सत्ताविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे होते. ते संमेलन 1942 साली नाशिक येथे भरले होते. अत्रे हे महाराष्ट्राचे हसते-खेळते, चैतन्यदायी, 'प्रचंड' व्यक्तिमत्त्व होय. त्यांनी वाङ्मयाचे वेड जीवनाच्या आनंदामधून आयुष्यभर जपले, जोपासले व स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा मराठी वाङ्मयावर, संस्कृतीवर, मराठी वृत्तपत्रसृष्टीवर, मराठी बोलपटांवर आणि मराठी नाटकांवर उमटवला. ते शिक्षणक्षेत्रात शिरले, तेथे स्वतःच्या शैक्षणिक ताकदीची मोहर उमटवली. ते बोलपटात गेले आणि ‘श्यामची आई’सारखा उत्तम बोलपट निर्माण केला. त्या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले. ते नाट्यक्षेत्रात उतरले आणि त्यांनी ‘उद्याचा संसार’, ‘लग्नाची बेडी’, ‘तो मी नव्हेच’ यांसारखी नाटके लिहून मराठी रंगभूमी सळसळती ठेवली. अत्रे हा गुणसंपन्न वाङ्मय लिहिणारा, वाङ्मयातील सर्व शाखांत स्वतःचे नाव निर्माण करणारा चमत्कार होता ! मराठीतील विडंबन काव्य समर्थपणे लिहिणारा तो पहिला आणि कदाचित शेवटचा कवी ठरेल. त्यांनी ‘झेंडूची फुले’1922 साली लिहिली. ती काळाच्या ओघात टिकली. त्यांनी प्रथम ‘मकरंद’ व नंतर ‘केशवकुमार’ या टोपणनावांनी काव्यलेखन केले. तो स्वतःची संस्था निर्माण करून कार्य साधणारा निष्ठावंत वाङ्मयसेवक होता. तो अन्यायाविरूद्ध चिडून उठणारा लेखक होता. ना.सी. फडके साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना त्यांनी पत्रकारांवर हल्ला चढवला तेव्हा अत्रे यांनी सर्व पत्रकारांना एकत्र करून व्यासपीठावरच फडके यांना माफी मागण्यास लावली.
अत्रे यांनी महाराष्ट्राला चाळीस वर्षे सतत हसत ठेवले. त्यांच्या विनोदात वाङ्मयीन दर्जा ठासून भरला होता. विनोद हा त्यांच्या व्यासंगाचा विषय होता. साहित्य काय, राजकारण काय, समाजकारण काय, सांस्कृतिक आयुष्य काय, अत्रे यांनी स्वतःला झोकून ज्या प्राणपणाने त्या त्या कामात स्वतःला बुडवून घेतले, त्याला तोड नाही. खळबळजनक लिखाण करणारा, निर्माण करणारा, विधानसभा गाजवणारा, अत्यंत हजरजबाबी, निर्भीड पत्रकार-लेखक-कला-नाटककार सत्ताविसाव्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला ! तसा आनंद अवघ्या महाराष्ट्राला झाला.
प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी सासवड (पुणे) येथे झाला. त्यांचे शिक्षण बी ए, बी टी (लंडन) पर्यंत झाले होते. ते बी ए झाल्यावर शिक्षक म्हणून पुण्यात 1918 साली रुजू झाले. ते हेडमास्तर 1922 साली झाले. ते 1940 सालापर्यंत शिक्षक होते. ते पुण्याच्या कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे प्रिन्सिपॉल होते. त्यांनी स्वतःची ‘नवयुग’ ही संस्था चित्रपट निर्माण करण्यासाठी काढली. ‘अत्रे थिएटर्स’ ही नाट्यसंस्था काढली. त्यांनी ‘नवयुग’ हे साप्ताहिक सुरू केले. ते संयुक्त महाराष्ट्र लढ्यात आघाडीवर होते. त्यांनी ‘मराठा’ हे दैनिक संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी काढले. त्यांनी त्यांचे ‘मराठा’ हे वृत्तपत्र अक्षरशः घणाघाती ठेवले; हजारोंच्या संख्येने भाषणे केली. ते ‘मराठा’चे संपादक तहहयात होते.
त्यांनी एकोणीस नाटके आणि ‘ब्रँडीची बाटली’सारखे अकरा कथासंग्रह, ‘चांगुणा’ व ‘मोहित्यांचा शाप’ या दोन कादंबऱ्या आणि ‘झेंडूची फुले’, ‘गीतगंगा’ व ‘पंचगव्य’ हे तीन कवितासंग्रह असे साहित्य लिहिले. त्यांचे ‘जन्मठेप’, ‘सूर्यास्त’ यांसारखे अठ्ठावीस ग्रंथ तसेच, ‘कऱ्हेचे पाणी’ हे पाच खंडांतील आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. अत्रे यांनी विविध विषयांवर केलेल्या लेखनात लहानमोठी चरित्रे, व्यक्तिदर्शने, मृत्यूलेख, प्रवासवर्णने, वृत्तपत्रीय लेख, साहित्यविषयक लेख आणि भाषणे, शालेय पाठ्यपुस्तके इत्यादींचा समावेश होतो. त्यांची काही उल्लेखनीय पुस्तके - महात्मा फुले (1958), पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरील सूर्यास्त (1964), समाधीवरील अश्रू (1956), केल्याने देशाटन (1961), अत्रे उवाच (1937), ललित वाङ्मय (1944), हशा आणि टाळ्या (1958). त्यांनी ‘धर्मवीर’, ‘ब्रह्मचारी’ आणि ‘ब्रँडीची बाटली’ यांसारख्या चित्रपटांचे लेखन केले. त्यांच्या नवयुग वाचनमालेतील (1937) संपादनाने मराठी भाषासाहित्यविषयक शालेय पाठ्यपुस्तकाचा मराठीत आदर्शच निर्माण केला. त्यांनी सुभाष वाचनमाला पुन्हा, 1962 साली निर्माण केली.
ते सत्ताविसाव्या साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “आजच्या युगात मानवी जीवनाला आवश्यक असणारे साहित्य हे सहावे महाभूत आहे. राष्ट्राला जिवंत ठेवण्याचे काम केवळ साहित्य करू शकते. ज्या समाजाजवळ साहित्याचे सामर्थ्य नाही तो समाज पारतंत्र्यातून बाहेर येणे अशक्य आहे.”
ते बेळगाव येथे 1950 साली झालेल्या पत्रकार संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद 1941 आणि 1956 साली दोन वेळा भूषवले. ते पुणे येथे भरलेल्या पहिल्या महाराष्ट्र कवी-संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. अशा या चतुरस्त्र साहित्यिकाचा मृत्यू 13 जून 1969 रोजी मुंबईत झाला.
- वामन देशपांडे 9167686695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 9920089488
------------------------------
1 टिप्पण्या
माहितीपर लेख
उत्तर द्याहटवा