भीक – भिक्षा : संस्कार व समाजव्यवस्थेतील सोय (Begging Has Cultural Shade)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

भीक – भिक्षा : संस्कार व समाजव्यवस्थेतील सोय (Begging Has Cultural Shade)


गरजवंत मनुष्य गरज भागण्यासाठी दुसऱ्याकडे गरजेच्या वस्तूची मागणी करतो, हात पसरतो. म्हणजे याचना करतो. त्याला भीक मागणेअसे उपहासाने म्हटले जाते. ज्याला मागण्यास लाज वाटते, शरम वाटते, संकोच वाटतो त्याला सल्ला दिला जातो, की भीक मागता येत नसेल तर विडी ओढायला शीक.साधारणत: धुम्रपान करणारा मनुष्य त्याच्याजवळ विडी-सिगारेट ठेवतो, परंतु काड्यापेटी किंवा लायटर ठेवण्यास विसरतो अथवा टाळतो. त्याची धुम्रपानाची इच्छा चाळवते, लहर येते. मग तो धुम्रपान करणाऱ्याकडे इस्तवाची मागणी करतो. तेव्हा तिरसट स्वभावाचा एखादा मनुष्य त्याला खिजवण्याच्या उद्देशाने खिशातून एक रुपया काढून म्हणतो, भीक कशाला मागतोस? हा रुपया घे आणि त्या दुकानावरून माचीस घेऊन विडी पेटव.

माचीसची काडी देणे किंवा रुपया देणे ही दोन्ही भिकेची वेगवेगळी स्वरूपे आहेत. तहानलेला पाणी, भुकेलेला अन्न मागतो. कोणी चहासाठी पाच रुपये मागतो. कोणी धान्य मागतो... असे दुसऱ्याकडे मागणे म्हणजे स्वत:ला कमीपणा घेणे, लाचार होणे असे समजले जाते. ते शिष्टाचारात बसत नाही. तसे मागणाऱ्याला याचकम्हणतात आणि देणाऱ्याला दाता म्हटले जाते. याचक म्हणजे भिकारीआणि दुसऱ्याकडे मागणाराही भिकारीच. दरवाज्यावर आलेल्या किंवा रस्त्यावरून जाणाऱ्यापुढे हात पसरणाऱ्याला भिकारी म्हणून संबोधले जाते. भिकारी(याचक) मंदिरे, तीर्थक्षेत्रे, जत्रा अशा ठिकाणी असतात. भीक हा हीन, कमी प्रतीचा, निंदार्थी शब्द आहे. भीक लागणे, भिकेचे डोहाळे लागणे, भीक घालणे असे वाक्प्रचारही त्यापासून तयार झाले आहेत. भीक शब्दाची उत्पत्ती संस्कृत भाषेत आहे. काय रे तुला भीक लागली? का हात पसरतोस? तोंड का वेंगाडतोस?’ असे तुच्छतादर्शक वाक्प्रयोग मराठीत आहेत. एखादी वस्तू, माल खरेदी केला गेला आणि दुसऱ्याच्या दृष्टीने ती वस्तू, सामान हलकी ठरली तर त्या वस्तूला भिकारअसे म्हटले जाते. भिकार म्हणजे टाकाऊ, हीन, खालच्या दर्ज्याची. भिकारडाअसाही शब्द आहे.
भिकारवाडी
भिकाऱ्यांच्या समुदायाला भिकार म्हणतात. अनेक भिकारी समुदायाने राहतात. त्यांची वस्ती, वास्तव्य असेल तर त्या ठिकाणाला भिकारवाडीअसे संबोधतात. अनेक भिकारी समुदायाने राहतात, पण भीक स्वतंत्रपणे, एक-दोघे असे मागत फिरतात. काही भिकारी हंगामी असतात. ते स्थिर एकाच गावात राहत नाहीत. ते गावोगाव भीक मागत फिरतात. त्यांची भटकंती कधी संपत नाही, पण त्यांचा भिकेचा हंगाम असतो. पावसाळा संपला, की त्या लोकांचा समुदाय, त्यांचा मूळगाव भिकारवाडी सोडतो आणि पुन्हा पावसाळा सुरू झाला, की फिरून त्यांच्या मूळगावी येतो. अशा लोकांची संख्या कमी, विरळ आहे.

भिकारी सर्वत्र आढळतात. ज्याला श्रम करायचे नाहीत, कष्ट करण्याची इच्छा, तयारी नसते, ज्याची घाम गाळण्याची वृत्ती नसते, ज्यांची जगण्यासाठी कोणतेही साधन नसते, पण जगण्याची इच्छा असते, ते भीक मागतात. पु.ल. देशपांडे यांच्या तीन पैशांचा तमाशामध्ये भिकारी व भीक मागणे हा कसा संघटित मोठा गुन्हा बनला आहे त्याचे दर्शन होते.
भिक्षा हा शब्दप्रयोग भीक शब्दापेक्षा थोडा उच्च आणि सन्माननीय आहे. तो शब्द संस्कृत भाषेतील आहे आणि तो बहुतांशी ब्राह्मणांमध्ये वापरला जातो. भिक्षा मागून राहणारा अर्थात ब्राह्मण. ब्राह्मणाकडेच भिक्षा मागून निर्वाह करणारा तो ब्रह्मचारी किंवा संन्यासी असतो. तो केवळ स्वत:च्या गरजेएवढे अन्न, धान्य मागतो. कारण तो एकटा राहतो. त्याला धनसंग्रहाची आवश्यकता नसते. मोह नसतो. निर्वाहासाठी अशी भिक्षा मागणाऱ्या ब्राह्मणाला भिक्षूकिंवा बटू म्हणत. आता ते फक्त मुंजीत असतात. ज्या ब्राह्मण, ब्रह्मचाऱ्याची मुंज झालेली असेल, तो ब्रह्मचारी काही घरांत भिक्षा अर्थात दान मागतो. त्या दानाला भीक, भिक्षान म्हणता भिक्षाळ किंवा भिक्षावळम्हणून संबोधतात. तसा विधी मुंजीत असतो. धार्मिक रूढी, संस्कार म्हणून त्याला त्या काळात भिक्षा मागावी लागते. त्या ब्रह्मचाऱ्याला बटू किंवा बटूकअसे संबोधले जाते. पुराणकथेनुसार विष्णूने वामनावतारात भिक्षेचे महत्त्व सांगितले आहे. मनुष्यमात्र जन्मत: भिक्षुकच असतो, कारण त्याला आईकडून दूध मिळते, गुरुकडून शिक्षण वगैरे. वामन हा बटू म्हणून जन्म घेतो आणि बळी राजाला त्याच्या राज्यात स्थित करून त्याचा अंहंकार संपवतो. त्यामधूनच व्रतबंधात बटूने भिक्षांदेही मागण्याचा संस्कार आला.
भिक्षुकीहा शब्द त्यातूनच व्यावसायिक कारणाने निर्माण झाला. भिक्षुकहा शब्दप्रयोग विशेषत: याज्ञिकीवर निर्वाह करणाऱ्या ब्राह्मणांसाठी वापरला जातो. त्याला याज्ञिकही संबोधतात. याज्ञिक हा अग्नी ठेवून होम करण्याचे शास्त्रोक्त कर्म करतो. तो लग्न, मुंज  इत्यादी धर्मकृत्ये चालवण्याचे अनुष्ठान जाणणारा असतो. तो त्यांच्या परिवाराचा निर्वाह धर्मकृत्यातून मिळणारे दान दक्षिणा यावर करतो. त्याला जे काही धन-धान्य लग्न, मुंज, श्राद्ध अशी वेगवेगळी धार्मिक कृत्ये केल्यावर यजमानांकडून दिले जाते त्याला दान, भीक म्हणता येत नाही. तो त्याच्या कामाचा, श्रमाचा मोबदला असतो. त्याला दक्षिणा किंवा बिदागी म्हणतात.
भीक, भिक्षा, भिकारी, भिकार, भिकारवाडी ही नामे, विशेषणे सर्वसामान्य याचकांसाठी वापरली जातात; ती दारोदार जाऊन अगर एका जागी बसून येणाऱ्या-जाणाऱ्याकडे दान मागतात, त्यांच्यासाठी आहेत. ती एक प्रवृती समाजात वाढत गेलेली आहे. ती संबोधने विशिष्ट व्यक्ती अथवा जमाती यांच्यासाठी वापरली जात असत. कालांतराने, ती समस्त याचक प्रवृत्तीसाठी वापरली जाऊ लागली.
भीक हा शब्द उपहासात्मक, निंदार्थी, तुच्छतादर्शक वाटतो, म्हणून त्या सर्व शब्दांना एकच सोज्वळ, चकचकीत शब्द निर्माण करण्यात आला. तो म्हणजे माधुकरी त्यात भीक, भिकारी व भिक्षा या दोन्ही संकल्पना सामावलेल्या आहेत.
ठाकरवाडी
भिकाऱ्यांचे प्रकार अनेक आहेत. त्या प्रत्येकाचे भीक मागण्याचे उपाय वेगवेगळे आहेत. ते लोक वेगवेगळ्या जाती-जमातींचे आहेत; तसेच, त्यांचा मार्ग, कला, त्यांची साधने त्यांचे उपाय आहेत. कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भिकाऱ्यांच्या अनेक वस्त्या आहेत. त्या वस्त्यांनाही वेगवेगळी नावे आहेत. तरीही अन्य जातीजमातींचे लोक त्या वस्त्यांचा ठाकरवाडी असा उल्लेख करतात. भारतीय समाजव्यवस्थेतील भिकारी कोणत्या ना कोणत्या करमणुकीच्या साधनांचा, अवजारांचा वापर भीक मागण्यासाठी करतात. त्या करमणूक करण्याला कला म्हटले जाते. धार्मिक कार्य केल्यावर ब्राह्मणाला दक्षिणा दिली जाते, तसेच दान या करमणूक करणाऱ्या लोकांना दिले जाते, पण त्याला भीक म्हटले जाते. सापांचे खेळ करणारा गारुडी, माकडांचा खेळ करणारा मदारी, अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी; तसेच, कोल्हाटी, डोंबारी हे सर्व व्यावसायिक त्यांचे खेळ गर्दी, रहदारी, चौक अशा भरवस्तीच्या सार्वजनिक ठिकाणी करतात. लोक ते पाहण्यासाठी गोळा होतात. खेळ संपला, की पाहणारे त्यांनी अंथरलेल्या वस्त्रावर पैसे टाकतात किंवा एखादे पोर बघ्यासमोर हात पसरून याचना करते. लोक त्याच्या हातावर नाणे ठेवतात. त्याला भिकेचेच रूप आले आहे. करमणुकीच्या बदल्यात दिलेल्या त्या दानाला भीकच म्हटले जाते.


कडकलक्ष्मी हासुद्धा भीक मागण्याचा प्रकार आहे. त्या खेळाचा मनोरंजनात समावेश होतो. स्त्री तिच्या डोक्यावर देवी बसवलेली परडी घेते. ती गळ्यात ढोलकी घालून विशिष्ट आवाजात वाजवते. पुरुष पायात घुंगरू बांधून, हातात कोडा घेऊन नाचत तो कोडा अंगावर मारून घेतो. दंडावर सुई टोचून रक्त काढतो. जाणाऱ्यासमोर हात पसरतो. दुकानदाराकडे याचना करतो. तो बहुतांशी बाजार, गर्दीच्या ठिकाणी खेळ करतो.
पिंगळा, वासुदेव एकेकटे घरोघरी फिरतात. त्यांच्याकडे करमणुकीचे काही साधन नसते. पिंगळा तर रात्री बारा वाजल्यानंतरच फिरू लागतो. झोपेच्या अंमलाखाली असलेल्या बाया काही कुरकुर न करता त्याला धान्य वा पैसे देतात. पिंगळा, वासुदेव गाणी म्हणतात, नाचतात; भीक मिळाल्यावर आशीर्वाद देतात. तेवढेच त्यांचे भांडवल. अंगारा लावणे ही परतफेड.
फकीर हा मुसलमान भिकारी म्हणण्यास हवा. फकीर हा शब्द फारशी भाषेतील आहे. त्याच्या दारोदार जाऊन भीक मागण्याला फकिरी हे विशेषण आहे. ते कोणी एकटे तर कोणी दोन-तीन एकत्र फिरतात. ते त्यांना दान दिल्यावर मोरपिसाचा जुडगा दात्याच्या अंगावरून फिरवून आशीर्वाद देतात.
 काही बाया, पुरुष कोणत्यातरी देवाच्या नावाने छापलेली पावती-पुस्तके घेऊन, मदत मागत दारोदार, गावोगाव फिरतात. हरदास, गोसावी हेही दान मागत फिरतात. त्या लोकांना गृहस्थ भिकारी मानून दान दिले जाते. ते दान म्हणजे भीक होय. नंदीबैलवाला बैलाला वेगळे कसब शिकवतो. त्याला शृंगारून घरोघरी जातो, बतावणी करतो. ते करतब पाहून मुलांचे मनोरंजन होते. तो शुभ भाषण करतो, आशीर्वाद देतो. गृहस्थ आनंदाने त्याला दान देतो. त्यांच्या कलेचा तो मोबदला असतो, पण त्याची गणती भिकेतच होते. जेव्हा दोन-चार असामी त्यांची अवजारे घेऊन घरोघर दान मागत फिरतात, ती मात्र भीक असते, पण गोंधळी अंबाबाईचा गोंधळ घालतो. जोगवा मागतो. जोगवा म्हणजे जोगेश्वरीच्या नावाने मागितलेली भीक. गोंधळ घालण्याची बिदागी दिली जाते. त्याला भीक म्हणत नाहीत.
ठाकर जमातीची वस्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अनेक गावांत आहे. भीक मागणे हाच त्यांतील बहुतांशी वस्त्यांवरील ठाकरांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय होता. त्यांतील पिंगुळी गावातील गुढीवाडीवर सर्वात मोठी लोकवस्ती आहे. तेथे सध्या एकशेसाठ घरे आहेत. त्यांतील नव्वद टक्के ठाकर त्यांचे कोणते ना कोणते कसब सादर करून दान-भीक मागत. त्यांची कला सादर करून मिळवलेले दान हीदेखील भीकच. नंदीबैल, गोंधळी, पिंगळा अशा कला तर होत्याच. त्या अन्यत्र सापडतात, पण त्यांपैकी चित्रकथी, कळसूत्री, छायाचित्र, पोवाडे, लावण्या, कळबाहुली ह्या आगळ्यावेगळ्या. त्या महाराष्ट्रातील दुसऱ्या कोणत्याही गावात नसलेल्या कला आहेत. त्या वाडीवर अजून जिवंत आहेत. ते त्यांची ती कला लोकांपुढे सादर करून भीक मागत. त्या सादर करणाऱ्या ठाकर कलाकारांना बावलेकर म्हटले जाते. त्या सार्वजनिक ठिकाणी सादर केल्या जातात. त्यांना जो मोबदला मिळतो, तो कलेचा असतो. परंतु दोन-चार ठाकर एकत्र येऊन त्यांची आयुधे घेऊन घरोघर जाऊन जे दान मिळवतात ती भीक आहे.
एकटा इसम किंवा एक-दोन बाया कोणतेही साधन वा अवजार न घेता दरवाज्यासमोर जाऊन माई भिक्षा वाढा, भिक्षा घाला असे म्हणतात तेव्हा त्यांना दिल्या गेलेल्या दानाला भीकच म्हटले जाते.
अशा प्रकारे स्वत:चे किंवा परिवाराचे पोट भीक मागून भरतात, कोणी लहानमोठ्यांचे मनोरंजन करतात, कोणी पशूकरवी करतब करवून दान-बक्षिशी मिळवतात. कोणी मिळालेल्या दानाच्या बदल्यात आशीर्वाद देतात. कोणी केवळ भीक मागतात. ते सर्व भिकारी. त्यांना कोणी स्वखुशीने, कोणी दरवाज्यावर आलेल्या याचकाला परत पाठवू नये म्हणून दया-सहानुभूती दाखवतात. कित्येक उदारमनस्क लोक दान केल्याने पुण्य मिळते या हेतूने भीक घालतात.
भीक मागणे ही वृत्ती आहे, प्रवृत्ती नव्हे. पुण्याचे डॉ. अभिजित सोनावणे भिकाऱ्यांची खराटा पलटण तयार करत आहेत. त्यांनी खराटा पलटण हा शब्द गाडगे महाराजांकडून घेतला आहे. ते भिकाऱ्यांच्या टोळ्या निर्माण करून त्यांच्या मार्फत निवासी संस्थांना स्वच्छतेची सोय उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांत आहेत. सोनावणे भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणूनच ओळखले जातात. त्यांनी भिकेची सोपी व्याख्या केली आहे, ती अशी - जी परावलंबी बनवते ती भीक व जी स्वावलंबी बनवते ती मदत.        
- ना.बा. रणसिंग 9833942504
c/o इमेल mohanransing@gmail.com
ना. बा. रणसिंग यांनी वास्को द गामा (गोवा) येथील माता सेकंडरी स्कूलमध्ये छत्तीस वर्षे अध्यापन केले. ते अठ्ठयाहत्तर वर्षांचे आहेत. त्यांनी लेखन विपुल केले आहे. त्यांची छत्तीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यात कादंबरी, कवितासंग्रह, आत्मकथन आणि कथासंग्रह यांचा समावेश आहे. त्यांच्या 'असुरेंद्र' आणि 'महायुद्धापूर्वी' या कादंबऱ्या विशेष गाजल्या. त्यांच्या कथा पणजी आकाशवाणीवर प्रसारित झाल्या आहेत. त्यांनी लोकसाहित्यावर संशोधनात्मक लेखन केले आहे. त्यांना कोकण मराठी साहित्य परिषद, गोवा अकादमी यांचे पुरस्कार मिळाली आहेत. ते कुडाळला वास्तव्यास आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. भीक शब्दाला सोज्वळ,चकचकीत शब्द म्हणून माधुकरी शब्द निर्माण करण्यात आल्याचे लेखकाचे म्हणणे बरोबर वाटत नाही.माधुकरी मध्ये फक्त brahmn व्यक्ती ब्राह्मण कुटुंबातून च दुपारी बारा vajechya आसपास तयार भोजन मागण्यास जात.माधुकरी मागणारी व्यक्ती पंचा उपरणे अंगावर घेऊन एका पांढऱ्या स्वच्छ वस्त्रात ताट घेऊन ठरलेल्या घरी..बहुतेक पाच पेक्षा जास्त नाही..जाई,गेल्यावर ओम भिक्षां देहि असा पुकारा करत असत.मग घरातील गृहिणी त्या दिवशी घरात शिजवलेले ताजे अन्न ताटात वाढत असे.
    आमच्याकडे सिन्नर ला खूप वर्षे एक दत्ता नावाचा ब्राह्मण तरुण माधुकरी मागण्यासाठी येत असे.

    उत्तर द्याहटवा