पोशाख मोडलो - वसईच्या स्त्रियांचे बंड! (Revolutionary Changes in Traditional Attire of Vasai Women)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

पोशाख मोडलो - वसईच्या स्त्रियांचे बंड! (Revolutionary Changes in Traditional Attire of Vasai Women)

सत्तरीच्या दशकात पेहरावात बदल करणे याला पोशाख मोडणे असे म्हणत. तो काळ माझी आजी, आई, काकी, दादी, मावशी यांचा... त्या काळात स्त्रीला पोशाखात बदल करणे किती अवघड होते! स्त्रीचा पोशाख परंपरेने ठरवून दिला होता. बालपणात एक, न्हाण आले की दुसरा आणि लग्नानंतर एक... असे. स्त्रीला पूर्ण आयुष्यात केवळ तीन वेळा पेहरावात बदल करण्याची मुभा! ‘पोशाख मोडणे हे भाकरी मोडण्याइतके सोपे नव्हते.

साधारण स्वातंत्र्यकाळात लग्न झालेल्या स्त्रिया लाल काण्याची (काठाची) तेरा हात लांबीची लुगडी नेसायच्या. ती लुगडी गुडघ्यापर्यंत घट्ट आवळलेली असायची. त्यांना दिवसभराची कष्टाची बरीच कामे ओणव्यानेच करावी लागत. तो काळ थोरामोठ्यांसमोर बसून काम करण्याचा नव्हता. त्यामुळे लुगडे कंबरेभोवती जाड दोरीने कचकचून बांधलेले असायचे. ते इतके घट्ट असायचे, की कंबरेचा तो सगळा भाग, कोड फुटल्यासारखा पांढराफटक व्हायचा! लुगड्याचा पदरदेखील चापुनचोपून खोचलेला असायचा. तो दिवसभर घरात, गोठ्यात, शेतीवाडीत कितीही काम केले तरी तसूभरही सरकायचा नाही की वाऱ्याने हलायचा नाही. हे कमी की काय म्हणून, स्त्रिया पदराच्या शेवटच्या टोकाला छोटुशी, कायमस्वरूपी गाठ बांधून ठेवत. एकदम फिट्ट! लाल लुगड्यावर पूर्ण हाताची लाल चोळी असायची. सर्व सवाष्ण स्त्रियांच्या चोळीच्या डाव्या खांद्यावर लाल, पिवळ्या, निळ्या रेशीम धाग्यांचे कशिदा काम केलेले असायचे. नवरा गेल्यावर मात्र स्त्रीच्या जीवनातील सारे रंगच उडून जात असत, म्हणून त्यांचा घरादारात वावर बिन कशिद्याच्या चोळीने, भुंड्या हातांनी आणि वेणी-फूल नसलेल्या काळ्या केशसंभारावर कायम सफेद बोखरा घेऊन असायचा.

वाडवळी पद्धतीचे लुगडे म्हणजे काळी काणी असलेले लाल लुगडे, पायाच्या पोटरीपर्यंत लांब आणि मोकळेढाकळे! खांद्यावर पदरदेखील त्रिकोणात काढलेला. पोट पूर्ण झाकून जाईल असा. अंगात बारीक, नाजूक फुलाफुलांचे डिझाईन असलेली चोळी. पण ती अर्ध्या हाताची. शिलाई मशिनचा वापर पन्नाशीच्या दशकात वाढला. त्या चोळ्या खास मशीनवर शिवल्या जाऊ लागल्या. तरी लाल चोळ्या शिवणाऱ्या काही स्त्रिया होत्या. त्या स्त्रिया मोरलीवर (विळी) कापड बेतत व चोळ्या शिवण्याचा जोडधंदा फावल्या वेळात किंवा रात्री निजानीज झाली की करत. एकोणीसशे साठचा काळ नववारी नेसण्याचा. ती चंद्रकळा. चोळीचे ब्लाऊजमध्ये रूपांतर झाले होते. लांब हात अर्ध्यावर आले होते. नववारी वजनाला हलकी, दिसायला सुंदर. मुख्य म्हणजे त्या पेहरावावर थोडे हलके दागिने शोभून दिसत. सत्तरीचे दशक आले पाचवारी नेसून!

काळानुसार स्त्रियांच्या पोशाखात बदल होत गेले, खरे. पण बदलाची ती प्रक्रिया धीमी होती. त्या काळास ती अनुरूपही होती. पण लग्न झाल्यानंतर मिळालेला पोशाख मरेपर्यंत कायम असायचा.

सत्तरीच्या दशकातील लग्न झालेल्या मुली जरा आधुनिक बनू लागल्या. त्या माहेरी आल्या, की आवर्जून ठेवणीतील स्कर्ट-ब्लाऊज घालायच्या. त्याबद्दल आजी, काकी, आई यांची नाराजी असायची. आता गळ्यात पोत पडली, लग्न झालंय, बरं नाही दिसत ते!”,कुणी सासरी जाऊन सांगितलं तर…”, कुणी सासरचं माणूस आलं तर…! घरातील ज्येष्ठ स्त्रिया नव्या माहेरवाशिणीला समजुतीने सांगायच्या. हातमाग बंद पडल्यामुळे हल्ली लुगडी मिळत नाहीत. तरीही आमच्या आज्या-काकूंनी पारंपरिक पोशाख टिकवून ठेवला आहे.

पोशाखाला अनुरूप दागदागिने होते. स्त्रिया सणावाराला लाल सहा पोवळ्यांचे हिराण वापरत. एरवी छोटं हिराण आणि गहरळी त्यांच्या गळ्यात शोभून दिसायचे. त्या गहरळीच्या मागील बाजूला लाल, हिरवे, निळे, पिवळे मोठे चमकदार मणी असायचे. वर्षातून एकदा गहराळी हिर्यासा (ओवणे) कार्यक्रम ठरलेला असायचा. त्यावेळी कोवळे डोळे म्हणून जाड सुतात मणी ओवण्याचे काम मुलींकडे हमखास असायचे. तेव्हा त्यांना ते मनःपूत हाताळता यायचे. कोवळ्या मुली त्या मण्यांच्या जबरदस्त फॅन होत्या. आज्या आम्ही जगातून गेल्यानंतर एकेक मणी वाटून घ्या असे मुलींना सांगत. आजी-काकूंनी हे रंगीत मणीदेखील निगुतीने वापरले.

मोहनमाळ

लाल लुगड्यावर शोभून दिसतील अशी कानभर कर्णफुले असायची. त्यात तीन घोडाच्या (घडासारखी) वाळ्या, तीन हादी (साधी) वाळ्या, एक करापे, लांबट लालभडक पोवळे असलेल्या धरण्या अशी एकूण दहा कर्णफुले प्रत्येक कानात असत. त्यांना दहा कान म्हणत. मुख्य म्हणजे ते दहा कान सासरकडून नवऱ्या मुलीला दिले जात असत. वावळी पोशाखाला गळ्यात केवळ एक पोत व कानातील एक मोठे करापे उठून दिसायचे. काळानुरूप सोन्याचा वापर कमी होऊ लागला होता. नववारीवर काळ्या मण्यांचे मंगळसूत्र असे. त्यासोबत कमी सोने आणि जास्त लाख असलेली ठसठशीत मोहनमाळ, कानात मोत्याच्या कुड्या हे कमी सोने लागणारे दागिने प्रचलित झाले होते. सत्तरीच्या दशकात लग्न झालेल्या मुलींच्या कानात झुमके, गळ्यात पोहेहार- लक्ष्मीहार आले. अविवाहित स्त्रिया धोतर व त्यावर खिसे असलेले, फुग्याचे पोलकी वापरायच्या.

संस्कृतीने ठरवून दिलेला हा पोशाख आया-बहिणी विनातक्रार वापरत आल्या. सत्तरीच्या दशकानंतर बदलाचे वारे वाहू लागले. त्यामागे खरे अर्थकारण होते. सासरहून सुनेला सोने देण्याची प्रथा होती. पण त्यानंतर गंगा उलटी वाहू लागली. जावयाची चलती आली. बहिणी, लेकी उजवताना घरधनी मेटाकुटीला येत होता. आया स्वत: मुलींना उजवताना गृहलक्ष्मीच्या पार्वती बनत होत्या. लेकीदेखील लाडे लाडे बापाकडून सोने उकळत होत्या! हुंड्याची पद्धत आली. लाड सांगू बापाला, मोती मागू कापाला या पारंपरिक लोकगीतामधून लेकीची सोन्याची मागणी दिसून येते.

पोशाख मोडण्याची प्रथा रूढ होऊ लागली. ते प्रस्थापित व्यवस्थेविरूद्ध स्त्रियांनी पुकारलेले छुपे बंडच होते! घरोघरी चार-पाच महिने चालणारी ती प्रक्रिया असे. त्यासाठी स्त्रिया विहिरीवर, तलावावर शेजारणी-पाजारणी यांच्याशी बोलून घेत. एक दिवस ठरवून सोनाराकडे जात, शिल्लक वाळ्या कापून घेत आणि हलक्याफुलक्या कुड्या बनवण्यास टाकत. शिंप्याकडे जाऊन दोन ब्लाऊज शिवण्यास देत. घरधन्याची मनधरणी करून दोन लुगड्यांसाठी पीस मिळवण्याचे दिव्य करत आणि ओढाताणीच्या संसारातून जमा केलेल्या पैशांतून त्यांचे म्हणून स्वतःचे एक अशी तीन लुगडी विकत घेत. मग शेजारणीशी बोलून सणासुदीचा, घरातील लग्नाचा मुहूर्त पकडून परंपरेने चालत आलेला पोशाख मोडत. पण तरीही तिच्या वागण्या-बोलण्यात अवघडलेपणा त्यानंतर महिनाभर जाणवत राही. घरातील छोटीमोठी मंडळी, ज्येष्ठ-श्रेष्ठ तिच्या बदललेल्या रूपाकडे टकमका पाहत राहत आणि बिचारीच्या जिवाची, ती सर्कशीतील विदूषक तर दिसत नाही ना या विचाराने घालमेल होत राही.

केवळ पोशाख मोडताना स्त्रीला अनेक छोट्यामोठ्या गोष्टींची दखल घ्यावी लागे. अनेकांच्या परवानगीची वाट पाहवी लागे. सासू-जावेचे मन जपावे लागे, नवऱ्याची मनधरणी करावी लागे. मुलांकडून होकार मिळवावा लागे. पैशांची जमवाजमव करावी लागे. नणंदेसोबत सोनाराकडे जाऊन वाळ्या कापून घ्याव्या लागत. नवी लुगडी घरात आणताना जुनी कोणाला द्यायची हे सासूला विचारावे लागे. कोणाचेही मन न दुखावता, सर्वसमावेशक विचार करून स्त्रीला पोशाख मोडण्याचे दिव्य करावे लागे. ते तिने परंपरेने चालत आलेल्या व्यवस्थेविरूद्ध पुकारलेले एक अघोषित बंडच नव्हते का?

(स्वेद, दिवाळी 2012 अंकावरून उद्धृत, संपादित-संस्कारित)

- बेर्नादेत रुमाव 9869694566 bernadetterumao@gmail.com

बेर्नादेत रूमाव यांचे बी एससी, एम एड असे शिक्षण झाले आहे. त्या वाकोला मनपा मराठी शाळेत मुख्याध्यापक आहेत. त्यांना महापौर पुरस्काराने 2012 मध्ये गौरवण्यात आले आहे. त्यांची ‘बय’ आणि ‘चिमण्यांचे झाड’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 

 ----------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. त्या काळातील स्त्रियांच्या पोषाखाचे,दागीण्यांच छान वर्णन केले आहे.बरीचशी नावे आम्हाला अपरिचित आहेत.छान माहिती.

    उत्तर द्याहटवा