पत्र 12 महोदय,
मला माझा एक मुस्लिम नातेवाईक मिरवणुकीनंतर काही दिवसांनी भेटला. त्याने मला विनंती केली, की त्याच्या मुलाच्या सुंता समारंभाला मी हजर राहवे. तो समारंभ म्हणजे नक्की काय असते ते मी सांगणारच आहे, पण त्यापूर्वी हे स्पष्ट करण्यास हवे, की मुस्लिम धर्माच्या संस्कारांप्रमाणे तो विधी करण्यापूर्वी आणखी तीन महत्त्वाचे संस्कार मुलावर केले जातात. पहिला संस्कार हा मुलाच्या जन्मादिवशी केला जातो. तो संस्कार ब्राह्मण करतो. ब्राह्मण लोक जरी वेगळ्या धार्मिक तत्त्वाचे असले तरी त्यांना असलेल्या भविष्यविषयक ज्ञानामुळे त्यांच्याबद्दल मुस्लिमांना आदर असतो. तो त्याच्या ज्ञानानुसार मुलाचे भविष्य सांगतो आणि त्याने त्याचे कर्तव्य केले (ते फक्त भविष्यकथन असते) आणि मुलास योग्य असे सर्वात चांगले असे नाव सांगितले की त्याला मुलाच्या पालकांकडून भेटीदाखल काही दिले जाते आणि तो त्याच्या घरी परततो. दुसरा संस्कार मूल चार दिवसांचे झाले की केला जातो. तो मुस्लिम धर्मगुरू म्हणजे मुल्लाहकडून केला जातो. तो मुलाच्या आईला प्रसूतीनंतर भेटण्यास येणाऱ्या अनेक स्त्रियांच्या उपस्थितीत केला जातो. मुल्लाह प्रथम कुराणातील काही प्रार्थना म्हणतो, मुलावर मंतरलेले पाणी शिंपडतो, त्याच्या बेंबीवर आणि कानांत मोहरीचे तेल लावतो. ते झाले की समारंभ संपतो. मुल्लाह महिलांच्या मेळ्यामधून निघून पुरुषांच्या दिवाणखान्यात जातो. मुल्लाह गेला की हजामांच्या स्त्रिया प्रवेश करतात. मुलाच्या आईला त्या सर्व प्रकारे मदत करतात. एक तिला नखे कापण्यास मदत करते, दुसरी तिला हात धुण्यासाठी भांडे आणते, इतर जण तिला ठाकठीक रीतीने पोशाख चढवण्यास मदत करतात. थोरामोठ्यांच्या बायका मोठ्या संख्येने तिला भेटण्यास येत असतात. तिचे अभिनंदन करून समृद्धीचे प्रतीक म्हणून तिच्या मांडीवर ताजी फळे ठेवतात. ते सर्व झाले, की हजाम आणि त्याहून (तथाकथित) खालच्या वर्गाच्या स्त्रिया वरिष्ठ माहिलांचा पाहुणचार करतात. त्यात अनेक प्रकारच्या मिठायांचा आणि चवदार पदार्थांचा समावेश असतो. मुलाच्या वडिलांवरही पुरुषांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतो. पुरुषांनाही मिठाया व इतर चविष्ट पदार्थ वाढले जातात. त्या नंतर दुसरा संस्कार संपतो. तिसरा संस्कार विसाव्या दिवशी होतो. त्या दिवशी हेच सारे विधी पुन्हा केले जातात.
त्यानंतर ते सर्व मूळ शामियान्यात आले. त्या मुलाला त्याच्या मूळ जागेवर बसवले गेले. वाद्यांचा गजर अचानक थांबला. मौलाना त्यांची समारंभाची वस्त्रे घालून अवतीर्ण झाले. त्यांच्या हातातील चांदीच्या घंगाळात मंतरलेले पाणी होते. ते पाणी त्यांनी मुलाच्या अंगावर शिंपडले. मुलाची सुंता करणारा हजाम हळू हळू पुढे आला. त्याने सुंता विधी एका झटक्यात उरकला. त्या कसोटीच्या वेळी सर्व जण एका पायावर उभे राहिले आणि मुलाच्या आईवडिलांसह त्या सर्वानी स्वर्गस्थ अल्लाहकडे मुलाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. पुन्हा संगीत सुरू झाले. आता स्वर आनंददर्शक वाजू लागले. त्यानंतर मुलाला घेऊन त्याचे वडील घरी गेले आणि त्यांनी त्याला बिछान्यावर झोपवले. सर्व लोकांना हजामांनी हात धुण्यासाठी पाणी आणि नॅपकिन वाटले. सर्व लोक हात धुऊन अनवाणी पायांनी उत्कृष्ट अशा गालीचावर येऊन बसले. तेथे त्यांनी त्यांच्या आवडत्या खाद्याचा –स्थानिक भाषेत पुलाव, म्हणजे शिजवलेले भात आणि मासा घातलेले मटण - आस्वाद घेतला. सर्वत्र मशाली लावल्या होत्त्या. त्याने शोभा अधिकच वाढली होती.
(वझे यांनी साके दीन महोमेत यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला असून तो लवकरच प्रसिद्ध होणार आहे.)
- रामचंद्र वझे 98209 46547 vazemukund@yahoo.com
रामचंद्र वझे हे निवृत्त बँक अधिकारी. त्यांनी बँकेत चाळीस वर्षे नोकरी केली. त्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्यांना प्रवासवर्णनांचा अभ्यास करत असताना काही जुनी पुस्तके सापडली. ती पुस्तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्यांना वाटू लागले. त्यांनी तशा पुस्तकांचा परिचय लिहिण्यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले’, ‘क्लोज्ड सर्किट’, ‘शब्दसुरांच्या पलिकडले’ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर’ ही पुस्तके ‘ग्रंथाली’कडून प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यांनी लिहिलेल्या कथा हंस, स्त्री, अनुष्टुभ, रुची अशा मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे ’महाराष्ट्र टाईम्स’ आणि ‘लोकसत्ता’ या दैनिकांमधून लेख आणि पुस्तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
1 टिप्पण्या
या लेखात उत्सव आणि समारंभ यातून समाज रीत उलगडत जाते..लेख वाचनीय आहे
उत्तर द्याहटवा