उषा तांबे |
उषा तांबे या खरोखरच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती आहेत. प्राध्यापक, मुलाखतकार, समीक्षक, लेखक, इंग्रजी-मराठी
- मराठी-इंग्रजी अशा दुहेरी अनुवादक आणि पुन्हा त्या दोन्ही भाषांत मूळलेखन
करणाऱ्या, संपादक, साहित्य संघ
पदाधिकारी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या
पदाधिकारी अशा विविध जबाबदाऱ्या उषा तांबे यांनी कुशलतेने सांभाळल्या आहेत आणि
त्यांवर स्वत:ची छाप उमटवली आहे. उषा तांबे मूळ विदर्भातील,
पण त्या मुंबईत पती शशिकांत तांबे यांच्याबरोबर आल्या आणि मुंबईकर
होऊन गेल्या. अर्थात, त्यांनी विदर्भाचे आस्था, आतिथ्य हे गुण जपून ठेवले आणि मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रभर परिवार
निर्माण केला आहे. त्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रमुख सूत्रधारांपैकी एक
आहेत. त्या नात्याने त्यांची नजर पुऱ्या महाराष्ट्रातील साहित्य व्यवहारावर असते.
मुंबई मराठी साहित्य संघाचे कार्यवाहपद असो वा अखिल भारतीय मराठी साहित्यमहामंडळाचे अध्यक्षपद – दोन्ही, उषा
तांबे यांनी कौशल्याने सांभाळले आहे. संस्था म्हटली, की
'पिंडे पिंडे मतिर्भिन्ना' ह्या न्यायाने
मतमतांतरे असणारच. त्यातून पेचप्रसंग उभे राहणारच. अशा वेऴी परिस्थिती हाताळताना
कटुता येऊ न देता त्यातून बाहेर पडण्याचे कसब मृदुभाषी उषा तांबे यांच्या अंगी
असल्याचे सिद्ध झाले आहे.
उषा तांबे यांचे माहेरचे आडनाव ठाकूर. अमरावतीतील ठाकूर घराणे हे गांधीवादी
विचारसरणीचे. त्यांचे आईवडील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या घरी भारताच्या
आरोग्यमंत्री अमृता कौर,
पंजाबचे राज्यपाल काकासाहेब गाडगीळ अशा थोर, मोठमोठ्या
माणसांचे येणेजाणे असे. तथापी उषा यांचे शिक्षण एम ए पर्यंत निर्वेध झाले; नव्हे त्यांना एम ए परीक्षेत
सुवर्णपदक मिळाले. त्यांचा विषय होता इंग्रजी वाङ्मय. त्यांचे लग्नही
चारचौघींप्रमाणे चांगला इंजिनीयर मुलगा पाहून करून देण्यात आले. त्या लग्नानंतर
उषा शशिकांत तांबे झाल्या आणि संसारात रमून गेल्या. शशिकांत तांबे हे स्वत:ही उत्तम वाचक, पण मितभाषी.
त्यांच्या वाचनाचे विषय वैज्ञानिक. उषा तांबे त्यांच्या लग्नानंतरचा एक किस्सा
सांगतात. 'मुगल ए आझम' सिनेमा
पाहिल्यानंतर उषा तांबे त्याविषयी भरभरून शशिकांत यांच्याशी बोलत होत्या. शशिकांत
यांनी एकाच वाक्यात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली - ''अनारकलीला
विटांच्या भिंतीत चिणलं... चुकीचं दाखवलंय ते, अकबराच्या
काळी तशा विटा नव्हत्याच!'' दोघेही रसिक. पण त्यांच्या
रसिकतेची जातकुळी वेगवेगळी. जे न देखे रवी ते देखे कवी... तरल कविमनाच्या उषा
यांना जे दिसले नाही ते बांधकाम अभियंता असलेल्या त्यांच्या यजमानांच्या नजरेने
बरोबर टिपले होते!
शशिकांत
तांबे ह्यांची सहचारिणी आणि दोन मुले... उषा तांबे यांचे आयुष्य चारचौघींसारखे, संसारात रमलेली
सुखवस्तु घरातील गृहिणी असे सुरेख चालले होते. तशातच
शशिकांत यांची बदली मुंबईत झाली. तोपर्यंत शशिकांत यांनी पाटबंधारे आणि रस्ते व बांधकाम
या दोन विभागांत येलदरी, नागपूर, अमरावती
येथे काम केले होते. त्यांना आता खास मुंबईला आणण्यात आले होते. मुंबईच्या नव्या
वातावरणात त्यांचे आयुष्य बदलून गेले. उषा तांबे यांनी मुंबईत नोकरी करण्याचे
ठरवले आणि त्या ठाणे कॉलेजमध्ये इंग्रजी विषय शिकवू लागल्या. त्या पहिल्या
दिवसाच्या पहिल्या तासापासून आदबशीर जरब विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करू
शकल्या. पुढे, त्या इंग्रजीच्या विद्यार्थिप्रिय
प्राध्यापकही झाल्या. त्याच बेताला त्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या संपर्कात
आल्या. तेथे त्यांना उत्तम संधी लाभली. मुंबई मराठी साहित्य संघात आयोजित केलेल्या
मुलाखतीच्या कार्यक्रमात 'इंदिरा' ह्या
गाजलेल्या
पुस्तकाच्या लेखिका पुपुल जयकर आणि त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करणारे अशोक जैन यांची मुलाखत इंग्रजी-मराठी ह्या दोन्ही भाषांमध्ये कोण घेऊ शकेल असा प्रश्न उभा राहिला तेव्हा नाव पुढे आले ते उषा तांबे यांचे. उषा तांबे यांनी घेतलेली ती मुलाखत त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि नेमकेपणाने, सहज व खुसखुशीत संवाद साधणे या वैशिष्ट्यांमुळे रंगली. त्यानंतर उषा तांबे यांना मुंबईचे साहित्यविश्व खुले झाले. त्या वर्तमानपत्रांत लिहू लागल्या. त्यांनी वर्तमानपत्रांत केलेली पुस्तक परीक्षणे गाजली. कारण पुस्तके मातब्बरांची होती; विविध तऱ्हांची होती. उदाहरणार्थ रा.चिं. ढेरे यांची 'भारतीय रंगभूमीच्या शोधात' व 'लोकसंस्कृतीचे उपासक' ही दोन; अशोक केळकर यांचे 'मध्यमा'; य.दि. फडके यांचे 'व्यक्तिरेखा'; इंदिरा संत यांचे 'मालनगाथा'; शरणकुमार लिंबाळे यांचे 'दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र'; विजया राजाध्यक्ष यांचे 'समांतर'; अरुणा ढेरे यांचे 'मनातलं आभाळ'. उषा तांबे यांचा इंग्रजी हा अध्यापनाचा विषय होता. त्यामुळे त्यांनी इंग्रजी पुस्तकांवरही भरपूर लिहिले.
पुस्तकाच्या लेखिका पुपुल जयकर आणि त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करणारे अशोक जैन यांची मुलाखत इंग्रजी-मराठी ह्या दोन्ही भाषांमध्ये कोण घेऊ शकेल असा प्रश्न उभा राहिला तेव्हा नाव पुढे आले ते उषा तांबे यांचे. उषा तांबे यांनी घेतलेली ती मुलाखत त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि नेमकेपणाने, सहज व खुसखुशीत संवाद साधणे या वैशिष्ट्यांमुळे रंगली. त्यानंतर उषा तांबे यांना मुंबईचे साहित्यविश्व खुले झाले. त्या वर्तमानपत्रांत लिहू लागल्या. त्यांनी वर्तमानपत्रांत केलेली पुस्तक परीक्षणे गाजली. कारण पुस्तके मातब्बरांची होती; विविध तऱ्हांची होती. उदाहरणार्थ रा.चिं. ढेरे यांची 'भारतीय रंगभूमीच्या शोधात' व 'लोकसंस्कृतीचे उपासक' ही दोन; अशोक केळकर यांचे 'मध्यमा'; य.दि. फडके यांचे 'व्यक्तिरेखा'; इंदिरा संत यांचे 'मालनगाथा'; शरणकुमार लिंबाळे यांचे 'दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र'; विजया राजाध्यक्ष यांचे 'समांतर'; अरुणा ढेरे यांचे 'मनातलं आभाळ'. उषा तांबे यांचा इंग्रजी हा अध्यापनाचा विषय होता. त्यामुळे त्यांनी इंग्रजी पुस्तकांवरही भरपूर लिहिले.
त्या
टप्प्यावर उषा तांबे सघन लेखनाकडे वळल्या. त्यांचा स्वत:चा वावर शिक्षण व साहित्य या
क्षेत्रात होता तर शशिकांत तांबे धरणे, बंधारे, रस्ते यांच्या
बांधकामात बुडून गेले होते. ते त्यांची सरकारी नोकरीत झपाट्याने प्रगती होत मुख्य
अभियंता पदापर्यंत पोचले होते. उषा तांबे यांचा भोवताल ती बांधकामे हाही होता.
त्यांना शशिकांत यांच्याबरोबर कोठे कोठे, दूरस्थळी साइटवर
जावे लागे. उषा तांबे यांचे लक्ष वैशिष्ट्यपूर्ण आणि मराठीत कधीही न आलेल्या त्या
परीघाबाहेरच्या विषयांनी वेधले. त्यानुसार त्यांचे पहिले पुस्तक अवतरले ते 'काँक्रिटचे किमयागार'. पुस्तकात महाराष्ट्रातील
वेगवेगळ्या प्रकल्पांच्या बांधकामांची सूक्ष्मतेने व लालित्याने माहिती लिहिली
आहे. अभियंत्यांची प्रकल्प स्थळे शहरागावांपासून दूर, रानावनात
असतात. उषा तांबे यांनी त्या ठिकठिकाणी जाऊन तपशील मिळवले आणि ते ललित लेखन
लोकांसमोर मांडले. त्यांनी त्यांना
स्वत:ला स्थापत्यशास्त्राचा गंधही नसताना
त्यातील बारकावे अशा पद्धतीने पुस्तकातून मांडले आहेत, की वाटावे उषा तांबे
ह्या बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत! पुस्तकाला प्रस्तावना माधवराव चितळे यांनी
लिहिली आहे. उषा तांबे यांनी पुढील विषय हाताळला तो कोयनेचा. तेथे उषा तांबे यांना
आणखी कष्टपूर्वक, संशोधनपूर्वक लेखन करावे लागले. जमिनीच्या आत बांधलेली जलविद्युत केंद्रे, कोयनेचे प्रचंड पात्र वळवणे म्हणजे काय, बोगदे,
जमिनीच्या कित्येक फूट खाली राहून काम करण्यातील शारीरिक आणि मानसिक
ताण...धरण, पूरपरिस्थिती, भूकंप असे
मानवी जीवनाशी निगडित प्रश्न... हे सगळे त्यांनी अभ्यासू वृत्तीने, चिकाटीने आणि मानवतेच्या दृष्टिकोणातून समजून घेतले आणि मग गोळा केलेला
सगळा तपशील 'कोयनेची कहाणी' या
पुस्तकातून वाचकांपुढे ठेवला. पुस्तकाची लेखनशैली सहज आहे. उषा तांबे या
आगळ्यावेगळ्या दोन विषयांवर लेखन केल्यामुळे मनापासून त्यात रमल्या. त्यामुळेच
त्यांनी साऱ्या भारताला कुतूहल असलेला पुढील विषय घेतला, तो
म्हणजे मुंबईचा वरळी-वांद्रे सागरी सेतू! त्यांचे त्यापुढील 'रोमांचकारी रेल्वे' हे पुस्तक राजहंस’ने 2014 च्या जानेवारीमध्ये प्रकाशित
केले. त्यांचे बांधकामविषयक लेखन यशस्वी होण्यासाठी त्यांचे यजमान शशिकांत तांबे
यांची त्यांना कायम साथ मिळाली आहे.
उषा
तांबे यांचा मुळात पिंड ललित लेखनाचा. त्यामुळे त्यांनी कथा वगैरे साहित्यही बरेच
लिहिले आहे. त्यांची 'मज फूलही रुतावे' ही पहिली कथा ‘माहेर’ने प्रसिद्ध केली आणि
त्यांचा कथालेखनाचा ओघ सुरू झाला. त्यांचा पहिला कथासंग्रह 'परीघाबाहेर'. त्या कथासंग्रहाला शासनाचा दिवाकर कृष्ण पुरस्कार मिळाला आहे. कथाकार
शांताराम ह्यांनी त्या संग्रहाच्या निमित्ताने म्हटले आहे, 'मराठी कथेच्या भवितव्याबद्दल चिंता करणाऱ्यांना आश्वस्त करणारा कथासंग्रह'. त्यानंतर त्यांचा 'संवाद' हा
वेगळ्या मनोविश्वाचा वेध घेणाऱ्या कथांचा आणखी एक संग्रह आला. उषा तांबे त्यानंतर
अनुवादाकडे वळल्या. विजय नाईक लिखित 'मंडेलांच्या देशात'चा In the land Of Mandela', आशा मुळगावकर
ह्यांच्या 'तुजविण संसारी'चा 'मिसिंग यू', इस्रायली लेखक ए.बी. येवोशुहा
ह्यांच्या 'होशिवा मेहोडू'चा इंग्रजीत 'ओपन हार्ट' अशा शीर्षकाने अनुवाद झालेल्या पुस्तकाला
'छेदिता हृदय हे' असे चपखल शीर्षक देऊन
केलेला अनुवाद... हे उषा तांबे यांनी केलेले अनुवाद वाचकांच्या पसंतीला उतरलेले
आहेत. डेबोरा रॉड्रिक्ज ह्या अमेरिकन लेखिकेच्या 'काबूल
ब्यूटी स्कूल,' शेरलॉक होम्स ह्या काल्पनिक गुप्त
पोलिसाच्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वावर मिच कुलीनने लिहिलेल्या 'ए स्लाईट ट्रिक ऑफ द माइंड' ह्या कादंबरीचा तेच
शीर्षक कायम ठेवून केलेला अनुवाद, शशी देशपांडे ह्यांच्या
इंग्रजी कथांचा 'जाणीव ' हा मराठी
अनुवाद अशी काही पुस्तके उषा तांबे यांच्या नावावर आहेत. उषा तांबे ह्यांच्या
कथांची, लेखांची आणि पुस्तकांची शीर्षकेही समर्पक आणि कल्पक
असतात.
'कहाणी कोयनेची', 'जाणीव' ह्या
त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले आहेत. 'छेदिता हृदय हे' ह्या पुस्तकाला पुरस्कार देऊन ‘मसाप (पुणे) यांनी त्याची नोंद घेतली
आहे. उषा तांबे यांच्या अध्यापन व साहित्य यांतील कार्याची दखल घेऊन गं.ना.
जोगळेकर यांच्या नावाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्या
मुंबई मराठी साहित्य संघाच्या 'साहित्य' ह्या
त्रैमासिकाच्या काही काळ संपादक होत्या. उषा तांबे यांनी नंतर संस्थात्मक कार्याची
जबाबदारी अधिक उचलली. काम करणारी व्यक्ती जितकी अधिक कामे करते, तेवढी अधिक तिची कार्यशक्तीही वाढून कसदार होते हा त्यांच्याबाबतीतील
अनुभव आहे. अष्टपैलू उषा तांबे यांच्या व्यक्तिमत्त्वातील संस्थात्मक कामाचा पैलू
गेल्या काही वर्षांत चमकू लागला आहे. त्यांनी केलेल्या संस्थात्मक कामाने मोठी
उंचीही गाठली आहे. मात्र त्यामुळे त्यांचे लेखन झाकोळून गेले की काय अशी शंका
येते.
लेखिका अनुपमा उजगरे या मूळच्या अहमदनगरच्या. त्यांची शैक्षणिक
प्रगती लग्नानंतर पती निरंजन उजगरे व सासरे हरिश्चन्द्र उजगरे यांच्या
प्रोत्साहनामुळे घडून आली. त्यामुळे त्यांना सामाजिक जीवनात गती लाभली आणि त्यांची
साहित्यविश्वात प्रतिष्ठा निर्माण झाली. त्यांनी लेखनच नव्हे तर संपादन आणि
संशोधनही केले आहे. त्यांनी अनेक संस्थांमध्ये मानाची पदे भूषवली. त्यांनी व्यवसाय
म्हणून शिक्षिकेची नोकरी केली. मराठी भाषा व साहित्य हे त्यांच्या जिव्हाळ्याचे
विषय होत. (अधिक माहितीसाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
उषा तांबे यांची काही छायाचित्रे आणि पुस्तकांची मुखपृष्ठे -
उषा तांबे यांची काही छायाचित्रे आणि पुस्तकांची मुखपृष्ठे -
4 टिप्पण्या
अतिशय सुंदर. खूपच प्रेरणादायक.
उत्तर द्याहटवाभारी व्यक्तिमत्व
उत्तर द्याहटवाआदरणीय सौ उषाताईं तांबे ह्यांचे वरील लेख वाचला,खूप आवडला.त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा आढावा लेखिकेने खूप कौशल्याने वाचनीय केला आहे.त्यामुळे त्यांचे प्रथमतः अभिनंदन. सौ ताईंची जिद्ध ,अभ्यासू वृत्ती ,प्रेमळ स्वभाव,भाषेवरील प्रभुत्व व तितक्याच सामर्थ्याने आपला मुद्दा समर्थपणे मांडणे व पुढे नेने ह्यातील कौशल्य सगळेच जाणतात .त्यांच्या अंगी असलेल्या गुणांबाबत जितके लिहावे तेवढे थोडेच. लेखिकेने त्यांचं व्यक्तित्व अष्टपैलू कस आहे ?ह्याच समर्पक वर्णन खूप आवडलं. .अत्यंत कमी वेळात साहित्य क्षेत्रात एवढी उंची गाठणाऱ्या माझ्या मते खूप कमी . सौ उषाताईंना सुयश चिंतितो श्रीकांत डबले
उत्तर द्याहटवापुणे
साहित्य क्षेत्रातील एक प्रगल्भ व्यक्तिमत्व
उत्तर द्याहटवाअतिशय प्रेमळ शांत आणि मनमिळाऊ.
अशा आमच्या उषाताई