संत गोरोबाकाका, तेर आणि साहित्यसंमेलन (Saint Goroba & Literary Event)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

संत गोरोबाकाका, तेर आणि साहित्यसंमेलन (Saint Goroba & Literary Event)

संत गोरा कुंभार
उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख दोन नावांत सामावलेली आहे. एक म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी जगदंबा तुळजाभवानी आणि दुसरे नाव म्हणजे तेर गावचे वैराग्यमहामेरु संत गोरोबाकाका'. गोरोबांच्या अभंगाशिवाय संतवाङ्मय पूर्ण होत नाही. उस्मानाबादकरांनी त्र्याण्णवावे साहित्य संमेलन(2020) साजरे केले तेव्हा संत गोरोबा यांचा उचित गौरव केला.
संमेलनाचे यजमानपद मिळाल्याचे पत्र गोरोबाकाकांच्या समाधीस्थळी त्यांच्या चेतनेस अर्पण करण्यापासून ते लोगोवरील त्यांची प्रतिमा, अभंगातील ओळी व अगदी संमेलन संकल्पना गीत (थीम साँग) गोरोबाकाकांना समर्पित करणे येथपर्यंत सर्व ठिकाणी गोरोबाकाकांच्या वाङ्मयाचा व कार्याचा सतत उल्लेख करण्यात आला. ते सर्व तेरणेच्या पंचक्रोशीसाठीच नव्हे तर संतप्रेमींसाठीही समाधानाचे ठरले.

एकूणच साहित्य संमेलन गोरोबाकाकांशी सतत जवळीक ठेवून राहिले. ते स्वाभाविकही आहे. कारण गोरोबाकाकांच्या काळात तेर भूमीत तत्कालीन संतांचे संमेलन (संतमेळा किंवा संतसभा) झाले होते! महाराष्ट्राच्या इतिहासातील तो फार मोठा प्रसंग. तेरला बाराव्या-तेराव्या शतकातील महाराष्ट्रातील संतांची मांदीयाळी होऊन गेली. निवृत्तिनाथ, नामदेव, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, जनाई, परिसा भागवत, साळ्या रसाळ, विसोबा खेचर, कुर्मदास, भानुदास, कान्हो पाठक, जगन्मित्र नागा, सच्चिदानंद बाबा, जोगा परमानंद, राका कुंभार, चोखोबा, सेना न्हावी, सावता माळी, नरहरी सोनार, चांगा वटेश्वर, बंका, चांगदेव, आसंद सुदामा ही सारी मंडळी तेरला आली होती. त्या सर्वांमध्ये वयाने ज्येष्ठ व अनुभवाने श्रेष्ठ असे गोरा कुंभार! एवढी संतमंडळी एकत्र आली. त्यांच्याभोवतीचा समुदाय त्याहूनही अधिक असणार नाही का? संतांचा तो मेळा त्यानंतर जनमानसाचा वेध घेत, प्रबोधन करत महाराष्ट्रभर फिरू लागला. ती सर्व मंडळी एका विचारधारेशी जोडलेली होती. ती विचारधारा म्हणजे त्यांचे विठ्ठलाप्रती प्रेम आणि त्यांच्या हाती भागवत धर्माची पताका. मांदीयाळीतील सखेसोबती त्यांच्या त्यांच्या गावी आग्रहाने समुदायाला घेऊन जात. त्या त्या गावी प्रवचन, कीर्तन होई. त्या कार्याचाच एक भाग म्हणून गोरोबाकाकांच्या गावी म्हणजे तेर या मुक्कामी संमेलन घडून आले होते. गोरोबांच्या चरित्रात तो संतमेळा तेरला आल्याचा उल्लेख आढळतो. संतसभा महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन असलेल्या तेरच्या त्रिविक्रम मंदिरात झाल्या होत्या. त्यावेळी नामदेवांचे कीर्तन झाले होते; त्याचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत.
त्रिविक्रम मंदिर
त्रिविक्रम मंदिरात कीर्तनकार वक्त्याच्या पायाखाली आजही काहीही अंथरले जात नाही, कारण नामदेवांनी कीर्तन केलेल्या त्या जागेला कोणाचाही पदस्पर्श व्हावा ही भावना त्यामागे आहे. जेथे नामदेवांचे कीर्तन झाले तेथे कदाचित ज्ञानदेवांनीही प्रवचन केले असेल! गोरोबाकाकांसह इतरही काही संतांनी त्यांच्या अभंगरचना सादर केल्या असतील. संतांची वैचारिक देवाणघेवाण झाली असेल. तेच ते मराठीतील पहिले (संत) साहित्य संमेलन म्हणता येईल. वर्तमानातील संमेलनाचे
औपचारिक स्वरूप तेव्हा नव्हते. गोरोबाकाकांच्या काळात झालेल्या संमेलनाचा वारसा त्या भूमीस आहे.
- दीपक खरात 7588877287, 7020335059
दीपक खरात यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी शैक्षणिक कालावधीत वक्तृत्व, वादविवाद, एकांकिका, कथा, कवितालेखन इत्यादी स्पर्धांत भाग घेतला आणि बक्षिसेही मिळवली. त्यांना एनएसएसमध्ये असताना बेस्ट स्टुडंटचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी अनेक कार्यशाळांत सहभाग नोंदवला आहे. त्यांचे महाराष्ट्रात 1999 पासून विविध विषयांवर व्याख्यान झाले आहे. संत गोरोबा, संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज या संतांचे चिंतनकार व रामकथा प्रवक्ते म्हणून त्यांचे राज्यभर संगीतमय कथांचे कार्यक्रम असतात. त्यांना आजवर आठ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे विविध विषयांवरील लेखन नियतकालिकांतून आणि ऑनलाईन माध्यमातूनही प्रसिद्ध झाले आहे.
----------------------------------------------------------------------------------------------
गोरोबाकाका : दोन आख्यायिका (Saint Gorobakaka)

संत गोरा कुंभार तेर येथे राहत असत. त्यांचा व्यवसायही कुंभाराचा होता. ते तो व्यवसाय करत असतानाही पांडुरंगाच्या नामस्मरणात दंग असत. माती तुडवतानाही नामानंदात प्रेमाने नाचावे हीच त्यांची श्रद्धा. त्यांच्या अद्भुत चमत्काराच्या कथा सांगितल्या जातात.
ते मडके बनवण्यासाठी एके दिवशी माती तुडवत होते. त्यांच्या पत्नी संती ह्या तान्ह्या बाळाला बाजूला ठेवून पाणी भरण्यास गेल्या होत्या. ते मूल रांगत रांगत आले व गोरोबाकाका तुडवत असलेल्या मातीच्या काल्यात पडले. ते ब्रह्मानंदी टाळी लागलेल्या गोरोबाकाकांच्या लक्षात आले नाही व ते मूलही चिखल तुडवताना तुडवले गेले! त्यांची पत्नी पाणी घेऊन परत आली तेव्हा मूल दिसले नाही. तिने शोधाशोध सुरू केली. तेव्हा तिला सगळा चिखल लाल झाल्याचे दिसले. तिने बाळाचा दारूण अंत तसा झाल्याचे पाहून हंबरडा फोडला. तिने गोरोबा आणि त्यांच्या परमेश्वरभक्तीला लाखोली वाहण्यास सुरुवात केली. गोरोबांची तल्लीनता त्या आकांडतांडवाने भंग पावली. त्यांच्या झालेला प्रकार लक्षात आला. त्यांनी भजनाच्या व्यत्ययातील संताप व्यक्त करण्यासाठी चक्रदंड घेऊन, पत्नीला शिक्षा करणे आरंभले, तेव्हा तिने गोरोबांना, ‘माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठोबाची शपथ आहेअसे म्हटले. चिडलेले गोरोबा चक्रदंड फेकून पुन्हा भजनात तल्लीन झाले. संतीच्या लक्षात गोरोबा तिच्याशी बोलत नाहीत, तिची सेवा स्वीकारत नाहीत हे आले. तिने माहेरी जाऊन तो प्रकार आईवडिलांना सांगितला. तिने वर आणखी विनंती केली, की धाकटी बहीण रामीचा विवाह गोरोबांशी करून द्या म्हणजे वंशाला दिवा मिळेल.त्यानुसार गोरोबांचे रामी या, संतीच्या धाकट्या बहिणीशी लग्न झाले. गोरोबांनी रामीच्या अंगालासुद्धा स्पर्श करणार नसल्याचे जाहीर केले. त्यावर संती व रामी या दोघींनी युक्ती करून एका रात्री गोरोबांचे हात दोघींच्या छातीवर ठेवले. गोरोबा सकाळी जागे झाल्यावर ते त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून पांडुरंगाची शपथ मोडली गेली या भावनेने शस्त्रावर दोन्ही हात आपटून ते तोडून टाकले! संती व रामी, दोघींना त्यांच्या चुकीचा तो भयंकर परिणाम पाहून दुःख झाले. गोरोबाकाकांनाही झाल्या प्रकाराबद्दल वाईट वाटले. त्यांनी पांडुरंगच त्यांचा पाठीराखा आहे. तेव्हा त्याचेच नामस्मरण करावे, म्हणजे तो योग्य मार्ग काढेलअसे पत्नींना समजावले. गोरोबा संती आणि रामी यांना घेऊन आषाढ महिन्यात एकादशीला पंढरपुरात गेले.
त्यांनी चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेतले. तेथे गरूडपारावर संत नामदेवांचे कीर्तन सुरू होते. कीर्तनात विठ्ठल-विठ्ठलम्हणत हात उंचावून टाळ्या वाजवतात, पण गोरोबांचे तर हातच नव्हते. नामदेवांनी त्यांना हात वर करून टाळ्या वाजवण्यास सांगितले. गोरोबांनी तसे करताच त्यांच्या थोट्या हातांच्या जागी पूर्ववत पूर्ण हात आले! तो प्रकार पाहून उपस्थित सर्व संतांनाही नवल वाटले. त्या आनंदप्रसंगी संतीला तिच्या पुत्रविरहाची आठवण झाली. तिने पांडुरंगाला हात जोडून, ‘माझी व माझ्या लेकराची भेट घडवअशी विनवणी केली आणि काय आश्चर्य! तिला तिचे लेकरू रांगत-रांगत तिच्याकडे येताना दिसले. गोरोबा दोघींना घेऊन गावाकडे आले.
दुसरी आख्यायिका त्यांच्या संत- परीक्षणाची आहे. त्यांनी सर्व संतांना एकदा घरी बोलावून त्यांचा आदरसत्कार भोजन देऊन केला. त्यावेळी ज्ञानदेवांनी उपस्थित संतमंडळींत कोणते मडके कच्चे व कोणते पक्के हे परीक्षा करून सांगण्याची विनंती केली. त्यावर गोरोबांनी कुंभाराची थापटी घेऊन प्रत्येक संताच्या डोक्यावर मारण्यास सुरुवात केली. सर्व संतांनी तो आघात निमूटपणे सहन केला, पण नामदेवांनी मात्र त्याला विरोध केला. तेव्हा काकांनी नामदेवांकडे बोट दाखवून, ‘हे एकच मडके कच्चे आहेअसे ज्ञानदेवांना सांगितले! गोरोबा यांचे निधन इसवी सन 1317 साली झाले. त्यांची समाधी तेर  येथे तेरणा नदीच्या काठी बांधलेली असून तेथे एक मंदिर, मंडप व नदीकाठी घाट आहे. तेथे चैत्र वद्य त्रयोदशीला मोठी यात्रा भरते.
- भारत गजेंद्रगडकर 9404676461
('बालाघाटची साद' पुस्तकावरून उद्धृत, संपादित-संस्कारित)
भारत गजेंद्रगडकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी सर्व प्रमुख वृत्तपत्रांत लेखन केले आहे. त्यांना छायाचित्रणाचा छंद आहे. त्यांची छायाचित्रे साधना, तरुण भारत यांच्या मुखपृष्ठावर तसेच, अनेक दैनिक व साप्ताहिकांत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी छायाचित्रांची पंधरा प्रदर्शनेही भरवली आहेत. त्यांचा विविध सामाजिक कार्यांत सहभाग असतो. त्यांची तेरा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना आखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा कै. नागोराव दुधगावकर पुरस्कार मिळाला आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या