कलावंतीणीच्या ‘कोड्याचा माळ’ या नावाने सांगली जिल्ह्याच्या मणेराजुरी या गावच्या हद्दीतील एक भूभाग प्रसिद्ध आहे. ते ‘कोडे’ साधारण षटकोनी आकारात, अर्धवर्तुळात मांडलेले दिसते. माळावरील जागेला ‘कलावंतीणीचे कोडे’, ‘कोड्याचा माळ’ अशा वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. ती जमीन ब्रिटिशांच्या काळात सरकारजमा झाली. तो माळ पूर्वी इचलकरंजी संस्थानामध्ये होता. मणेराजुरी हे गाव आंदण दिले गेल्याचा संदर्भ पेशवाईच्या काळात सापडतो. त्याआधी औरंगजेब विजापूर-सातारा मार्गाने जात असे असेही सांगितले जाते. मोठ्या विस्तीर्ण माळावर, कुमठेफाटा ते शिरढोण या रस्त्याच्या कडेला ते कोडे आहे. खेड्यांतील लोक अमावस्या-पौर्णिमेला तेथे येऊन नारळ, हळदकुंकू, कापड ठेवतात.
कोड्याबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका ऐकण्यास मिळतात. मणेराजुरीत कलावंतीण राहण्यास आली. तिने तिची कला सादर करताना, तिच्या बुद्धीच्या जोरावर अनेक मातब्बरांना, राजे-रजवाड्यांना पराभूत केले. तिने तिच्या बुद्धिसामर्थ्याने माळरानावर लहानमोठ्या दगडगोट्यांचे कोडे मांडले. ती ते कोडे सोडवेल त्याच्याशी लग्न करणार होती. तसा तिचा पण होता. अनेकांनी कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात कोणी यशस्वी झाले नाही. कोडे सोडवताना एक प्रमुख अट अशी होती, की ज्या वाटेने कोड्यात प्रवेश करायचा ती वाट सोडून दुसऱ्या वाटेने बाहेर पडायचे. मात्र, ग्रामस्थ, ते कोणाला अजून जमलेले नाही असे सांगतात. कलावंतीणीने बुद्धिमत्तेच्या जोरावर शंभर बिघा जमीन बक्षीस म्हणून मिळवली. तिला वारस नाहीत म्हणून जमीन सरकारजमा झाली.
मणेराजुरी गावात तलाठी ऑफिसच्या पाठीमागे सरकार वाडा आहे. तो कलावंतीणीचा वाडा म्हणून ओळखला जातो. वाडा जवळजवळ नामशेष होत आला आहे. मात्र अजून एक-दोन भिंती, चौथरा, लाकडी खांब उभे करण्यासाठीचे जोते, दगडाचे घडवलेले चौकोन दिसून येतात.
दुसरी आख्यायिका अशी, की एक राजपुत्र त्या कलावंतीणीच्या प्रेमात पडला. त्याचा विचार तिच्याशी लग्न करण्याचा होता. त्याने त्याचे मनोगत तिच्याजवळ उघड केले, तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. अर्थात तिला कितीही वाटले तरी ती त्याच्याशी लग्नाचा विचार करूच शकत नव्हती. तिला तिच्यामुळे राजपुत्राच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये असे वाटत होते. त्यामुळे तिने स्वतःची सुटका त्याच्या प्रेमजाळ्यातून करून घेण्याचा निर्णय घेतला. एके रात्री, ती कोणासही न सांगता गाव सोडून निघाली. ती पहाटेपर्यंत त्या माळावर आली. राजपुत्राला ती बातमी समजताच तो तिच्या मागावर निघाला. त्याने तिला त्या माळावर गाठले. ती घाबरली. तिला तिची सुटका होणार नाही असे वाटू लागले. तिने राजपुत्राला अट घातली, की ती एक कोडे तेथे मांडेल आणि त्याने ते सोडवल्यास ती त्याच्याबरोबर लग्न करेल. राजपुत्राने ते आव्हान स्वीकारले, पण राजपुत्राला ते कोडे सोडवता आले नाही. तिची सुटका झाली !
छोट्यामोठ्या दगडगोट्यांची मांडणी करून मणेराजुरी गावातील माळावर बनवलेले ‘कोडे’ मांडलेले दिसते, हे खरे. ती आखणी अर्धवर्तुळाकार आकारात साधारण तीन गोल एकमेकांत मिसळून केलेली आहे. तेथे ईशान्य बाजूकडून प्रवेश करून, सर्व गोलांतून फिरून नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर येणे अशी योजना आहे. कलावंतीणीचा दंडक आत असलेल्या अरूंद मार्गावरून जाताना, एकाच मार्गावरून परत जायचे नाही असा होता. आजुबाजूच्या गावांतून लोक येतात. कोडे सोडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र ते व्यवस्थित रीत्या सोडवले जात नाही. कोड्याबद्दल लोकमानसात कुतूहल आहे. अशा कोणत्याही अद्भुत गोष्टीबद्दल स्वाभाविकपणे निर्माण होतात तशा दंतकथा या ‘कोड्या’बद्दल आहेत. उदाहरणार्थ, कोडे सोडवण्याचा प्रयत्न करेल, तो आंधळा होईल ! ज्या जागी ते कोडे मांडलेले आहे, ते वर्षानुवर्षे तसेच आहे. ऊन-पाऊस, वादळवारा यांचा थोडा परिणाम त्यावर झालेला असणारच. तेथील लहान लहान गोटे थोडे हलवले गेले असावेत असेही दिसते. त्यामुळे आतील रचनेत थोडा बदल झाल्याचे जाणवते.
- डॉ. प्रल्हाद कुलकर्णी 8830072503 drpakulk@yahoo.com
प्रल्हाद कुलकर्णी हे इंग्रजीचे डॉक्टरेट प्राप्त प्राध्यापक म्हणून कोल्हापूरच्या विवेकानंद संस्थेच्या कॉलेजमधून निवृत्त झाले. त्यांनी इंग्रजी लेखक विल्यम गोल्डिंग यांच्या कादंबऱ्या या विषयावर पीएच डी पदवी संपादली. त्यांची मराठीत आठ पुस्तके व इंग्रजीत चार पुस्तके प्रसिद्ध आहेत. निवृत्तीनंतर त्यांचा भटकंती आणि तत्संबंधी लेखन हा छंद बनला आहे. त्यांनी भारतविद्या, मोडीलिपी व पर्शियन भाषा या विषयांचाही अभ्यास केला आहे. त्यांनी ‘साहित्याचे पश्चिम रंग’ हे सदर ‘तरुण भारत’मध्ये पाच वर्षे लिहिले होते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
1 टिप्पण्या
सर.
उत्तर द्याहटवाखूप छान.
अनेकदा जाऊन आलो. आख्यायिकाही ऐकल्या आहेत. यासंबंधी जवळच असलेल्या मळणगावच्या दिनकर दत्तात्रय भोसले उर्फ चारुतासागर यानागिन, मामाचा वाडा व नदीपार या अजोड कथासंग्रहांनी मैलाचा दगड बनलेल्या
मराठी साहित्यातील अनमोँ रत्नानेही कथासुत्रात बांधले आहे. धन्यवाद...