शिवाजी विद्यापीठाच्या जलसंधारणाची यशस्वी कहाणी (Shivaji University’s Fruitful Water Conservation Efforts)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

शिवाजी विद्यापीठाच्या जलसंधारणाची यशस्वी कहाणी (Shivaji University’s Fruitful Water Conservation Efforts)


शिवाजी विद्यापीठ
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला आठशेत्रेपन्न एकरांचा परिसर लाभला आहे. विद्यापीठाला पाणीपुवठा राजाराम तलाव आणि दोन विहिरी यांतून सुरुवातीला होई. त्यातील एका विहिरीचे पाणी प्रयोगशाळांसाठी आणि दुसऱ्या विहिरीचे पाणी उद्यानासाठी वापरले जात असे. विद्यापीठाचा विस्तार झाला. मुलांची-मुलींची वसतिगृहे बांधण्यात आली. विद्यापीठात चाळीस विभागांमध्ये सात हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांतील तीन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी वसतिगृहात राहतात. विविध विज्ञान प्रयोगशाळांमधून संशोधन सुरू असते. परिसरातील निवासस्थानांत शंभरापेक्षा जास्त कर्मचारी कुटुंबांसह राहतात. त्या सर्वांची पाण्याची गरज मोठी आहे. विद्यापीठ आरंभी जादा पाणी महानगरपालिकेकडून घेत असे. पाण्यापोटी महानगरपालिकेला द्यावी लागणारी रक्कम वाढू लागली. तेव्हा विद्यापीठाने भाषा भवनच्या पाठीमागे तलाव सत्तर लाख रूपये खर्चून 2002 मध्ये बांधला. मात्र त्यात पाणी थांबत नव्हते. तेव्हा तलावात पाणी येण्यासाठी पाट तयार करावेत आणि त्या कामात राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्य घ्यावे असे कुलगुरू माणिकराव साळुंखे यांनी ठरवले. तेव्हापासून शिवाजी विद्यापीठाचे जलसंधारणाचे प्रयोग सुरू झाले आणि त्यांत यशच येत गेले. सेवा योजनेचे समन्वयक जे.आर. भोळे यांनी पुढाकार घेऊन, अभियांत्रिकी विभागाच्या सहकार्याने काम करून घेतले. तो तलाव 2005 मध्ये पाण्याने भरून वाहू लागला. विद्यापीठाने महानगरपालिकेचे पाणी घेणे बंद केले. परंतु तलावातील पाणी डिसेंबरमध्ये संपले. पुन्हा काही महिने महानगरपालिकेचे पाणी घ्यावे लागले. त्या काळात विद्यापीठ साधारण आठ महिने स्वत: साठवलेले पाणी वापरत असे.
महानगरपालिकेचे पाणी घेणे पूर्ण बंद व्हावे या हेतूने दुसरा तलाव संगीतशास्त्र विभागा शेजारी बांधण्यात आला. केवळ साडेचोवीस लाख रूपये खर्चून पाच कोटी लिटर पाणी साठवणक्षमता असणारा तो तलाव बांधला. त्यानंतर 2014 मध्ये त्या तलावाच्या पश्चिमेस शंभर फूट व्यासाचीपस्तीस फूट खोलीची विहीर खोदली. त्याशिवाय लिड बॉटॅनिकल गार्डनला पाण्याची सोय व्हावी या हेतूने वनस्पतीशास्त्र विभागातील प्रकल्पातून भाषा भवन तलावाच्या पश्चिमेस दोन शेततळी आणि एक विहीर खोदण्यात आली. त्यातून बॉटनी विभागाच्या पाण्याचा ताण कमी झाला. अशा सर्व प्रयत्नांमुळे विद्यापीठ पाण्याबाबत सुखी होते, मात्र स्वंयपूर्ण नव्हते.
पुन्हा 2015 मध्ये महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या. कोल्हापूरही त्याला अपवाद नव्हते. महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यात कपात केली. विद्यापीठाला विद्यार्थ्यांना पाणी पुरवणे कठीण झाले. सत्राचा कालावधी कमी करून परीक्षा एक महिना अगोदर घ्याव्या लागल्या. त्यावेळी दुष्काळी मराठवाड्यातील देवानंद शिंदे हे कुलगुरू होते आणि मी कुलसचिव. आम्ही विद्यापीठाला पाण्याबाबत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे ठरवले. प्राचार्य डी.आर. मोरे, उपकुलसचिव गिरीश कुलकर्णी, डी.के. गायकवाड अशी सर्व मंडळी एकत्र आली आणि आम्ही जलसंधारणाच्या कामात पुन्हा जोमाने हात घातला. पहिला टप्पा म्हणून सर्व तळ्यांना पाणी आणणाऱ्या चरींचे पुनरूज्जीवनदोन विहिरींचा गाळ काढणे आणि त्यांचे बांधकाम ही कामे हाती घेतली. महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण संचालकांच्या संघटनेने दोन दिवसांसाठी जेसीबी मशीन दिले. तेवढ्या अवधीत पहिले शेततळे खोदून पूर्ण केले. पुढे साखळी पद्धतीने आणखी दोन शेततळी पूर्ण करण्यात आली. त्या तळ्यांचे वैशिष्ट्य असे, की एक भरल्यानंतर त्याचे जास्त झालेले पाणी आपोआप दुसऱ्या आणि ते भरले की तिसऱ्या तळ्यात जाते. सर्व तळ्यांची उभारणी सुतार विहिरीजवळ करण्यात आली आहे.
          त्याच टप्प्यावर सिंथेटिक ट्रॅक परिसरातील विहिरीचा गाळ काढून टाकला. खरे तर, तो विद्यापीठाचा सर्वात उंच भाग. कडक उन्हाळा आणि दुष्काळ असूनही गाळ काढल्यानंतर पस्तीस फूट खाली तळाशी पाणी दिसू लागलेत्या विहिरीचे तातडीने बांधकाम करून घेण्यात आले. त्या पाठोपाठ सुतार विहिरीजवळील शिंदे विहिरीचा गाळ काढून टाकला. ती विहीर तीस फूट खोलीची, पण गाळाने पंचवीस फूट भरलेली होती. त्या विहिरीलाही गाळ निघताच पाणी येऊ लागलेतळाशी आठ फूट पाणी साठले. त्या विहिरीचेही बांधकाम करण्यात आले. गाळ काढून दोन्ही विहिरींच्या बांधकामास साडेसहा लाख रूपये खर्च आला.
सेवा योजनेचे स्वयंसेवकअभियांत्रिकीचे कर्मचारी आणि उद्यानविभाग या सर्वांनी एकदिलाने त्या मोहिमेत सहभाग घेतला. त्यांच्यातर्फे सर्व तळ्यांना येणारे पाण्याचे स्रोत स्वच्छ करण्याचेअडथळे काढण्याचे काम केले गेले. त्यावेळी एक वेगळाच अडथळा लक्षात आला. पुणे बंगलोर रस्ता रुंदीकरणात शाहू नाक्यापासून पश्चिम बाजूला जाणारे पाण्याचे प्रवाह विस्कळीत झाले होते. त्या रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी पश्चिम भागात जावे म्हणून रस्ता बांधताना जागोजागी फूटपाथखालील गटाराचे मार्ग सोडले होते. मात्र विद्यापीठाचे त्याकडे दुर्लक्ष झाले होते. पण तो प्रश्न सोपेपणाने सुटला. रस्त्याचे पाणी दोन ठिकाणांवरून भाषाभवनजवळच्या तळ्यात घेता येते हे लक्षात आले. सर्व कामाची जेसीबी भाड्याने घेऊन, देखरेख करत अंमलबजावणी झाली. त्यामध्ये एकूण अडीच किलोमीटर अंतराच्या चरींचे काम करण्यात आले. चरींची खोली अर्ध्या फूटांपासून आठ फूट होती. त्यामध्ये रसायनशास्त्र विभागाजवळील रोडवरील पाणी आत घेऊन भाषाभवन तलावापर्यंत नेण्यासाठी तयार करण्यात आलेली चर काढताना विचारपूर्वक काम करावे लागले. काही ठिकाणी आठ फूट खोदावे लागले. त्या चरीचे महत्त्व मोठे होते, कारण त्या चरीला रोडचे पाणी येणार होते. रोडवर थोडा जरी पाऊस पडला तरी पाणी चरीत येणारत्यातून विद्यापीठाच्या प्रयत्नांची यशस्वीता कळणार होती. इतर चरी पन्नास मीटरपासून साडेपाचशे मीटरपर्यंत होत्या. त्या चरी खोदणे आणि साफ करणे या कामाला केवळ पन्नास हजार रूपये खर्च आला. सर्व जलसंधारणाच्या कामावर, विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत शिबिराचा खर्च वगळता साडेसात लाख रूपयांपेक्षा कमी खर्च केला होता.
विद्यापीठ या सर्व प्रयत्नांत एकूण तीस कोटी लिटर पाणी भूपृष्ठावरील साठ्यामध्ये साठवण्यात यशस्वी झाले. भाषाभवन तलावामध्ये बावीस कोटी पंधरा लाख लिटरसंगीतशास्त्र तलावामध्ये पाच कोटी वीस लाख लिटरसुतार विहीर - चार लाख लिटरक्रीडा विभागाजवळील विहीर - चार लाख लिटररसायनशास्त्र विभागाजवळील विहीर - तीन लाख लिटरसिंथेटिक ट्रॅकजवळील विहीर - पाच लाख लिटरशिंदे विहीर - तीन लाख लिटर आणि तीन शेततळ्यांध्ये चाळीस लाख लिटर. त्याखेरीज जमिनीखालील पाण्यामध्ये मोठी वाढ झाली. सुतार विहिरीजवळील साधारण दीडशे एकर क्षेत्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली. त्या क्षेत्रात कोठेही साताठ फूटांचा खड्डा घेतला तर पाण्याचे झरे सुरू होतात.
         


विद्यापीठ परिसरामध्ये दोन ऐतिहासिक विहिरी आहेत. त्यांचे बांधकाम 1883 साली केल्याचे शिलालेख त्या दोन्ही विहिरींवर इंग्रजी आणि मराठी भाषांत आहेत. त्यांतील रसायनशास्त्र विभागाजवळील विहिरीचे पाणी वापरले जात होते. तंत्रज्ञान विभागाशेजारील विहीर मात्र दुर्लक्षित होती. त्या विहिराचा गाळ 2017 मध्ये काढून तिची दुरूस्ती करण्यात आली. तसेच, सुतार विहीर परिसरातील पाणी आणखी वापरात यावे म्हणून सहासष्ट फूट व्यासाची आणखी एक विहीर खोदण्यात आली. या नव्या विहिरीची साठवणक्षमता सात लाख लिटर इतकी आहे. महानगरपालिकेचे विद्यापीठाला पाण्यासाठी दरमहा येणारे बिल सात लाख रूपये होते. जलसंधारणाच्या प्रयत्नांतून विद्यापीठ वर्षाला साठ ते सत्तर लाख रूपयांची बचत करत आहे. त्या जलसाठ्याबरोबर विद्यापीठातील जैवविविधताही वाढत आहे. परिसरात पक्ष्यांची संख्या भरपूर जाणवते. मोरसापमुंगुसससाखवल्या मांजर या प्राण्यांबरोबर कोल्होबाही दर्शन देऊ लागला आहे. झाडे आणि वेली परिसरात वाढत आहेत. विद्यापीठाने प्रतिदिन एक लाख लिटर शुद्ध पाणी देण्याची क्षमता असलेला रिव्हर्स ऑस्मॉसीस तंत्रावरील जलशुद्धिकरण प्रकल्प विद्यापीठात उभारला आहे. विद्यापीठाने स्वत:चे सांडपाणी जलप्रक्रिया प्रकल्पही उभारले आहेत. त्यातून मिळणारे पाणी बागांसाठी वापरण्यात येते. विद्यापीठात दोन तलाव, दहा विहिरी आणि अकरा शेततळी आहेत. विद्यापीठ वर्षभर त्या साठ्यातील पाणी वापरते. विद्यापीठाच्या जलस्वयंपूर्णतेचा फायदा समाजालाही 2019 च्या महापूरात झाला. कोल्हापूर मनपाचे सर्व पंपहाउस पूरामध्ये पाण्याखाली गेले होते. तेव्हा विद्यापीठाच्या जलसाठ्याचे पाणी शुद्ध करून पंधरा दिवस शहरवासियांना पुरवण्यात आले. अशी ही शिवाजी विद्यापीठाच्या जलसंधारणाची यशस्वी कहाणी.
विलास (व्ही. एन.) शिंदे हे शिवाजी विद्यापीठात उपकुलसचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पदार्थविज्ञान शास्त्राचे अधिव्याख्याता, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून कार्य केले आहे. त्यांनी ‘क्रायोजेनिक्स अँड इट्स ॲप्लिकेशन्स’ पुस्तकाचे सहसंपादन आणि ‘सक्सेस गाईड फॉर एमएचसीईटी’ पुस्तकाचे सहलेखन केले आहे. शिंदे वृक्षप्रेमी आणि पर्यावरणमित्र म्हणून परिचित आहेत. ते शिवाजी विद्यापीठाच्या जलसंधारण मोहिमेचे प्रवर्तक आहेत. त्यांनी एककांचे मानकरी, असे घडले भारतीय वैज्ञानिक, हिरव्या बोटांचे किमयागार आणि आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया ही विज्ञान विषयक पुस्तके लिहिली आहेत. ते विविध दैनिके, नियतकालिके आणि drvnshinde.blogspot.com या ब्लॉगवर विज्ञान व  ललित साहित्य प्रकाशित करतात. त्यांनी मराठी विश्वकोषामध्ये विज्ञानविषयक नोंदींचे लेखनही केले आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

7 टिप्पण्या

  1. शिवाजी विद्यापीठ परिसर पाणीदार व अधिक निसर्ग दार करण्यात उपकुलसचिव व्ही.एन. शिंदे ह्यांचा सिहांचा वाटा आहे. नांदेड येथील विद्यापीठात कुलसचिव असतांना शिंदे सरांनी येथील परिसरही असाच विकसीत केला आहे.त्यांच्या अथक प्रयत्नामुळे शिवाजी विद्यापीठ येथील दूर शिक्षण इमारत समोरील ओसाड परिसराचे हिरव्यागार रानात रूपांतर झालेले दिसून येते .

    उत्तर द्याहटवा
  2. डॉ.व्ही.एन.शिंदे सरांच्या संकल्पनेतून शिवाजी विद्यापीठ हे पाणीदार विद्यापीठ तर झालेच; पण शिवाजी विद्यापीठाचा हा उपक्रम आदर्शवत उपक्रम म्हणून इतर विद्यापीठे आणि संस्था या पद्धतीने काम करताहेत हे या योजनेचे आणि डॉ. व्ही.एन. शिंदे सरांच्या कामाचे फलित आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. कुलगुरू देवआनंद शिंदे व कुलसचिव विलास शिंदे या दोन मराठवाड्यातील शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवाजी विद्यापीठ हे पाणीदार झाले याचे तत्कालीन राज्यपाल साहेबांनी कौतुक केले व व या प्रकारच्या पाणीदार विद्यापीठ बनण्याची संकल्पना प्रत्येक विद्यापीठाने राबवावी असे आदेश काढले यावरून तुमच्या कामाचे महत्त्व व अधोरेखित होते शिवाजी विद्यापीठात विलास शिंदे यांना पाणी बाबा म्हणून ओळख आहे

    उत्तर द्याहटवा
  4. आदरणीय शिंदे सर
    शिवाजी विद्यापीठाच्या जलसंधारणाची कहाणी यशस्वी होऊ शकली ती तत्कालीन कुलगुरू आणि आपणासारख्या दूरदृष्टी आणि मातृसंस्थेबद्दल कमालीची ओढ असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे ! आता खऱ्या अर्थाने विद्यापीठ जलसंसाधनाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झाले आहे. वर्षाला ७० लाख रुपयांची बचत म्हणजे तेवढा उत्पादनाचा स्रोत विद्यापीठाने निसर्गतः तयार केल्याचे श्रेय आपणा सर्वांना जाते. विद्यापीठ परिसरातील वाढलेली पाण्याची पातळी पश्‍चिम बाजूला असलेल्या अंबाई डिफेन्स, प्रतिभानगर, जागृतीनगर तसेच इंगळेनगर या भागातील पाण्याची पातळी कमालीची वाढण्यास मदतगार ठरली आहे. आणि पाणी वर्षभर टिकत आहे. याचा दुसरा फायदा म्हणजे या स्त्रोतांमुळे विद्यापीठाच्या निसर्गसौंदर्य आणि जैवविविधतेत पडलेली अमूल्य भर ... पूर्वीच्या मानाने विद्यापीठ परिसर अतिशय आकर्षक, मनमोहक आणि हिरवागार बनला आहे. गेल्या महिन्यात या धनसंपदेचा फेसबुक वॉल वर मुद्दामून प्रचार केला होता. या प्रकल्पात सिंहाचा वाटा उचलून यशस्वी गाथेचे तपशीलवार वर्णन केलेल्या लेखाबद्दल आपले खूप खूप कौतुक आणि मन:पूर्वक आभार.

    प्रा डॉ केशव यशवंत राजपुरे

    उत्तर द्याहटवा
  5. छान लेख आहे.
    मी 84 ते 86 तेथे शिकत असताना तीन तीन दिवस पाणी नसायचे आम्ही वरचेवर
    अनोल्न करावयाची. आणि मग टंकारने पाणी यायचे.
    Good Work ...University ला भेट द्यायलाच हवी.

    उत्तर द्याहटवा
  6. डॉ. शिंदे सर यांचे कार्य फक्त निसर्ग आणि पाणी येवढ्या पुरतेच मर्यादित नाही तर मराठी साहित्यात ते आता विज्ञान लेखनाने मोठी भर घालत आहेत. आजच्या घडीला इतक्या एकाग्रपणे नोकरीच्या ठिकाणी आपला सगळा वेळ देऊन काम करणारा हा एक अवलिया माणूस आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. खूपच छान... आपल्याला विद्यापीठ परिसराचा असणारा अनुभव व वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळेच हे इतक्या कमी खर्चामध्ये व कमी वेळेमध्ये होऊ शकले.... शेवटी आपल्या विद्यापीठाचे दरवर्षी चे ५०-६० लाख रुपयांची (पुढे पुढे हा खर्च कोटीच्या घरात गेला असता) बचत होते ही बाब खूपच महत्वाची आहे...

    आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा