एका नटसम्राटाला भेटण्याचा योग आला. खराखुरा जिवंत, हाडामांसाचा, नाटकातले पात्र नसलेला नटसम्राट! तमाशाचा राजा! शब्बीरभाई मणियार. शब्बीर यांचा जन्म सिन्नर तालुक्याच्या शहा गावात गरीब कुटुंबात झाला. शिक्षण इयत्ता चौथीपर्यंत झाले. घरची परिस्थिती बेताची. शब्बीर यांचा स्वभाव हरहुन्नरी, पडेल ते काम करण्याची जिज्ञासू वृत्ती. त्यांचे वडील मुंबईला हमाली करायचे. घरचा व्यवसाय पारंपरिक, बांगड्या भरण्याचा-मणियारकीचा. मात्र सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे नेहमी हातातोंडाशी गाठ.
शब्बीरभाई मणियार
शब्बीर खोल फिटिंगची कामे, इंजिन रिपेअरिंग,
वायरमन अशा कामात हुशार होते. त्यांनी 1972 च्या
दुष्काळात वैतागून गाव सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना दत्तोबा तांबे यांच्या
तमाशा फडात 'वायरमन' म्हणून नोकरी मिळाली अन् त्यांचा तमाशात प्रवेश झाला. शब्बीर
यांनी तमाशातील खाचाखोचा आत्मसात केल्या. मग त्यांनी ढोलकीवाला नसेल तर ढोलकी वाजव,
हलगीवाला नसेल तर हलगी वाजव, नाल-हार्मोनियम अशी वाद्ये वाजवण्याची कला आत्मसात
केली; अगदी ड्रायव्हर आजारी पडला तर ट्रक चालवणे, तंबू मास्तर नसेल तर तंबू उभारणे-सोडणे
अशी जोखमीची कामेही आत्मसात केली.
इंद्रदरबार गाढवाचे लग्नमधील वेशभूषा (1987) |
शब्बीरला सगळे वग, अगदी वाक्यन वाक्य रोज ऐकून-पाहून पाठ होते. इतर कलाकारांच्या प्रॅक्टिसला मदत करताना तलवारीचे हात, काठीचे हातही अवगत झाले होते. शब्बीर यांच्या मनी प्रथम धास्ती आली, पण सर्वानी आग्रह केल्यानंतर त्यांनी महाराणा प्रतापचा मेकअप अंगावर चढवला. सहा फुटांच्या आसपास उंची, भारदस्त जरब बसवणारा खर्जातला आवाज, भरभक्कम शरीरयष्टी, गव्हाळ वर्ण, रुबाबदार चेहरेपट्टी अशी जन्मजात शरीरसंपदा होतीच!
त्यांनी स्वतःचे रूप आरशात पाहिले अन् त्यांच्या
अंगात वीरश्री संचारली. शब्बीर न डगमगता, आवेशात 'चितोडगडचा रणसंग्राम'
पहिल्यांदाच लढले आणि जिंकलेही! अचानक चालून आलेली वगातली नायकाची भूमिका कायमस्वरूपी
चिकटली! 'विक्रमराजाची पुण्यनगरी' या वगात विक्रमराजा, 'धन्य झाली पावनखिंड' वगात बाजीप्रभू,
'महाराष्ट्र झुकत नाही' मधील संभाजी इत्यादी त्यांच्या भूमिका प्रेक्षकांनी
डोक्यावर घेतल्या. त्यांनी खलनायकाच्या भूमिकाही तितक्याच ताकदीने केल्या. अनेक
ठिकाणी खलनायकाच्या भूमिकेला रसिक प्रेक्षकांकडून रोख बक्षिसांनी गौरवण्याचे प्रसंग
आले.
हुंड्याला कायदा आहे वगनाट्यातील एक दृश्य |
बुलढाण्यात 'साधू मठाचे गुपित' हे
वगनाट्य तुफान गाजले. तेथील तत्कालीन कलेक्टरला स्वतः शब्बीर मणियार लिखित या वगनाट्याने
प्रभावित केले. त्यांनी दुसर्या दिवशी पुन्हा त्या वगासाठी कार्यक्रम ठेवला व
सत्कारही केला. तो क्षण त्यांना त्यांच्या कारकीर्दीतील सुवर्णक्षणांची आठवण
करून देतो.
एकदा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात जत
येथे तमाशा होता. फडाचा मुक्काम नदीकाठी, वाळवंटात होता. जतच्या यात्रेत वग रंगात
आला असताना अचानक धो धो पाऊस आला, नदीला पूर आला. तमाशा नदीतच उतरलेला. गावकरी
मदतीला धावून आले पण राहुट्या, तंबू, वगाची हस्तलिखिते, जुने फोटो, कागदपत्रे असे बरेच
साहित्य वाहून गेले.
शब्बीर यांचे गुलाबराव बोरगावकर,
जगन्नाथ शिंगवेकर, माधवराव गायकवाड इत्यादी कलावंतांशी विशेष सूत जुळले होतेच. शब्बीर
म्हणाले, "मी अधूनमधून दारू प्यायचो, पण व्यसनात अडकलो नाही. दारू पिऊन कधीही
रंगभूमीवर पाय ठेवला नाही. कलेशी प्रतारणा कधीच केली नाही. सहकलाकारांनाही माझा
धाक असे. कोणी पिऊन आला तर त्याला त्या दिवशी काम मिळत नसे." त्यांनी तमाशात
राजाच्या भूमिका केल्या अन् ते राजासारखेच जगले. शब्बीर पावसाळ्यातील दोन महिने कुटुंबात
असत व तेथे त्यांचे लेखन होत असे. ते म्हणतात, की "तमाशातला राजा सकाळी चहाला
महाग असतो. पण माझ्या वाट्याला असे काही अनुभव आले नाही. प्रेक्षकांचे भरभरून
प्रेम लाभले."
ते कौतुकाने सांगतात, "तमासगिरीच्या
सुरुवातीलाच दत्तोबा तांबे यांच्याकडून दोन हजार रुपये उचल घेऊन बायकोला सिन्नर
तालुक्यातील नायगावी संसार थाटून दिला. कुटुंबाकडे सतत लक्ष दिले. मुलांची शिक्षणे
केली. त्यांना सुसंस्कृत बनवले. व्यवसाय थाटून दिले. आता एका मुलीचा मुलगा वकील तर
एक नातू इंजिनीयर आहे. त्यांचा मूळचा धडपड्या, चळवळ्या स्वभाव तमाशातही स्वस्थ बसू
देत नव्हता. त्यांनी फडमालकांच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारले. सहकलाकारांना,
मजुरांना न्याय मिळवून दिला. त्यांनी तमाशा कलावंतांच्या उन्नतीसाठी 1978 साली मुंबईत लालबागला 'तमाशा कला-कलावंत विकास मंदिर' ह्या संस्थेच्या
उभारणीत मोलाची भूमिका बजावली. मात्र इतर कलावंतांची फारशी साथ न मिळाल्याने
तमासगीरांसाठी भरीव असे काही करता न आल्याची खंत त्यांना आहे. त्यांना वृद्ध
कलावंतांसाठी असलेले तीन हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते.
ते निळू फुले, दादा कोंडके, दादू
इंदुरीकर यांच्यासोबत काही प्रयोगांतून काम केल्याचेही सांगतात. मात्र एक प्रकारची
वेठबिगारीची पद्धत तमाशात असते. त्यामुळे त्यांना 'ते' चक्रव्यूह भेदून बाहेर पडणे
शक्य झाले नाही. त्यांच्या मनावर 1999 साली
वडील वारले तो प्रसंग कोरला गेला आहे. वगातला मुख्य नट सुट्टीवर गेला तर धंदा बुडेल
म्हणून वडिलांच्या निधनाची बातमी त्यांच्यापासून लपवून ठेवली गेली होती. शब्बीर हे
एकुलता एक मुलगा असल्याने वडिलांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबीयांनी शोध घेत अखेर
तमाशा मालकाला शब्बीर यांना घरी सोडण्यास भाग पाडले.
शब्बीर यांनी तमाशा 2008 साली, वयाच्या पासष्टाव्या वर्षी सोडला. ते नायगाव, (तालुका सिन्नर) येथे
स्थायिक झाले. ते
नटसम्राट गावी 'बांगड्या भरण्याचे' मनियारकीचे काम करत होते! त्यांचे झोपडीवजा घर
आहे. घरापुढे दुकान. त्यांचा कॅन्सरच्या आजाराने आजच दुपारी मृत्यू झाला.
सादिकभाई 9881495043, फिरोजा
मणियार 9552303316
-
किरण भावसार 7757031933 kiran@advancedenzymes.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
3 टिप्पण्या
शब्बीर भाईंची जीवन कहाणी, त्यांची झालेली ससेहोलपट, त्यांच्या अंगी असलेले गुण, साहस, कमावलेली शरीरयष्टी, प्रेमळ स्वभाव पण तरी असलेली जिद्द,अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर केलेली मात हे सर्व किरण भावसार यांनी उत्कृष्ट शब्दांकन केलेलं आहे.धन्यवाद किरण.
उत्तर द्याहटवामी नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना माझा भाईंचा 2008 पासून संपर्क आला, त्यांच्या शांत व मनमिळावू स्वभावामुळे आमची मैत्री झाली होती.
आजच मला त्यांच्या कन्येकडून त्यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळली, खूप वाईट वाटले.एक वगसम्राट रंगमचवरून एक्झिट घेऊन काळाच्या पडद्याआड गेला जो पडदा आता कधीच उघडणार नाही.
भाईंना पहिल्या वर्गाचं मानधन मिळणे हा त्यांचा हक्क मिळवायचा राहूनच गेला.
भावपुर्ण श्रद्धांजली
खरच एक महान कलावंत हरपला त्याना भावपूर्ण श्रंधदाजली बबन सागंळे नायगांव सिनर
उत्तर द्याहटवाभावपूर्ण श्रद्धांजली.
उत्तर द्याहटवा