सध्या जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. लोकांना
त्याच्या बातम्या, हकिकती वर्तमानपत्रे, टीव्ही आणि समाजमाध्यमे यांवरून कळतात. पण
त्या सर्वांवरच वाचक/प्रेक्षकांचा विश्वास बसतो असे नव्हे. शिवाय प्रत्यक्षदर्शी हकिकतीस
वेगळे वजन प्राप्त होते. भारतातील हकिकती आपल्याला विविध मार्गाने कळत असतात. परदेशस्थ
जी मराठी मंडळी आहेत त्यांना तेथील प्रत्यक्ष परिस्थिती अनुभवातून लिहिण्याबाबत
आम्ही सुचवत आहोत. संध्या जोशी या कामी 'थिंक महाराष्ट्र'ला मदत करत आहेत. या
पद्धतीने प्राप्त झालेले दोन वृत्तांत आज येथे प्रसिद्ध केले आहेत. या नव्या 'फिचर'चा
आरंभ म्हणून मराठी वाचकांच्या मनातील उत्सुकता दर्शवणारे विनीता वेल्हाणकर यांचे आरंभीचे
पत्र आणि अनघा गोडसे यांचा अनुभव पहावा. तुम्हीही ते info@thinkmaharashtra.com
या इमेल किंवा 9892611767 या क्रमांकावर पाठवू शकता.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
काळ
मोठा कठीण आहे... (Corona Reports from Different Countries)
विनीता वेल्हाणकर |
कोरोनाच्या संकटाने आपल्या देशात प्रवेश केला, तो देशभर
सर्वत्र पसरला आणि या किटाणूचा टिकाव उष्णकटिबंधातील प्रदेशात लागणार नाही ही आशा
फोल ठरली. कोरोनाविरूद्ध इतर देशांनी काय पावले उचलली हे माहीत असल्यामुळे आपल्यालाही कशातून जायचे
आहे याचा अंदाज आला; तशी मानसिक तयारीदेखील केली. आपल्याला आठच दिवस घरी बसायचे
आहे, करू आराम असे म्हणत असतानाच पूर्ण लॉकडाऊन झाले! तेव्हा
मात्र जिवावर आले. कोठलीही बाई कामाला येणार नव्हती. मग आठवले, जास्त काम म्हणजे जास्त व्यायाम हे सूत्र ते वापरले. 'भिऊ नकोस,
मी तुझ्या पाठीशी आहे’ असे म्हणत मिक्सर, वॉशिंग मशिन,
डीशवॉशर माझ्या मदतीला आले. सर्व छान जमू लागले. मी आता
खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा झाले. माझे कुटुंबीय शुद्ध अंतःकरणाने शिजवलेल्या
भोजनाचा आस्वाद घेऊ लागले. सोसायटीचा वॉचमन अतिथी म्हणून दारी उभा राहतो आणि मला
अन्नदानाचे पुण्य देवून जातो. घरातील लक्ष्मीला (केरसुणी) मी जवळ घेत आहे. माझ्या
वास्तुदेवतेची मी स्वतः काळजी घेत आहे. तिच्या कुशीत बसून माझे छंद जोपासत आहे.
इतके सगळे असले तरी चिंतेचा भुंगा काही सुटत नाही.
संध्या जोशी |
तेव्हा
डोळ्यांसमोर आला, अमेरिकास्थित माझा
भाचा व त्याची पत्नी. ते त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची तयारी करत आहेत.
त्यांची आपली म्हणावी अशी माणसे जवळ नाहीत. पण त्यांच्या मनात चिंतेचा लवलेशही
नाही. येथे माझ्याजवळ माझी माणसे आहेत. माझ्या गाठीशी अनुभव आहे. मग मी का चिंता करते? मी तर सरकारने दिलेले आदेश तंतोतंत पाळत आहे. आमच्या योगशिक्षिका संध्या जोशी आम्हा विद्यार्थिनींना संसर्ग होऊ नये म्हणून प्रयत्नशील आहेत. आम्ही सर्वजणी इतर प्रार्थनेबरोबर धन्वंतरीची प्रार्थना करत आहोत. आमच्या
नववर्षाची सुरुवात आईच्या आशीर्वादाने झाली आहे. मग चिंता कसली?
मी आज
प्रदूषणमुक्त हवेमुळे मोकळा श्वास घेत आहे. निळे आसमंत न्याहाळत आहे. मला ध्वनिप्रदूषण
कमी झाल्यामुळे पक्ष्यांची किलबिल ऐकू येत आहे. मी त्यांचा आकाशातील मुक्त विहार
पहात आहे. इतके आनंदमय आयुष्य दिल्याबद्दल त्या जगन्नियंत्याचे आभार.
एक दिवस,
मोदीजी आठ वाजता, टीव्हीवर येतील आणि सांगतील “मै घोषित करता हूँ, आज बारा बजे से भारत देश कोरोनामुक्त
हो गया है।”
विनीता वेल्हाणकर यांचे एम ए पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी बँकेत तेहेतीस वर्षे नोकरी केली आणि 2011 साली स्वेच्छानिवृत्ती
पत्करली. त्यांचे पती चार्टर्ड अकाउंटट आहेत. त्यांची मुलगी मानसी वैद्य व तिचा परिवार अमेरिकेत आहे आणि मुलगा अमेय व त्याची पत्नी
लंडनला वास्तव्यास आहेत. विनीता यांना वाचनाची
आवड आहे. तसेच, त्यांचा शेअर मार्केटचाही अभ्यास आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------
ऑस्ट्रेलियातील
अनुभव (Experience From
Australia)
अनघा गोडसे, मुलगी मुक्ता व तिच्या दोन जुळ्या मुली यांच्यासमवेत |
ऑस्ट्रेलिया हा देश बाकी जगापासून
भौगोलिकदृष्ट्या लांब असल्याने व जगाच्या राजकारणापासून अलिप्त राहणारा वाटत
असल्याने जगातील घडामोडींचे अती तीव्र पडसाद येथे फारसे जाणवत नाहीत. तसेच, सरत्या
2019 पासून येथे नैसर्गिक संकटांची सुरूवात झाली. प्रथम जंगलातील वणवे, त्यामुळे झालेले हवेतील प्रदूषण आणि त्यानंतर काही ठिकाणी अतिवृष्टी,
पूरसदृश्य परिस्थिती यांमुळे अनेक लोक त्रस्त होते. काहींची तर
संपूर्ण घरेदारे उध्वस्त झाली होती. परिस्थिती जरा स्थिर होत असताना कोरोनाचे नवे
संकट उभे ठाकले.
चीनमध्ये उद्भवलेल्या या जैविक आपत्तीने
सर्व जग हा हा म्हणता व्यापून टाकले. प्रथम काही दिवस तो प्रश्न गांभीर्याने घेतला
गेला नाही. परंतु ऑस्ट्रेलियात विमानप्रवास व समुद्रप्रवास करून आलेल्या लोकांमध्ये
काही रुग्ण आढळून आले. तेवढेच नव्हे रोगाची लक्षणे इतरत्रही वाढताना दिसून आली.
एव्हाना अनेक देशांत लॉकडाऊन सुरू झाले होते. मार्च महिन्याच्या मध्यापासून येथेही
लॉकडाऊन सुरू झाले. काही सुज्ञ नागरिकांनी तर त्याही पूर्वीपासून सोशल डिस्टन्सिंग
सुरू केले होते. या सर्वामुळे ह्या देशापुरती तरी इतर जगाच्या तुलनेत महामारीची
साथ आटोक्यात राहिली.
सुरूवातीला थोडा विरोध किंवा जीवनावश्यक
वस्तूंच्या हव्यासापायी काही ठिकाणी घडलेल्या अप्रिय घटना वगळल्यास, येथील सर्व लोकांनी लॉकडाऊन अत्यंत सकारात्मक घेतला. त्यांच्या अत्यंत
आवडत्या गोष्टी उदाहरणार्थ -स्वीमिंग, सर्फिंग वगैरेंना त्यांनी मुरड घातली आहे.
तसेच, देशांतर्गत स्टेट बॉर्डरस् बंद करून आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखला आहे. अतिशय
समजूतदारपणे जनता स्वेच्छेने सर्व नियम पाळत आहे. इतर प्रगत देशांतील बातम्या
ऐकल्यावर हे खूपच कौतुकाचे वाटते. अर्थात या देशात नियम न पाळणाऱ्यांसाठी कडक शासन
केले जाते. त्याचबरोबर येथील मेडिकल सर्विस उत्तम आहेत. कमी लोकवस्ती हेसुद्धा
परिस्थिती आटोक्यात राहण्याचे एक कारण आहे.
अनघा गोडसे मुलीच्या परिवारासोबत |
आता थोडे घरातील वातावरणाबद्दल. सर्वजण
एकमेकांसोबत घरात आहेत ही जणू पर्वणीच आहे. येथील 'वर्क फ्रॉम होम' ही संकल्पना तशी
नवीन राहिलेली नाही. सोबत सगळ्या सुविधा म्हणजे इंटरनेट, स्मार्टफोन, झूम वगैरे
आहेतच. तीच गोष्ट होम स्कूलिंगची. माझ्या नातींना स्वत:च्या आयपॅडवर शाळेतील
शिक्षकांनी दिलेला अभ्यास करताना पाहून गंमत वाटते. त्या शाळेच्या वेळापत्रकानुसार
वागत आहेत. तसेच, त्या सर्वांना बाहेरची दुसरी काही व्यवधाने सांभाळायची नसल्याने
खूप गोष्टी करण्यास वेळ मिळत आहे -शुभम् करोति म्हणायला, परवचा म्हणायला, मुलांसोबत खेळायला इत्यादी. लहान
मुलांच्या मनांतील ‘हे सर्व कधी संपणार’ या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत, त्याची
खंत वाटते. घरातील आनंदावर एक प्रकारची अदृष्य भीती, भविष्यकाळाबद्दल
अनिश्चिततेचे सावट आहेच. दृष्य संकटापेक्षा अदृष्य संकट जास्त भयंकर वाटते आणि
त्याचा सामना करणे तितकेच कठिण असते. त्यावरसुद्धा मानवालाच उपाय शोधावा लागणार
हेही तितकेच खरे आहे.
सध्या जगभरात निर्माण झालेल्या
परिस्थितीचा विचार केल्यास मानवाने मानवतेच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांची
विफलताच जास्त जाणवते. मानवाने स्वत:लाच विज्ञान, तंत्रज्ञान
याची कास धरताना निसर्गावर प्रभुत्व गाजवण्याच्या हव्यासापायी बंदी करून घेतले
आहे. माणूस व माणसाने निर्माण केलेल्या साधनांवाचून निसर्गाचे काहीच अडलेले नाही. तो
नेहमीसारखा त्याचा समतोल राखून आहे. माणसाव्यतिरिक्त सर्व जीवन, प्राणी-पक्षी-झाडे-पाने-फुले, नित्यनियमाने माणसाच्या हस्तक्षेपाशिवाय चालत
आहे. माणसावर स्वत:च स्वत:ला बंदिवासात टाकण्याची वेळ आली आहे. सकारात्मक विचार
केल्यास ही एक वेगळ्या प्रकारची स्वत:शी संवाद साधण्याची संधी मानता येईल. निसर्ग
व मानव यांतील हरवलेला दुवा शोधण्याचा प्रयत्न करता येईल. जगात अस्तित्वात
असलेल्या सर्व गोष्टींचे परस्परांशी असलेले नाते उलगडण्यास, सर्वच
एकमेकांस पूरक कसे होऊ शकतील या दृष्टीने मानव प्रयत्न करू लागेल. विज्ञान,
शास्त्र, कौशल्य इत्यादी जे आहे ते सामान्यज्ञान
असे मानल्यास त्याचा समन्वय अध्यात्म, परमार्थ, योग अशा बुद्धिजन्य ज्ञानापलीकडील असामान्य ज्ञानाशी होऊन एक नवा
मानवसमाज निर्माण होईल का? ॐ सर्वे सुखिन: सन्तु ।
सर्वे सन्तु निरामय: ॥
-
अनघा गोडसे, सिडनी 9819497155
अनघा वसंत गोडसे यांचा जन्म गुजरातच्या बडोदा येथे झाला. त्या मुंबईत विलेपार्ले येथे राहतात. त्यांनी एम कॉम, एम ए, डिप्लोमा इन म्युझिक आणि ऍडव्हान्स डिप्लोमा इन योगा अशा विविध शाखेतील पदवी ससंपादित केल्या आहेत. त्या अठ्ठावीस वर्षे 'बँक ऑफ बडोदा'मध्ये नोकरी करून 2001 साली सेवानिवृत्त झाल्या. त्यांना गाणी ऐकणे, वाचणे आणि प्रवास करणे इत्यादीचा छंद आहे. तसेच, गुरुदेव रानडे ह्यांचे तत्त्वज्ञान हा
त्यांचा विशेष आवडीचा विषय आहे.
30-4-20
---------------------------------------------------------------------------------------------------------
2 टिप्पण्या
दोन्ही लेख छान झालेत .....कुणीतरी असे मनातले कागदावर व्यक्त झाले की बर्याच जणांना आपल्या विचारांना शब्द सापडल्याची भावना जाणवते ...या दोन्ही लेखांनी ते साधलय...धन्यवाद
उत्तर द्याहटवाअतिशय साध्या आणि ओघवती भाषा हे दोन्ही लेखांचे वैशिष्ट्य. सध्याच्या परिस्थती बद्दल खूपच सकारात्मक विचार मांडले आहेत आणि जे खरेही आहे. भारताबाहेरही मानव त्याच तणावातून जात आहे हे समजले.
उत्तर द्याहटवाधन्यवाद