अनिल नाकतोडे |
झाडीबोलीच्या नाट्यकलेचा पिढीजात वारसा जपणारा उदापूरच्या मातीतील अवलिया म्हणजे अनिल नाकतोडे. त्यांचे वडील दाजीबा नाकतोडे हेही गावात होणाऱ्या नाटकांतून भूमिका साकारायचे. अनिल यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. मात्र त्यांना अभ्यासापेक्षा नाटक आणि सिनेमा पाहण्याची हौस अधिक असे. त्यांचे पाठांतर चांगले आहे. ते एकपाठी आहेत. ते कोणत्याही नाटकातील संवाद घडाघडा बोलून दाखवतात. दहावीची परीक्षा चालू असतानादेखील ते नाटक-सिनेमात रमत. आता मात्र ते 'मॅट्रिक' राहून गेल्याची खंत बोलून दाखवतात. त्यांना शाळेत असताना सकाळी शाळा आणि त्यानंतर गाई राखण्यास रानात जावे लागत असे. त्यांनी आटाचक्की चालवणे, शेतीमातीत राबणे अशी कामेही केली आहेत. त्याच काळात ते प्रथेप्रमाणे लग्नबंधनात अडकले- ‘शेतकामात आणखी एक माणूस हाताशी येते ना!’
अनिल नाकतोडे यांच्या अभिनयकौशल्यास लोक पसंती दर्शवतात. त्यांचे रंगभूमीवरील पहिले पाऊल पडले ते अनपेक्षितच. ते सांगतात, “गावात ‘सिंहाचा छावा’ हे नाटक होते. ते बघण्यास मिळणार असल्याने खूप आनंद झाला होता. तिकिट काढून प्रवेश घेतला. तोवर एकही प्रेक्षक नव्हता. त्यामुळे खुर्ची पहिल्या रांगेत मिळाली. नाटक जवळून बघण्यास मिळणार म्हणून शब्दातीत आनंद झाला. तेवढ्यात नाट्यमंडळीचा सदस्य आला आणि म्हणाला, ‘अबे, तुलं आतमंदी बलवत आयेत.’ ‘मी नाई ये रे बावा. तिकळं आलो तं माजी सीट जाईल.’ ‘अबे, चल ना. तुलं नाटकात काम करालं बलावतेत.’ दुसरा सदस्य आला. त्याने आणखी आग्रह केला. ‘मजाकबाजी नोको करा. माजी सीट जायेल. फुकट नाही. हे पाय टिकट काढून आलो.’ ‘मज्जाक नोहे. एक कलाकार नाही आला. जरासाच काम आये.’ मी ‘माजं टिकटीचं सा रूपे देत असाल तं येतो’ म्हणत मेकअप रूममध्ये प्रवेश केला. त्यांनी माझ्या मिसरूड नुकतीच फुटलेल्या उंच-सडपातळ शरीराला न्याहाळलं. ‘हं, जमते याला सहदेवचा रोल!’ असं म्हणत मेकअप करायला लावलं आणि मला रंगमंचावर अभिनय साकारण्याची संधी पहिल्यांदा आयती चालून आली! ती साक्षात नटेश्वराचीच कृपा. नाहीतर एवढ्या नावाजलेल्या कलावंतांसोबत काम करण्याची संधी सहज उपलब्ध झाली नसती. चेहरा रंगवून, डायलॉग पाठ करत एण्ट्रीची वाट बराच वेळपर्यंत पाहत बसलो. ‘अभिमन्यू, चक्रव्यूह भेदणे म्हणजे पोरखेळ नव्हे.’ एकदाची एण्ट्री झाली. संवाद झाला, ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळाला आणि हायसे वाटले.
“मग नाटकांची आवड वाढली. ‘सिंहाचा छावा’ नाटक चौदा वर्षांनी पुन्हा बसवले. नाटकाच्या त्या नव्या अवतारात द्रोणाचार्यांची भूमिका साकारण्यास मिळाली. त्यात सहा पदे होती. उदापूर ते मोहटोला (किन्हाळा) हे अंतर सायकलने पार करत, संगीतकार शाम शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ती सहा पदे (नाट्य गीतं) बसवली आणि रसिकांची वाहवा मिळवण्यात यश आलं. यशानंतर हुरूप वाढला होता. गावातील प्रतिष्ठित मंडळाचे अध्यक्ष रामदास पाटील यांनी नाटक उभे करण्यास सुरुवात केली. मी वर्गणी गोळा करणे, नाटक बसवणे, सादरीकरण करणे ही महत्त्वाची कामे आनंदाने स्वीकारत असे.”
अनिल यांचा अभिनय लोकांना विशेष पसंत पडतो असे दिसू लागले. त्यांचे नाव पट्टीच्या कलावंतांसोबत - दत्ता आगलावे, राम दोनाडकर, शोभा जोगदेव, शबाना खान, प्रा.शेखर डोंगरे, के. आत्माराम, हिरालाल पेंटर यांसारख्या – रंगभूमीवर घेतले जाऊ लागले. त्यांच्या ‘वीर उमाजी नाईक’मध्ये उमाजी, ‘तेजस्वी’मध्ये कर्ण, ‘आम्ही एकशे पाच’ नाटकात चित्रसेन, ‘प्रीत जमली चाळातून’मध्ये हंबीरराव, ‘बिजली कडाडली’मधील विलास या भूमिका रसिकांच्या मनात घर करून बसल्या आहेत. त्यांनी मौशी (ब्रह्मपुरी) येथील ‘बिजली कडाडली’ नाटकात रंगेल, दारूबाज विलास रंगवला. पहिला प्रवेश झाल्यानंतर प्रेक्षक कुजबुजू लागले. ‘अबे, हा पक्का बेवळा मारून आहे. मायच्यान हा आता काम नाही करू सकत.’ मंडळाची माणसेही तशीच बोलली. अनिलचा अभिनय इतका सच्चा होऊन गेला होता. अनिल म्हणतात, “पण त्यांना कळले होते, की पात्र उभे करायला नशेचा सहारा घ्यावा लागत नाही; तर कलेतच खरी नशा असते!”
झाडीपट्टीत नाटक मंडळीला ‘प्रेस’ म्हणतात. महाराष्ट्र प्रेसला दोन ग्रूप होते. दोन्ही ग्रूपची नाटके बुकिंग झाली, की एका ग्रूपला वर्णी लागायची. अनिल यांनी तीनशे रुपये मानधनात बब्बुभाई प्रेसवाले यांच्याकडे काम केले. ते वडपल्लीवार गुरूजी, शेखर डोंगरे, मोरेश्वर खानोरकर, केशव खरकाटे आदी नामवंत कलावंतांसोबत रंगमंचावर मोकळेपणाने वावरले.
अनिल झाडीपट्टी रंगभूमीवर जवळपास तीस वर्षांपासून वावरतात. त्यांनी महाराष्ट्र रंगभूमी, भारत रंगभूमी, धनंजय स्मृती रंगभूमी, महालक्ष्मी रंगभूमी, एकता कला रंगभूमी (जुनी आणि नवीन सुद्धा), युवा रंगमंच, महाराष्ट्र ललित कला रंगभूमी, अम्मा भगवान रंगभूमी यांसारख्या अनेक ग्रूपमधून दोन हजारांपेक्षा जास्त नाट्यप्रयोगांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ‘धर्मभास्कर’ या नाटकात दीडशेच्या वर प्रयोगांतून काम केले. तो एक विक्रमच झाला.
अनिल यांनी विनोदी, चरित्र अशा वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या, पण त्यांना खलनायक साकारण्यास आवडतो. उंच-धडधाकट देहयष्टी, चेहऱ्यावरचा रूबाब, आवाजातील जरब यांमुळे दिग्दर्शकांनीसुद्धा त्याची निवड खलनायक म्हणून केली आणि रसिक मायबापांनी तर अनिल यांच्या त्या रूपास मोठी दाद दिली! त्यांनी ‘अवतार कला निकेतन, रंगभूमी ब्रह्मपुरी /वडसा या’ नावाने स्वतःची प्रेस (मंडळी) ओपन केली. त्यांच्या नाटकात मोहन जोशी यांच्यासारख्या हिंदी-मराठी सिनेनाट्यसृष्टीतील दिग्गज कलावंताला ‘कास्टिंग’ केले आणि झाडीपट्टीत आणले. ‘जवानी लपली पदराखाली’ या व्ही. दिलीपकुमार यांच्या नाटकांचे प्रयोग अनेक झाले. त्यातील प्रतापची भूमिका मोहन जोशी तर झुंजारचे पात्र अनिलजी साकारायचे. ती भूमिका झाडीपट्टीत प्रचंड गाजली.
अनिल यांच्या आयुष्यात देखील अनेक चढउतार आले. पण त्यांना एका प्रसंगाने पार हादरून सोडले. ते म्हणतात, ‘तो दिवस आठवला, की अजूनही अंगावर शहारे येतात. देवसरा (कुरखेडा) येथे नाटक 16 फेब्रुवारी 2012 रोजी होते. नाटकाला जाण्यासाठी गाडीत बसलो. निर्माता दुर्वास कापगते, शेषराव मोहुर्ले, वासुदेव नेवारे गुरूजी, उन्मेश जवळे, मोहन धांडे, निखिल मत्ते, अविनाश गेडाम आणि मी. गाडी वडसा प्रेसजवळून निघाली. कुरखेडा रोडला लागली. वडसापासून चारदोन किलोमीटर अंतर असलेल्या विसोरा फाट्याजवळ येताच समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकची जबर धडक बसल्यामुळे आमच्या गाडीचा चेंदामेंदा झाला. गावकऱ्यांनी आवाज ऐकून धावा घेतला. ‘अबे, मेले सप्पा!’, ‘पार चारा चुराच झाला!’
‘अबे, हाही मेला.’ म्हणत कोणीतरी माझ्याजवळ आले. त्यांनी गाडीच्या पल्ल्यात अडकलेले माझे शरीर बाहेर काढले. मला त्यांचे बोलणे ऐकू येत होते. माझ्या हाताला आणि मानेला जबर दुखापत झालेली. चेहरा पार सुजलेला. मी ‘मी मरत नाही!’ असे पुटपुटलो. खरे तर, तो आत्मविश्वास होता. सर्व देह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसत होते. डोळ्यांसमोर अंधारी आली. आम्हा सर्वांना गडचिरोलीच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले आणि वेळेवर उपचार झाल्यामुळे वाचलो. दैव बलवत्तर म्हणून वाचलो. तो माझा पुनर्जन्मच होता! बाकीचे सात सहकारी नाट्यकर्मी हरवल्याची दुखरी सल मनाला कायम बोचत राहते. एवढ्या भयानक जिवघेण्या प्रसंगातून वाचल्यानंतर हात जवळजवळ लुळा पडला. थोडा स्मृतिभ्रंश झाला होता. उपचाराअंती बऱ्याच अंशी प्रकृती साथ देत आहे. हात आणि मान यांतील दुखापत ऑपरेशन केल्यामुळे बरी झाली. थोडेफार दुखणे कधीतरी जाणवतेच. साक्षात मृत्यूशी कडवी झुंज दिल्यानंतर, पुन्हा चेहऱ्याला रंग लावून नव्या उमेदीने नटेश्वराची उपासना करण्यासाठी, रसिकांच्या सेवेत उभे राहता आले याचे फार मोठे समाधान आहे!”
त्यांना ‘झाडी’वूडबद्दल अभिमान आहे. ते सांगतात, ‘झाडीपट्टी म्हणजे अस्सल हिऱ्यांची खाण! अनेक हिरे झाडीपट्टीने दिले. ती झाडीपट्टीच्या दृष्टीने विशेष बाब आहे. उदापूर आणि वडसा ही गावे हाकेच्या अंतरावर आहेत. त्यांचा सीझनमधील कार्यक्रम ठरलेला असतो. नाटक संपले की सकाळी उदापूरला घरी येऊन आराम करायचा. पुन्हा चार-पाच वाजता पुढील नाटकासाठी वडसा प्रेसला हजर व्हायचे. ते सांगतात, झाडीचा रसिक हा चोखंदळ आहे. बऱ्यावाईटाची पारख करणारा आहे.
अनिल नाकतोडे रंगभूमीवर खलनायक साकारत असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यांचे व्यक्तिमत्त्व मृदुभाषी, सुस्वभावी, माणुसकी जपणारे आहे. ते स्वतःचा घरसंसारही जिवापाड जपतात. त्यांचे शेतीमातीवर उदंड प्रेम आहे. काही वेळा, त्यांचा संवाद-सराव नाटकाची स्क्रिप्ट घेऊन शेताच्या बांधावर चालतो.
अनिल नाकतोडे - 94236 01660
- रोशनकुमार शामजी पिलेवान 7798509816 roshankumarpilewan11@gmail.com
रोशनकुमार पिलेवान यांच्या कथा, कविता, गझल विविध नियतकालिकांत आणि दिवाळीअंकांत प्रसिद्ध झाल्या आहेत. ते विज्ञान विषयाचे कवठाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत (तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर). त्यांचे शिक्षण एम ए, बी एससी, डी एड पर्यंत झाले आहे. त्यांचा ठिगळ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी आक्रीत, पाऊसपाणी आणि हा जीव तुझ्यावर जडला या नाटकांचे लेखन व प्रयोगांचे सादरीकरण झाडीपट्टीसाठी केले आहे. ते व्यावसायिक आणि स्पर्धात्मक नाटकांत अभिनयही करतात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
3 टिप्पण्या
झाडीपट्ठीची ओळख करुन दिल्याबददल..
उत्तर द्याहटवालेखकाााचे अभिनंदन.वडसा देसाईगंज वगैरे भागााात बोरकर मंडळीचेही आभार..
व्वाह, pillewan sir फार सुंदर रेखाटलंय... शुभेच्छा
उत्तर द्याहटवाAmchya gavajvkche ahet anil kaka 😁❤️🙏
उत्तर द्याहटवा