
रापण म्हणजे सरकारमान्य नोंदणीकृत मच्छिमारी संस्था. होड्यांवर एम.एल.व्ही. व नंबर इंग्रजीत कोरून रंगवलेला असायचा. शासनाकडून आर्थिक मदत कधी मिळत नव्हती, परंतु चुकून मिळालीच तर ती पुढाऱ्याच्या किंवा त्यातल्या त्यात शिकलेल्या माणसाच्या खिशात जात असे. सोसायटीमध्ये कमीत कमी वीस सदस्य कायम स्वरूपी असत. एक किंमतीवान होडी, तांब्याचे मडके, एक छोटी होडी व रापणीची मोठी जाळी हीच काय ती त्यांची मालमत्ता. वर्षभरात मासे विकून, कुटा विकून किंवा आवारात मीठ आणल्याचे जे पैसे गोळा होत असत, त्यामधून वर्षाचा खर्च वजा जाता शिल्लक समप्रमाणात सर्वांना मे महिन्यात वाटली जाई. वर्षभराच्या मेहनतीचे फळ साधारण शंभर रुपये होत असे. मिळालेल्या धनातून कर्ज; तसेच, पावसाळी बेगमीच्या वस्तू घरात आणल्या जात; तर काही वेळा, लग्नकार्याला मदत होत असे.
होडी जाळ्यासह सकाळी पाचच्या सुमाराला पाण्यात ढकलली जाई. एका दोरखंडाचे टोक किनाऱ्यावर देऊन होडी सरळ खोल पाण्यात मार्गक्रमण करत असताना दोरखंड सोडला जाई व नंतर दांडका सोडून जाळे टाकण्यास सुरुवात होई. होडी काही अंतर गेल्यानंतर दक्षिणेकडे वक्राकृती फिरे आणि पुढे पुढे मार्ग काढत जाळे टाकले जाई. जाळे अर्धवर्तुळाकार पसरल्यानंतर होडी सरळ किनाऱ्याकडे वळे. त्यावेळी उरलेले जाळे व शेवटी, दोरखंड टाकला जाई. एक माणूस दुसऱ्या दोरखंडाचे टोक घेऊन, पाण्यात उडी घेऊन किनाऱ्यावर येई. होडी नांगरून उरलेले खलाशीही पाण्यात उडी मारून पोहत किनाऱ्यावर रापण ओढण्यासाठी येत. शेवटी, दोन्ही बाजूंनी आठ-आठ जोड्या-होड्या दोरखंडाला दोरी बांधून, त्यात पाच फूट लांबीचे टांगूल (बांबू) टाकून, ते कंबरेच्या खाली धरून रापण वरवर ओढली जाई. दोरखंड पूर्णत: संपण्यास कमीत कमी एक तास लागे. रापण ओढणे हे येरागबाळ्यांचे काम नव्हे. त्याला कंबर मजबूत व ताकद भक्कम लागते. दोरखंड माणसांकडून त्यांचे पाय मातीत/वाळूत खोलवर रोवून ओढला जाई. ती माणसे फार श्रमाचे काम उपाशी पोटी करत असत. दोरखंडानंतर टांगूल येत असल्याने, त्या पाठोपाठ जाळे येण्यास सुरुवात होई. जाळे दुडून मगच ते वर खेचले जाई. त्या प्रक्रियेत पुन्हा एक तास जात असे. जाळे जेव्हा कमी पाण्यात येई तेव्हा त्याचे वक्रकृती तरंग डोळ्यांना दिसत. किर (गल) पक्षी गोळा होत व पाण्यात मनसोक्त तरंगून पटापट मासे फस्त करत. ते दृश्य अविस्मरणीय असेच असे. जाळे पाच फूट खोल पाण्यात आल्यानंतर, त्यात मासे किती आहेत याचा अंदाज घेऊन नंतर जाळे वर कसे घ्यायचे ते ठरवले जाई. मासे भरपूर असतील तर जाळे तसेच पाण्यात ठेवून येंडीच्या (मासे पकडण्याचे साधन) सहाय्याने मासे कमी करत व शेवटी, पूर्ण जाळे माशांसह किनाऱ्यावर घेत. कधी कधी, जाळे कमकुवत असल्यास ते वर ओढताना रापण फुटे व मासे पाण्यात जात. त्यामुळे केलेले श्रम फुकट जात.माता-भगिनी संसाराचे रहाटगाडगे चालवण्यासाठी सकाळी आठ वाजता रापणीचे मासे विकत घेऊन, जड ओझे डोक्यावर घेऊन, तापलेली वाळू अनवाणी पायाने तुडवत, पाण्यातून मार्ग काढत तीन मैलांचे अंतर पार करून एस.टी. पकडण्यासाठी स्टँडवर पोचत असत. पंधरा मिनिटांच्या अवधीत ट्रंकांमध्ये मासे भरून, कसेबसे टपावर चढवून उभ्याने लिंगडाळचा तिठा गाठत असत. पुढे, दुसरी गाडी पकडून शिरगाव, कोळोशी, नांदगाव, फोंडा येथे जाऊन - मासे विकून संध्याकाळी सात वाजता परत येत. त्या सर्व श्रमातून फक्त दहा रुपये त्यांना प्रत्येकी सुटत असत. तरीही त्या चांगल्या प्रकारे संसार चालवून मुलांना एस एस सी किंवा डी एड करू शकल्या. त्याच त्यांच्या श्रमातून पुढील पिढी कर्तव्यदक्ष डॉक्टर, इंजीनियर; तसेच, चांगले शिक्षक बनू शकली आहे.
तांबळडेग ‘सुजलाम् सुफलाम्’; तसेच, सर्व क्षेत्रांत पुढे आहे, आज सर्व काही बदलून गेले आहे. किनाऱ्यावर गाडी येते, परंतु नयनरम्य किनारपट्टीवरील देखावा लुप्त झाला आहे. नवीन पिढीने माता-भगिनींचे पांग फेडून स्वबळावर रस्ता, पाणी, वीज आणून तांबळडेगचे नंदनवन केले आहे. तांबळडेगची वाळू जशी शुभ्र, तशीच तेथील माणसे पूर्वीपासून पारदर्शक व कष्टाळू आहेत. पायाखालच्या वाळूनेच त्या सर्वांना जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवले.
– सूर्यकांत येरागी 9870381020
(दर्याचा राजा दिवाळी अंक - 2019 वरून उद्धृत, संपादित)
सूर्यकांत येरागी हे सोमैया कॉलेजमध्ये झूओलॉजी विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही विद्यार्थ्यांनी पी.एचडीचे चे प्रबंध पूर्ण केले आहेत. त्यांचे तीनशेहून अधिक रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना काही पुरस्कार मिळाले आहेत, त्यापैकी एक महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट शिक्षक हा पुरस्कार त्यांना विशेष गौरवास्पद वाटतो.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------












3 टिप्पण्या
Very nice information given by Mr. Suryakant Yerangi Sir. Foom ,- Rajan J. MASTAKAR, Andheri West.
उत्तर द्याहटवाRapan , Golden culture and tradition very effectively narrated by my Guru Dr Yeragi Sir is spreading knowledge about this wonderful culture traditional fishing methods and life of fishermen very successfully. Salute to your dedication Sir. Dr. Kakavipure.
उत्तर द्याहटवासर,खुपचं माहितीपूर्ण लेख आहे.लेखात मासे पकडणे,त्यासाठीची साधने यांची माहिती लेखातून कळली.
उत्तर द्याहटवा