सुनील खेडकर विद्यार्थ्यांसह शाळेत दहीहंडी उत्सव साजरा करतात. |
सुनील खेडकर या शिक्षकामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडी या गावाला ओळख मिळाली आहे. ते तेथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून आले आणि त्यांनी त्या गावचा शैक्षणिक कायापालट केला. पाथर्डी तालुका हा कायम दुष्काळी छायेत असणारा. त्या तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात छोटीशी लोकवस्ती असणारे मौजे जोगेवाडी गाव. तेथून पुढे गेले की बीड जिल्ह्याची हद्द सुरू होते. जोगेवाडी पाथर्डीपासून पस्तीस किलोमीटरवर आहे. गावात बहुसंख्येने भटक्या जमातीतील लोक राहतात. त्यात वंजारी, मागासवर्गीय यांचा प्रामुख्याने समावेश आहे. गावात शंभर टक्के लोक ऊसतोड कामगार व सहा महिने स्थलांतर करणारे.
जोगेवाडीमध्ये शाळेची स्थापना 1951 साली झाली. शाळा चौथीपर्यंत आहे. चार शिक्षक तेथे कार्यरत आहेत. सुनील खेडकर मुख्याध्यापक म्हणून 2012 साली शाळेत रूजू झाले. ती शाळा अनेक अभावांनी ग्रस्त होती. मुलांना पिण्यासाठी पाणी नव्हते, जनावरांचा मुक्काम शाळेतच असे, त्यामुळे मुलांना आणि पालकांना तेथे येण्याची इच्छा होत नसे. खेडकर यांनी सुरुवातीला शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले, पण लोकांनी व जनावरांनी एकही झाड शिल्लक ठेवले नाही.
खेडकर यांनी गावकऱ्यांना भेटणे सुरू केले, त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले, अडचणीही सांगितल्या. त्यातून नवीन शाळा बांधण्य़ाची योजना निघाली. जुनी शाळा दोन खोल्यांची गावात मध्यावर होती. त्याऐवजी नवी चार खोल्यांची शाळा लोकसहभागातून गावाच्या थोडी बाहेर बांधली आहे. ती तीन गुंठे जागेवर आहे. त्यासाठी लोकांनी स्वेच्छेने नव्वद हजार रुपयांची रक्कम उभी केली. रामदास खाडे या एकट्या गावकऱ्याने चाळीस हजार रुपये देणगी दिली. नवीन जागेत संरक्षक भिंत बांधली. हिरवळ, वाढलेली झाडे टिकवली. मुले शाळेकडे येऊ लागली. गावातील जुन्या बोअरवेलमधून (पाचशे मीटर अंतरावरून) शाळेत पाण्याची सुविधा शाळेच्या निधीमधून निर्माण केली. दर शनिवारी, दुपारनंतर दानशूर व्यक्तींना भेटून शाळेतील विद्यार्थ्यांना भेटण्यास बोलावले जाई. पालक सहभागातून पाच लाख रुपये 2015 ते 2019 दरम्यान जमा केले व शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ केली. त्यातून हॅण्डवॉश स्टेशन, आर.ओ. वॉटर सिस्टिम, शाळेची रंगरंगोटी, साऊंड सिस्टिम, कॉम्प्युटर, डिजिटल शाळेला लागणारे साहित्य खरेदी करण्यात आले. खेडकर म्हणाले, की शाळा चौथीपर्यंतच आहे, परंतु इ लर्निंग, डिजिटल पद्धत अशा सर्व मार्गांनी मुलांचे अध्ययन चालू असते. सेमी इंग्रजीचे वर्गही शाळेत सुरू केले. खेडकर यांची बदली वर्षभरापूर्वी चिंचपूर डोळेवस्ती या शाळेत झाली आहे. तीही शाळा पाच किलोमीटर अंतरावर आहे. तेथे फक्त एकोणीस मुले आहेत. ते म्हणाले, की तेथे पाचवीचा वर्ग सुरू करण्याच्या विचारात आहोत. खेडकर बोलत असतानाच जाणवते, की अध्ययन-अध्यापन हा त्यांचा ध्यास आहे.
गावातील नव्हे तर बाहेरगावांहूनही विद्यार्थी शिकण्यासाठी येऊ लागले. शाळेसाठी ती मोठी उपलब्धी होती. मुलांमध्ये आधी स्वच्छतेचा अभाव होता. शिक्षकांनी परिपाठातून मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे सुरू केले. मुले टापटीपपणे शाळेत येऊ लागली.
जोगेवाडीतील मुलांचे पालक स्थलांतर करणारे, त्यामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्या ओळखून त्यावर उपाययोजना केली तर मुले शाळेत येतील हे जाणून तसे प्रयत्न केले गेले. उपाय म्हणून पालकांचे मतपरिवर्तन केले. शिक्षकांनी पालकांची भेट घेतली व त्यांनी एकत्र येऊन पन्नास टक्के मुलांचे स्थलांतर रोखले. त्याकरता हंगामी वसतिगृह योजना 2015 पासून सुरू झाली. मुले रात्री शाळेतच राहत व त्यांच्या देखरेखीसाठी एक स्वयंसेवक नेमलेला असे. त्याला एक हजार रुपये मानधन देण्यात येई. प्रत्येक विद्यार्थ्यामागे शासन सहाशे रुपये खर्च करत असे, त्यातून त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय शाळेतच होई. ती योजना 2019 सालानंतर बंद पडली. मुलांचे राहणे त्या योजनेत शाळेमध्येच असे. परंतु त्यात मुलांची देखरेख, जबाबदारी असे अनेक घटक होते. त्याऐवजी मुलांची राहण्याची सोय त्यांच्या नातेवाईकांकडे केली जाते. त्यांचा रहिवास व भोजन यांसाठीचा खर्च त्यांचे पालक आनंदाने देतात असा अनुभव आहे.
शाळेतील कार्यक्रमासाठी महिला येत नसत. त्यांचा सहभाग मिळवण्यासाठी हळदीकुंकू, संगीत खुर्ची, पालक मेळावे इत्यादी उपक्रम घेतले. विद्यार्थ्यांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यास सुरुवात केली. पटनोंदणी 2012 मध्ये नव्वद होती ती एकशेवीस झाली.
शाळेने पुढील नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले : 1. फळा माझा मित्र - दोन वर्गखोल्यांमधील मोकळ्या जागेत एक फलक तयार केला. मुले त्यावर मनमोकळेपणाने हाताने स्वतःला आवडणारी चित्रे काढू लागली, मुली रांगोळ्या काढू लागल्या. अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांना फळा हा मित्र वाटू लागला. ती मुले त्यांच्या हुशार मित्राकडून दुपारच्या मधल्या सुट्टीत संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया शिकू लागली. मराठीतील मुळाक्षरे, इंग्रजीतील सोपे शब्ददेखील मुले शिकण्यास व लिहिण्यास लागली. इयत्ता पहिली ते चौथी असा सर्व वर्गांतील मुलांचा समावेश असल्यामुळे आपोआपच वर्ग ही संकल्पना न राहता मुले लहान-मोठ्या सर्वांकडून शिकू लागली. त्याचा फायदा असा झाला, की तीन महिन्यांत अभ्यासात मागे असणारी मुले हुशार मुलांसोबत आली. विद्यार्थ्यांची व्यक्त होण्याची उणीव भरून निघाली.
2. परिसराशी नाते जोडुया : मुले शाळेत अधिकाधिक रमण्यासाठी व टिकण्यासाठी हा उपक्रम राबवला. त्यात मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांतील शब्द, वाक्य, अनेक संबोध दोन फूट बाय एक फूट अशा बोर्डावर लिहून ते झाडावर; तसेच, परिसरात लावले. मुले सकाळी शाळेत आल्यानंतर परिसरातील ते सर्व बोर्ड वाचत बसत. त्या उपक्रमाचा फायदा असा झाला, की मुलांच्या मनातील अभ्यासाविषयाची भीती दूर झाली. विविध विषयांतील अनेक संबोध पहिली ते चौथीच्या मुलांना समजू लागले.
सातत्याने एखादा मजकूर किंवा आशय समोर जर आला तर तो चांगला लक्षात राहतो. असे प्रयोग अनेक गावांतून होण्यास हवेत. शाळेच्या भिंतींवर सुविचाराबरोबर संबोधही स्पष्ट होतील अशा काही गोष्टी येण्यास हव्यात.
३. चला, मुलांनो व्यक्त होऊ या : मुलांनी स्वतःमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बालसभा हा उपक्रम राबवला. त्यामध्ये मुलेच सर्व नियोजन करतात. दरमहा होणाऱ्या बालसभेसाठी वर्गावर्गात नोटिस काढून, वर्गातून मुलांची नावे व ते काय सादर करणार याची माहिती मागवली जाते. नंतर, कार्यक्रमाच्या दिवशी मुले गाणी, नकला, गोष्टी, प्रश्नमंजुषा, प्रयोग सादर करतात. अशा रीतीने मुले व्यक्त होऊ लागली व नवनवीन घडामोडींचा त्यांचा अभ्यास होऊ लागला. हाताची घडी तोंडावर बोट हे तत्त्व वापरून चालणार नाही, तर मुलांना बोलते करून त्यांना व्यक्त होऊ देणे हे महत्त्वाचे ठरले आहे.
4. स्वच्छ मुलगा, स्वच्छ मुलगी व शालेय मंत्रिमंडळ : मुलांना वैयक्तिक स्वच्छतेची सवय लागावी या हेतूने हा उपक्रम सुरू केला. ज्यांचा गणवेश स्वच्छ धुतलेला, तसेच व्यवस्थित नखे व केस असलेले, बेल्ट व ओळखपत्र व्यवस्थित लावलेले आहेत, अशा नीटनेटक्या राहणीच्या मुलांना फूल व बक्षीसरूपात वस्तू देऊन गौरवले जाते. शालेय मंत्रिमंडळ तयार केले. त्यात सर्व मंत्री मुलेच असतात. जी मुले शाळेत येऊ शकली नाहीत अशा मुलांच्या घरी मंत्रिमंडळातील सदस्य जाऊन ती शाळेत का आली नाहीत याची विचारणा करतात व ती माहिती सरांपर्यंत पोचवतात. स्वच्छता मंत्री, गुणवत्ता मंत्री हेही त्यांची त्यांची कामे चोख बजावतात.
विद्यार्थी गुणवत्ता व उपस्थिती वाढवण्यासाठी या उपक्रमांसोबतच मुलांसाठी बाल नर्सरी, बाल ग्रंथालय, स्वयंअध्ययन फळा, आदर्श परिपाठ, इंग्रजी शब्द, तारखेनुसार पाढे, सामान्यज्ञान, बोधकथा, विद्यार्थी वाढदिवस, स्वच्छ मुलगा वा मुलगी यांचे स्वागत, स्पर्धात्मक गणेशोत्सव, शालेय मंत्रिमंडळ, विद्यार्थी बचत बँक, बेटी बचाव बेटी पढाव, निबंध स्पर्धा, शैक्षणिक साहित्य कार्यशाळा, वृक्षदिंडी, विज्ञानकरिअर मार्गदर्शक, वेगवेगळ्या स्पर्धांत सहभाग, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम, लोकसभा अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे संस्कार दिले जातात.
आमीर खानने 'पाणी फाउंडेशन'च्या कार्यक्रमावेळी शाळेला भेट दिली. |
करोना काळात शिक्षकांनी गावातील कोविड सेंटरला पन्नास हजार रुपयांची मदत केली. शाळा समाजासाठी काय करते याचे ते आदर्श उदाहरण आहे. आमिर खाननेही ‘पाणी फाउंडेशन’ कार्यक्रमाच्या वेळी त्या शाळेला भेट दिली. त्याच्याबरोबर त्याचा ताफा होता. या नाविन्यपूर्ण उपक्रमांतून शाळेची वेगळी ओळख निर्माण झाली.
सुनील खेडकर हे पाथर्डी तालुक्यातील तीनखेडी गावचे. शाळेपासून ते गाव बारा किलोमीटरवर आहे. खेडकर यांचे शिक्षण बारावी डी एड झाले आहे. ते बारावीला तालुक्यात पहिले आल्यामुळे ‘शिरोडकर अध्यापक विद्यालय (मुंबई)’ येथे त्यांना डी एडसाठी गुणवत्तेवर प्रवेश मिळाला. खेडकर यांनी यापूर्वी धुळे जिल्ह्याच्या तिखी, पाथर्डी तालुक्याच्या मानेवाडी अशा गावी शिक्षक म्हणून काम केले. ते म्हणाले, की माझे वडील शेतकरी आहेत. त्यांची इच्छा मी शिक्षक व्हावे व मुलांना उत्तम शिकवावे अशी आहे. ती मी पूर्ण करतो. मी आधीच्या दोन्ही ठिकाणी उपक्रम सुरू केले. परंतु लोकांचा सहभाग लाभला नाही. जोगेवाडीत मात्र पालकवर्ग जागरूकपणे प्रतिसाद देई. ते म्हणाले, की मला मुलांमध्ये रमण्यास आवडते. आता सुट्टी आहे तरी आमच्या शाळेची तीन मुले राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत भाग घेत आहेत. त्यांना मी मार्गदर्शन करतो.
सुनील खेडकर 9049670245
- अनिल कुलकर्णी 9403805153 anilkulkarni666@gmai.com
डॉ. अनिल कुलकर्णी हे जालना येथील वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालयात प्राचार्य होते. ते औरंगाबादच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात विभागीय संचालक आणि महाराष्ट्र राज्य प्रौढशिक्षण संस्था साधन केंद्र येथे संचालक होते. ते शिक्षण क्षेत्रातील कल्पक व्यक्तीमत्त्वांचा शोध घेऊन त्यांविषयी लेखन करतात. त्यांचे लेखन विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहे. ते पुणे येथे राहतात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
2 टिप्पण्या
खेडकर शिक्षण क्षेत्रातील मिशनरी आहेत .
उत्तर द्याहटवाहे खरे हाडाचे शिक्षक ! त्यांच्या या कार्याची प्रशंसा करावी तितकी कमी!
उत्तर द्याहटवा