दीपावली - सण प्रकाशाचा! (Deepawali)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

दीपावली - सण प्रकाशाचा! (Deepawali)


दीपावली हा भारतात सर्वत्र साजरा होणारा बहुधा एकमेव सण आहे. पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर शरदऋतूच्या ऐन मध्यात, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात, तो येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस या सणाचे असतात.

          सर्वपरिचित लोकश्रद्धा अशी, की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले, ते याच दिवसांत. त्या वेळी अयोध्येतील प्रजेने दीपोत्सव साजरा केला आणि तेव्हापासून तो उत्सव दर वर्षी साजरा करण्यात येतो.

          दीपावली या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते त्या काळात झाला असेही म्हणतात. सहा महिन्यांची दीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरू होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव साजरा करत असावेत. आर्यांच्या सात पाकयज्ञांपैकी पार्वण, आश्वयुजी व आग्रहायणी व तीन यज्ञांचे एकीककरण व रूपांतर होऊन दीपावलीचा उत्सव सुरू झाला असावा असेही मानले जाते. पार्वण पाकयज्ञ हा पितरांसाठी असे; आश्वयुजी हा इंद्र व कृषिदेवता सीता यांच्यासाठी असे आणि आग्रहायणी हा संवत्सरसमाप्तीचा योग असे.

          जैन लोकही दीपावलीचा उत्सव वैदिक धर्मियांइतक्याच आस्थेने साजरा करतात. त्यांच्या हरिवंश पुराणात या उत्सवाचा प्रारंभ कसा झाला, त्याचा वृत्तांत पुढीलप्रमाणे दिला आहे आश्विन अमावास्येला महावीर या शेवटच्या तीर्थकरांचे निर्वाण झाले. त्यावेळी जे देव, राजे व भक्त तेथे उपस्थित होते, त्यांनी महावीरांची पूजा करून दीपाराधना केली. ज्ञानदीप निर्वाणाला गेला आहे; आता आपण साधे दिवे लावून प्रकाश कायम ठेवूयाअसा विचार जैनांनी केला. तेव्हापासून महावीरांचे भक्त दरवर्षी जिनेश्वराची पूजा करून दीपोत्सव साजरा करू लागले. जैनांनी ती तिथी महत्त्वाची मानून वीग-निर्वाण-संवत नावाने वर्षगणना सुरू केली.

          दीपावली या सणाच्या उगमासंबंधी असेही मानले जाते, की सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्या राज्याभिषेक समारंभात जो दीपोत्सव करण्यात आला, तोच पुढे दर वर्षी साजरा करण्याची प्रथा पडली.

          दीपावलीत आकाशदिवे (आकाशकंदिल) लावण्याची प्रथा आहे. आश्विन शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत शिव, विष्णू, यम इत्यादी देवता व पितर यांच्यासाठी आकाशदीप लावावे, त्यामुळे भाग्य व लक्ष्मी प्राप्त होते असे पुराणांत सांगितले आहे.

          भारतीय वाङ्मयात दीपावलीचे उल्लेख भिन्न भिन्न नावांनी आलेले आहेत. वात्स्यायनाच्या कामसूत्रात यक्षरात्री नामक उत्सवाचा उल्लेख आहे. हेमचंद्राने तो यक्षांचा सण असल्याची नोंद केली आहे. त्याच्या मते यक्षरात्री म्हणजे दीपालिकाउत्सव होय. श्रीहर्षाच्या नागानंदनाटकातील दीपप्रतिपदुत्सव म्हणजेही दीपावलीचाच उत्सव आहे. नीलमतपुराणात त्यालाच दीपमालाउत्सव असे नाव दिले आहे. सोमदेव सुरी (इसवी सनाचे दहावे शतक) याच्यायशस्तिलकचंपूत दीपोत्सवाचे वर्णन केलेले आहे, ते दीपावलीच्या उत्सवाशी जुळते आहे. इसवी सनाच्या अकराव्या शतकातील श्रीपती नामक ज्योतिषाचार्याने त्याच्या ज्योतिषरत्नमालाया ग्रंथावरील मराठी टीकेत दिवाळी हा शब्द वापरला आहे. ज्ञानेश्वरीलीळाचरित्र या ग्रंथांतही (इसवी सनाचे तेरावे शतक) दिवाळी हा शब्द अनेकदा आढळतो.

          यशोधराने कामसूत्रांवरील टीकेत यक्षरात्री म्हणजेच सुखरात्री असे सांगून, यक्षपूजा व द्यूतक्रीडा यांच्याशी त्याचा संबंध जोडला आहे.वराहपुराणातही कार्तिक शुद्ध प्रतिपदेला यक्षाची पूजा होत असल्याचा उल्लेख सापडतो. कुबेर हा यक्षांचा राजा, त्याचप्रमाणे धनदेवही मानला जातो. गुप्तयुगात वैष्णव संप्रदायाच्या प्रभावामुळे कुबेराच्या पूजेऐवजी लक्ष्मीपूजनाचे महत्त्व वाढत गेले असावे.

          काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतात दिवाळीच्या उत्सवाचे स्वरूप साधारणपणे सारखेच आहे. घरे स्वच्छ झाडून, सारवून, रंगवून आणि फुलांच्या माला, पताका, तोरणे वगैरे लावून सुशोभित करणे; अभ्यंगस्नान करून मौल्यवान वस्त्रालंकार धारण करणे; या काळात आप्तेष्टांसह मिष्टान्नभोजन, दिव्याची रोषणाई, लक्ष्मीपूजन, दीपदान, मनोरंजक खेळ इत्यादी कार्यक्रम होतात.

          अमावास्या हा दिवाळीतील सर्वांत महत्त्वाचा दिवस मानतात. त्या दिवशी महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांची पूजा करतात. दौत, रुपया आणि वही ही त्यांची प्रतीके मानली जातात. जमाखर्चाच्या नवीन वहीच्या तिसऱ्या पानावरश्रीहे अक्षर लिहून त्यावर विड्याचे एक पान व एक रुपया ठेवतात. नंतर त्या वहीची पंचोपचार पूजा करतात. रात्रभर वही तशीच उघडी ठेवून जवळ एक दिवा तेवत ठेवतात. जागरण करतात. सकाळी वहीला नमस्कार करून लक्षलाभहे शब्द तीनदा उच्चारतात.

          कार्तिक शुद्ध प्रतिपदेला काळभैरवाची पूजा करतात. सकाळी लहान मुले मिठाची पुरचुंडी घेऊन गावात हिंडतात. वर्षारंभाच्या शुभशकुनाप्रीत्यर्थ लोक त्यांच्याकडून मीठ विकत घेतात. रात्री मुले मशाली घेऊन हिंडतात. लोक त्यांना तेल व मिठाई देतात.

          देशाच्या विविध प्रांतांत दिवाळी साजरी करण्याची त्यांची त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. राजस्थानमध्ये दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आला त्या मंगल घटनेशी जोडला जातो. काही ठिकाणी लंकादहनाचा देखावा उभा करून त्यातून शोभेची दारू उडवतात. मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कौतुक करतात. तिने कितीही नुकसान केले, तरी तिला मारत नाहीत. दिवाळीतील चतुर्दशीला रूपचौदस म्हणतात. त्या दिवशी ब्राह्मण व वैश्य स्त्रिया सूर्योदयापूर्वी स्नान करून विशेष शृंगार करतात. संध्याकाळी मुली मस्तकावर घुडल्याघेऊन घरोघर फिरतात. घुडल्या म्हणजे सछिद्र घडा. त्यात दिवा लावलेला असतो. ते घुडलेखां नावाच्या मुसलमान सरदाराचे प्रतीक असते. त्या अत्याचारी सरदाराला मारवाडी वीरांनी ठार मारून अनेक मुलींची सुटका केली होती व घुडलेखांचे शिर कापून आणून त्याला बाणांनी अनेक छिद्रे पाडली होती, अशी दंतकथा आहे. त्या वीरकृत्याची स्मृती म्हणून ती घुडल्याची मिरवणूक असते असे म्हणतात. पण त्या समजुतीत तथ्य वाटत नाही. तो मुळात दीपपूजेचाच एक प्रकार आहे. नामसादृशामुळे घुडल्याचा संबंध घुडलेखांशी जोडला गेला असावा. घुडल्याला प्रत्येक घरी मिठाई व दिव्यासाठी तेल मिळते. गावातील तरुणही मातीचे मोठे दिवे घेऊन घरोघर हिंडतात. त्यांनाही मिठाई व तेल मिळते.

          पंजाबातील हिंदू लोक रामराज्याभिषेकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दीपोत्सव करतात. तेथील शीख लोकही सुवर्णमंदिराच्या स्थापनेचा दिन म्हणून दीपोत्सव करतात.

          उत्तरप्रदेशातील डोंगराळ भागातील लोक दिवाळीच्या दिवशी गायींची पूजा करतात व रात्री गावाच्या सीमेवर जाऊन मशालींच्या प्रकाशात नाचतात. त्या वेळी दुसऱ्या गावातील कोणी मनुष्य तेथे आला, तर त्याला शिव्या देतात. कारण तसे करणे पुण्यप्रद मानले गेले आहे. काही लोक कुबेराची पूजा करतात, तर काही लोक देवीची पूजा करून तूपभात व साखर खातात.

          सिंधी लोक दिवाळीच्या रात्री गावाबाहेर मशाली लावून नृत्य करतात. नंतर तलावाच्या काठची माती आणून एक चबुतरा तयार करतात व त्यावर काटेरी वृक्षाची फांदी रोवून तिची पूजा करतात. मग त्याच चबुतऱ्याची थोडी माती ते घरी नेतात. दुसऱ्या दिवशी त्या मातीचे सोने होते अशी त्यामागची समजूत आहे.

          बंगालमध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने होतो; पण तेथे लक्ष्मीपूजनापेक्षा कालीपूजनाला विशेष महत्त्व मिळालेले आहे. आश्विन अमावास्येच्या रात्री बंगाली लोक कालीची स्तोत्रे गात जागरण करतात. त्या रात्रीला ते महानिशाम्हणतात. काली हीच लक्ष्मी, सरस्वती व शक्ती होय अशी त्यांची धारणा असते.

          नेपाळमध्ये दिवाळीच्या दिवसांत द्यूतक्रीडेला विशेष उधाण येते. नेपाळी लोक लक्ष्मीपूजन तर करतातच; शिवाय कुत्रे, गायी, बैल यांचीही पूजा करतात.

          गोव्यातील दिवाळी सामुदायिक आतिथ्याची असते. शेजारी-पाजारी एकत्र जमून एकमेकांकडे जातात आणि दूधगुळाच्या पोह्यांचा फराळ करतात.

          दक्षिण भारतात त्या दिवशी सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते.

          महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात दिवाळीच्या दिवसांत गुराखी कांढळाच्या सुंदर दिवट्या विणून संध्याकाळी गुरांना ओवाळतात व गाणी म्हणतात.

          दिवाळीच्या दिवसांत मातीचे किल्ले बनवून त्यांच्याभोवती ऐतिहासिक देखावे व प्रसंग उभे करण्याची चाल गेल्या (विसाव्या) शतकात सुरू झाली आहे. मुलांचा उत्साह व त्यांच्यातील कलागुण यांना अशा कामांत बराच वाव मिळतो.

          दीपावली हा मुख्यत: दीपोत्सव आहे. घरातील प्रत्येक भागात, कानाकोपऱ्यात तेलाचे लहान दिवे लावून सर्व घर प्रकाशमय केले जाते. प्रत्येक वास्तूच्या बाहेरील अंगालाही पणत्यांच्या रांगा लावून ती उजळून टाकली जाते. उंच जागी आकाशदिवा लावून काळोख नाहीसा करण्याचा प्रयत्न असतो. मंगलस्नान, मिष्टान्नभोजन, मनोरंजक खेळ इत्यादी कार्यक्रमांत लोकांचा आनंद ओसंडून वाहतो. त्या आनंदाच्या वृद्धीसाठी लोक नवनवीन मार्ग शोधत असतात. शोभेचे दारूकाम हा त्यातीलच एक प्रकार होय. चंद्रज्योती, भुईनळे, फुलबाजा यांच्या उपयोगामुळे दिवाळीची शोभा द्विगुणित होते. गेल्या काही वर्षांत विजेच्या रोषणाईने दिवाळीचा झगमगाट खूपच वाढला आहे. दारूकामासाठी दिवसेंदिवस अधिक स्फोटक व दणकेबाज वस्तू निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यांच्या अतिरिक्त वापरामुळे दिवाळीचा उत्सव पूर्वीसारखा शोभनीय राहिलेला नाही; उलट, तो आता फार त्रासदायक व धोकादयाक झाला आहे. लहान मुले व अत्युत्साही तरुण यांना दिवाळीच्या धडाड्धूममध्ये खूप मौज वाटत असली, तरी सामान्यजनांना ती नकोशी वाटू लागली आहे.

          सर्व सणांमध्ये दीपावली अधिक लोकप्रिय आहे; कारण ती सुख-समृद्धीचा उत्सव म्हणून साजरी केली जाते. शेतकरी असो, उद्योगपती असो किंवा व्यापारी असो, प्रत्येकजण त्याच्या वर्षभरातील कष्टांच्या कमाईचा उपभोग घेण्याच्या कल्पनेने दिवाळीचे हर्षभराने स्वागत करतो. लक्ष्मीला प्रसन्न करणे ही मानवाची मोठी आकांक्षा असते. दीपावलीच्या रूपाने ती साकार झालेली आहे.

          दीपोत्सवात निरनिराळ्या दिवशी जे धार्मिक विधी केले जातात, त्यांचे विस्तृत वर्णन पुराणांत पाहता येते.

- आशुतोष गोडबोले

(आधार - भारतीय संस्‍कृतिकोश)

---------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. दिवाळीच्या लोकांमध्ये चैतन्य उत्साह येतो ही चांगली बाब आहे परंतु या दिवाळीत फटाक्यांचा शिरकाव आणि त्यामुळे दिवाळी सणाला गालबोट लागले, आजही फटाक्यांचे दुष्परिणाम माहीत असून देखील लोक फटाके वाजवतात. त्यांचं प्रबोधन करायला गेलं की आम्ही धर्मविरोधी अस समजून अंगावर येतात ही आजची स्थिती आहे. दिवाळी सण इतरही चांगल्या मार्गाने आनंदाने साजरा करू शकतो हे लोकांच्या पचनी पडत नाही याचं वाईट वाटत

    उत्तर द्याहटवा