कोरोना: अमेरिकेत वातावरण संभ्रमाचे (Corona - People Confused in US)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

कोरोना: अमेरिकेत वातावरण संभ्रमाचे (Corona - People Confused in US)

अमेरिका दोन आघाड्यांवर लढाई लढत आहे.  एक कोरोनाविरुद्ध आणि दुसरी लढाई म्हणता येणार नाही, परंतु नोव्हेंबरमध्ये होणारी अध्यक्षीय निवडणूक. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांत इतक्या गुंतल्या आहेत, की मास्क वापरायचे की नाही याबद्दलची साधी सूचना वैद्यकीय अधिकारी आणि राजकारणी लोक या दोघांकडून दिली जात आहे! जनतेने कोणाचे ऐकावे हा संभ्रम सर्वसामान्यांच्या मनात आहे.   
अमृता देशपांडे
          मी अमेरिकेत वेगवेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींकडून काही माहिती जमा केली. ती येथे लिहीत आहे. अमृता देशपांडे सिअॅटल येथे बारा वर्षे राहतात. त्या म्हणाल्या, "आमच्याकडे स्नोहोमीष येथे कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारीमध्ये सापडला. ती व्यक्ती चीनमधील वुहान येथून आली होती. चीनमध्ये फैलावलेला कोरोना रोग आणि तेथून आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघणे ही बाब आमच्याकडे फार गांभीर्याने घेतली गेली नाही. थोड्याच दिवसांत कर्कलँड येथील लाईफ केअर सेंटरमध्ये बरेच रुग्ण आढळले. त्यांतील काही रुग्ण दगावलेदेखील आणि 23 मार्चला आमच्याकडे लॉकडाऊन घोषित करण्यात आला. कर्कलँडचे लाईफ केअर सेंटर माझ्या घरापासून एक-दीड किलोमीटर अंतरावर आहे. त्या सेंटरमध्ये पेशंट सापडले आणि आमच्या भागातील वर्दळ कमी झाली. मी हौशेने केक बनवते. माझ्याकडे ऑर्डर दिलेले केक नेण्यासदेखील कोणी फिरकले नाही. माझा फ्रिज केकनी भरून गेला. मी केक बनवणे नंतरचे दोन महिने थांबवले. गंमत अशी की मला वाटले होते, की परत ऑर्डर्स मिळण्यास त्रास होईल. पण तसे झाले नाही. उलट, लोक आता बेकरीतील  केकपेक्षा घरी बनवलेल्या केकला पसंती देतात!"
          अमृता त्या काळात आलेल्या आणखी एका तणावाबद्दल सांगतात, "आमच्या  व्हिसा रिन्युअलची कार्यवाही कंपनी सुरु करणार तेवढ्यात लॉकडाऊन सुरु झाला. त्यामुळे आमचे अमेरिकेतील राहणेच धोक्यात आले! तशी स्थिती आमच्यासारख्या बऱ्याच जणांची झाली होती. पण महिनाभराने व्हिसा ऑफिस उघडले आणि आमची काळजी मिटली."
          अमृता पुढे म्हणाल्या, की "या गोष्टी व हापूस आंबे या वर्षी खाण्यास न मिळणे एवढे वगळले तर आमचा लॉकडाऊन सुसह्य होते. आम्ही वॉकसाठी बाहेर जाऊ शकत होतो. आम्ही आमच्या ग्रूपमधील सगळ्यांचे वाढदिवस झूमवर साजरे केले. आम्हाला कोठल्याही गोष्टीची कमतरता भासली नाही. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी होती; त्याबरोबर 'गन'ची पण दुकाने उघडी ठेवली गेली. ती गोष्ट मात्र अनाकलनीय वाटते."
          सिअॅटल येथेच राहणारे अद्वैत वैद्य सांगतात, "कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सुरु केला. सार्वजनिक स्थळे, डेंटिस्ट, जिम, केशकर्तनालये ताबडतोब बंद झाली. गर्दीची ठिकाणे व जेथे व्यक्तींशी जवळून संपर्क येतो अशी ठिकाणे बंद झाली. कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम' सुरु केले. अमेरिकेत टेक्नॉलॉजी उत्तम असल्यामुळे ते कठीण गेले नाही. अद्वैत पुढे सांगतात, "आता लॉकडाऊन थोडा शिथिल केला गेला आहे. अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी अमेरिकेत सरकारने बेकार व गरीब लोकांच्या खात्यात पैसे जमा केले. पण अमेरिकेत अनधिकृत लोकांची संख्या खूप आहे. तशा लोकांना त्या मदतीचा फायदा मिळाला नाही."

          ते पुढे सांगतात, की "सिअॅटलला कोरोनाचा प्रादुर्भाव फार झाला नाही. पण न्यूयॉर्क येथे त्याचा फैलाव झाला. त्याचे मुख्य कारण म्हणजे तेथे असलेली दाट लोकवस्ती. अमेरिकेसारखा प्रगत देश कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत जगात पहिल्या स्थानावर का पोचला? तर अमेरिकेत वैद्यकीय उपचार फार खर्चिक. इन्शुरन्स असल्याशिवाय हॉस्पिटलची पायरी चढण्यास रुग्ण धजावत नाही. पण इन्शुरन्स घेणेसुद्धा महाग असते. पर्यायाने दुखणे अंगावर काढले जाते. कोरोनामध्ये ते योग्य ठरत नाही. दुसरे कारण म्हणजे चाचण्यांना सुरुवात रुग्णसंख्या वाढल्यानंतर झाली. चाचण्या लवकर सुरु केल्या गेल्या असत्या तर कोरोना इतका फैलावला नसता."           
मानसी वेल्हाणकर
          मानसी वेल्हाणकर सांगतात, "आम्ही दोघे मायक्रोसॉफ्टमध्ये काम करतो. जगभर वर्क फ्रॉम होम सुरु झाल्यामुळे आमचे काम वाढले आहे. सगळीकडे टेक्नॉलॉजी सुरळीत सुरु आहे ना ते आम्हाला बघावे लागते. आम्ही घरी येणारे क्लिनर, गार्डनर बंद केले. मुलांचे डे केअर बंद झाल्यामुळे मुले घरी राहू लागली. आमची अगदी तारेवरची कसरत सुरु झाली. पण आमचा मोठा मुलगा त्याच्या धाकट्या भावाची काळजी घेऊ लागला. ते दोघे एकत्र खेळू लागले आणि आमचा भार थोडा हलका झाला. मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. मी पण माझ्या लहान भावाकडे असेच लक्ष देत असे. आम्ही सगळे एकत्र घरी असतो; खूप मजा येते. माझा पेंटिंगचा क्लास ऑनलाइन सुरु झाल्यामुळे माझा जायचा-यायचा वेळ वाचतो."
          एक चटका लावणारी घटना घडली असे सांगताना त्या म्हणतात, "सिअॅटल येथे राहणाऱ्या आमच्या एका मित्राच्या वडिलांचे भारतात अकस्मात निधन झाले. तो मित्र त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. तो विमानसेवा बंद असल्यामुळे भारतात जाऊ शकला नाही. त्याची आणि वडिलांची भेट झाली नाही; प्रत्यक्ष भेटून आईला धीर देता आला नाही. त्या मित्राचे सांत्वनपण आम्हाला फोनवरून करावे लागले."
         
रश्मी व निनाद सोहोनी
उलट, शिकागो येथे राहणारे निनाद व रश्मी सोहोनी आनंदाने सांगतात
, "याच काळात आम्हाला पहिली मुलगी झाली. भारतातून कोणी आमच्या मदतीला येऊ शकले नाही. अगदी शेवटपर्यंत रश्मीला एकट्याने चेकिंगला जावे लागत होते. डॉक्टरांच्या तशा सूचना होत्या. आम्ही  गाडी सॅनिटाइझ करून तयार ठेवली होती. मित्रमैत्रिणींना मदतीला बोलावणेपण धोक्याचे होते. मात्र येथील डॉक्टर आणि नर्स यांनी दिलेल्या सूचना, गुगल-युट्यूब  आणि आईबरोबरचे व्हिडिओ कॉल यामुळे आम्ही सर्व निभावून नेले."
          अमेरिका अजूनही कोरोनाबाधित देशांच्या यादीत जगात पहिल्या स्थानावर आहे.  बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. बेरोजगारीचा दर तीन टक्क्यांवरून पंधरा टक्के एवढा वाढला आहे. अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी आलेले विद्यार्थी स्वतःचा राहण्याचा व जेवणाखाण्याचा खर्च सुटावा म्हणून छोट्या नोकऱ्या करतात. त्या नोकऱ्या बंद झाल्या आहेत. व्हिसावर काम करणाऱ्यांची नोकरी गेल्यास त्याला मायदेशी परतण्यावाचून गत्यंतर  नसते. तशा लोकांना विमानसेवा बंद असल्यामुळे मायदेशी परतता येत नव्हते. भारताने तशा अडकलेल्या लोकांसाठी विमाने पाठवली. पण त्यातून एक वेगळीच अडचण तयार झाली. फक्त भारतीय नागरिकांसाठी ती विमाने असल्यामुळे अमेरिकेत जन्मलेली मुले, जी अमेरिकन नागरिक असतात त्यांना विमानात प्रवेश मिळेना. ती समस्या नंतर भारत सरकारने सोडवली, आईवडील आणि मुले एकत्र परत भारतात जाऊ लागली. जे अमेरिकन नागरिक बेकार झाले, त्यांना बेकार भत्ता मिळतो. पण तो भत्ता मिळण्याचे काम सुरळीत सुरु झाले नाही. अमेरिकेत हातावर पोट असणारे लोक आहेत. त्यांच्या मुलांना शाळेत एका वेळेचे जेवण मोफत मिळते. त्यांना शाळा बंद झाल्यामुळे जेवण मिळेना. अमृता सांगतात, की "तशा मुलांच्या जेवणाची सोय त्यांच्या संस्थेने केली. घरगुती अत्याचाराला ज्या बायकांना सामोरे जावे लागते त्यांची अशी स्थिती आहे, की जो अत्याचार करतो त्याच्या सहवासात त्यांना चोवीस तास राहवे लागत आहे. तशा बायकांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे कामही वाढले आहे."
          अमृता देशपांडे यांचे सामाजिक कार्य याकाळातही सुरु आहे. त्या 'आशा' या सेवाभावी संस्थेसाठी काम करतात. 'आशाभारतात अनेक जनहितार्थ कामे करत आहे. त्यातील त्यांचे एक कार्य म्हणजे 'अवेही अॅबॅकस' या संस्थेला आर्थिक मदत पोचवणे. अकराशेपन्नास म्युनसिपल शाळांतील अडीच लाख विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व आरोग्य दर्जा सुधारावा यासाठी प्रयत्न करणे हे अवेहीचे मुख्य कार्य आहे. सिअॅटलटच्या 'आशा' शाखेने गोळा केलेला पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी 'अवेही'साठी भारतात पाठवला गेला. ते पैसे अमेरिकेतून निघाले पण भारतात पोचले नाहीत. सर्व कार्यकर्ते खूप चिंतेत होते. शेवटी आठ दिवसानंतर ते मिळाले!
          सिअॅटल ते पोर्टलँड अशी दोनशे मैलांची सायकल स्पर्धा दरवर्षी जुलैमध्ये होते. खूप स्पर्धक त्यात भाग घेतात. त्या स्पर्धेचा भारताशी संबंध आहे. त्यात भाग घेणारे काही स्पर्धक 'आशा'साठी नोंदणी करतात. 'आशा'चे कार्यकर्ते त्यातील स्पर्धकांना शिकवतात, स्पर्धेसाठी त्यांची तयारी करून घेतात. त्यातून जो निधी जमतो तो भारतातील शाळांना पाठवला जातो. या वर्षी कोरोनामुळे ती स्पर्धा रद्द झाली आहे. स्पर्धा नाही तर निधी नाही अशी चुटपुट 'आशा'च्या कार्यकर्त्यांना लागली आहे असे अमृता देशपांडे यांनी सांगितले.

विनीता वेल्हाणकर यांचे एम ए पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी बँकेत तेहेतीस वर्षे नोकरी केली आणि 2011 साली स्वेच्छानिवृत्ती पत्करली. त्यांचे पती चार्टर्ड अकाउंटट आहेत. त्यांची मुलगी मानसी वैद्य व तिचा परिवार अमेरिकेत आहे आणि मुलगा अमेय व त्याची पत्नी लंडनला वास्तव्यास आहेत. विनीता यांना वाचनाची आवड आहे. तसेच, त्यांचा शेअर मार्केटचाही अभ्यास आहे. 
----------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या