तुकडोजी महाराजांनी
त्यांच्या हयातीत ग्रामगीतेचा प्रयोग करून भंडारा जिल्ह्यातील आमगाव ह्या, शहाण्णव
घरे असलेल्या एका लहानशा खेड्याचे रुपांतर आदर्श आमगावात 1953 साली सर्वांच्या समन्वयाने करून दाखवले. प्रेमानुज नावाच्या लेखकाने
आदर्श होण्यापूर्वीच्या आमगावचे वर्णन केले ते असे -
आमगाव हे दारू व्यवसायाचे
केंद्र होते, जातीपातीत अतिशय कठोरता होती. देवी-देवतांच्या पुढे कोंबडे-बकरे कापले जात होते. रस्त्यावर घाण
पाणी सोडले जात होते. जागोजागी कचऱ्याचे उकिरडे होते. परस्पर सहकार्याची भावना
नव्हती. साक्षरतेचे प्रमाण कमी होते. अशा अनेक समस्यांनी ग्रस्त असे ते गाव होते.
आमगावात श्रीगुरुदेव सेवा मंडळाची स्थापना 1948 मध्ये झाली.
त्याच काळात महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चातुर्मास्य वर्गाचे आयोजन करून,
निरनिराळे उपक्रम राबवून आदर्श ग्रामनिर्मितीचे कार्य सुरू झाले.
उपक्रमात सामुदायिक प्रार्थना, सामुहिक श्रमदानातून
रस्तेनिर्मिती, सार्वजनिक चरसंडास, सहकारी
धान्य भांडार, पशुचिकित्सा मंदिर, घरोघरी
पेशाबघर, रामधून, दारुबंदी, ग्रामसफाई, उद्योग मंदिर, व्यायाम
मंदिर, जातिभेद निवारण, सेवासमिती असे
अनेक उपक्रम राबवले गेले. आमगावात आदर्श गाव निर्माणाची एक शिक्षा-दीक्षा देणारी
प्रयोगशाळाच महाराजांनी स्थापन केली होती. तो प्रयोग पाहण्यासाठी देशभरातील मंत्री,
राज्यपाल, मध्यप्रदेशातील तत्कालीन
उद्योगमंत्री, शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्री,
कृषिमंत्री, संत-महात्मे, साहित्यिक, पत्रकार यांनी भेटी देऊन महाराजांच्या
ग्रामगीताप्रणीत कार्याचे अभिप्राय देऊन कौतुक केले होते. 'प्रथम
केले, मग सांगितले' ही त्यांच्या
कार्याची पद्धत होती हे आमगावच्या प्रयोगाने सिद्ध केले.
महाराष्ट्रात काही गावे
आदर्श गेल्या काही वर्षांत झालेली आहेत. त्यांना ग्रामगीतेच्या तत्त्वप्रणालीचाही
आधार लाभलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी, पोपटराव पवार यांचे हिवरेबाजार, सांगली जिल्ह्यातील
कवठेपिराण, कोल्हापूर जिल्ह्यातील जैनाळ, भिलवडी (स्टेशन), चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड (मूल
तालुका), चोरटी, अड्याळ टेकडी
(ब्रह्मपुरी तालुका), आदर्श ग्राम घाटकुळ (पोंभुर्णा तालुका),
गोंदोडा (चिमूर तालुका), कचराळा, चपराळा, घोडपेठ, चालबर्डी,
घोनाड, कोची (भद्रावती तालुका) अशी कितीतरी
गावे ग्राम स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम पुरस्कार, आदर्श ग्राम पुरस्कार, हरितग्राम पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार यांनी गौरवण्यात आलेली आहेत. महाराष्ट्र शासन आणि
केंद्र शासन यांनी अशा आदर्श गावांच्या कार्याची दखल घेऊन ग्रामराज्याच्या
संकल्पनेस मान्यता दिली आहे. आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी गावातील तरूण एकत्र
येऊन समन्वयकाची भूमिका पार पाडून लोकसहभागातून आणि सामुहिक श्रमदानातून शोषखड्डे,
दारुबंदी, हरितग्राम, बायोगॅस,
बंदिस्त गटारे, पिण्याच्या पाण्याच्या सोयी,
जलपुनर्भरण, वनराई बंधारे अशी गावाच्या
विकासासाठी कामे पार पाडत आहेत. गावात तंटे होऊ नये, नव्याने
होणारे तंटे गावातच समन्वय साधून सोडवावेत यासाठी गावागावांत तंटामुक्त समितीचे
सहकार्य घेतले जाते. गावागावांत ग्रामसभा घेऊन त्यांच्या त्यांच्या गावांचा विकास
करण्यासाठी सरसावले आहेत. बचतगट स्थापन करून बचतगटांच्या माध्यमातून छोटे छोटे
घरगुती उद्योग सुरू करून गावे स्वावलंबी, आत्मनिर्भर
होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गावोगावी गुरुदेव सेवा मंडळांची स्थापना होऊन,
गावागावांतील सर्व जातिधर्मांचे लोक एकत्र येऊन रोज सामुदायिक
प्रार्थना करतात; एकत्र येऊन
गावाच्या विकासासाठी चर्चा करताना दिसतात.
गडचिरोलीसारख्या
दुर्गम,
आदिवासी भागातील देवाजी तोफा यांचे मेंढालेखा हे गाव संपूर्ण
राज्यात नव्हे, तर देशात नावारूपाला आले आहे. शंभर टक्के
आदिवासी लोकसंख्या असलेले मेंढालेखा
हे गाव. त्या गावचे जेमतेम चौथी इयत्ता शिकलेले देवाजी तोफा हे आदर्श
ग्रामस्वराज्याचे शिल्पकार ठरले. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत सांगितलेल्या
ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित 'मावा माटे मावा राज' म्हणजे 'आमच्या
गावात आम्हीच सरकार'. हे विचारसूत्र त्यांनी त्या गावात
राबवले. ग्रामसभेत गावातील लोकांशी चर्चा करून गावाच्या परिक्षेत्रातील जल,
जंगल, जमीन यांवर फक्त गावाचा अधिकार असतो. ती
संपत्ती गावाच्या मालकीची असते. यासाठी तेथील लोकांनी 'हमारे
गाव मे हमारा राज' या तत्त्वावर निकराचा लढा दिला. सरकारलाही
माघार घ्यावी लागली. सरकारने गावकऱ्यांची जल, जंगल, संपत्ती त्यांच्या ताब्यात दिली. त्या आदिवासीबहुल गावामध्ये प्रत्येक
निर्णय ग्रामसभेद्वारे घेतले जातात. ते त्यांच्या जंगलाचे रक्षण करतात आणि त्याचा
वापरही सोयीसुविधेकरता यथायोग्य करतात. त्यांच्या गावात एकाही माणसावर कोणत्याही
बँकेचे कर्ज नाही. गावातील ग्रामसभेजवळ
कोटीच्या वर रुपयांची शिल्लक आहे. ती ताकद गावच्या ग्रामसभेने त्यांना दिली आहे.
देवाजी तोफा हा फक्त चौथी इयत्ता शिकलेला माणूस ग्रामगीतेतून एवढे मोठे परिवर्तन
घडवून आणू शकला! ह्या बाबी लक्षात घेता 'वाचता वाट दावी जणासि, समूळ बदलवी जीवनासि, मनी घेता अर्थ तिचा’ हा ग्रामगीतेचा प्रत्यय
आल्याशिवाय राहणार नाही.
-
राजेंद्र घोटकर 9527507576ghotkarrajendra@gmail.com
राजेंद्र
घोटकर हे शिक्षक आहेत. त्यांचे बीएड आणि डीएडचे शिक्षण झाले आहे. त्यांचा 'वंचितांच्या वेदना' हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. विविध मासिक आणि त्रैमासिकांमध्ये त्यांचे लेख व कविता प्रकाशित झालेल्या
आहेत.
------------------------------
1 टिप्पण्या
देशातल्या प्रत्येक गावात ग्रामगीता रूजणे ही काळाची गरज आहे...फार सुंदरतेने लेख मांडलाय.
उत्तर द्याहटवा