ऐतिहासिक परंपरेचे - टाऊन हॉल म्युझियम (कोल्हापूर) (Kolhapur Town Hall Museum)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

ऐतिहासिक परंपरेचे - टाऊन हॉल म्युझियम (कोल्हापूर) (Kolhapur Town Hall Museum)


नवगॉथिक वास्तुशैलीमध्ये तंतोतंत घडवलेली कोल्हापुरातील पहिली आणि एकमेव इमारत म्हणजे टाऊन हॉल होय. निमुळते छप्पर, मनोरे आणि आकर्षक वास्तू ही नवगॉथिक वास्तुकलेची प्रमुख वैशिष्ट्ये असतात. टाऊन हॉलची लक्षवेधी इमारत महालक्ष्मी मंदिरापासून उत्तरेला साधारण दोनेक किलोमीटर अंतरावर भाऊसिंगजी रोडवर उभारलेली आहे. ती चार्लस मांट या ब्रिटिश अधिकाऱ्याने 1872 ते 1876 या कालावधीत बांधली. टाऊन हॉल वस्तुसंग्रहालयाची स्थापना 30 जानेवारी 1946 ला झाली. संग्रहालयाची व्याप्ती वाढावी या हेतूने 1953 च्या सुमारास स्थानिक चित्रकारांकडून चित्रकृती घेऊन चित्रकला विभाग सुरू करण्यात आला. सुमारे पन्नास वर्षांनंतर, 2009 मध्ये पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये या विभागाच्या मार्गदर्शनाखाली संग्रहालय शास्त्रानुसार नव्या सात दालनांची मांडणी केली गेली आहे.
टाऊन हॉलमघ्ये पाचशे माणसे एका वेळेला बसू शकतील असे प्रशस्त सभागृह आहे. सभागृहाच्या दोन्ही बाजूंस दोन-दोन खोल्या, प्रशस्त व्हरांड्याने जोडलेल्या आहेत. टाऊन हॉलच्या दर्शनी भागी आकर्षक द्वारमंडप असून, त्याच्यावर गच्ची आहे. गच्ची सभागृह व सज्जा यांना जोडलेली आहे. ती आरंभी संस्थानाची कार्यालयीन इमारत होती.
इमारत पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असून, तेथे 1947पासून शासकीय वस्तुसंग्रहालय आहे. वस्तुसंग्रहालयाच्या सात विभागांत संकीर्ण कलाकृती, शस्त्रास्त्रे, उत्खननातील वस्तू, नाणी, शिल्पाकृती, ताम्रपट, शिलालेख अशा वस्तू पाहण्यास मिळतात. ब्रह्मपुरीच्या उत्खननात सापडलेल्या कोल्हापूरच्या इतिहासाच्या इसवी सनापूर्वीपासूनच्या महत्त्वाच्या वस्तू तेथे प्रत्यक्ष पाहता येतात. कलाकृतींचे प्रदर्शन वेळोवेळी भरवण्यासाठी एक प्रशस्त हॉलही तेथे आहे. चित्रकलाकृती विभागात आबालाल रहमान, बाबुराव पेंटर, गणपतराव वडणगेकर, बाबा गजबर, रा.शि. गोसावी, रवींद्र मेस्त्री, एम.एस. काझी यांच्या चित्रकृती व पुतळे यांची मांडणी तेथे केली आहे.
वस्तुसंग्रहालयात ब्रह्मपुरीप्रमाणेच, उत्तरेश्वर या ठिकाणीही उत्खननात सापडलेल्या दुर्मीळ व मौल्यवान वस्तू संरक्षित करण्यात आल्या आहेत. ब्रह्मपुरी हा भाग कोल्हापुरातच येतो. त्या परिसरात करण्यात आलेल्या उत्खननामध्ये सातवाहनकालीन अनेक वस्तू सापडल्या. ग्रीक देवता पॉसिडॉनच्या प्रतिमेसह हत्तीवर स्वारयोद्धे, जुनी शस्त्रास्त्रे, दुर्मीळ शिल्पाकृतींचे नमुने, चंदन आणि हस्तिदंताच्या कोरीव व रेखीव कलाकृती, जुनी नाणी इत्यादी विविध प्रकारच्या अन्य वस्तू पर्यटकांना करवीर नगरीच्या ऐतिहासिक काळात घेऊन जातात. महालक्ष्मी मंदिर परिसरात सापडलेल्या वादक महिलांच्या चित्ताकर्षक शिल्पाकृती, पन्हाळा येथे सापडलेले दासीचे शिल्प, महालक्ष्मी मंदिरात बसवण्यासाठी 1739 मध्ये वसईहून आलेली घंटा अशा अनेक महत्त्वपूर्ण वस्तू तेथे पाहता येतात. मांट यांनीच संग्रहालयाच्या समोर असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळाची इमारतही 1881 ते 1884 या काळात बांधली. त्या इमारतीचे बांधकामही नजाकतीने केल्याचे दिसते. टाऊन हॉल परिसराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथील बॉटनिकल गार्डन. दुर्मीळ वृक्षांच्या अनेक जाती तेथे पाहण्यास मिळतात.
(संकलित. मुख्य स्रोत कोल्हापूरचं पर्यटनपुस्तक)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या