उच्चस्थान गाठणे सोपे – राखणे अवघड!
इंद्रपूजा हा प्रकार एकेकाळी नित्य होता;
तो दुर्मीळ झाला आहे.
इंद्रदेवाचे वर्णन तो स्वर्गाचा अधिपती आहे; त्याची ती इंद्रसभा... तीत तो मेनका-रंभा-उर्वशी
आदी अप्सरांच्या गायन-नृत्याच्या मैफलीत रमणारा, मद्यपान करणारा, विलासी स्वभावाचा, अहंकारी, लोभी
आणि इतरांना तुच्छ लेखणारा, स्वत:च्या पदाची काळजी करणारा असे विविध प्रकारे केले
जाते. तो देवांचा राजा मानला गेला आहे. अशा देवेंद्राला कोण भजणार?
‘इंद्र’ ही हिंदू धर्मातील प्रमुख देवता ऋग्वेदानुसार आहे.
ऋग्वेदातील एकूण सूक्तांच्या एक चतुर्थांश सूक्ते त्या देवतेला उद्देशून आहेत.
इंद्राला पर्जन्यदेवता मानले जाते. इंद्रपूजेला महत्त्व चांगल्या प्रकारचा पाऊस
होऊन शेतीतून भरघोस उत्पन्न मिळावे या हेतूने वेदकाळात निर्माण झाले होते. ‘इंद्रपूजे’चे आयोजन उत्तर भारतात अजूनही करण्यात येते.
इंद्र हा पूर्वेचा
दिक्पाल मानला जातो. ‘दिक्पाल’ ही संकल्पना वेदोत्तर काळात देवता परंपरेमध्ये उदयास आली.
भारतात मोठमोठी साम्राज्ये निर्माण होत होती. त्या काळातील सम्राटांनी राज्यकारभार
सुरळीत व सुनियंत्रित चालावा यासाठी राज्याच्या चारी दिशांना राज्यपाल नेमले. तीच
संकल्पना पुराणकर्त्यांनी त्यांच्या रचनांमधील स्वर्गीय साम्राज्यातही राबवली.
दिक्पालांचा उल्लेख पौराणिक धर्म, जैन व बौद्ध या तिन्ही धर्मांमध्ये आहे. पूर्व
दिशेला इंद्र, आग्नेय-अग्नी, दक्षिण-यम,
नैऋत्य-निर्ऋती, पश्चिम-वरूण, वायव्य-वायू, उत्तर-कुबेर व ईशान्येला-ईशान अशी दिक्पालांच्या दिशांची वाटणी आहे. आठ दिक्पालांपैकी
इंद्र, कुबेर, अग्नी, वरूण यांची पूजा स्वतंत्रपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून होत असावी.
इंद्र, अग्नी व वरूण हे तिघेही वेदकाळातील श्रेष्ठ देव मानले
जात होते. ते तिघे निसर्गशक्तींशी संबंधित आहेत. ते निसर्गशक्तींना नियंत्रित
करतात अशी कल्पना.
इंद्र हा स्वर्गाचा, देवलोकाचा अधिपती पौराणिक वाङ्मयात झाला. तो स्वामी सर्व
देवांचा आहे. तो त्याच्या पदाला नेहमी जपत असतो. पराक्रम हा इंद्राच्या सर्व
गुणांत त्याचा मुख्य गुण मानलेला आहे. त्याने त्याच्या तेजाने जन्मत: पृथ्वी व आकाश ही दोन्ही भरून टाकली. वज्र हे
त्याचे प्रमुख आयुध. इंद्राने वज्राच्या आघाताने वृत्रासुराला मारून, त्याने अडवलेल्या सिंधुप्रदेशातील
सातही नद्या प्रवाहीत करून सोडल्या! त्याचबरोबर इंद्राने
त्याचा बलपराक्रम शंबर, शुष्ण, वल
यांसारख्या शत्रूंच्या संहाराने सिद्ध केला. त्यानंतर तो पूर्व दिशा, स्वर्ग व अंतरिक्ष यांचा अधिपती बनला.
इंद्रपूजेचा
विस्तार बराच होता. राजे लोक मोठ्या प्रमाणावर ‘इंद्रध्वजोत्सव’
साजरा करत. वर्षप्रतिपदेच्या दिवशी घरोघरी उभारली जाणारी गुढी ही
इंद्रध्वजपूजनाचे लघुरूप मानले जाते. इंद्राच्या प्रत्यक्ष प्रतिमेचे पूजन
नंतरच्या काळात लुप्त झाले. पण, त्याच्या प्रतिमा मध्यकालीन
कलेत मिळतात. भरपूर दागिने, पायाजवळ हत्ती आणि हातात वज्र ही
त्याची प्रमुख चिन्हे. इंद्र शिल्पसार ग्रंथाप्रमाणे चतुर्भुज आहे. त्याच्या तीन
हातांत धनुष्य, शंख व चक्र अशी आयुधे आहेत आणि चौथा हात
अभयमुद्रेत आहे. चालुक्य शैलीतील इंद्रमूर्ती ऐरावताच्या पाठीवर आडवी बसलेली आहे.
मुकुटाऐवजी पागोटे घातलेला वैशिष्ट्यपूर्ण इंद्र पुणे जिल्ह्यातील कार्ल्याजवळील
भाजे येथील लेण्यांत पाहण्यास मिळतो. तो ऐरावतावर स्वार असून त्याच्या मागे
ध्वजधारी सेवक आहे. वेरूळच्या इंद्रसभा गुंफेतील हत्तीवरील त्याची प्रतिमा ‘देवराज’पदाला साजेशी आहे.
जैनांच्या दैवतकथांत
इंद्राला यक्षरूपाने तीर्थंकरांच्या सेवकाचे स्थान देण्यात आले आहे. तो
तीर्थंकरांचे जन्ममंगल करणारा सेवेकरी म्हणून जैन वाङ्मयात दिसतो. तो बौद्ध
वाङ्मयातील जातककथांमध्ये मानवप्रेमी व दीनबंधू या स्वरूपात दिसतो. गांधारकलेतील इंद्र बौद्ध
आहे. त्याच्या हातातील वज्र हे हाडांप्रमाणे दिसते. इतरत्र मात्र वज्राचा आकार
खाली आणि वर तीन टोके असलेल्या लहानशा दांड्याप्रमाणे आहे.
वेदकाळातील प्रमुख देव नंतरच्या काळात मात्र मागे पडले व पंचदेवोपासनेचे
महत्त्व वाढत गेले. ‘विष्णू, शिव,
सूर्य, गणपती व देवी’ यांची
उपासना ‘पंचदेवोपासना’ या नावाने
समाजात रुढ झाली. शिवभक्ती करणारे ‘शैव’, विष्णूला भजणारे ‘वैष्णव’, सूर्याची
पूजा करणारे ‘सौर’, गणपतीला प्रमुख
देवता म्हणून पूजणारे ‘गाणपत्य’ आणि
देवीची म्हणजेच शक्तीची पूजा करणारे ‘शाक्त’ असे पाच वेगवेगळे संप्रदाय निर्माण झाले.
‘उप इंद्र’ स्थानावर असलेला विष्णू त्याच्या सर्व
सामर्थ्यानिशी वर आला! भागवतातील गोवर्धनोद्धाराच्या
आख्यानात विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाने तर इंद्राला आणखी खालच्या स्थानावर
आणले. इंद्राच्या पराक्रमांऐवजी त्याची भोगवृत्ती विविध कथांद्वारे अधोरेखित
करण्यात येऊ लागली. इंद्राचे महात्म्य चारित्र्याला अतिरिक्त महत्त्व देणाऱ्या
भारतीय समाजात टिकणे अवघडच होते. परिणामी, देवतांचा राजा
असणारा इंद्र त्याचे मुख्य पूजेतील स्थान गमावून बसला. इंद्रपूजा, गोवर्धनपूजा जुन्या परंपरेप्रमाणे काही ठिकाणी होते. तसे सण असतात. पण ते
प्रमाण अत्यल्प आहे. ‘उच्च स्थान गाठणे सोपे, पण राखणे अवघड’ हाच संदेश इंद्राच्या कथांतून मिळतो.
तुषार
म्हात्रे हे माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत. ते रायगडमधील पिरकोन या गावी राहतात.
त्यांनी बीएससी, बीएड आणि डीएसएम (डिप्लोमा इन
स्कूल मॅनेजमेंट) पर्यंतचे शिक्षण
घेतले आहे. त्यांचे विज्ञान विषयातील दोन शोधनिबंध आंतरराष्ट्रीय ऑनलाईन
जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. ते 'तुषारकी' ब्लॉगच्या माध्यमातून लेखन करतात. ते 'लोकसत्ता',
'सकाळ', 'रयत विज्ञान पत्रिका', 'नवेगाव आंदोलन', 'कर्नाळा' या
दैनिकांतही लेखन करतात.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इंद्रवज्र |
3 टिप्पण्या
छान लेख आहे
उत्तर द्याहटवालेख माहितीपूर्ण. आवडला.
उत्तर द्याहटवामाहितीपूर्ण आणि रंजकही.
उत्तर द्याहटवा