शाळा कोरोनाच्या संकटामुळे अनेक दिवस बंद आहेत, तर
मुलांच्या शिक्षणाचे काय होणार असा प्रश्न पालकांना भेडसावत आहे. कोणी कोणी ऑनलाइन
क्लासेसचा विचार करतात, त्यांची फी ऐकून हैराण होतात. पण 'एमकेसीएल नॉलेज फाऊण्डेशन’ने (MKCLKF) 'ग्राममंगल'च्या मदतीने पहिली ते आठवीचे पाठ बनवून घेतले आहेत व ते दूरदर्शनच्या
सह्याद्री वाहिनीवर दाखवले जात आहेत.
मी त्यांतील काही पाठ गेल्या काही दिवसांत पाहिले.
सुखद धक्का बसला. जसे शिक्षकाने शिकवणे अपेक्षित आहे, तसेच
ते पाठ आहेत. सावकाश, मुलांच्या कलाने, उदाहरणे देत ताई किंवा दादा शिकवतात. मुले नैसर्गिक रीतीने, स्वभावतः पडणारे प्रश्न विचारतात, चुकाही करतात. त्यावरून
तेथे सगळे पाठ केलेले नाटक चालू नाही हे समजते. मुले खरेच शिकत आहेत, शिक्षक किंवा शिक्षिका मैत्रीपूर्ण रीतीने शिकवतात असे दिसते. शिकवताना, बालभारतीच्या
पाठ्यपुस्तकांचा वापर केला जातो. तेदेखील सोयीचे आहे. कारण जेव्हा शाळा चालू होतील,
तेव्हा मुलांना तीच पुस्तके वापरायची आहेत, त्यांचा
परिचय झालेला असेल, अर्धाअधिक अभ्यास हसतखेळत झालेला असेल.
मंगला नारळीकर |
आज शहरात निदान मुलांना स्वतःचा स्मार्टफोन
नसेल तरी घरात टीव्ही असतो. त्यावर सकाळी साडेसात ते साडेबारा सहसा मोठी माणसे आवडीचे
कार्यक्रम पाहत नाहीत. मुलांना जरूर त्यांच्या जोगते पाठ पाहण्यास, शिकण्यास
बसवावे. जमल्यास पालकांनीदेखील पाहवेत. म्हणजे मुलांना गृहपाठात मदत कशी करता येते
ते समजेल.
वास्तविक, माझे नेहमी सांगणे असते, की
पालकांपैकी कोणीतरी लहान मुलांचा अभ्यास पाहवा, त्यांच्याबरोबर
पाठ्यपुस्तक वाचावे. अशिक्षित पालकांनी मुलांकडून मोठ्याने एकेक धडा वाचून घ्यावा.
दोघांनी मिळून अर्थ लावावा. प्राथमिक शाळेतील मुलांना समजण्याजोगा मजकूर प्रौढ
माणसांना समजणार नाही का? पण ते जमत नसेल तर 'टिलीमिली' मालिकेतील योग्य पाठ जरूर दाखवावेत. अगदी
कमी शुल्क भरून स्मार्ट फोनवर ते पाठ हवे तेव्हा पुन्हा पुन्हा पाहण्याची सोय आहे.
एरवी, सह्याद्री वाहिनीवरील पाठ तर अगदी मोफत आहेत.
भारताने अवकाशात उपग्रह सोडताना त्याचा
सर्वदूर,
लोकशिक्षणासाठी उपयोग होईल असे भविष्य सांगितले गेले होते.
प्राध्यापक यशपाल यांनी ते स्वप्न दाखवले होते. ते आज सत्यात येत आहे असे वाटते.
('सकाळ'वरून
उद्धृत)
घरातील
कुटुंबवत्सल शाळा !
मंगला
नारळीकर यांचा 'टिलीमिली' मालिकेबाबतचा लेख योग्य वाटला. त्यांनी ती मालिका कशी
उपयुक्त आहे हे यथार्थ लिहिले आहे. त्या मालिकेचा आणखी एक वेगळा पैलू आमच्या
प्रत्ययाला आला आहे. आम्ही घरामध्ये गेल्या आठवड्यात तीन-चार दिवस सकाळी तीन-चार
तास सह्याद्री वाहिनी चालू ठेवली. आमच्या घरी शिकणारा विद्यार्थी कोणी नाही, परंतु
त्या कार्यक्रमामुळे घरातील वातावरण हसरे, खेळकर, कुटुंबवत्सल व प्रेमळ झाल्याचे जाणवले
जीवन एकूण जे रुक्ष व व्यवहारप्रधान होऊन गेले आहे; ते कोरोनामुळे विशेषच तसे
जाणवते, त्याऐवजी प्रसन्नतेचा शिडकावा सर्वत्र पसरलेला होता. घरात हिंडत फिरत
असताना मराठीतील चांगले शब्द, चांगल्या संकल्पना कानावर पडत होत्या. टेलिव्हिजन
असलेली खोली वर्गखोली झाली नव्हती, पण नीटनेटकी व उपयुक्त तेवढ्याच वस्तू
असल्यासारखी वाटत होती. एकूण वातावरण संस्कारशील झाले होते.
हा अनुभव आम्ही जेव्हा एका नातेवाईक स्त्रीला
सांगितला तेव्हा त्या म्हणाल्या, की "हो की काय, मी माझ्या मुलीला सांगते हं.
तिचा मुलगा हेडफोन लावून बेडरूममध्ये लोळत 'ऑनलाइन वर्ग अटेंड' करत असतो. तो काय
पाहत-ऐकत असतो असेच मुलीला सारखे वाटत असते. त्या घरच्या शाळेपेक्षा ही शाळा बरी
की!" एमकेसीएल नॉलेज फाऊण्डेशन व सह्याद्री वाहिनी यांनी हा फार उत्तम उपक्रम सुरू केला आहे!
-
दिनकर गांगल 9867118517
dinkargangal39@gmail.com
----------------------------------------------------------------------------------------------
3 टिप्पण्या
खरोखर अतिशय स्तुत्य उपक्रम. याचे टायटल गीत अतिशय उत्तम रित्या सादर केले आहे.
उत्तर द्याहटवाअजून एक सांगावेसे वाटते आमच्या कडे लहान कोणी नाही. पान ज्यांच्या कडे आहेत त्यांना या कार्यक्रमाची शिफारस करतो. कारण आम्ही सुद्धा वय वर्षे 68/6oरुची घेऊन हा कर्यक्रम पाहतो व मनोमन कौतुक मिश्रित हल्लीच्या पिढीचा हेवा करतो.
उत्तर द्याहटवाटिलीमिली हा उपक्रम फार पूर्वीपासून चालू करायला पाहिजे होता, असे वाटत राहिले.
उत्तर द्याहटवा- प्रमोद शेंडे