अशोक चिटणीस हे ठाण्याच्या बेडेकर हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची निबंधलेखन कलेपासून विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी शिल्पकार साठे यांचे चरित्रात्मक पुस्तक 'वेचीत आलो सुगंध मातीचे' या नावाने संकलित केले आहे. सदाशिव साठे स्वतः आत्मचरित्रात्मक ग्रंथ लिहिण्याच्या खटपटीत होते. परंतु तो सिद्ध होईना. तेव्हा ती कामगिरी गतवर्षी अशोक चिटणीस यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांनी ते काम झपाट्याने पूर्ततेस नेले व त्या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार, 17 मे 2021 रोजी ऑनलाईन पद्धतीने झाले. प्रकाशक आहेत डिंपल प्रकाशन. त्या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत. इंग्लंडचे राजे फिलिप यांचे निधन एप्रिल 2021 मध्ये झाले. त्यांचे व्यक्तिशिल्प बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन करण्याची संधी साठे यांना लाभली होती. चिटणीस यांनी तो भाग शब्दबद्ध केला आहे तो असा -
सदाशिव साठे यांची शिल्पकृती लंडनच्या राजवाड्यात !
प्रिन्स फिलिप यांचे शिल्प बकिंगहॅम पॅलेसमध्ये साकारताना सदाशिव साठे
जगप्रसिद्ध शिल्पकार सदाशिव ऊर्फ भाऊ साठे हे कल्याणच्या साठेवाड्यात लहानाचे मोठे होत असताना, शालेय जीवनापासूनच युरोप-अमेरिका पाहण्याचे स्वप्न त्यांच्या मनात रंगवत असत. त्यांचे धाकटे बंधू भास्कर ऊर्फ बाळ 1964 सालापासून लंडननिवासी होते. शिल्पकार भाऊ आणि त्यांची चित्रकार पत्नी नेत्रा यांनी लंडनला यावे अशी बाळ यांची तीव्र इच्छा होती. चित्रकलेत ‘कोल्ड सिरॅमिक’ चित्रपद्धतीची निर्माती भाऊंची पत्नी नेत्रा हिची चित्रप्रदर्शने आणि भाऊंची शिल्पे दिल्लीत व इतरत्र नावाजली जात होती. इंग्लंडमध्ये अप्पा पंत हे भारताचे उच्चायुक्त 1972 च्या काळात होते. त्यांच्याशी भाऊंचे बंधू बाळ आणि भाऊ यांनी पत्राद्वारे व समक्ष भेटीत संपर्क साधला. अप्पा पंत दिल्लीत आले असता भाऊंनी त्यांची भेट घेतली होती. लंडनच्या इंडिया हाऊस या भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयाच्या इमारतीत 1972 च्या जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात भाऊंच्या शिल्पांचे आणि नेत्रा यांच्या चित्रांचे प्रदर्शन संयोजित करण्यास अप्पा पंतांनी मान्यता दिली.
लंडनमध्ये लॉर्ड माऊंटबॅटन यांचे शिल्प साकारत असलेले सदाशिव साठे
लंडनच्या प्रदर्शनाचे आकर्षण लंडनवासियांना वाटावे म्हणून भाऊंनी केसरीचे तेथील तत्कालीन प्रतिनिधी ताम्हनकर यांच्या सूचनेनुसार लॉर्ड माऊंटबॅटन यांचे ‘पोर्टेट स्कल्पचर’ करून प्रदर्शनात मांडण्याचे ठरवले. भाऊंनी लंडनपासून ऐंशी मैल दूर असलेल्या ‘रोमझे’ गावी राहणाऱ्या लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या निवासस्थानी जाऊन एका सिटिंगमध्ये त्यांचे ‘बस्ट’ स्वरूपाचे शिल्प करून ते प्रदर्शनात ठेवले. फक्त नव्वद मिनिटांत भाऊंनी तयार केलेले ते शिल्प लंडनचे वृत्तपत्रे व प्रसिद्धीमाध्यमे यांच्यामुळे गाजले. प्रदर्शनाचाही गाजावाजा झाला. ती प्रसिद्धी बकिंगहॅम पॅलेसमध्ये प्रिन्स फिलिप यांच्यापर्यंत पोचली. इंग्लंडच्या राणीचे ते यजमान ! लॉर्ड माऊंटबॅटन हे भाऊंच्या शिल्पकलेवर इतके खूष झाले होते, की त्यांनीच प्रिन्स फिलिप यांना त्यांचे शिल्प भाऊंकडून करवून घेण्यास सुचवले. भाऊंनाही प्रिन्सना औपचारिक पत्र लिहिण्यास लॉर्ड माऊंटबॅटन यांनी सुचवले.
1973 मधील मे महिन्यातील दर आठवड्याला एक तास बकिंगहॅम पॅलेसमध्ये शिल्पनिर्मितीचे निमंत्रण भाऊंना लाभले. त्या संदर्भात भाऊ म्हणाले होते, “हा योग म्हणजे माझ्या कलाजीवनातील एक उत्कर्ष बिंदूच!”
पूर्व योजनेनुसार लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये भाऊ आणि नेत्रा यांनी चार आठवडे स्टुडिओच मांडला ! दर मंगळवारी महिनाभर सकाळी दहा ते अकरा राजेसाहेब भाऊ आणि नेत्रा यांच्यासमोर बसत असत. विशेष म्हणजे शिल्पनिर्मितीचे भाऊंचे काम चालू असताना आणि नेत्रा त्यांना साहाय्यक म्हणून मदत करत असताना प्रिन्स फिलिप भाऊंशी हसतखेळत गप्पाही मारत असत.
भाऊंनी प्रिन्स फिलिप यांचे शिल्प लंडनमध्ये आकारून त्याचे कास्टिंग भारतात आल्यावर करून ते राजेसाहेबांना लंडनला पाठवले. “बकिंगहॅम पॅलेसच्या मौल्यवान संग्रहात आज ते शिल्प इतमामाने पॅलेसची शोभा वाढवत आहे.” असे भाऊ आजही वयाच्या पंच्याण्णवव्या वर्षी अत्यंत आनंदाने, समाधानाने आणि तृप्तीने सांगतात ! भाऊंच्या चेहऱ्यावरील तो भाव पाहून भाऊ त्यांचे वय विसरून 1973 मधील अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वीच्या काळातील त्यांच्या वयाच्या सत्तेचाळीशीत वावरताना जाणवतात.
लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये महिन्यातून चार दिवस एक तास वावरण्याची आणि दस्तुरखुद्द राजेसाहेबांना समोर बसवून हसतखेळत, गप्पा मारत त्यांचे शिल्प आकारण्याची परमोच्च आनंदमयी संधी जगातील कोणत्या कलावंतास लाभली आहे? अशी संधी लाभलेली जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे आज कल्याणमधील साठेवाड्यात राहणारे सदाशिव ऊर्फ भाऊ साठे !
अशा भाऊ साठे यांचा 17 मे ला वाढदिवस आहे ! वयाची पंच्याण्णव वर्षे ते पूर्ण करत आहेत. आजपर्यंत केंद्रात आलेल्या कोणत्याही सरकारला वा महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक वा सांस्कृतिक क्षेत्रांतील थोरांना भाऊंच्या कार्याची, कर्तृत्वाची, कलेची थोरवी जाणवली नसावी ! हे करंटेपण सार्वकालिक आहे ! तसे ते नसते तर भाऊंचा गौरव पद्मपुरस्काराने होऊन पुरस्कारच थोर झाला असता !
(संदर्भ - वेचित आलो सुगंध मातीचे या पुस्तकावरून)
- अशोक चिटणीस 9870312828
अशोक चिटणीस हे ठाण्याच्या डॉ.बेडेकर विद्या मंदिर येथे मुख्याध्यापक होते. त्यांना आदर्श शिक्षक हा राष्ट्रीय पुरस्कार 1982 मध्ये मिळाला. ते आदिशक्ती मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत. त्यांना ठाणे भूषण, ठाणे नगररत्न, आदर्श दांपत्य असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना साहित्य सेवेबद्दल सुवर्ण पदक मिळाले आहे. त्यांनी अडतीस पुस्तकांचे लेखन केले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
3 टिप्पण्या
कलाकाराची सूचक आत्मचिंतनपर लेखन आहे आज महाराष्ट्राला कलेची आणि संस्कृतीची जाण नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल
उत्तर द्याहटवाफार आवडले.
उत्तर द्याहटवाशिल्पयोगी भाऊ साठे
उत्तर द्याहटवाकल्याणच नव्हे तर राज्यासाठीचे वैभव आहे.
सी डी देशमुख,लाँर्ड माउंटबँटन अशा व्यक्तीचे शिल्प समोरासमोर बनवले.
मुंबईतील गेटवे आँफ इंडियासमोरील शिवाजी महाराजाचा अश्वारुढ पुतळा बनवला.