सावंताचे सौरघट संशोधन – कोल्हापुरातून कोरियात झेप ! (Kolhapur boy Sawanta in solar energy research at Korean University)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

सावंताचे सौरघट संशोधन – कोल्हापुरातून कोरियात झेप ! (Kolhapur boy Sawanta in solar energy research at Korean University)

 


सावंता माळी

          सावता माळी पंढरपूर संतपीठाजवळच्या अरण गावचे. त्यांनी संत परंपरेत असाधारण स्थान मिळवले. तसा सावंता माळी हा कोल्हापूरजवळच्या शिवाजी विद्यापीठाचा तरुण स्नातक. तो जगातील सौर संशोधन क्षेत्र गाजवून राहिला आहे. त्याने पीएच डी मिळवण्याआधीच त्याला दक्षिण कोरियातील विद्यापीठाने पुढील संशोधनासाठी उचलून नेले. ती गोष्ट आठ वर्षांपूर्वीची. त्याने तेवढ्या काळात अनेक चमत्कार घडवले, त्याची ही वृत्तांतकथा -

सावंताचे काकाचीवाडी हे गाव, मात्र जन्मठिकाण आजोळ जाखले, (जिल्हा कोल्हापूर). त्याचे बालपण जाखले गावातच गेले. जाखले गाव ज्योतिबाच्या पायथ्यालगत. पाणी, बागायतदार शेतकरी, भात शेती, कारखाना, ऊसाचे उत्पन्न, थोडेसे विकसित. जाखले गावात भाताचे उत्पन्न खूप. त्यामुळे तेथील मुलांचे राहणीमानही त्याप्रमाणेच. मातुल आजोबा सर्जेराव पाटील यांचा सावंतावर फार जीव. सावंताचे वडील सुभाष गणू माळी. सुभाष यांचे वडील गणू माळी ते पैलवान होते. पण सावंताचे हे आजोबा त्याच्या लहानपणीच वारले.

सुभाष माळी यांची गावात (काकाचीवाडी येथे) पावसावरील शेती. त्यांच्या मळ्यात पाणी नसायचे. भाजीपाल्याचा व्यापार. व्यापारातून काही फायदा झाला तर झाला, त्यावर त्यांचे संपूर्ण कुटुंब जगायचे. घरच्या स्त्रिया- आजी अनुबाई, आई कमल, आत्या सोनाबाई यांची सुभाष यांना शेती-भाजीपाला व्यापार यासाठी मदत व्हायची. सावंताचे प्राथमिक शिक्षण - पहिली ते चौथी - हे काकाचीवाडी या त्याच्या व जाखले या आजोळी असे दोन्ही गावी झाले.

सावंता शाळेत वर्गात नेहमी पहिला असे. त्याचे पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण मराठी मुलांची शाळा नंबर एक, बागणी या जवळच्याच शाळेत झाले. त्याने आठवी ते दहावीचे शिक्षण बागणीतील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय येथे पूर्ण केले. तो सर्व ग्रामीण मुलांप्रमाणे भाजीपाला विकणे, दुसऱ्यांच्या शेतात कामास जाणे, घरच्या थोड्याफार असलेल्या शेतीत मदत अशी कामे करत असेच. त्यातून काही पैसेही उभे होत. त्याचे शालेय शिक्षण आई-वडील पूर्ण करू शकतील अशी परिस्थिती नव्हतीच !

ठिक्या-पोत्याची खोप

सावंताला त्याचे शालेय जीवन आठवते. मातुल आजोबा मुलीच्या सासरी, काकाचीवाडी येथे वरचेवर येऊन त्याच्या शिक्षणाची चौकशी करायचे. थोडेफार पैसेही द्यायचे. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण हायस्कूलमध्ये घेत असताना शाळा दूर. त्यात मळ्यातील रस्ते ठीक नव्हते. पायवाट, तीही निसरडी. मध्येच ओढा, पावसाळ्यात सगळी मुले हाताला हात धरून ओढा पार करायची. चप्पल नावाचा प्रकार फार कमी होता. छत्र्याही नव्हत्या. तेव्हा सगळी मुले ठिक्या-पोत्याची खोप करून शाळेत हजर असायची (ठिके-पोते त्यास गोण असेही म्हणतात. ती गोण प्लॅस्टिकच्या धाग्यापासून बनलेली असल्याने पाणी त्यातून आत येत नाही. त्याची घडी कशीही घालता येते. खोप म्हणजे पावसाच्या पाण्याने डोके भिजू नये म्हणून गोणीची घडी घालून डोक्यावर धरण्यासाठी केलेली खोळ अथवा पिशवी). सावंताच्या घरी एक सायकल. वडील त्यावरूनच व्यापार करायचे. कधीमधी, सावंताही ती सायकल घेऊन जायचा! दप्तर भरण्यास वायरीच्या पिशव्या. त्यात पावसाळ्यात पाणी जायचे. पाऊस चुकवून घरी येताना दप्तर भिजल्यावर घरी आले, की सगळ्या वह्या-पुस्तके चुलीवरील तापलेले भांडे/तवा त्यावर ठेवून सुकवण्याचे काम चाले. सगळे वर्ष एक-दोन वह्यांवर काढावे लागे. एकाच गणवेशात आठवी ते नववीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करावे लागणार हे गृहीतच धरलेले होते. दुपारच्या डब्यात जे घरात शिजेल तेच न्यायचे. कधी कधी तोही नसायचा. भाकरी छोट्या कापडाच्या फडक्यातून नेण्याची वेळही त्यांच्यावर कधी कधी आली होती.

सावंता दहावीची परीक्षा सत्तर टक्के मार्कांनी पास झाला. आईचे शिक्षण सातवी झालेले होते. वडिलांच्या घरी कोणीही शिकलेले नव्हते, सावंताने स्वतःचा मार्ग स्वतः ठरवला. जेव्हा समोर टार्गेट असते तेव्हा अनेक समस्यांवर मात करण्याची धमक आपोआप येते! ती धमक सावंतात होती. घर व मातुल आजोबा यांच्याकडून त्यासाठी पाठिंबाही मिळाला. पुढील शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात (आष्टा) सायन्स शाखेमधून झाले. सावंताचे महाविद्यालयीन शिक्षण तात्यासाहेब कोरे वारणा महाविद्यालय (वारणानगर) येथे झाले. त्याने बी एससीमध्ये भौतिकशास्त्र हा विषय घेऊन तो सर्वोत्तम गुणांनी पूर्ण केला. त्याने एम एससी शिवाजी विद्यापीठातून (कोल्हापूर) केले. तोपर्यंत त्याची त्याला चांगला संशोधक व्हायचे आहे ही नजर विकसित झाली होती. त्याने दहावी-बारावीच्या मुलांचे क्लासही घेतले होते. ज्या पालकांना पीएच डी या शब्दाचा उच्चारही करता येत नव्हता त्यांनी त्यांच्या मुलास शिक, आमच्यासारखा नुसता शेतात राबू नकोएवढेच सांगितले होते. त्याच्या पीएच डी ॲडमिशनच्या वेळी वडिलांनी घरातील गळ्यातील सोन्याची चेन गहाण टाकून पैसे उभे केले. लहान भाऊ सुरेश याला दरम्यान, आयटीआय करून छोटी नोकरी लागली होती. त्या पैशांतून आर्थिक मदत सुरू झाली. पीएच डी दरम्यान काही प्रोजेक्टस व स्कॉलरशिप मिळण्याची व्यवस्था झाल्याने सावंताच्या कुटुंबाची आर्थिक अडचण सुटत गेली.

आई-वडिल, भाऊ-बहीण, पत्नी व इतर कुटुंबीयांसमवेत घरगुती कार्यक्रमाप्रसंगी

मातुल आजोबा सर्जेराव पाटील हे तेव्हाची मॅट्रिक झाले होते. त्यामुळे ते बुद्धीला प्राधान्य देणारे होते. तो वारसा त्यांच्या मुलीला म्हणजे सावंताच्या आईलाही लाभला. त्यामुळे मुलाविषयी अभिमान वाटावा असे वातावरण घरात होते. सावंता सुट्टी दरम्यान गावी, काकाचीवाडीकडे आला तर नेहमी वडिलांना मदत करायचा. कधी वाखोरी तोडणे, पाईपलाईन खोदणे, बांधावरील झाडी तोडणे, काही भाजीपाला विकायला जाणे ही कामे त्याला परिचयाची होती. मातुल आजोबांकडेही तो वेळ मिळेल तशी कामे करायचा. त्या आजोबांचा 21 जून 2010 रोजी अपघात झाला व त्यातच त्यांचे निधन झाले.

सावंताचे संशोधन पाहताना पी.एस. पाटील, पी.एन.भोसले व शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक वर्ग

सावंताची निवड चीन येथे जाण्यासाठी तो पीएच डीचा अभ्यास करत असतानाच, 26 जुलै 2010 ला झाली. त्याला पेपर सादर करायचा होता. ती निवड भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या (DST) नॅशनल ट्रॅव्हल्स स्कीमच्या (ITS) माध्यमातून झाली. त्याद्वारे त्याला जाण्या-येण्याचा व रजिस्ट्रेशनचा खर्च मिळाला. सावंता सौर घटामध्ये (सोलर सेल) आवडीने काम करत गेला. सौर घटाची गरज स्पष्ट करणाऱ्या त्याच्या संशोधनाची दखल ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजी’ (DST) या भारतीय संस्थेने घेतली व तो ‘ऑल इंडियन यंग सायंटिस्ट -2010’च्या पुरस्काराचा मानकरीही ठरला. त्याचे काम पीएच डी दरम्यान विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्रे, संशोधन स्पर्धा व प्रदर्शने अशा ठिकाणी नावाजले गेले. तसेच, त्याला MRSI या संस्थेकडून (मटेरियल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया) उत्कृष्ट संशोधन पेपर सादरीकरण पुरस्कार 2010 मध्ये मिळाला. दरम्यान, 2012 मध्ये त्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची 'डी.एस.कोठारी' ही पी डी एफ संशोधन शिष्यवृत्ती (Post Doctoral Fellowship) मिळाली. त्याला भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राकडून (बीएआरसी) संशोधन प्रकल्प मिळाल्याने (फेब्रुवारी 2008 ते मार्च 2012 मध्ये) Junior Research Fellow & Senior Research Fellow (या जागा संशोधन योजनेअंतर्गत भरल्या जातात) आर्थिक मदत होत गेली. तेवढेच अधिक महत्त्वाचे म्हणजे सावंताला बीएआरसीसारख्या उच्च संशोधन प्रयोगशाळेत काम करण्याची संधी मिळाली आणि शास्त्रज्ञ प्रा.डॉ.सी.ए. बेट्टी यांचे मार्गदर्शनही लाभले.

         सावंताच्या डोक्यात सतत संशोधनाचाच विचार असे व असतो. तो मार्गदर्शकांशी चर्चा, नवनवीन संशोधन प्रबंधलेखनाचा पेपर यांमध्ये सतत गुंतलेला असायचा. त्याच्या कामाची, संशोधनाची दखल वेळीच घेतली गेली. त्याला पीएच डी पदवी मिळण्याआधीच (डिसेंबर 2012) दक्षिण कोरियातील चेन्नॉम नॅशनल विद्यापीठ (ग्वांगजू) यांच्याकडून संशोधनपर नोकरीसाठी विचारणा झाली. सावंता आव्हानात्मक काम स्वीकारण्यासाठी तिकडे गेलादेखील.

सर्वोत्कृष्ट संशोधन पुरस्कार (ISHA)

सावंता याला शिवाजी विद्यापीठाने (कोल्हापूर) भौतिकशास्त्र विषयातील पीएच डी पदवी मार्च 2013 मध्ये बहाल केली. सावंता ती स्वीकारण्यापुरता आला व लगेच दक्षिण कोरियामध्ये परतला. त्याच्या प्रबंधाचा विषय ‘Development of Polymer Solar Cells Based on Nano Structured Titanium Oxide’ हा होता. त्याच्या पीएच डी प्रबंधास सायन्स क्षेत्रातील नावाजलेल्या 'International Solvothermal and Hydrothermal Association' (ISHA) या  संस्थेने जगातील ‘सर्वोकृष्ट संशोधन प्रबंध’ म्हणून नावाजले. त्या पुरस्काराचा तो एकमेव भारतीय मानकरी आहे. शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनातील मंडळींनादेखील ती गोष्ट बहुमानाची वाटते.

सावंता चेन्नॉम नँशनल विद्यापीठातील प्रा.चँग कूक हॉंग यांच्यासमवेत ‘सौरघट निर्मिती प्रक्रिया’ दाखवताना

त्याच्या आकर्षणाचा व संशोधनाचा विषय नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर सौर घटामध्ये करणे हा आहे. नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर सौर घटामध्ये झाल्याने सौर घटाच्या उत्पादनचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे सौर ऊर्जा स्वस्त व वापरण्यास सोयीचीही होणार आहे. सौरघट म्हणजे सूर्यप्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्याची प्रक्रिया होय. ते करण्यासाठी विविध रासायनिक अभिक्रियांना सामोरे जावे लागते. विविध रसायनांचे अतिसूक्ष्मकण प्रभावीपणे सौरशक्ती शोषून घेतात व तिचे रूपांतर विद्युत ऊर्जेत प्रभावीपणे करतात. सौरघट मेटल ऑक्साईड व विशिष्ट प्रकारच्या कार्बनचे अतिसूक्ष्मकण वापरून पर्यावरणपूरक असे तयार करता येतात. ही सामग्री अगदी कमी असते. सावंताचा प्रयत्न सौरघट धातूंच्या मिश्रणांच्या माध्यमातून करण्याचा आहे. भारत सध्या चीन, जपानदक्षिण कोरिया या देशांतून मागवत असलेल्या सौरघटास तो पर्याय ठरू शकेल. पारंपरिक सौरघट एकसारखी कार्यक्षमता (Efficiency) पूर्ण दिवसभर देऊ शकत नाही. तसेच, त्यांचा उत्पादन खर्चही जास्त आहे. नवीन संशोधनातून बाहेर येणारा सौरघट हा विविध रसायनमिश्रित कणांमुळे तेवढ्याच सूर्यप्रकाशामध्ये जास्त प्रभावीपणे कार्य करू शकणार आहे. त्या विविध धातूंचे अतिसूक्ष्मकण पारदर्शक तर आहेतच; शिवाय, रंग बदलणारेसुद्धा आहेत.

शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु एन.जे. पवार यांच्यासमोर संशोधनाचे सादरीकरण करताना

त्याच्या संशोधनाचा पुढील विषय पॅर्वोस्काइट सामग्रीचा उपयोग सौरघटात करणे हा आहे. सौरघटाची कार्यक्षमता त्यात असणाऱ्या इलेक्ट्रॉन व होल यांच्या हालचालीवर अवलंबून असते. हवेच्या सान्निध्यात अतिशय संवेदनशील असणारी पॅर्वोस्काइट सामग्री सौरघटात वापरल्याने नॅनोपोरस निकेल ऑक्साइड होलची गती व स्थिरता वाढवण्यास मदत होईल. त्यामुळे त्याची कार्यक्षमता वीस पटींनी वाढणार आहे. त्यासाठी त्याने धन-आचरण स्तर (होल कंडक्टिंग लेयर) युक्त मेटल ऑक्साईड तयार करण्याची रासायनिक अभिक्रिया विकसित केली आहे. अशा प्रकारचे सौरघट भविष्यात कंपन्यांपासून घरांपर्यंत सर्वत्र वापरले जातील. त्यांच्या पारदर्शकतेमुळे घरातील फॅन्सी खिडक्या, फॅन्सी दरवाजे व विविध तऱ्हांच्या सजावटी यांमध्ये ते सहज समाविष्ट करता येतील. तो सौरघट त्याच्या विविध गुणधर्मांमुळे Smart Solar Cell म्हणून ओळखला जाईल.

सावंताच्या ‘सोलर सेल’वरील कामाबद्दल त्याला 2015 मध्ये ‘कोरियन इंडस्ट्रियल अँड इंजिनीयरिंग केमिस्ट्री’ या दक्षिण कोरियातील संशोधन संस्थेकडून ‘बेस्ट यंग रिसर्चर- 2015’ हा पुरस्कार देण्यात आला. तसेच, ‘नॅशनल रिसर्च फाउंडेशन’ या कोरियाच्या शिखर संस्थेने त्याला 'उत्कृष्ट परदेशी युवा संशोधक' (Outstanding Young Overseas Researcher) ही मानाची फेलोशिप 2016 मध्ये दिली. सध्या तो त्याच फेलोशिपअंतर्गत सौरघटावर काम करत आहे. तो त्या विद्यापीठातील एम एस व पीएच डी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतो.

         

सावंता पत्नी ज्योतीसोबत संशोधन लॅबमध्ये

        त्याचे काम दिवसाला चौदा तास चालते. त्याची पत्नी डॉ. ज्योती पाटील हीदेखील शिवाजी विद्यापीठाची त्याच विषयातील पीएच डी आहे. त्या दोघांचे दिवसाचे दोन-तीन तास त्यांच्या अभ्यास विषयातील चर्चेत जातात. ज्योती चेन्नॉम नॅशनल विद्यापीठात संशोधक विद्यार्थी म्हणून काम करतात. दोघे पती-पत्नी सुट्टीच्या दिवशी पर्यटन स्थळी, मित्र-मैत्रिणींच्या घरी, ट्रेकिंगला किंवा भारतीय हॉटेलमध्ये जेवण्यास जातात. दोघांचेही पीएच डीचे मार्गदर्शक डॉ.पी.एस. पाटीलसर हे होते. ते पीएच डी गाइड म्हणून प्रसिद्ध आहेत. तेही सावंताच्या संशोधनाबाबत खूश असतात. त्यांची स्वत:ची पीएच डी भौतिकशास्त्र विषयात आहे. पाटीलसर हे त्यांची जिद्द, चिकाटी, अभ्यासू वृत्ती, पारदर्शकपणा व संशोधनावर असणारे प्रभुत्व या गुणांमुळे जगातील दोन टक्के संशोधकांमध्ये निवडले गेले आहेत. सध्या ते शिवाजी विद्यापीठात उपकुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. सावंता त्यांच्याकडे प्रकल्प सहाय्यक व पीएच डी संशोधक विद्यार्थी म्हणून काम करत होता. पाटीलसर त्याचा व्यवस्थितपणा, शिस्त यांवर खूश असायचे. महत्त्वाचे म्हणजे सावंताने सौरघट विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागामध्ये त्यासाठी पुरेसे तंत्रज्ञान व सामग्री नसतानाही विकसित केला याचे पाटीलसरांना कौतुक वाटते. शिवाजी विद्यापीठातील डॉ. पी.एन. भोसलेसर हे सावंताचे प्रकल्प सहमार्गदर्शक होते. त्यांची व सावंताची चर्चा संशोधनाची प्रगती व विविध विषय यांवर अजूनही होत असते. सावंताने काही भारतीय विद्यार्थ्यांना चेन्नॉम नॅशनल विद्यापीठ (ग्वांगजू) या ठिकाणी व इतर काही कोरियन विद्यापीठांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

सावंता आणि प्रा.चँग कूक हॉंग भारतभेटी दरम्यान, ज्योतिबा डोंगरावर (कोल्हापूर)

सावंता भारतामध्ये येतो तेव्हा तेव्हा तो त्याच्या शाळेत, कॉलेज व विद्यापीठामध्ये जात असतो. तेथील संशोधनावर बोलत असतो. तो घरी आल्यावर शेतात काम करणे असो वा आई-वडिलांचे घरचे काही काम, यातही कमी पडत नाही. तो म्हणतो, कोणतेही काम कमीपणाचे नसते, ते तुम्ही किती मन लावून करता यावर तुमची गुणवत्ता ठरते’. त्याला वाटते, की त्याच्या गावातून, विभागातून, जिल्ह्यातून, देशातून चांगले संशोधक निर्माण व्हावेत व त्यांनी जगापुढे नवनवे शोध आणावे !

सावंता माळी malisawantasubhash@gmail.com

- नगिना माळी 89752 95297 naginamali2012@gmail.com

नगिना सुभाष माळी या काकाचीवाडी येथे राहतात. त्यांनी राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांत एम ए तसेच, शिक्षणशास्त्रात पीएच डी मिळवली आहे. त्या सध्या शिवाजी विद्यापीठात (कोल्हापूर) शिक्षणशास्त्र अधिविभागात कार्यरत आहे. त्यांचे संशोधनपर लेख राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. त्यांना गायनाची आवड आहे. त्यांचे लेखन विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होत असते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


 

सर्वोत्कृष्ट संशोधन प्रबंध - 2014 ISHA पुरस्काराप्रसंगी

दक्षिण कोरियात पी.एस.पाटीलसर व सावंता
 
   
 
    
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

8 टिप्पण्या

  1. मँडम सुंदर लेख. अभिंनंदन आणि शुभेच्छा. शिवाजी विद्यापीठातून असे अनेक संशोधक जगभर आपली चमक दाखवित आहेत.

    उत्तर द्याहटवा
  2. Very nice article mam...and Congratulations sawanta mali sir on your well-deserved success.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप सुंदर .... थक्क करणारा ...प्रेरणादायी प्रवास...

    उत्तर द्याहटवा
  4. Dr. Sawanta आणि मी काही काळ शिवाजी विद्यापीठात संशोधना निमित्त भेटायचो त्यांचा संघर्ष जवळून पाहीला आहे.हा लेख नक्कीच नव्या पिढीला प्रेरणा देईल

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान ... सावांता माझा क्लासमेट आम्ही B.Sc.ला असताना एकत्र होतो.त्याचा शांत स्वभाव व कष्टाळू पना हा अगदी जवळून बघितला आहे.. अपल्या सारख्या खेड्यापाड्यात शिक्षण घेणारा एक मुलगा चांगला संशोधक होवून केवळ गावाचे नाही तर देश्या चे नाव उंचावत आहे.. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगला आदर्श घालून दिला आहे.. ही आपल्या साठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.. सवांता ला त्याच्या पुढच्या संशोधनासाठी खूप शुभेच्या..
    पांडुरंग व्हडे

    उत्तर द्याहटवा