शंभर वर्षांपूर्वीदेखील मास्क लावणे बंधनकारक होते. |
कोरोनाची साथ ही धुळे जिल्ह्यापुरती
तरी इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे! यापूर्वी
अठराव्या, एकोणिसाव्या आणि विसाव्या अशा तिन्ही शतकांत साधारण
याच वर्षाच्या सुमारास धुळे जिल्ह्यात साथीच्या रोगांचा फैलाव झाला असल्याची
माहिती उपलब्ध झाली आहे. साथीच्या आजारांमुळे 1720 मध्ये तत्कालीन खानदेशात काय धुळधाण उडाली असेल यासंबंधीचा अधिकृत तपशील उपलब्ध नाही. तथापि 1820 आणि 1920 मधील माहिती
वाचण्यास मिळू शकते. या तिन्ही शतकात
महामारीची साथ जणू योजनाबध्द पध्दतीने
आलेली भासते. प्रत्येक शतकात
विषाणूंच्या संसर्गातून विविध
देशांमध्ये साथींचा फैलाव झाला
आणि मोठ्या प्रमाणावर
जीवितहानी झाली.
तसे दाखले इतिहासात
आहेत. त्या तडाख्यात धुळे
जिल्हादेखील सापडला होता
हे संदर्भ ग्रंथांत आढळून
येते.
खानदेश परिसर 1818 मध्ये पेशवे-होळकरांच्या ताब्यातून इंग्रजांच्या ताब्यात गेला होता. त्यामुळे विविध अहवालांच्या माध्यमातून अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकते. खानदेशचा पहिला ब्रिटिश कलेक्टर कॅप्टन जॉन ब्रिग्ज याच्या कारकिर्दीवर आधारित 'JOHN BRIGGS IN MAHARASHTRA' हे अरविंद देशपांडे यांचे पुस्तक प्रसिद्ध
आहे. त्यात साथीच्या आजारांमुळे उद्भ्वलेल्या परिस्थितीचा धावता उल्लेख आहे. कॉलरा हा वारंवार उद्भवणारा आजार 1817 ते 1820 या कालावधीत होता. सामान्य नागरिकांप्रमाणे सैन्यदलातील जवानदेखील कॉल-याच्या तडाख्यात सापडले होते. पाचशे कॉलराबाधित सैनिकांपैकी चौऱ्याऐंशी जण मृत्युमुखी पडल्याचा उल्लेख ब्रिग्ज यांनी पाठवलेल्या 1818 च्या अहवालात आहे.
संपूर्ण धुळे शहर कॉलरा साथीच्या विळख्यात 1819 मध्ये सापडले होते. ती साथ लवकरच परिसरातील गावांत पसरली आणि ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू झाले. खेडी ओस पडली. कॉल-यामुळे अकरा हजार पाचशे एकवीस मृत्यू जुलै 1819 अखेर झाल्याचा उल्लेख त्या पुस्तकात आहे. साथीचा उद्रेक रांजणगाव या गावात, पुन्हा मार्च 1820 मध्ये झाला आणि एका आठवड्यात सत्याऐंशी
जण मृत्युमुखी पडले. एका
छोट्या गावात असा हाहाकार माजल्याचे दुसरे उदाहरण नसावे. ते रांजणगाव नेमके कोणते यासंबंधीचा उल्लेख मात्र सापडत नाही. त्यावेळी धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव आणि बागलाण हा सारा परिसर मिळून खानदेश हा एक जिल्हा होता. यापैकी धुळे जिल्ह्यात रांजणगाव नक्की नाही. ते चाळीसगावजवळ असल्याचे कळते.
धुळेकरांना स्पॅनिश फ्लू या साथीच्या आजाराने मगरमिठीत आवळण्यास सुरुवात 1901मध्ये केल्याचे दिसते. धुळे नगरपालिकेस शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 1962 मध्ये एक स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. त्या स्मरणिकेमध्ये स्पॅनिश फ्लूचा उल्लेख साथीचा प्लेग असा आहे. त्या साथीचा शिरकाव धुळयात 1901मध्ये झाला. त्यावेळी तीनशेतेवीस जण मृत्युमुखी पडले. परंतु शहरातील लोकांनी गावाबाहेर स्थलांतर केल्यामुळे पुढील प्राणहानी टळली. मात्र 1902 आणि 1903 या वर्षी त्या साथीच्या आजाराने धुळे शहरास भयंकर तडाखा दिला आणि 20 सप्टेंबर 1902 पर्यंत एकशेसतरा जण मृत्युमुखी पडले. नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना अन्यत्र हलवण्याचा प्रयत्न 1903 मध्ये कसोशीने केला. परंतु त्याला पावसामुळे फारसे यश आले नाही. त्या साथीने दोन हजार सहाशेत्र्याऐंशी जणांचा बळी घेतला. विशेष म्हणजे त्यावेळी धुळे शहराची लोकसंख्या अवघी सत्तावीस
हजार होती.
त्या साथीचा अंमल 1905 पर्यंत होता. नगरपालिकेच्या दप्तरी असलेल्या माहितीमध्ये प्लेगमुळे झालेल्या मानवहानीचे आकडे देण्यात आले आहेत. लागण 1905 नंतर तुरळक होत असे. त्या साथीने पुन्हा 1916मध्ये डोके वर काढले. त्यावेळी सातशे जणांचा बळी त्या साथीच्या आजाराने घेतला.
त्या साथीने बराच जोर 1919मध्ये धरला होता. खानदेशच्या उर्वरित भागासह नाशिक, नगर आणि पुणे येथे प्लेगची जोरदार लागण झाली होती. तथापि त्यावेळी नगरपालिकेने जबाबदारी व्यवस्थित सांभाळल्यामुळे साथीस कोणीही बळी पडले नाही.
धुळे नगरपालिकेकडे प्लेगचा विषाणू पसरवण्यास कारणीभूत असलेले उंदीर पकडण्याचे पाचशे पिंजरे होते. त्या वर्षी एकूण एकोणीस हजार पाचशेदहा उंदीर पकडून त्यांचा नाश करण्यात आला. सिव्हील हॉस्पिटल, नगरपालिकेचा बापट दवाखाना, प्लेग हॉस्पिटल आणि शहरातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी चांगली मेहनत घेतल्यामुळे साथीचा परिणाम शहरावर झाला नाही असा उल्लेख धुळे नगरपालिका शताब्दी महोत्सवी स्मरणिकेमध्ये करण्यात आलेला आहे.
धुळे शहराची महानगरपालिका तसेच आरोग्यविभागाशी संबंधित सर्वच घटक शंभर वर्षांनंतरदेखील जबाबदारीने कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे एप्रिल 2020 च्या मध्यापर्यंत कोरोना विषाणूची बाधा झालेला आणि धुळे शहरातील रहिवासी असलेला एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता. तथापि कोरोना हॉटस्पॉट झालेल्या मालेगाव कनेक्शनमुळे धुळ्यातील तिरंगा चौकात प्रारंभी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. 13 मेपर्यंत शहरासह जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या चौसष्टपर्यंत पोचली आहे. तर मृतांची संख्या आठ होती.
-------------------------------------------------------------------------------------------------
1 टिप्पण्या
झेंडे सर ...ससंदर्भ माहिती .
उत्तर द्याहटवा