जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याची भक्त असलेल्या स्त्रीने हिटलरच्या स्मृती जागवण्यासाठी तो जेथे जेथे गेला तेथे तेथे जाऊन त्या प्रवासावर एक पुस्तक लिहिले आहे! हिटलरची आम लोकांना माहिती आहे ती त्याने केलेल्या ज्यू लोकांच्या हत्याकांडामुळे. हिटलरशाही ही टाळण्याची गोष्ट मानली जाते. पण उलट, हिटलरच्या स्मृती जागवणारे The Pilgrimage नावाचे पुस्तक आहे आणि ते इंटरनेटवर मुक्तपणे वाचता येते! लेखिका सावित्रीदेवी! प्रकाशन वर्ष 1953. सावित्रीदेवी मूळ फ्रेंच ग्रीक राष्ट्रीयत्व असलेल्या Maximiani Julia Portas. त्यांचा जन्म 1905 सालचा. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मित्र राष्ट्रांविरुद्ध हेरगिरी केली आणि जर्मनी, इटाली व जपान यांच्या आघाडीला - Axis Powers - मदत केली. त्यांनी फ्रेंच नागरिकत्व सोडून ग्रीक राष्ट्रीयत्व 1928 साली घेतले. त्यांनी जेरुसलेमची यात्रा 1929 साली 'लेण्ट'च्या उपवास काळात केली. त्या हिंदुस्तानात 1932 साली आल्या - आर्य संस्कृतीच्या ओढीने आणि त्या संस्कृतीचा शोध घेण्यासाठी! त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला आणि सावित्रीदेवी हे नाव धारण केले. त्यांनी असित कृष्ण मुखर्जी यांच्याशी विवाह 1940 साली केला. मुखर्जी हे नाझीवादी होते आणि ते त्याच वादाचा प्रचार करणाऱ्या New Mercury या वृत्तपत्राचे संपादन करत होते. असित कृष्ण मुखर्जी यांच्याशी विवाह होण्यापूर्वीच, सावित्रीदेवी यांनी A Warning to Hindus या शीर्षकाचे पुस्तक लिहिले होते. त्या पुस्तकाला गणेश दामोदर सावरकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे (गणेश दामोदर यांनी पुढे त्या पुस्तकाचा मराठीत अनुवादही केला.)
बार्इंच्या हिंदुप्रीतीचे स्वरूप हिंदुधर्मीय हे मूळचे आर्य आणि बार्इंना आर्य वंशाचा अभिमान असे म्हणता येईल. हिंदूंचा देव श्रीकृष्ण हा बाईंचा अंतिम आदर्श. त्यांनी त्यांची राजकीय भूमिका पुस्तकाच्या प्रस्तावनेत स्पष्ट केली आहे. त्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत हिटलरशी निष्ठा, आर्यन रक्ताशी निष्ठा आणि एकत्रित जर्मनी हा आर्यन रक्ताच्या सर्व लोकांचा जागतिक नेता देश या तीन गोष्टी म्हणजे राष्ट्रीय समाजवाद (National Socialism) होय असे सांगितले आहे.
त्यांनी हिटलरचे बालपण गेले त्या लिन्झ गावाला भेट दिली. त्याची विस्तृत हकिगत पहिल्या प्रकरणात दिली आहे. त्यांना जी माणसे त्या प्रवासात भेटली ती सुदैवाने (!) हिटलरशी निष्ठा ठेवणारी होती. दोस्तांच्या फौजा त्यावेळी जर्मनीत होत्या आणि हिटलरचा गौरव कोणत्याही प्रकारे केलेला आढळला तर त्या गौरव करणाऱ्याला शिक्षा होऊ शकत असे. बार्इंनी तशा परिस्थितीतही नेटाने प्रवास केला. त्या वेळची एक आठवण त्यांनी सांगितली आहे, तिचा सारांश असा – ‘मला लंडनमध्ये 1947 साली झालेले एक संभाषण आठवले. माझ्याशी बोलणारा माणूस दिल्लीकडील चांगला गोरागोमटा ब्राह्मण होता. त्यानेही मध्य युरोपात व्यवसायानिमित्ताने प्रवास करताना मुद्दाम वाकडी वाट करून या लिन्झ गावाला भेट दिली होती. त्याने फ्युररच्या आठवणी जाग्या होतील अशा त्या स्थळाला भेट दिली, याबद्दल मी आश्चर्य व्यक्त केले. तेव्हा त्याने मला उलट विचारले, ‘तुम्ही नाही वृंदावन आणि अयोध्या येथे गेलात? तुम्ही तर हिंदुस्तानीसुद्धा नाही आहात.' मी उत्तरले, 'कारण मी आर्यन आहे.’ चमत्कार वाटावा असा विजय दक्षिणेवर मिळवणारा राम अयोध्येत राहिला आणि त्याने तेथे राज्य केले. कृष्ण म्हणजे, हिंसेसह पण निरपेक्ष प्रतिकार या तत्त्वाचा अमर गुरू! युद्धातील सामंजस्य आणि प्रादेशिक विस्तार - जे माझ्या पवित्र वंशाचे ब्रीदवाक्य आहे, त्याचे कृष्ण म्हणजे साक्षात रूप आहे.'
गंमत म्हणजे बार्इंनी हिटलरला प्रत्यक्षात कधीच बघितले नव्हते. त्याचे फोटो, फिल्म्स, माहितीपट आणि कधीमधी रेडिओवर ऐकलेली भाषणे हाच त्यांच्या ऐहिक भेटीचा परिसर. अर्थात, त्यांनी हिटलरचे आत्मचरित्र वाचले होते (कदाचित ते त्यांना मुखोद्गत सुद्धा असेल). परंतु त्या हिटलरच्या वावराच्या सर्व जागांना भेट देताना विलक्षण हळव्या, भावाकूल होतात, त्या हिटलरच्या आईवडिलांचे दफन ज्या दफनभूमीत झाले होते त्या दफनभूमीजवळच्या चर्चमध्ये गेल्या. तेथील त्यांची मनोवस्था - ''मला वाटलं, पन्नास वर्षांपूर्वी त्या बाकांच्या जवळ गुढघे टेकून एका स्त्रीने प्रार्थना केली असेल आणि त्या वेळी तिच्याजवळ निळ्या डोळ्यांचा आणि नजरेत विचारांचे सारे गांभीर्य साठवलेला एक बालक बसला असेल. त्याच्या वदनावर अमर्याद अशा स्नेहभावनेची आणि अलौकिक शक्तीची प्रभा अगोदरच उमटली होती असा - अॅडॉल्फ हिटलर! अदृश्य शक्तींनी युक्त आणि देवाने ज्याची निवड केली आहे असा!'' माझ्या मनात भावना उचंबळून आल्या. मी गुढघे टेकले. माझ्या नकळत मी क्रुसाची खूण केली. मी बिलकूल नास्तिक म्हणावी अशी - पण शतकानुशतकांच्या त्या हालचालींनी मला माझ्या नेत्याच्या ख्रिश्चन मातेच्या जवळ आणलं होतं.''
हिटलरच्या आईवडिलांच्या कबरीजवळ प्रार्थना करतानाची नोंद - ''मला भास झाला की 'तो' एका भावुक जमावासमोर - त्यांत त्याचे सर्वात जवळचे सहकारी, घनिष्ट मित्र आणि गावातील लोक आहेत - त्यांच्या शवपेटीवर फुले वाहत आहे. आता 'तो' कोठे आहे? अजून जिवंत आहे ना? तो कधी परत येऊन त्या कबरींजवळ उभा राहील का, निःशब्द अवस्थेत? आणि जर तो मृत असेल तर त्याला कळेल का, त्याला जाणवेल का की आम्ही त्याच्यावर अजून किती प्रेम करतो ते! की जे अनंतत्वात जातात त्यांचे आयुष्य निसर्गासारखेच व्यक्तिनिरपेक्ष होते आणि ते स्मृतींतून हद्दपार होतील?'' सावित्रीदेवी यांची खूप इच्छा होती, की त्या कबरींवर लाल गुलाबाची फुले वाहावी. परंतु त्या फुलांच्या ज्या दुकानांत गेल्या तेथे लाल गुलाबाची फुले उपलब्ध नव्हती आणि फुले विकणाऱ्या मुलीने त्यांना सावध केले. सावित्रीदेवी यांना ती फुले हिटलरच्या आईवडिलांच्या कबरीवर वाहायची होती हे तिने ओळखले. ती म्हणाली, ''मला वाटतं, तुम्हाला ती कोणत्या कबरीसाठी हवी आहेत त्याचा अंदाज मला आहे. पण तो बरोबर असेल तर मला तुम्हाला सावध करणं जरूर आहे - त्या कबरीवर फुलं वगैरे काही चढवण्याला मनाई आहे. कोणी तुम्हाला तसं करताना पाहणार नाही याची काळजी घ्या.''
“मनाई? म्हणजे हे अगदी त्यांच्या पद्धतीप्रमाणेच झालं! (त्यांच्या म्हणजे ऑक्युपेशन अॅथॉरिटीज आणि त्यांची कळसूत्री बाहुली, दोन्ही) पण मी पकडली जाणार नाही.' त्यांनी 'मनाई केलेली कामे करण्याची मला सवय आहे आणि समजा, मी पकडले गेले तरी मला त्याची फिकीर नाही. गमावण्यासारखे माझ्याकडे काहीच नाही.''
सावित्रीदेवी |
सावित्रीदेवी यांना ध्यास होता, तो आर्यत्वाचा आणि त्या वंशाचे श्रेष्ठत्व टिकवण्याचा. फुले विकणाऱ्या मुलीला त्या म्हणाल्या, ''ग्रीस, हिंदुस्थान आणि जर्मनी हे तीन माझ्या आयुष्याच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे आहेत. इतर बायका जशा अनेक माणसांवर आळीपाळीने प्रेम करतात तसे मी अनेक देशांच्या मूळ सांस्कृतिक गाभ्यावर प्रेम केले. निदान तीन देशांच्या आत्म्याला साद घातली. पण त्या तिहींतही मी आर्यत्वाच्या परिपूर्णतेचा शोध घेतला, मी याच आर्यत्वाची आयुष्यभर पूजा बांधली. मी ईश्वराचा, ‘पूर्णत्वा’चा शोध जित्या सौंदर्यात घेतला आणि माझ्या दैवी वंशाच्या मर्दानी गुणांमध्ये घेतला. स्वर्गात नाही, इथंच जमिनीवर!''
हिटलरचे शिक्षक त्यावेळी ऐंशी वर्षांचे होते. सावित्रीदेवी त्यांनाही लिन्झ गावी भेटल्या. ''ते त्यांच्या घराच्या दाराशी मोकळ्या जागेत बसले होते. तेथे एक भव्य झाड वाढले होते. त्यांनी माझे स्नेहभावाने स्वागत केलें. त्यांच्या पिकल्या चेहेऱ्यावरील चमकणारे डोळे बघितले आणि मी त्या डोळ्यांनी रोज चौदा वर्षांच्या अॅडॉल्फ हिटलरला बघितले आहे या कल्पनेनेच भारावून गेले. त्याचे भविष्यातील उज्ज्वल कार्य कोणालाच दिसले नव्हते. मी त्यांना म्हटले, ‘मला फ्युररबद्दल काही सांगा.’ ते म्हणाले, ‘काय सांगू? तो स्वच्छ मनाचा, निरोगी, प्रेम करणारा आणि प्रेम करण्याजोगा मुलगा होता. मला भेटलेल्या सर्व मुलांत सर्वात जास्त लळा लावलेला.'”
नंतर त्या हिटलरच्या वर्गमित्राला भेटल्या. त्याने हिटलरच्या सहवासातील आनंददायी क्षणाची आठवण काढली. तो म्हणाला, ''असे दिवस आम्ही पुन्हा कधी जगू शकू का? आणि दिवस कितीही सुखद असले तरी 'तो' नसताना ते पहिल्याइतके सुंदर कधीच वाटणार नाहीत.” सावित्रीदेवी म्हणाल्या, ''तुम्हाला खरंच वाटतं की 'त्याला' मृत्यू आला आहे म्हणून?'' ''मला माहीत नाही. कोणालाच माहीत नाही - अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतके लोक सोडून! तो मेला असला तर त्याला मरताना बघणारे, तो जिवंत असला तर त्याच्याबरोबर असलेलेच लोक काही सांगू शकतील! काळच उत्तर देईल.'' मित्र उत्तरला.
''तो परत कधी येणार नाही यावर माझा विश्वासच बसत नाही'' मित्राची पत्नी म्हणाली. माझ्या अंतर्मनाला वाटत होते, की माझ्या लाडक्या नेत्याच्या चेहेऱ्याचा आकार, अनेक स्वरूपातील निराकार अस्तित्वात विरघळला आहे. कित्येक शतकांपूर्वी त्या निराकार अस्तित्वाने म्हटले होते, ''जेव्हा न्याय तुडवला जाईल, दुष्ट सत्ता गाजवू लागतील, तेव्हा मी येईन. चांगल्याच्या रक्षणासाठी, दुष्कृत्ये करणाऱ्यांच्या परिहारासाठी, सदाचाराला पुन्हा राज्यावर बसवण्यासाठी, मी युगानुयुगे जन्म घेईन.'' (भगवद्गीता अध्याय 4, श्लोक 7-8).
एवढे तपशील वाचल्यावर वाचकाला काही गोष्टी जाणवतील - दुसऱ्या महायुद्धापश्चात पाच वर्षे झाली, तरी हिटलरबद्दल त्याच्या निकटवर्तीयांच्या मनात किती आदर, सद्भावना होती; त्याच्या पाठिराख्यांचा पाठिंबा पाच वर्षांनंतरही टिकून होता; त्या टिकलेल्या पाठिंब्याची धार दोस्त राष्ट्रांना जाणवत असल्याने अनेक प्रकारचे निर्बंध घातले गेले होते. त्याच बरोबर हेही जाणवते, की सावित्रीदेवीसारख्यांनी नॅशनल सोशॅलिझम नावाच्या संकल्पनेला इतर राष्ट्रांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सैद्धांतिक रूप देऊन केला होता आणि तो पाच वर्षांनंतरही चालू होता!
हेही जाणवते, की सावित्रीदेवी यांची हिटलरबद्दलची भक्ती हिंदू पुराणातील राधेच्या भक्तीच्या जातकुळीची होती. राधा हे मिथक आहे असे काही अभ्यासक मानतात, तर श्रीकृष्ण हा खरा होता हे मानणारी मंडळी त्या पुराणातील प्रत्येक व्यक्तिरेखा खरी आहे असेच मानतात. त्या बाबतची चर्चा कधी न संपणारी आहे. पण सावित्रीदेवी ह्या मिथक नव्हेत. त्या वास्तवात होऊन गेल्या. त्यांची हिटलरबद्दलची भक्ती हेही वास्तवच. हिटलर श्रीकृष्णाचा अवतार मानला नाही तरी, सावित्रीदेवी त्यांच्या राधा होत्या असे म्हणता येईल का? पुराणातील राधेने कृष्णाला बालरूपात बघितले आणि माया लावली असे गो.नी. दांडेकर यांना वाटते; तर काही कवींनी ती कृष्णाला सर्वस्व वाहिलेली आणि त्यामुळे स्वतःच कृष्ण झालेली आहे असे म्हटले आहे. सावित्रीदेवींनी हिटलरला ना बघितले ना त्याच्याशी संभाषण केले. तरी त्यांची भक्ती किंवा त्या भावनेला जे काही नाव द्यायचे ती राधेपेक्षा उच्च अशी म्हणायची का? त्यांचे हिटलरशी असलेले नाते, राधाकृष्ण यांच्या नात्याच्या वरच्या पातळीचे मानायचे का?
- रामचंद्र वझे 9820946547
---------------------------------------------------------------------------------------------------------
0 टिप्पण्या