रंगमंचाची सजावट - पडदे, लाईटिंग |
झाडीपट्टी नाटकांचे स्टेज (रंगमंच) हा विषय कायम कुतूहलाचा राहिलेला आहे. किंबहुना झाडीपट्टीत खुद्द नाटक, त्यातील नटनट्या हे जसे आकर्षणाचे व चर्चेचे विषय असतात, त्याप्रमाणे रंगमंच – त्याची व्यवस्था - त्यावरील पडदे – त्यानुसार पात्रांच्या हालचाली हादेखील प्रेक्षकांच्या कुजबुजीचा विषय असतो. त्यामुळे झाडीपट्टी नाट्यजगतात गावोगावची खुल्या जागेतील थिएटरे, त्यात केलेली बैठक व्यवस्था, बांधलेले स्टेज हे सगळे मुद्दे महत्त्वाचे ठरतात. नाटकांचे दोन प्रकार झाडीपट्टीत पाहण्यास मिळतात. एक गावातील हौशी कलावंतांनी केलेले नाटक. त्यातील स्त्री पात्रे हा अडचणीचा मुद्दा असे. स्त्री कलावंतांना ठरावीक रक्कम मानधन देऊन नाटकासाठी बोलावले जाई. नाटकाचा प्रयोग साधारणतः मोफत असे. पुरूष कलावंत हौसेने महिना-पंधरा दिवस सराव करून नाटक बसवत. स्त्री कलावंतांना स्क्रिप्ट दिली जाई. त्या 'डायरेक्ट ऑन स्टेज परफॉर्म' करत. त्यांनी अनेक नाटकांतून भूमिका साकारलेल्या असतात. त्यामुळे त्या सराईत असतात. अर्थात, मुख्यत: त्यांच्यासाठी पार्श्वसूचक नेमलेला असे.
कलावंत नाटक सादर करताना |
दुसरा नाट्यप्रकार हा झाडीपट्टीतील व्यावसायिक रंगभूमीच्या कसलेल्या कलावंतांनी सादर केलेला. हळुहळू गावातील हौशी नाट्य मंडळांच्या स्वत:च्या नाटकांची जागा व्यावसायिक रंगभूमीच्या स्थानिक कलावंतांनी घेतली. गावोगावची हौशी नाट्यमंडळे त्यांना पैसा मोजून संपूर्ण नाट्यसंचासहित सादरीकरणाला बोलावतात. तो नाट्यप्रयोग लोकांना तिकिट काढून पाहवा लागतो. पूर्वी पुण्या-मुंबईच्या कलावंतांचे नाट्यप्रयोग काही निवडक गावांत अशा तऱ्हेने बोलावले जात. परंतु त्यात अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागे. त्यातूनच प्रभावित होऊन, हौशी नाट्यप्रकारातून सरावाने कसदार बनलेल्या गावागावातील निवडक कलावंतांनी नाट्यसंचांची उभारणी केली. त्यांच्या प्रयोगांना गावागावांतून मागणी येऊ लागली आणि त्याला व्यावसायिक रूप प्राप्त झाले. झाडीपट्टीतील रंगभूमीवरील नाटके हा अभिनव नाट्यप्रकार निर्माण झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा हे तशा नाटकांचे केंद्र बनून गेले आहे.
नाटकाचा स्टेज उभारत असलेले कारागीर |
नाटकांसाठी रंगमंच ही सर्वात मोठी गरज असते. प्रत्येक गावातील रंगमंच हा त्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे, वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे. रंगमंचांची विभागणी पुढील प्रकारांत करता येईल - 1. सिमेंट काँक्रिटचे पक्के बांधकाम असलेले रंगमंच. ते ग्रामपंचायत निधीतून किंवा आमदार फंड वगैरेच्या माध्यमांतून उभे केलेले असतात. ते सिमेंटचे पक्के बांधकाम असलेले ओटे असतात. ते झाडीपट्टीत फार कमी गावांमध्ये पाहण्यास मिळतात. काही ठिकाणी, तसे ओटे गावांतील शाळांच्या मालकीचे असतात. त्यांचा वापर नाटकांसाठी व इतर कार्यक्रमांसाठी केला जातो, 2. मातीचा चौकोनी उंचवटा असलेले रंगमंच - मातीचे आयताकृती उंचवटा असलेले कायमस्वरूपी रंगमंच काही गावांमध्ये असतात. नाटकांचे प्रयोग त्या गावांमध्ये दरवर्षी निश्चित असतात. त्यामुळे गावात सार्वजनिक ठिकाणी माती टाकून 22×20 चौरस फूटांचा उंचवटा तयार केला जातो. त्या पलीकडे समोर साधारणतः पाचशे खुर्च्या मावतील एवढा खड्डा तयार केला जातो. खड्ड्यातील माती रंगमंचाचा उंचवटा तयार करण्यासाठी वापरतात. समोर हजारभर प्रेक्षक बसण्याच्या क्षमतेएवढे मोकळे मैदान असते. ती जागा आणि तो रंगमंच दरवर्षीच्या नाटकासाठी आरक्षित असतात. त्या खड्ड्यांत पाणी दरवर्षी पावसात साचते. स्टेजच्या उंचवट्यावरील माती वाहून जाते. नाटकाची तारीख जवळ आली, की मंडळांचे सदस्य स्टेजची डागडुजी करतात. परिसराची साफसफाई करून स्टेज नाटकासाठी सज्ज करतात, 3. सेंट्रिंग ठोकून तयार केलेले रंगमंच - ज्या गावांमध्ये नाटकासाठी पर्मनंट स्टेज नसते अशा ठिकाणी गावालगत असलेल्या ‘ओपन स्पेस’मध्ये किंवा शेतातील धानाचे पीक निघाल्यानंतर त्यात सेंट्रिंग ठोकून रंगमंच तयार केले जातात. अशा जागा मिळवण्यासाठी ग्रामपंचायत किंवा शेतमालकाची पूर्व परवानगी घ्यावी लागते. असे स्टेज तयार करण्यासाठी लाकडी पाट्या किंवा लोखंडी पत्रे असलेली सेंट्रिंग वापरतात. तसे स्टेज साधारणतः 20×22 फूट अथवा 22×25 फूट आयताकृती जमिनीपासून साडेतीन-चार फूट उंच बनवले जाते. स्टेजच्या चार कोपऱ्यांत चार बळकट लाकडी खांब रोवले जातात. टेलिफोन सेवा हल्ली विस्कटली असल्यामुळे टेलिफोनचे निरूपयोगी झालेले खांब स्टेजसाठी वापरल्याचे आढळून येते. त्या चार खांबांवर आढे लावून छत बनवले जाते. त्या छताला नाटकासाठी आवश्यक असलेले पडदे बांधले जातात.
पडदेबांधणी सर्व प्रकारच्या रंगमंचांवर साधारणतः पुढीलप्रमाणे केली जाते - समोर नाट्य मंडळीचे (रंगभूमीचे) नाव असलेली आडवी पट्टी असते. त्यामागे अंक पडदा. त्यानंतर प्रवेश पडदा. नंतर बगीचा दृश्य, झोपडी दृश्य, लावणीची कोठी, सर्वात शेवटी फ्लॅट सिन (बंगला) असलेले पडदे असतात. बाजूला लोखंडी पायऱ्या बसवल्या जातात. प्रत्येक पडद्याच्या दोन्ही बाजूंना विंग असते. प्रवेशाच्या वेळी उभे असलेले कलाकार थेट प्रेक्षकांना दिसू नयेत हा त्या मागील उद्देश असतो. ते सर्व पडदे पेंटरकडून रंगवून घेतले जातात. नाटकातील कथानकाला अनुसरून सिनसिनरी, विशिष्ट स्थळ, घटना, प्रसंग दाखवण्यासाठी त्यांचा वापर होतो. प्रत्येक पडद्याला वर-खाली ओढण्यासाठी दोरी बांधलेली असते. दृश्य संपले, की प्रवेश पडदा खाली सोडला जातो. त्यामागे पुढील प्रवेशाची तयारी केली जाते. नंतरच्या प्रवेशाचे दृश्य दर्शन घडवणारा पडदा खाली सोडला जातो. कलावंत प्रवेश करताच प्रवेश पडदा वर ओढला जातो. नाटकाच्या नंतरच्या प्रवेशाला सुरुवात होते. स्टेजच्या दोन्ही बाजूंला दोन खोल्या पडद्यांच्या बनवलेल्या असतात. त्यांचा वापर कलावंतांच्या मेकअप आणि ड्रेसिंग यांसाठी ‘ग्रीन रूम’ म्हणून केला जातो. तेथे व्यवस्था एका बाजूला पुरूष आणि दुसऱ्या बाजूला स्त्री कलावंत अशी असते.
सिनेमा टॉकिजच्या धर्तीवर तयार केलेला पडद्यांचा बंद शामियाना |
नाटकाचे प्रयोग हे बंद शामियान्यात होतात. नाटकाचा सीजन दिवाळी ते होळी हा म्हणजे ऐन कडाक्याच्या थंडीचे दिवस. त्यामुळे प्रेक्षकांना थंडीची बाधा होऊ नये यासाठी सिनेमा टॉकिजच्या धर्तीवर पडद्यांचा बंद शामियाना तयार केला जातो. शामियाना अठरा ते वीस पल्ल्यांचा असतो. त्यासाठी 20×30 चे चार पल्ले, 15×30 चे सोळा पल्ले वापरले जातात. ते सर्व पल्ले एकत्र शिवलेले असतात. त्यामुळे कामगारांना ते बांधण्यास त्रास जास्त होत नाही. त्यामुळे ‘घंटो का काम मिनटो में’ सहज साध्य होते. तो पल्ल्यांचा एकजिनसी तंबू दोरांच्या साहाय्याने ताणला जातो. भिंती चारही बाजूंला 15×30 च्या बारा ते चौदा साईडिंग वापरून तयार केल्या जातात.
पडद्यांचे थियेटर (बंद शामियाना)
स्टेज आणि प्रेक्षकांची बैठक व्यवस्था असलेल्या संपूर्ण जागेवर पडद्यांचे छत आच्छादले जाते. चहूबाजूंनी पल्ले लावले जातात. बाहेरील प्रेक्षक विनातिकिट प्रवेश करू नये यासाठी प्रवेश आणि निकास गेट तयार केले जातात. प्रेक्षकांची बैठक व्यवस्था आतील भागात एका बाजूला स्त्रिया व दुसऱ्या बाजूला पुरूष अशी केलेली असते. तशी विभागणी मधोमध मोठा दोर बांधून करतात. समोर खुर्ची, त्यामागे गादी व शेवटी दरी अशा प्रकारे तिकिट दरानुसार दोर बांधून विभागणी केली जाते. लोकांना प्रवेश करण्यासाठी गेट केले जाते. मंडळाची माणसे त्या गेटवर तिकिट चेक करण्यासाठी असतात. तिकिट तपासून प्रेक्षकांना त्या त्या तिकिट दालनात प्रवेश दिला जातो.
प्रकाश योजना - प्रकाशयोजनेकरता स्टेजच्या समोरील आढ्याला अंकपडद्याजवळ वेगवेगळ्या रंगांचे लाइट्स लावलेले असतात. स्टेजवर समोरच्या भागातसुद्धा काही लाइट खाली ठेवलेले असतात. सिन-सीनरी दाखवताना स्पॉट लाईट किंवा इतर लाईटस् वापरले जातात.
ध्वनी योजना - दहाबारा भोंगे गावाबाहेर झाडांवर, पाण्याच्या उंच टाकीवर वेगवेगळ्या दिशांना तोंडे करून लावले जातात. नाटकाची जाहिरात शेजारपाजारच्या गावांना ऐकू जावी हा उद्देश त्यामागील असतो. स्टेजमध्ये साउंड बॉक्स आणि लहान भोंगे असतात. रात्री नाटक सुरू झाल्यानंतर बाहेरील मोठे भोंगे बंद करून स्टेजमधील भोंगे सुरू ठेवले जातात. नाटकातील पात्रांचा आवाज शेवटच्या रसिकापर्यंत पोचला जावा यासाठी स्पीकरचा आवाज मोठा केलेला असतो. स्टेजच्या मध्यभागी अंक पडद्याजवळ अॅडजस्टेबल चांगल्या प्रतीचा माईक बांधलेला असतो. इतर एकदोन माईक स्टेजच्या फ्लॅट सीनच्या जवळपास असतात. पात्रांना साजेसे मेकअप आणि ड्रेसिंग केले जाते. संगीत संयोजन हा संगीत नाटकांचा आत्मा आहे. पौराणिक, ऐतिहासिक वा सामाजिक नाटकांतील नाट्यगीते अथवा पदे हार्मोनियम आणि तबला यांच्या साथीवर व ठेक्यावर बसवली जातात. पायपेटी हे विकसित वाद्यसुद्धा वाजवले जाते. कॅशिओ, बुलबुल तरंग, ऑर्गन, ऑक्टोप्याड ही इलेक्ट्रॉनिक वाद्येसुद्धा नाटकाला संगीत साज चढवण्यासाठी वापरतात. सध्या नाल (ढोलकी), तबला, ऑर्गन, ऑक्टोप्याड वापरून संगीत दिले जाते. नाट्यपदांची जागा भावगीतांनी घेतली आहे. लावणी, भावगीत, प्रेमगीत अशी संगीतमय मेजवानी हे रसिकांच्या आवडीचे बलस्थान आहे. तबला वादक, ऑक्टोप्याड वादक आणि ऑर्गन वादक हे स्टेजच्या समोरील बाजूस, कलावंतांकडे तोंड करून असलेल्या बैठक व्यवस्थेत बसतात.
नवरगाव येथील फिरता रंगमंच |
प्रत्येक नाटक हे तीन अंकांचे असते. एका अंकात साधारणतः पाच प्रवेश असतात. काही नाटकांमध्ये पहिल्या अंकात पाच ते सात प्रवेश असतात. प्रत्येक अंक झाल्यानंतर अंक पडदा पडतो. प्रत्येक अंकानंतर एक रेकॉर्डिंग डान्स किंवा एखाद्या मंडळाच्या फर्माइशीवर गायकाकडून गाणे ऐकवले जाते. आवडल्यास रसिकांचा ‘हंसमोर’ (वन्स मोअर) मिळतो. अंकानंतर लघुविश्रांती असते. त्यात मंडळाला देणगी स्वरूपात मिळालेल्या रकमेची अनाऊन्समेंट होते. उदाहरणार्थ, आजच्या नाटकाचे उद्घाटक ......... यांच्याकडून पाच हजार मिळाले. मंडळ त्यांचे आभारी आहे. नुकत्याच झालेल्या रेकॉर्डिंग डान्ससाठी अध्यक्षांकडून पाचशेएक रूपयांचे बक्षिस मिळाले. नाटकातील विनोदाचा बादशहा पठाणबाबू यांना एकशेएक रूपयांचे बक्षिस प्रेक्षक श्री ..... यांच्याकडून मिळाले वगैरे वगैरे. नाटकाच्या मंडळाला मिळालेली देणगी त्या मंडळाचे कोषाध्यक्ष स्वीकारतात. ज्या कलावंतांना वैयक्तिक बक्षिसे मिळतात ते कलावंत ती ती बक्षिसे स्वीकारतात. ती त्यांची वैयक्तिक मिळकत असते.
फिरता रंगमंचदेखील झाडीपट्टीत आहे. तो एकमेव रंगमंच प्रा.सदानंद बोरकर यांच्या व्यंकटेश नाट्य रंगभूमी (नवरगाव) यांनी तयार केलेला आहे. बोरकर फिरत्या रंगमंचाची संकल्पना पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वीची असल्याचे सांगतात. छोटुभाई मिस्त्री यांनी त्या रंगमंचाचे काम केले, तर दागोबाजी लोखंडे यांनी त्याचे लाकडी काम केले. पूर्वी फिरत्या रंगमंचाचा व्यास हा सव्वीस फूटांचा होता. त्याला बेचाळीस चाके लावलेली असायची. त्यासाठी राईस मिलचे शंभरसव्वाशे किलोचे लोखंडी व्हिल वापरत असत. रंगमंचावर तीन भाग करून तीन वेगवेगळी दृश्ये दाखवण्यासाठी त्यांचा वापर केला जात असे. तो रंगमंच दृश्यबदल दाखवण्यासाठी फिरवण्यास तीन माणसांची गरज असायची. काही वर्षांनंतर त्यात थोडा बदल करून, व्यासाचा आकार कमी करून चोवीस फूटांचा करण्यात आला. आता लोखंडी चाकांऐवजी रबरी चाके वापरण्यात येतात. त्यामुळे त्रास थोडा कमी झाला. व्यंकटेश नाट्य मंडळाने हजारो प्रयोग फिरत्या रंगमंचावर सादर केले आहेत. त्यात ‘तो मी नव्हेच’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘माझं कुंकू मीच पुसलं’, ‘आत्महत्या’, ‘नवरे झाले बावरे’ अशा नाटकांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल असे सदानंद बोरकर सांगतात.
- रोशनकुमार शामजी पिलेवान 7798509816 roshankumarpilewan11@gmail.com
रोशनकुमार पिलेवान यांच्या कथा, कविता, गझल विविध नियतकालिकांत आणि दिवाळीअंकांत प्रसिद्ध झाल्या आहेत. ते विज्ञान विषयाचे कवठाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत (तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर). त्यांचे शिक्षण एम ए, बी एससी, डी एड पर्यंत झाले आहे. त्यांचा ‘ठिगळ’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी आक्रीत, पाऊसपाणी आणि हा जीव तुझ्यावर जडला या नाटकांचे लेखन व प्रयोगांचे सादरीकरण झाडीपट्टीसाठी केले आहे. ते व्यावसायिक आणि स्पर्धात्मक नाटकांत अभिनयही करतात.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------रंगमंच तयार करणारे कारागीर |
पुरुष कलावंतांची मेकअप रूम |
7 टिप्पण्या
झाडीपट्टीतील नाटक आणि नाट्यप्रयोगाविषयी सविस्तर लेख खूप छान वाटला
उत्तर द्याहटवावाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासूनआभार
हटवाखूपच सुंदर सर अशी बातमी पहिल्यांदाच वाचायला मिळाली.अशीच झाडीपट्टी ची माहिती घडामोडी आम्हा पर्यंत पोह्चवा धन्यवाद।
उत्तर द्याहटवामनापासूनआभार सर
हटवारोशन सर
उत्तर द्याहटवाअप्रतिम असा लेख
झाडिपट्टीचि नाटक समजायला अगदी सोपि अशी मांडणी
--सिद्धू राऊत
मनःपूर्वक आभार
हटवानाट्यकलेचा अदभुत प्रकार वाचताना लेख आनंद देतोय
उत्तर द्याहटवा