भार्गवराम विठ्ठल
ऊर्फ मामा वरेरकर हे धुळे येथे 1944
साली झालेल्या एकोणतिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचा लौकिक श्रेष्ठ
नाटककार, बंगाली साहित्याचे भाषांतरकार आणि कादंबरीकार असा होता. त्यांचा जन्म चिपळूण
येथे 27 एप्रिल 1883
रोजी झाला. त्यांचे बालपण
मालवणला गेले. त्यांचे प्राथमिक व थोडेफार माध्यमिक शिक्षण तेथेच
झाले. त्यांच्या वडिलांनी त्यांना चिपळूण
येथे 1898 साली रत्नागिरीच्या
सिव्हिल हॉस्पिटलात पाठवले. त्यांनी
त्यासाठी भार्गवराम यांना शाळेतून
काढून घेतले. त्यांना
ते
शिक्षण शारीरिक दुबळेपणामुळे मधेच सोडून द्यावे लागले व त्यांनी टपाल खात्यात नोकरी घेतली. ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना मराठी कवी कीर्तिकर
अध्यापक म्हणून भेटले.
मामा
वरेरकर हे केवळ ‘मामा’ ह्या नावाने अधिक ज्ञात संपूर्ण मराठी मुलखात होते. मामांचा
स्वभाव गप्पिष्ट होता. त्यांच्या वृत्तीत जातिवंत खट्याळपणा होता. मामांसारख्या
हजरजबाबी कोट्या फार क्वचित कोणी केल्या असतील. मामा थापा भयंकर मारतात असा प्रवाद
साहित्यप्रांतात होता. त्यांना वावड्या सोडण्याचे जणू व्यसनच होते. साहित्यिक
गप्पांची प्रत्येक मैफिल मामांच्या आठवणींनी गच्च भरून जायची. मामांचा विषय निघाला
नाही अशी मैफलच जणू झाली नाही. त्यांनी गप्पा मारण्यातच आयुष्य घालवले, पण मग लेखन
कधी केले? हा अचंबाच लोकांना वाटे.
मामांकडे लहान मुलांचा निर्व्याज्यपणाही होता. त्यामुळे त्यांच्या मनात कधी कोणाबद्दल
द्वेष राहिला नाही.
त्यांनी
‘हाच मुलाचा बाप’, ‘भूमिकन्या सीता’, ‘सत्तेचे गुलाम’, ‘संन्याशाचा संसार’ यांसारखी
आठ अप्रतिम नाटके लिहिली. त्यांनी त्यांच्या प्रत्येक नाटकातून तत्कालीन ज्वलंत
प्रश्नाला वाचा फोडली. शरच्चंद्रांच्या ‘श्रीकांत’, ‘गृहदाह’ यांसारख्या अप्रतिम
कादंबऱ्या मामांनी बंगालीतून मराठीत आणल्या, हे त्यांचे महद् उपकारच मराठी
साहित्यावर आहेत. शरदचंद्र चटर्जी हे बंगालचे सर्वश्रेष्ठ कादंबरीकार मामांमुळे
मराठी वाचकांना ज्ञात झाले. त्यांनी जवळ जवळ पन्नास कादंबऱ्या अनुवादित केल्या. रवींद्रनाथांची
नाटके ‘ठाकूरांची नाटके’ या नावाने अनुवादित केली. तसेच, त्यांनी सत्तावीस
कादंबऱ्या, पंचवीस-तीस रहस्यकथा एवढी ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यांनी ‘माझा नाटकी संसार’ ह्या
नावाचे
आत्मवृत्त लिहिले
आहे. त्यांनी लिहिलेल्या रहस्यकथांची संख्याही बरीच आहे. त्यांनी
अनेक स्फूट लेखही लिहिले
मामांना त्यांच्या साहित्याची मराठी
समीक्षा विशेष दखल घेत नाही याची खंत होती. अनेक कादंबऱ्या, कथा लिहिलेला हा लेखक मॅट्रिकच्या
पलीकडे विशेष शिकलेला नव्हता. पण डॉक्टर कान्होबा
रणछोडदास कीर्तिकर यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे मामा वरेरकर हे लेखक झाले.
कारण डॉक्टरांनी मामांच्या वाचनास शिस्त लावली आणि योग्य ते मार्गदर्शन केले. ते श्रीपाद
कृष्ण कोल्हटकर यांना गुरुस्थानी मानत. मामांनी
त्यांचे पहिले नाटक- ‘कुंजविहारी’ -वयाच्या एकविसाव्या वर्षी, 1904
साली लिहिले. ते 1908
साली रंगभूमीवर आले. नाटकांवर मामांचा विलक्षण जीव. त्यांचा रेडिओ ह्या माध्यमाशी संबंध भारतात ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ ह्या खाजगी कंपनीने रेडिओ केंद्र सुरू केल्यापासून होता. त्यांनी आकाशवाणीवरून अनेक लघुनाटके,
नभोनाट्ये, एकांकिका आणि श्रुतिका लिहून प्रसारित केल्या. त्यामुळे त्यांना नाटककार
वरेरकर अशी प्रसिद्धी अधिक मिळाली. ते इंग्रजी आणि बंगाली भाषा उत्तम शिकले आणि त्यांनी
त्याचा लाभ मराठी वाचकांना करून दिला, पण मामांचे खरे वेड होते गप्पा मारण्याचे. ते
पंडित नेहरू यांच्यापासून गल्लीतील लहान मुलांपर्यंत कोणाशीही आत्मीयतेने गप्पा
मारू शकत. समोरचा माणूस कितीही मोठा असो, मामांना त्याचे दडपण येत नसे.
ते पुणे येथे 1938
साली भरलेल्या एकोणिसाव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांना पद्मभूषण हा सन्मान
1959 साली प्राप्त झाला. त्यांना संगीत नाटक अकादमीची फेलोशिप 1963 साली
दिली गेली. ते राज्यसभेत 1956
ते 1964 अशी आठ वर्षे सदस्य होते. त्यांनी
1944 सालच्या एकोणतिसाव्या
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. ते त्यांच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “कलात्मकतेचा
अभाव असलेले वाङ्मय केव्हाही प्रचारक्षम होणार नाही. म्हणूनच, वास्तववादी
वाङ्मयाची विचक्षणा करताना प्रचार आणि कलात्मकता यांची जीवनमूल्ये हिशेबात घेतली
नाहीत तर त्या वाङ्मयाचे मूल्यमापन यथातथ्य रीतीने होणार नाही.”
त्यांचे निधन 23
सप्टेंबर 1964 रोजी झाले.
- वामन
देशपांडे 9167686695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 9920089488
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 टिप्पण्या