पर्यावरण – प्रश्न आहे लाइफस्टाइलचा (Environment and the Lifestyle)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

पर्यावरण – प्रश्न आहे लाइफस्टाइलचा (Environment and the Lifestyle)

 

मीना नदी, नारायणगाव

रिव्हर सिस्टिम ही भूगोलातील नवी संज्ञा. शाळेत नदीचा धडा म्हणजे माहीत असे, की उगम, टप्पे, खनन, वहन, भरण क्रिया आणि भूरूपे! नदीचे महत्त्व म्हणजे तिच्यापासून फक्त आणि फक्त माणसाला मिळवायच्या फायद्यांची यादी! आणि नंतर आला Multidisciplinary Approach’? समर्थ रामदासांची उक्ती आहे- भूगोळ आहे भूमंडळीआणि विश्वाची प्राचीनता हे प्रमाण मानले जाते माणसाच्या जगण्याचे.

मिनेर - मीना नदी उगम

परंतु त्यापलीकडे, अगदी व्यक्तिगत पातळीवर मी माझ्या नारायणगाव या त्या वेळच्या छोट्याशा टुमदार खेड्यात जिवंत, रसरशीत खराखुरा भूगोल अक्षरशः जगले आहे! दोन वेशींमधील सडा-रांगोळ्यांनी सजलेल्या रस्त्याभोवताली वसलेले, सह्याद्रीच्या लेकींच्या म्हणजे छोट्या टेकड्यांच्या कुशीतील, गच्च- दाट हिरवाईच्या किनाऱ्यांमधील, मीना नदीची आरसपानी झुळझुळ अनुभवणारे माझे गाव! माझ्या गावात निसर्ग व्रत-वैकल्यातून, लोककथांतून, प्रथांतून, संकेतांतून जपला जाई. पिंपळावरील मुंजाच्या भीतीने आणि राखणदार खंडोबाच्या गोष्टींनी किती तरी झाडे वाचली! अपार श्रद्धेमुळे देवराया- त्यांतील वनचर निर्धास्त झाले! लेंडी ओढ्यावर पाणी पिण्यास येणाऱ्या प्राण्यांना अंधार पडल्यावर येणाऱ्या भुतांनीमाणसांपासून अभय दिले. उन्हाळ्यात नदी आटे, पण थोडी वाळू हाताने बाजूला करताच, वाहू लागलेले झऱ्याचे थंडगार पाणी आणि बांधावरची झाडे तन-मन तृप्त करत. उकिरडे होते, पण प्रदूषण नव्हते. संसाधने आणि गरजा, दोन्ही अगदीच कमी होती. मला भूगोल- निसर्ग आधी प्रत्यक्ष भेटला आणि मग पुस्तकातून!

शहरी जीवनाशी जुळवून घेताना लाइफस्टाइल कधी-कशी बदलत गेली ते समजलेच नाही! कपाटात चार-सहा कपडे-जोड असायचे. कपाट जाऊन वॉर्ड रोब भरला. जाहिरातींच्या माऱ्याने कधी न वापरलेली कॉस्मेटिक्सही जीवनावश्यक गरज बनली. कोणतीही गोष्ट किती जास्त काळ वापरता येईल या पूर्वीच्या विचारावर Use & Through’ ने सोयिस्करमात केली. शिकेकाईच्या जागी सुगंधी फेसाळ शाम्पू; तर Old Fashioned 501 सारखा साबण कपडों की चमकारच्या तेजाने अंधारात फेकला गेला, दातून, राखुंडी, दंतमंजन यांसारखे गावठी प्रकार सोडून, पेस्ट-ब्रशने आम्ही आधुनिक झालो!

         


पुण्यात आल्यावर, स्थिरावल्यावर आणि मुख्य म्हणजे शिक्षक म्हणून काम करताना याची जाणीव प्रकर्षाने अस्वस्थ करू लागली. lithosphere, Atmosphere, Hydrosphere, इको-सिस्टिम्स यांची चर्चा, लठ्ठमुठ्ठ पुस्तकांतील गुळगुळीत पानांतील ज्ञान विवेचन आणि आजुबाजूचे उद्ध्वस्त होत जाणारे पर्यावरण यांचा ताळमेळच लागेना. मी नदीप्रणाली, जलचक्र यांबद्दल वर्गात कळकळीने शिकवले, छान व्हिडिओ दाखवले तरी पुलावरून जाताना छिन्न-विच्छिन्न मुठा नदी आणि गावाला गेले, की लोकांनी वाळीत टाकलेली मीना नदी जाब विचारे; नद्याच काय पण सुकलेला ओहोळही जाब विचारतो. प्रत्येक व्यक्तीला पर्यावरणासाठी काहीतरी करावेसे वाटते, तसेच मलाही वाटते. माझ्यासारखी सामान्य व्यक्ती घरदार, संसार, नोकरी सांभाळून पर्यावरणासाठी नक्की काय योगदान देऊ शकते? मी प्रकाश गोळे यांनी स्थापन केलेल्या इकॉलॉजिकल सोसायटीने सुरू केलेल्या एक वर्षाच्या Sustainable Management कोर्समध्ये प्रवेश घेतला. तेथे महाजनसरांनी सांगितलेल्या जाबालाच्या गोष्टीत रंगून गेल्यावर एकच ब्रह्मवाक्य मनावर ठसले पर्यावरणाचे ज्ञान हेच ब्रह्मज्ञान होय.गोळेसरानी Environmental Restoration’ची गरज अधोरेखित केली. स्वाती गोळे मॅडम यांच्या वर्गामधून विविध भूरूपे, नदीप्रणाली आणि त्यांची पर्यावरणीय सेवा किंवा कार्ये हे नव्यानेच उलगडत गेले. त्यातून जाणीव झाली, की विद्यार्थ्यांना केवळ नैसर्गिक घटक तयार होण्याची प्रक्रिया, वितरण (Formation Process & Distribution) आणि अर्थातच त्याचे आर्थिक फायदे यापलीकडे जाऊन त्यांची पर्यावरणीय कार्ये समजावून सांगण्याची आणि इको-सिस्टिम्सच्या पुनरुज्जीवनाची नितांत गरज आहे.

गटारांचे पाणी नद्यांत सोडले जाते.

जलबिरादारी, सागरमाथाजीविधा, ऑइकॉस, वसुंधरा, जीवितनदी अशा संस्थांशी नाते होतेच. पर्यावरणीय प्रश्नांचे अनेक पैलू-प्रश्न अनेकांकडून समजून घेतले तरी त्यांच्या उत्तराची रेसिपी प्रत्येक व्यक्तीने तिच्यासाठी तयार करायची असते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे मोठ्या प्रमाणात झालेली ध्रुवीय प्रदेशाची आणि पर्यायाने पृथ्वीची वाताहत पाहून काही क्षण रक्त जरूर उसळते, पण शेवटी अॅक्शन मात्र वैयक्तिक पातळीवर घ्यायची असते. पुण्यातील जीवितनदीच्या तीन दिवसांच्या कार्यशाळेने साक्षात्कार झाला, की मी माझ्या कृतीतून पर्यावरणीय प्रश्नांना सामोरी जाऊ शकते, मी माझ्या परीने घरातूनसुद्धा नदीची स्वच्छता करू शकते आणि माझे उत्तम स्वास्थ्य हा त्यावरचा बंपर बोनस! ‘नदीतील सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त प्रदूषणाचा वाटा हा स्वत:च्या घरातून जाणाऱ्या सांडपाण्याचा आहेहे विदारक सत्य मनाला सलू लागले. जीवनशैली पर्यावरणपूरक बनवणे हाच त्यावरील एकमेव उपाय!

खरे तर, पर्यावरणातील सारी सूत्रे मी माझ्या घरातच अनुभवली होती. माझ्या आज्या, पणज्या, मोठी आत्या अशा कितीतरी! आजी दुधाच्या रिकाम्या झालेल्या भांड्यात कणिक भिजवून दूध-साईचा कणही वाया घालवायची नाही, पणजीचे डोळे अंधुक असले तरी पानात टाकलेले तिला बरोबर दिसायचे आणि तिच्या धाकाने सगळ्यांचे ताट स्वच्छ व्हायचे, वर खाऊन माजा, टाकून माजू नकाहा धडा गिरवला जायचा. कामवाली ठकू राखेने भांडी घासायची आणि ओंजळी ओंजळीने, दोन घमेली पाण्यात दोन घमेलीभर भांडी लखलखून चमकायची. ते होते Reduce’ हे पर्यावरणातील तत्त्व! सुट्टीत सगळे जमल्यावर तर आया-आज्या पोरे-नातवंडांनी वापरलेल्या कपड्यांचा जंगी Exchange एक्स्पो इव्हेंट लावायच्या. आजीची तिच्या सगळ्या पोरांकडे फेरी असायची तेव्हाच तिने आंद्याला’ हा स्वेटर लहान होऊ लागला, धाकट्या ‘चंद्याला’ बरोबर बसेल हे हेरलेले असायचे, त्यानुसार कपड्यांची अदलाबदल व्हायची. फ्रॉकच्या बदल्यात वापरलेले का असेना, पण परकर-पोलके मिळाल्याचा आनंद कोण होता! हे पर्यावरणातील Reuse’ आणि सणावाराशिवाय कोणत्याही नवीन कपडे, वस्तूंना, गोडाधोडाला Refuse’च असायचे तर आई-काकू या जुनेरी-गोधड्या यांतून Renew’ करत. ती सहज स्वीकारलेली, साधी सोपी जीवनपद्धत होती. आई, आजी अंतर्धान पावल्या, पण ऋषितुल्य शास्त्रज्ञ NCL चे प्रमोद मोघेसर आणि त्यांची टीम अशी मंडळी मदतीला होतीच.


सर्वात आधी आठवले ते आईचे भरपूर कोमट तेल लावून नंतर कचोरा, वाळा, नागरमोथ्याने सुगंधित शिकेकाईने खसखसून न्हाण्यास घालणे. नंतर उन्हात मोकळे केस वाळवणे. …..शाम्पूच्या कृत्रिम फेसात तसे अस्सल अनुभव हरवल्याची जाणीव पहिल्यांदाच झाली. शिकेकाई हा नैसर्गिक साबण आहे. Siphoning सारखा नैसर्गिक Detergent देणारी, वर्षभर केसांबरोबरच, तांब्या-पितळेची भांडी, दागिने आणि अगदी नदीचीही स्वच्छता करणारी शिकेकाई.Toxin free lifestyle हाच महामंत्र ठरला! पर्यावरणपूरक गोष्टी तयार करायच्या आणि वापरायच्या! उन्हाळ्याच्या सुट्टीत शिकेकाई- रिठे वाळवणे, दळणे हे नेहमीच्या हळद-तिखटाबरोबरच दळून आणले गेले. वर्षभराची साठवण झाली.

नदी स्वच्छ झाली का? असा प्रश्न प्रत्येक मीला नक्की पडेल. मीही घरातील बाजारू वहिवाटेला फाटा देऊन घरीच रिठा-शिकेकाई, कपड्यांचा साबण, फळांच्या उरलेल्या सालींपासून Bio-enzyme, भांड्याची पावडर, फेस पावडर असे कित्येक प्रयोग घर, नोकरी सांभाळत करून बघितले. ते सगळे घरगुती कामातच होऊन जाते. त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही. थोडा Mindset बदलावा लागेल, एवढेच. नवीन गोष्टी स्वीकाराव्या लागतील, ज्या तुमच्या-आमच्या, नदी- निसर्गाच्या शाश्वततेसाठी आवश्यक आहेत. फळांच्या साली कचऱ्याच्या डब्यात टाकण्याऐवजी बरणीत गूळ पाणी घालून ठेवाव्या, मधून मधून हलवाव्या. तीनएक महिन्यांत संपूर्ण घरासाठीचे सफाई द्रावण तयार होते. अशा कितीतरी गोष्टी! पैसे वाचतील आणि आपण नदीसाठी काहीतरी करतो हे समाधान केवढ्या मोलाचे नाही का? 

- स्वाती दीक्षित 9420175834 swatiadixit@gmail.com

स्वाती दीक्षित या ‘सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स आणि कॉमर्स’च्या माजी भूगोल विभागप्रमुख आहेत. त्यांना पस्तीस वर्षे अध्यापनाचा अनुभव आहे. त्या पर्यावरण विषयावरील विविध कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होतात. त्यांनी विषमुक्त जीवनशैली आणि पर्यावरणास अनुकूल उत्पादने यावर आधारित कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यांनी सेंद्रीय कचर्‍याचा वापर करून इमारतीवर भाज्या आणि फळे पिकवली आहेत. त्यांनी कवी विंदा करंदीकर यांच्या साहित्यावर आधारित अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.

------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या