![]() |
अजित कुलकर्णी |
नगरच्या
अजित कुलकर्णीला सिनेनट आमीरखान याच्याबरोबर अर्धा-पाऊण तास घालवण्यास मिळाला होता.
अजितला आमीरखानचे उमदेपण आवडले, तो सभोवतालचे जीवन जिव्हाळ्याने पाहतो व उत्सुकतेने
प्रश्न विचारतो हेही जाणवले. त्याला आमीरखान आवडला, परंतु तो आमीरखानच्या भेटीमुळे
एक्साईट झाला नाही. ही गोष्ट तीन-चार वर्षांपूर्वीची. नगरच्या 'स्नेहालय' संस्थेला
आमीरखानने त्याच्या सत्यमेव जयते कार्यक्रमातून जवळजवळ दीड कोटी रुपयांचे
अर्थसहाय्य केले. त्यामधून जी इमारत उभी राहिली तिच्या उद्घाटनानिमित्त आणि 'स्नेहालय'चे
कार्य पाहण्यासाठी आमीरखान नगरला पोचला होता. अजितच्या उत्तराने मी सतर्क झालो. जो
माणूस आमीरखानबरोबर दोन-चार तास घालवतो, त्याला आमीरखानची सुसंस्कृतता जाणवते, पण
त्या भेटीचे अप्रूप वाटत नाही? मी तसे कुतूहल दाखवले, तेव्हा अजित म्हणाला, की "मी
आयुष्यात फक्त एका व्यक्तीला भेटून 'एक्साईट' झालो, ती व्यक्ती आहे नगरच्या 'स्नेहालय'
संस्थेचे संस्थापक-प्रेरक गिरीश कुलकर्णी." अजित त्यांचा उल्लेख गिरीश'बाबा' कुलकर्णी
असाच करतो.
![]() |
'अनामप्रेम'मधील मुले |
अजित मूळ सोलापूरच्या माढा तालुक्यातील.
त्याचे वडील स्टॅम्प व्हेंण्डर. घरची गरिबी. तरीही अजितला समाजसेवेचे डोहाळे
लागले. तो बारावीत असतानाच आनंदवनला श्रमसंस्कार छावणीत गेला. ही गोष्ट 2004
सालची. त्यानंतर दोन-तीन वर्षे तो छावणीत जात राहिला. तरी इकडे माढ्याला
युक्रांदच्या कार्यात सहभागी झाला. असे विविध संस्कार घेत त्याचे शिक्षण झाले. त्याच
ओघात त्याला नगरच्या स्नेहालयची व गिरीश कुलकर्णी यांची माहीती 2008 साली कळली आणि
त्याने बाडबिस्तरा आईवडिलांसह नगरला
हलवला. त्याला 'करियर' समाजसेवा क्षेत्रात
करायचे होते. म्हणून तो गिरीश कुलकर्णी यांना भेटला व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने
प्रभावित झाला. दरम्यान अजितने त्याचे शिक्षण पूर्ण केले(बीए, बीएड) व नगरच्या
समर्थ विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. त्याने 2009 ते 2014 या काळात
शिक्षकाची नोकरी व स्नेहालयचे काम या दोन्ही गोष्टी सांभाळल्या. तो म्हणतो, सकाळी
सात ते बारा शाळा आणि दुपारी बारा ते रात्री बारा स्नेहालय असे माझे वेळापत्रक
होते. तरीही स्नेहालयच्या कामाचा लोड वाढला तेव्हा मी शाळेची नोकरी सोडून दिली. महाराष्ट्रातील
साऱ्या कार्यकर्त्यांचे होते तसेच अजितचे झाले आहे. त्याचे स्फूर्तिस्थान बाबा
आमटे झाले आणि त्याची कार्यवृत्ती 'आनंदवन'च्या श्रमसंस्कार छावणीत घडली. त्याचे
रचना व संघर्ष हे व्रत बनले. मी त्याला विचारले, की घर संसार करायचा आहे की नाही? तर
तो म्हणाला, शोध चालू आहे; बायकोचा, नव्हे साथीदाराचा!

अजितने समाजविकास कार्यात पडण्याचे एकदा
ठरवल्यानंतर, मुंबईच्या एस पी जैन इन्स्टिट्यूटमधून त्या विषयात एमबीए केले. त्या
अभ्यासक्रमाची रचनाच अशी आहे, की पंधरा दिवस प्रशिक्षण आणि दीड महिना क्षेत्रीय
कार्य. अजित क्षेत्रीय कामात नगरला आधीपासून गुंतला होताच. तो सध्या कायद्याचे
पदवी शिक्षण घेत आहे.
अजितच्या अनामप्रेम संस्थेने विशेष मुलामुलींसाठी
पहिली ते सातवीपर्यंतची विशेष शाळा तयार केली आहे. त्यांचे वसतिगृह आहे. त्याचे
नावही 'हिंमत भवन' आहे. ती मुले नियमित अभ्यासक्रमाबरोबर व्यवसायशिक्षण घेत असतात.
कौशल्यविकास हा त्यामागील हेतू असतो. त्यांनी सध्याच्या कोरोनाकाळात शिलाई मशीनवर मास्क
शिवले, चेहऱ्यावरील प्लॅस्टिक आवरणे बनवली. शाळेची स्वतःची व्यवसाय शिक्षणाची
साधनसामग्री आहे. 'अनामप्रेम'चे अॅक्टिव्हिटी सेंटर सुरू करावे या दृष्टीने
पुण्याच्या अरविंद पित्रे यांच्यासह प्रयत्न सुरू आहेत.
![]() |
राहत केंद्र |
---------------------------------------------------------------------------------------------------------
7 टिप्पण्या
अशी माणसे महाराष्ट्रात आहे हीच महाराष्ट्राची खरी संपत्ती आहे. अधिकात अधिकाधिक लोकांपर्यंत हे काम जायला हवे. खूप लहान वयात खूप चांगलं काम होते आहे श्री अजित कुलकर्णी यांच्याकडून
उत्तर द्याहटवाखूप छान आणि प्रेरणादायी कार्य.
उत्तर द्याहटवाआम्हाला वाचायला वेळ आहे ...ज्यांनी आयुष्याचा सारा वेळ समाजासाठी दिला अशा लोकासाठी वेळ नसेल तर समाजाला गति कशी मिळेल ...हेच संचित माणुसकीचे महाराष्ट्राचे आणि ते कवेत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या थिंक महाराष्ट्राचे ...धन्यवाद
उत्तर द्याहटवाफार चांगले कामआहे.श्री. अजित यांच्यासारखी माणसे ही समजाची संजीवनी आहेत.
उत्तर द्याहटवासौ.अनुराधा म्हात्रे. पुणे.
Ajit we r proud of you
उत्तर द्याहटवाअनामप्रेम संस्था सर्वांसाठी एक आदर्श झाली यात अजित चा सिंहाचा वाटा आहे. दीव्यांग साठी टोकाचा विचार करणारा अजित आमचा अभिमानाचा विषय आहे
उत्तर द्याहटवाApratim Kam.
उत्तर द्याहटवा