व्यवसाय निवृत्ती घेतली आणि मन विदीर्ण झाले. सगळ्यांची जी अवस्था तशा परिस्थितीत होते तशीच ती मलाही वाटली. मन गुंतले पाहिजे - त्यासाठी काहीतरी असे काम करावे, की जे माझ्या जीवनाचे ध्येय असेल असेही वाटले. दरम्यान, कधीतरी एकदा उल्हास नदीवरील जलपर्णीकडे सहज लक्ष गेले आणि नदी स्वच्छतेचा विचार मनात आला. तो विषय कोणा न् कोणाजवळ काढत होतो, परंतु थोड्याशा चर्चेनंतर त्यावर काहीच घडत नव्हते. सरतेशेवटी, एका पहाटे एकटाच नदीकिनारी गेलो आणि कामास सुरुवात केली. मग मात्र लगेच, दोन-तीन दिवसांनी एकजण आला, दुसरा आला. अशा प्रकारे आमचे उल्हास नदी स्वच्छता अभियान सुरु झाले! पण संख्या तीन-चारपेक्षा जास्त वाढत नव्हती. तरी कामात सातत्य ठेवल्याने मे महिन्यापर्यंत दोन्ही घाटांलगत असलेली जलपर्णी संपूर्ण काढली. उल्हास नदी स्वच्छ तर झाली, आता काय करावे? तर आम्ही ठरवले, की नदी किनारे व दोन्ही घाट स्वच्छ करूया. काम अवघड होते, पण तेही काम हळूहळू मार्गी लागले.
आमच्या टीमने त्याच दरम्यान,
वृक्षारोपणाचा कार्यक्रम 26 मे 2019 रोजी
हाती घेतला. सोबतीला कर्जतमधील मेडिकल असोसिएशन, ‘ज्येष्ठ
नागरिक’ इत्यादी संस्थांचे लोक आले. वीस-पंचवीस झाडे लावली गेली. काही नवीन माणसे वृक्ष
संवर्धनासाठी जोडली गेली. काही दूरही झाली, पण आम्ही असे
तर घडणारच हे गृहीत धरलेले होते व आहे. आमचे काम दररोज होत आहे.
वृक्ष संवर्धनात अनेक संकटे सुरुवातीपासून येत आहेत, अजूनही येत असतात. पण आमच्या टीममधे दोन माणसे खंबीरपणे काम करत आहेत. त्यामुळे सर्व संकटांवर मात करता येते. झाडे 26 मे रोजी लावली. जूनमध्ये पावसाळा आला. सालाबादप्रमाणे, 2019 लापण नदीचे पाणी किनाऱ्यालगतच्या काँक्रिट धक्क्यापर्यंत आले. थोडक्यात, पूरसदृश स्थिती होती! सर्व झाडे पाच-सहा तास पाण्यात होती आणि म्हणून त्यातील बरीचशी झाडे भुईसपाट झाली. पण चांगली गोष्ट म्हणजे, कोणतेही झाड वाहून गेले नाही. आम्ही ती झाडे दुसऱ्या दिवशी परत उभी केली. असे एकदा नव्हे तर तीनदा घडले. आम्ही हार मानली नाही.
या सर्व प्रवासात आमच्या टीमने अजून एक धाडस केले. ते म्हणजे उल्हास नदीचा उगम जो लोणावळा येथील तुंगार्ली जलाशयातून होतो तेथून ते कोंडाणा गाव येथपर्यंत चक्क नदी पात्रातून, डोंगरदरीतून पायी प्रवास केला. आम्ही आठ दहाजण होतो. आम्हास दरी उतरल्यावर, एका ठिकाणी नदीचे जल अत्यंत ‘निर्मल’ आहे असे आढळून आले. त्याच क्षणी प्रत्येकाने त्याच्या त्याच्या ओंजळीत ते निर्मल जल भरून त्या जलाने त्याची त्याची तहान भागवली. परत एकदा, तेच निर्मल जल हातात घेऊन आम्ही आमच्या अभियानाचे नाव ‘उल्हास नदी निर्मल जल अभियान’ असे नक्की केले. तेव्हा हेही लक्षात आले, की नदी कर्जत परिसराच्या मनुष्यवस्तीत येते तेव्हाच ती अस्वच्छ, प्रदूषित होऊ लागते. ती माणसानेच पुन्हा स्वच्छ केली पाहिजे. आमचा नदी स्वच्छतेचा निर्धार दृढ झाला.
कार्यक्रमाचे दुसरे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे
कार्यक्रमात सर्व लोकांना निसर्गाच्या जवळ होतो ही जाणीव सर्वांना झाली. सर्वांनी
नैसर्गिक संसाधनांचा वापर केला. गंमत म्हणजे दुसऱ्या दिवशीची आवराआवर! ते काम फक्त
दोन जणांनी पंधरा मिनिटांत केले. सर्व
घाट पहिल्यासारखा स्वच्छ झाला. कारण तेच, नैसर्गिक वस्तूंचा वापर. त्यात वापरलेल्या
पणत्या आणि कापसाच्या अर्धवट शिल्लक राहिलेल्या वाती व
इतर वस्तू यांचे विघटन होण्यासाठी लागलेला वेळ प्लॅस्टिकच्या तुलनेत नगण्य आहे. नदीविषयीची
जागरूकता व पर्यावरण जपणूक हे दोन्ही हेतू साध्य झाले.मुकुंद भागवत आणि त्यांचे सहकारी
त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त नदी किनारी दीपोत्सव
वेदांती व संतोष गोडबोले या रहिवाशांची प्रतिक्रिया - पौर्णिमेच्या घटनेमुळे आमचे मनोबल वाढले. त्यामुळे पुढील वर्षीही असाच कार्यक्रम करावासा वाटेल. ह्या दीपोत्सवाच्या कल्पनेने पुन्हा एकदा सर्व कर्जतकरांच्या नजरा उल्हास नदीकडे वळल्या!
असे होणे हेच आमचे उद्दिष्ट होते आणि आहे. कार्यकर्त्यांपैकी समीर विद्वांस, विशाल सुर्वे, वैभव वैद्य व सदानंद जोशी हे आमच्या बरोबर ठरावीक दिवसांच्या अंतराने पण नेहमी असतात.
हे ही लेख वाचा -
‘मुठाई’ नदीला संजीवनी,
पुण्याच्या मुळा-मुठा नदीची स्वच्छता,
कयाधू नदी - पुनरुज्जीवनाची लोकचळवळ
- मुकुंद भागवत 9834459519 aimdibhagwat@gmail.com
मुकुंद भागवत हे कर्जतला राहतात. ते अडुसष्ट वर्षांचे आहेत. त्यांनी दीड वर्षांपूर्वी ‘उल्हास नदी स्वच्छता अभियान’ सुरू केले. त्यांच्या परिवारात ते आणि पत्नी रचना आहेत. त्यांना लेखनाची आवड आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
2 टिप्पण्या
खुप छान उपक्रम.केवळ चांगले विचार माडणाऱ्यांपेक्षा प्रत्यक्ष कृती करणारे हात केंव्हावी श्रेष्ठ.मुकुंद भागवत साहेबांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत.थींक महाराष्ट्र अशा गोष्टींना चालना देतात म्हणून गांगल साहेब व नितेश शिंदे यांचेही आभार.
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
हटवा