(मराठी) भाषेला पर्याय आहे! (The Possibility of Visual Language)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

(मराठी) भाषेला पर्याय आहे! (The Possibility of Visual Language)


मी मराठी भाषेचा लढा असे शीर्षक या लेखास आरंभी दिले होते; इतकी या विषयाची सवय गेल्या चाळीस-पन्नास वर्षांत होऊन गेली आहे! मी ते लिहिले आणि माझे मला हसू आले. तो विषय हास्यास्पद झाला आहे का? मराठी राजभाषा दिन कुसुमाग्रजांच्या वाढदिवशी, 27 फेब्रुवारीला, दरवर्षी साजरा होतो. त्याची चर्चा म्हणण्यापेक्षा, त्याची तयारी निवडक लोक व संस्था यांच्याकडून आठ-पंधरा दिवस आधीपासून चालू असते. मराठीबाबत जागरूक मंडळींनी त्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम करायचे असतात. मी पाहिला तो कार्यक्रम एका वर्षी कॉलेजमध्ये झाल्याने तरुण मुलामुलींचा सहभाग त्यात होता. त्यांनी पथनाट्य सादर केले. तो दिवस उगवला-मावळला. घटना घडून गेली, उपचार-विधी उरकल्याप्रमाणे. दुसऱ्या दिवसापासून सारी शांतता. सर्वजण त्यांच्या त्यांच्या मार्गास लागले. एक नवी कुजबुज एवढीच ऐकू आली, की भाषाअभ्यासक गणेश देवी यांनाही भाषा पुढील काळात जगतील/तगतील असे वाटत नाही. त्यांचा सूर आतापर्यंत आशादायी असे. त्यांनाही भाषेचे भवितव्य काय याचा अंदाज बांधता येत नाही. त्यांचा एक लेख एका वर्तमानपत्राने भाषादिनाच्या सुमारास छापला. तो वाचला; तर खरोखरीच, त्या लेखनाचा शेवट वेगळा जाणवला.


मी मराठी भाषेसाठी मुंबई परिसरात चाललेली चर्चा-आंदोलने 1974-75 पासून जवळून पाहत आलो आहे. त्यात पहिल्या पंधरा वर्षांत छोट्या बैठकांपासून 1989 सालच्या जागतिक मराठी परिषदे (जामप) पर्यंतचे विविध तऱ्हांचे इव्हेंट्सआहेत. मराठी अस्मितेचा लढा त्याही आधी, 1965-66 सालच्या शिवसेनेच्या जन्मापासून सुरू झाला. पण त्याने बघता बघता राजकीय वळण घेतले आणि म्हणून शिवसेनेची दृष्टी संकुचित होऊन गेली. त्यांना ते निवडणुकीच्या राजकारणात गैरसोयीचे वाटले, तेव्हा त्यांनी हिंदुत्वाचा व्यापक अजेंडाघेतला. शिवसेनेला मराठीचे सोयरसुतक उरलेले नाही आणि एरवीही, मराठी माणसांची मुंबईतील संख्या वीस टक्क्यांपर्यंत खाली घसरलेली आहे. शिवसेनेतून मनसे नावाची नवी पार्टी जन्माला आली व मीडियासाठी ती नवी करमणूक उपलब्ध झाली.


मराठी भाषेविषयीच्या जागरूकतेने, आंदोलनाने जोमदार स्वरूप 1975 च्या सुमारास घेतले होते. कारण त्यावेळी कॉलेजांमधील मराठी प्राध्यापकांच्या नोकऱ्या जाण्याची वेळ आली होती. वर्तमानपत्रांनी अग्रलेख लिहिले. साहित्यिक-प्राध्यापकांनी बैठका घेतल्या. एका वेळी तर पु.भा.भावे, कुसुमाग्रज, पुल असे सारे रुपारेल कॉलेजमध्ये एकत्र आलेले आठवतात. भावे यांनी भाषा किती भ्रष्ट व इंग्रजाळलेली होत आहे त्याचे उदाहरण म्हणून एका कथेतील डोंबिवलीच्या नायिकेचे वर्णन ती वॉश घेऊन फ्रेश होतेअसे केले गेले असल्याचे सांगितले होते. त्यावेळी ती नवलाई वाटली होती! आता, माझा हा लेख धरून सर्व मीडिया तशी सरमिसळ भाषा सर्रास वापरत आहे. विज्ञानशिक्षण संवर्धक वि.गो. कुळकर्णी यांनी नंतर, एका टप्प्यावर लिहिले, की वाक्यात फक्त कर्ता आणि विशेषत: क्रियापद मराठीत लिहा, बाकी सर्व शब्द इंग्रजीतील असले तरी चालतील. तर मराठी भाषा जिवंत राहील; नव्हे, वाढेल!

मराठी अस्मितेसाठीचा राजकीयलढा दाक्षिणात्यांना विरोध येथपासून सुरू झाला, तो उत्तर भारतीयांनाही विरोध येथपर्यंत जाऊन पोचला. मराठी भाषेसाठीचा सांस्कृतिक लढा हिंदी/इंग्रजी या भाषांचे आक्रमण येथवर जाऊन अनेक वेळा पोचला आहे. पण भाषातज्ज्ञ अशोक केळकर यांच्या मराठी अभ्यास परिषदेने मराठीचे दार इंग्रजीची खिडकी ही घोषणा 1985 च्या सुमारास देऊन तो प्रश्न सोडवला. त्यांचा आग्रह मराठी भाषेसाठीच होता, म्हणून त्यांची आणखीही एक घोषणा होती, की शिव्याही द्या, पण मराठीत!’


शरद पवार व मनोहर जोशी या दोन राजकीय विरोधकांनी एकत्र येऊन 1989 साली दिमाखदार जामप(जागतिक मराठी परिषद) घेतली होती. तिला चाळीस लाख रुपये खर्च आला होता. त्यावेळी ती रक्कम अबब! अशी होती. मराठी नामवंत साहित्यिक, प्राध्यापक, चित्रपट व नाट्य तारे-तारका, विचारवंत, क्रिकेटपटू सुनील गावसकर, वैज्ञानिक जयंत नारळीकर असे सारे मराठी प्रकाशमान लोक तेथे एकत्र आले होते. कुसुमाग्रज परिषदेचे अध्यक्ष होते. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ (1987 साली) मिळाले. त्यामुळे त्यांना अनन्य स्थान प्राप्त झाले होते. कुसुमाग्रजांनी त्यांचे मराठी भाषेचे सर्वत्र प्रसिद्ध झालेले वर्णन तेथेच केले होते, की मराठी भाषा डोक्यावर राजमुकुट मिरवते, परंतु तिच्या अंगावर दारिद्र्याची लक्तरे आहेत! त्यांचे मराठीचा राजदरबार म्हणावा अशा त्या परिषदेतील उद्गार मराठी भाषकांच्या व सरकारच्याही वर्मी लागले. त्यामुळे त्यावर मलमपट्टी करणे आले. त्यानंतरच त्यांच्या नावाने मराठीचा राजभाषा दिन साजरा होऊ लागला. दरम्यान, सरकारने आणखी एक राज्य मराठी भाषा विकास संस्था निर्माण केली, भाषा सल्लागार समिती नेमली, मराठी ही अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करून केंद्राकडून निधी मिळवण्याचे प्रयत्न चालू ठेवले. तो सारा सरकारी उपचार दरवर्षी छान पार पडत असतो. लेखक-कवी-वक्ते यांना मराठीचे तुणतुणे वाजवण्याची वार्षिक संधी मिळते. मराठीसाठीच्या लढ्याने 1990 नंतर प्रतीकात्मक रूप घेतले आहे. मराठीबाबतची जागरूकता त्यानंतर जवळजवळ संपली आहे. एकटा दीपक पवार व त्याचे मराठी अभ्यास केंद्र ती ध्वजा फडकती ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

प्रत्यक्षात, मानवी भाषांवरच 1990 नंतर आक्रमण सुरू झाले आहे. ते आहे तंत्रज्ञानाचे. त्यामुळे भाषेची गरज आविष्कारासाठी कमी होऊ लागली आहे. पहिला प्रभाव टेलिव्हिजनचा होता. टीव्हीने आविर्भावातून मनाचे बोल व्यक्त होतात हे दाखवून दिले. विशेषत: टीव्हीवरील क्रिकेट सामने पाहून झेल पकडल्याच्या-उत्तुंग षटकार मारल्याच्या-सामना जिंकल्याच्या वेळचे हातवारे-चेहऱ्यावरील भाव-उजव्या हाताची मूठ करून बाजी मारली असे दाखवण्यासाठी अंगठा या सर्व खुणा माणसाच्या जीवनातील प्रसन्नतेचे-आनंदाचे-खिन्नतेचे क्षण व्यक्त करण्यासाठी सहज वापरल्या जाऊ लागल्या. हावभाव वाढले. तीही आविष्काराची भाषा असते याचा प्रत्यय आला. आर्ट स्कूलमधील प्राध्यापक चित्रभाषेच्या गोष्टी करू लागले. कॉलेजांमध्ये अकरावी-बारावीच्या वर्गांत भाषा (लँग्वेज) हा विषय असे. त्या जागी कम्युनिकेशन स्किलहा विषय आला. ते नव्या जमान्याचे भाषेवरील आक्रमण होते. त्यामुळे मानवी संभाषण कमी होऊ लागले. परिणामत: म्हणी-वाक्प्रचार यांचा वापर, नव्या पर्यायी शब्दांचा शोध या गोष्टी कमी पडू लागल्या.

खरे तर, व्हिज्युअल भाषेचा शोध असे प्रयोगदेखील सुरू झाले. जे जे स्कूलमधील निवृत्त प्राध्यापक अनंत कुळकर्णी यांनी तसे लेखन साधते का म्हणून प्रयत्न केला, तर ती चित्रेच प्रकट होऊ लागली. आम्ही थिंक महाराष्ट्रच्या सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिमेत, प्रसिद्ध समीक्षक गो.मा.पवार यांच्या अध्यक्षतेखाली चित्रभाषेच्या शोधातअसा एक परिसंवाद सोलापुरला योजला. पण ती संकल्पना रुजली गेली नाही. मराठी लेखक-प्राध्यापक रूढ शब्दाक्षर भाषेपलीकडे जाण्याइतपत प्रगल्भ होऊ शकत नाहीत असे वारंवार आढळून आले आहे. गणेशदेवी यांच्या लेखाचा शेवट या चित्रभाषेच्या शक्यतेने होतो. देवी म्हणतात, डिजिटल युगात जगभरातच भाषांची स्थिती अत्यंत दारूण बनली आहे!

दैनंदिन जीवनात क्रांतिकारी बदल जाणवत असूनही भाषेविषयीच्या विचार-संकल्पना रूढ आहेत तशाच घेतल्या जातात. भाषा हे संस्कृतीचे वाहन आहे हा त्यातील एक पक्का रूढ समज आहे. उलट, अनुभव असा येतो, की संस्कृती ही भाषेपलीकडे संवर्धित होत असते. तिला भाषेच्या कुबडीची गरज असत नाही. प्रत्यक्षात मानवी जीवनात भाषेची गरज झपाट्याने कमी होत आहे व त्यामुळे भाषेचा वापर कमी होत चालला आहे. त्याच वेळी विविध देशी व जागतिक भाषांची सरमिसळ होत आहे. तंत्रज्ञानाने माणसांमधील परस्परविनिमय इतका सुकर केला आहे, की शब्दाक्षर भाषा ही इंटरअॅक्शनकरता गरजेची गोष्ट राहिलेली नाही. ते काम संकेतांनी साधते.

आमचा एक तरुण उच्चशिक्षित मित्र म्हणाला, की मला ज्ञानेश्वरी जर व्हिज्युअल लँग्वेजमध्ये दिली तर मी ती नक्की वाचेन. त्याचे म्हणणे असे, की ज्ञानेश्वरांनी संस्कृत सर्वसामान्यांना बोजड झाली तेव्हा प्राकृत भाषेचा वापर केला. आता जागतिक मानवी व्यवहारात भाषाभाषांचे भेद अडथळा आणू लागले तर माणूस त्या शब्दाक्षरांपलीकडील चित्रभाषा वापरू लागेल. ती व्हिज्युअल लँग्वेज कशी असेल? तिचा शोध कोण लावेल? अशा प्रश्नांवर त्या तरुणाचे उत्तर असे, की ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषा शोधून कोठे काढली? त्यांनी ती लोकांत रूढ आहे असे पाहून वापरात आणली. पुढे आहे तो त्यांचा स्वत:चा प्रतिभाविकास. त्यातील काव्य जाणिवेने, तत्त्वज्ञानाने ती गेल्या पाच-सातशे वर्षांत विकसित होत गेली. व्हिज्युअल लँग्वेज गेली दोन दशके सर्व मानवी व्यवहारांत ऐकली-बोलली-पाहिली जाते. ज्ञानेश्वरी, शेक्सपीयरची नाटके यांसारख्या अभिजात कलाकृती त्या व्हिज्युअल लँग्वेजमध्ये जेव्हा निर्माण होतील तेव्हा तो शब्दाक्षर भाषेला पर्याय म्हणून पुढे येईल. त्याआधी काही सांस्कृतिक पेच सोडवावे लागतील. त्यांतील कळीचा एक पेच कवी विंदा करंदीकर यांनी त्यांच्या तुक्या आणि विल्या या कवितेत मांडून ठेवला आहे! तो खोल तत्त्वज्ञानपर आहे. इस्ट इज इस्ट आणि वेस्ट इज वेस्ट. ते भेटणार कोठे आणि कसे?

- दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com

दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली म.टा.ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना फीचर रायटिंगया संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल हे ग्रंथालीप्रमाणे प्रभात चित्र मंडळाचे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर


-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. नमस्कार दिनकर गागंलानी मराठी संस्कृतीचे गेल्या ६० वर्षातिल मांडलेली निरीक्षण अचूक आहेत. १९६६ म्हणजे माझे वयं १६ पासून शिवसेना प्रयोग आज तयागत पातोय. फसलेलं मराठी संस्कृतीचे ऊदाहरण जया मूळे मोठ नुकसान झालं आपण गुंड ठरवले गेलो. चांगली संधि मराठी माणूस कशी घालवतो हेच सिध्द झाले. व्हिजयूल भाषे विषयी मात्र स्पष्टतता हवी. चित्र हे शब्दाला पर्याय म्हणून वापरू नयेत असे माझे मत
    आहे. नामदेवानी महाराष्ट्र ते पंजाब केलेला प्रवास व त्याचे योग्य ग्रंथित टिपण नसलयाने हजार वर्षा पूर्वी आलेले चिनी बौध्द अभ्यासकाची निरीक्षण आज आपण वाचू शकतो तसे नाहि. जर असते तर नामदेवानी तयवेळी पाहिलेले आज चित्रातून मांडतां आले असते. धर्माचे गारूड हा मोठा अडसर निरागस चित्र भाषेचा अडसर आहे. म. वा. धोड हयानी लौकिक ज्ञानेशवरीत दुशयातमक मांडले आहे.
    सस्नेह
    रंजन र. इं. जोशी
    ठाणे

    उत्तर द्याहटवा