञानेश्वरीसंबंधीचे पुस्तक तयार झाले आणि त्या काळातील विविध संभाषणांमधून त्यांना तुकारामाचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली असे त्या सांगतात. रेखा नार्वेकर यांचे पती रमेश हे मूळ सावंतवाडीचे, परंतु, त्यांचे सासरे मुरारी नार्वेकर हे मुंबईला आले. त्यांनी अलिबागजवळ सूतगिरणी काढली. त्यांचे चिरंजीव रमेश यांनी नायलॉन धागा काढणे, त्याची जाळी बनवणे असा उद्योग वाढवला. त्यांच्याकडे तीनशे कामगार एका टप्प्यावर होते. रेखा व रमेश नार्वेकर यांना तीन मुली. दोघी अमेरिकेत असतात, एक मुंबईत डॉक्टर. त्यामुळे नार्वेकर यांनी त्यांचे वय वाढत गेले तेव्हा नायलॉनचा व्यवसाय छोट्या प्रमाणावर चालू ठेवला आहे.
मी त्यांची
पुस्तके गेल्या वर्षभरात वाचली व त्यातून स्नेहबंध दृढावला. तोपर्यंत त्यांचे
कार्यकर्तेपण अधिक परिचयाचे होते. कोरोना सर्वांनाच अस्वस्थ करून राहिला आहे, पण
जसजसे दिवस लांबत आहेत तसतसा भविष्यकाळाचा विचार अधिक भेडसावू लागला आहे. या दीड-दोन
महिन्यांत काय गमावले त्याची बेरीज मोठीच आहे. रेखा नार्वेकर ही कोरोनामुळे खूप
अस्वस्थ असतात; काय करावे सुचत नाही असे म्हणतात, पण तरी त्यातील 'पॉझिटिव्ह' भाग
उमेदीने मांडतात. फोनवर बोलणे झाले, की म्हणतात, कोरोनाने समाजाला संयम शिकवला,
शिस्त लावली, स्वच्छतेचे महत्त्व जाणवून दिले, काटकसरीने जगणे अंगीकारण्यास लावले.
समाजजीवनाचे हे फार छान पैलू आहेत, ते का सोडून द्यायचे? मुंबईतील पन्नास
टक्क्यांहून अधिक लोक झोपड्यांत राहतात, त्यांच्या मोठमोठ्या वस्त्या झाल्या आहेत.
तेथील आरोग्याचे प्रश्न भेदकपणाने याकाळात कळून आले. तसे मोठे प्रश्न पुनर्वसनाच्यावेळी
व्यापक पातळीवर हाती घ्यावे लागतील, परंतु समाजशिस्तीसारख्या आचरणाच्या ज्या सवयी
आहेत त्या कायमस्वरूपी टिकतील, समाजातील 'सिव्हिक सेन्स' जागा होईल यासाठी काय
प्रकारचे प्रयत्न करता येतील?
रेखा
नार्वेकर यांची त्याकरता सूचना फार चांगली आहे. त्या म्हणाल्या, की
मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या 'युद्धकाळा'करता 'कोरोना योद्धे' बनण्याचे आवाहन
लोकांना केले आणि त्या सैनिकांना आरोग्यसेवेत सामावून घेण्याची योजना आखली. तसे
सैनिकदल नागरी आचारसंहिता कायमस्वरूपी अंमलात राहावी यासाठी समाजातून, विशेषतः
सक्षम निवृत्त वर्गातून बनवावे. ज्येष्ठांमध्ये पंचावन्न ते पंच्याहत्तर या वयोगटातील
मंडळी क्रियाशील असतात, त्यांना काही करण्याची इच्छा असते. त्यांची तशी दले
गावोगावी बनवावी. त्यांचे कामकाज, समाजसैनिकांची कर्तव्ये, त्यांना मानधनाची
शक्यता या सर्व गोष्टींवर सरकारच्या व सामाजिक पातळीवर विचार व्हावा अशी रेखा
नार्वेकर यांची इच्छा आहे.
मला नार्वेकर
यांचे हे म्हणणे पटते. खरे तर, शिवसेनेने या कामाला चालना द्यावी असेही सुचवता
येईल. शिवसेनेचे संघटना व पक्ष म्हणून स्वरूप असेच सेवाभावी राहिले आहे. त्या
पक्षास राजकीय वैचारिक भूमिका कधी नव्हतीच. त्यांनी प्रथम परप्रांतीयांचा विरोध
आणि नंतर हिंदुत्व अशा भूमिका मांडल्या. त्या दोन्ही आधुनिक काळात गैरलागू ठरत आहेत.
अशा वेळी समाजाला त्याची घटनादत्त कर्तव्ये शिकवण्यासाठी एक व्यवस्था तयार करणे
आणि त्याद्वारे समाजातील ज्येष्ठ वर्गाच्या बळाचा उपयोग करून घेणे ही कल्पना
उपयुक्त ठरेल. शिवसेना पक्षास कार्यक्रम मिळेल. त्यांचा सहभाग सरकारात असल्याने व्यवस्था
करण्याचे काम सुकरतेने होईल. शिवसेनेने संघटनेच्या स्थापनेच्या काळात वॉर्डावॉर्डात
बस्तान बसवले ते त्या त्या ठिकाणचे स्थानिक प्रश्न नोंदून व त्यांची तड लावून. शिवसेनेला
बदललेल्या काळात राज्य पातळीवर आखलेली समाजसैनिक दलाची योजना विकेंद्रित पद्धतीने
राबवून समाजात तोच सद्भाव निर्माण करता येऊ शकेल.
रेखा नार्वेकर
व मी - आमच्या संभाषणातून असे ठरले, की ही कल्पना बुद्धिनिष्ठ, विचारी जनांसमोर
मांडून बघू, त्यास प्रतिसाद कसा येतो -काय घडते ते!
(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या
वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत.)
-------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------
रेखा नार्वेकर यांची पुस्तके
7 टिप्पण्या
डॉ. रवीन थत्ते हेदेखील ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत.
उत्तर द्याहटवा- नितेश शिंदे
ज्ञानेश्वरी किंवा गीतेचे वैशिष्ट्य हे आहें की व्यक्तिपरत्वे त्यांचे अर्थ विश्लेषण आणि विवेचन बदलू शकते...त्यामुळे जितके अभ्यासक तेव्हढे वेगवेगळे दृष्टिकोन मिळू शकतात ...आणि एक शिल्प अनेक अंगानी न्याहाळता येते...धन्यवाद
उत्तर द्याहटवावा!नार्वेकर ह्याची सूचना चांगली आहे .ती शिवसेनेनी उचलली तर समाजजीवनात शिस्त आणण्यात मदत होईल
उत्तर द्याहटवासौ.अंजली आपटे दादर
कोणत्याही राजकीय पक्षावर जबाबदारी टाकली तर अन्य राजकीय विचारांचे लोक दूर राहण्याचा धोका आहे. त्यासाठी अराजकीय व्यासपीठ जास्त प्रभावी/उपयुक्त ठरेल, असं वाटतं.
उत्तर द्याहटवातुमच्या मताशी सहमत आहे.
हटवाज्येष्ठांचा वेळ, अनुभव आणि समाजाचे देणे परत द्यायची इच्छा याचा उपयोग करून घेण्याची कल्पना चांगलीच आहे.
उत्तर द्याहटवारेखा नार्वेकर यांनी सुचवलेली कल्पना खरोखर च चांगली आहे.पुन्हा एकदा नव्याने समाजाची घडी बसवायची वेळ आली आहे.
उत्तर द्याहटवासौ.अनुराधा म्हात्रे. पुणे.