ना.सी. फडके यांचे पुरोगामित्व (Veteran Novelist N S Phadke and his progressive stance)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

ना.सी. फडके यांचे पुरोगामित्व (Veteran Novelist N S Phadke and his progressive stance)

 


ना.सी. फडके यांचे नाव उच्चारले, की सर्वसामान्य वाचकांना सर्वप्रथम त्यांच्या प्रणयरम्य कादंबऱ्या (दौलत, अल्ला हो अकबर वगैरे अनेक) आणि कथा आठवतात. तद्नंतर त्यांच्या गुजगोष्टी, आचार्य अत्रे यांच्याशी व इतरांशी झालेले वाद आणि त्यांचा प्रतिभासाधनहा ग्रंथराज. फडके यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी ते लेखन पृष्ठसंख्येने अधिक आणि लोकप्रियतेत वरचढ आहे. फडके यांनी तत्कालीन मध्यमवर्गीय वर्गातील युवा वाचकांना सनातनी विचारांच्या जोखडातून मुक्त करून फडके यांनी त्यांच्यातील तारुण्यसुलभ भावनांच्या अभिव्यक्तीला मोकळेपणा बहाल केला.

मात्र फडके यांच्या व्यक्तिमत्त्वाला इतरही पदर होते. ते रसिकांकडून नकळत झाकोळले गेले. फडके जाणकार क्रीडारसिक, नाट्यरसिक, कानसेन होते. त्यांनी त्या त्या विषयांवर मराठी आणि इंग्रजी भाषांत लेखन केले आहे. त्या पलीकडे, फडके यांनी आयुष्यभर जोपासलेली, ठामपणे व्यक्त केलेली आणि जगलेली पुरोगामी भूमिका. फडके यांनी अनेक प्रसंगी दिलेल्या व्याख्यानांमध्ये, लेखनामध्ये त्यांची ती भूमिका दृगोचर झाली. फडके यांच्या ललित साहित्यात जसा नाजूकसाजूक प्रणय आहे तसा त्यांच्या वैचारिक साहित्यात पुरोगामित्वाचा खणखणीत प्रणव आहे.

ज्या कालखंडात खांडेकरादी ध्येयवादी लेखन करत होते आणि भक्तीपर किंवा देशभक्तीपर लेखनाचीच परंपरा चालत आलेली होती, त्या कालखंडात फडके यांनी तारुण्यसुलभ भावनांच्या अभिव्यक्तीला असलेली कोंडी फोडली. त्यांनी प्रणयकथा आणि कादंबऱ्या लिहिल्या. ती एक लहानशी क्रांती होती ! मात्र फडके यांची जीवनविषयक दृष्टी चंगळवादी नव्हती. त्यांना सामाजिक बांधिलकीचे पुरेपूर भान होते. त्यांनी त्यांची पुरोगामी भूमिका विविध सामाजिक प्रश्नांवर वेळोवेळी ठामपणे व्यक्त केल्याचे आढळून येते.

फडके यांची निवड पहिल्या दक्षिण महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलनाच्या (मिरज) अध्यक्षपदी 5 फेब्रुवारी 1939 रोजी झाली. फडके यांनी त्यांच्या पुरोगामी विचारसरणीचे सूतोवाच त्याच संमेलनात केले. त्यांनी अध्यक्षीय भाषणात विविध मुद्यांना स्पर्श करताना मध्यमवर्गीय वाचक आणि बहुजन समाजातील वाचक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी मराठी साहित्य बहुजन वर्गापर्यंत पोचवण्याची निकड व्यक्त केली. त्यांनी तत्कालीन बाजारातील किमतींचा आढावा घेत बाजारात दोन रुपये किमतीला मिळणारी कादंबरी (निर्मितीच्या खर्चात किंचित तडजोड करून आणि अधिक प्रती छापून) आठ आण्यांत वाचकांना देता येईल आणि त्यायोगे बहुजन वाचकाला कादंबरी विकत घेणे परवडेल असा विचार मांडला. काळाची चौकट आणि सामाजिक स्थिती लक्षात घेता तो विचार क्रांतिकारीच म्हणायला हवा ! ते त्याच भाषणात नव्या विचारांविषयी अगत्य व्यक्त करताना म्हणतात, “मला असा असंदिग्ध भरवसा वाटतो, की नवमतवाद व समाजसत्तावाद यांचा निर्भयपणानं व तडजोडीच्या गोड गोष्टींच्या फंदात न पडता क्रांतिकारक वृत्तीनं पुरस्कार करणाऱ्या साहित्यिकांचाच या युद्धात अखेर विजय होणार आहे.

उठसूट भावना दुखावणे, कथित अस्मितांना धक्का लागणे हा भारतीय समाजाला जडलेला रोग अलिकडचा नसून गेल्या शतकभराचा आहे. अहमदनगर येथील साहित्य संमेलनात 1939 साली चक्क ठराव पास झाला होता, की मराठी लेखकांनी पावित्र्याचे विडंबन करू नये! त्या ठरावाची फडके यांनी हास्यास्पद पोरकटपणाया शब्दांत संभावना केली. संमेलनानंतर काही दिवसांनी, मुंबई मराठी साहित्य संघाच्या तृतीय वर्धापनदिनी केलेल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सनातन्यांवर कोरडे ओढताना मत व्यक्त केले, की पावित्र्याचा उगम उपयुक्ततेत होतो आणि उपयुक्तता सापेक्ष असते.ते शेतकर्‍यांना पूर्वी वाटणारी गायबैलांची उपयुक्तता ट्रॅक्टरच्या आगमनाने नष्ट झाल्याचे प्रतिपादन करतात. ती गायीविषयी सावरकर यांनी मांडलेल्या मताचीच आवृत्ती होय. फडके यांच्या नेमक्या शब्दांत सांगायचे तर पूर्वजांनी ज्या गोष्टी पवित्र ठरवल्या त्यांचं पावित्र्य आजही मानलं गेलं पाहिजे हा सनातन्यांचा आग्रह किती चुकीच्या तात्त्विक भूमिकेवर आधारला आहे हे आपल्या लक्षात आलं असेल.ते त्याच भाषणाच्या अखेरीस श्रोत्यांना बजावतात, “आमच्या वाचकांना असा संदेश सांगितला पाहिजे, की श्रीमंती आणि गरिबी ईश्वराने निर्माण केलेली नसून आम्ही मानवांनी जी विषम समाजरचना निर्माण केली त्यातून ती उद्भवलेली आहे. दुःख मनुष्यकृत आहे आणि ते नाहीसे करण्याची शक्ती आणि जबाबदारीसुद्धा मनुष्याचीच आहे.

फडके यांची पुरोगामी भूमिका पुढे पुढे अधिक स्पष्ट होत गेलेली दिसते. त्यांनी रत्नागिरी येथे 1940 साली झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून वृत्तपत्रात अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या सिद्ध वशीकरण मंत्रकिंवा तिलीस्मी दर्पणयांसारख्या जाहिरातींचा प्रकट निषेध केला आणि वृत्तपत्रांचे ध्येय काय असावे ते बजावले. त्यांच्या मते, वृत्तपत्रांनी लोकांना सुशिक्षित करावे, त्यांच्या मनातील मूर्खपणाच्या साध्याभोळ्या कल्पना नष्ट कराव्यात, त्यांना दुर्बळ करणारी खोटी भक्ती व श्रद्धा दूर करावी. त्यांनी त्याच भाषणात पुरोगामी साहित्य शब्दांची नेटकी व्याख्या सांगितली, ती अशी – “जे ध्येयप्रेरित असल्यानं समाजाच्या पुढे असतं व जे स्वत:च्या नेटानं समाजाला पुढे नेतं ते पुरोगामी साहित्य.ना.सी. फडके हेच पुरोगामी या शब्दाची स्पष्ट व्याख्या आणि पुरस्कार करणारे पहिले मराठी साहित्यिक असावेत. ती व्याख्या सांगितल्यावर त्यांनी भाषणात आवाहन केले, की मराठीतील पुरोगामी लेखकांनी एकवटून त्यांच्या तेजस्वी साहित्याची अजस्र लाट एकंदर मराठी वाचकवर्गाच्या मस्तकावरून जाईल असा संकल्प केला पाहिजे. त्यांनी त्या भाषणाचा समारोप करताना तर जागतिकीकरणाची कल्पना मांडली आणि आशा व्यक्त केली, की विज्ञानाने लावलेल्या नवनव्या शोधांमुळे देशांदेशांमधील भौगोलिक सीमा धूसर होत जातील, देशाचे हितसंबंध सर्व जगाच्या व मानवजातीच्या हितसंबंधांशी निगडित होतील, (भारत म्हणून) आपण एका विवक्षित मर्यादित कोपऱ्यात न जगता सर्व राष्ट्रांचे मिळून एक प्रचंड आधुनिक कुटुंब निर्माण होईल. त्यांनी त्या विचारसरणीचा पुरस्कार करण्याचे आवाहन साहित्यिकांना केले.

फडके यांनी सोलापूरच्या साहित्य संमेलनात बोलताना 1941 साली पुन्हा एकवार गर्जना केली, की भारतीय समाजाला एक नष्ट तरी झाले पाहिजे किंवा पुढे गेले पाहिजे. हे घडवून आणणारे साहित्य ते पुरोगामी साहित्य आणि ते लिहिणारे लेखक पुरोगामी लेखक होत.

भाषाशुद्धी हा सनातन्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. मराठी भाषेत शिरलेल्या परकीय शब्दांचा विटाळ होतो आणि सबब ते शब्द बाहेर हाकलून त्यांच्या जागी शुद्ध मराठी शब्द निर्माण करावेत अशी त्यांची इच्छा असते. मात्र फडके यांनी तो आग्रह साफ नाकारला आहे. त्यांनी (14 ऑगस्ट 1938) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एकोणचाळिसाव्या वर्धापनदिनी अध्यक्षीय भाषणात सांगितले, की जुनी पालवी गळून नवी पालवी येणे हे जसे नैसर्गिक; तसेच, जुने शब्द मागे पडून नवे (स्वकीय अथवा परकीय) शब्द रूढ होणे अपरिहार्य व प्रगतीचे लक्षण होय. परकीय शब्द रूढ झाले तरी त्यामुळे भाषा दरिद्री किंवा भ्रष्ट होत नाही.      

फडके यांनी रेडिओवरील एका भाषणात अंधश्रद्धेवर कठोर प्रहार केला होता. नवससायास, व्रतेवैकल्ये किंवा देवभक्ती यांसारख्या दैववादी गोष्टींना त्यांचा कडवा विरोध होता. ते माणसाने प्रयत्नवादी असावे असा आग्रह धरताना म्हणतात, “आपण शरणागतीचं किंवा भक्तीचं संकट घातलं म्हणजे ईश्वरी इच्छा बदलते अशी भ्रामक समजूत ईश्वरवाद्यांच्या ठिकाणी असते अन् ती समजूत त्यांना दुर्बल केल्यावाचून राहत नाही...  सामान्य दैववादी मनुष्य दैवापुढे इलाज नाही असे म्हणून स्वस्थ बसतो. मी म्हणतो, मनुष्याने दुःखापासून आणि अपयशापासून धडा घ्यावा. म्हणजे नेमके काय करायचे, दुःखे आणि संकटे निर्माण करणाऱ्या शक्तींना दैवम्हणावे, पण त्या शक्तींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करावा! (समग्र ना. सी. फडके: खंड 10 पृष्ठ 80)     

फडके यांनी त्यांचे विज्ञानविषयक विचार पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत 1945 साली मांडले होते. सत्य हेच विज्ञानाचे ध्येय असते आणि ते गवसते तेव्हा होणारा आनंद म्हणजे ज्ञानानंद. त्या आनंदाची भलावण करताना फडके म्हणतात, “शास्त्रांनी धर्माच्या आणि नीतीच्या हुकमतीखाली वागले पाहिजे हे म्हणणे शास्त्रज्ञ केव्हाही कबूल करणार नाहीत.मध्ययुगीन काळात, पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध पाश्चात्य देशातील सनातन्यांनादेखील भ्रष्टाचारासारखा वाटला व त्या सनातन्यांनी त्या शास्त्रज्ञांचा प्रचंड छळ केला. सरतेशेवटी सत्याचा शोध घेणारा सॉक्रेटिस अमर झाला, पण त्याचा छळ करणारे व त्याला विष पिण्यास भाग पाडणारे सनातनी लोक विस्मृतीच्या खड्ड्यात गाडले गेले याची आठवण फडके यांनी त्याच भाषणात करून दिली आहे.

दुसऱ्या महायुद्धाचा आगडोंब पाहून झाल्यावर फडके मुंबईच्या ब्राह्मणसभेत बोलताना (26 ऑगस्ट 1944) भांडवलशाही देश, तेथील व्यापारी, शस्त्रांचे दलाल यांच्या हितसंबंधातून युद्धे पेटवली जातात या मताशीदेखील सहमती दर्शवतात. गांधीवाद आणि मार्क्सवाद यांची तुलना करताना ते म्हणतात, इतिहासाच्या, समाजशास्त्राच्या आणि मानसशास्त्राच्या कायद्यांना अनुसरून जी विचारसरणी असेल व जी बुद्धिप्रामाण्याच्या कसोटीला उतरण्यासारखी असेल तिचाच स्वीकार आपल्याला करता येईल आणि या दृष्टीने गांधी यांच्या विचारसरणीपेक्षा मार्क्सची विचारसरणीच अधिक स्वीकारणीय दिसते.ते मार्क्सने महायुद्धे टाळण्यासाठी सुचवलेल्या उपायांची स्पष्टपणे भलावण करतात. तत्कालीन रशियन राज्यघटनेत काम करण्याचा अधिकार, विश्रांतीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि वृद्धपणी सामाजिक सुरक्षा या चार मूलभूत अधिकारांचा समावेश होता. त्यांचा उल्लेख करून फडके म्हणतात, हे चार हक्क हिंदुस्थानातील प्रत्येक स्त्रीपुरुषाला मिळतील तेव्हा आपल्या देशात सर्वांचे राज्य प्रस्थापित होईल. ते झाल्यावाचून हिंदुस्थान बलिष्ठ होणार नाही.

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर

- विजय तरवडे 9890301812 vijaytarawade@gmail.com

विजय तरवडे यांनी भारतीय जीवन बीमा निगममधून स्वेच्छानिवृत्ती 2011 साली स्वीकारली. ते वास्तव्यास पुण्यात असतात. ते पूर्णवेळ लेखन करतात. त्यांचे  सदर लेखन केसरी, तरुण भारत, देशदूत, नवा काळ, प्रभात इत्यादी वृत्तपत्रांत नियमित चालू असते. त्यांची विविध साहित्यप्रकारांतील बावीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते सध्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरील पुस्तके भाषांतरित करत आहेत.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या