अशोकदेव टिळक |
लक्ष्मीबाई टिळकांना 29 मे 1921 रोजी दुसरा नातू झाला. त्याचे नाव अशोक देवदत्त टिळक. त्यांच्यासारख्याच रंगारूपाचा. मुलीची हौस म्हणून ह्या मुलाचे केस पाठीवर रुळतील एवढे त्यांच्या सुनेने -- रूथबाईंनी वाढवले. लक्ष्मीबाईचं हे नातवंड जन्मलं तेच मुळात डोळ्यांवर संशोधकाचा चष्मा घालून, हातात टोकदार लेखणी धरून आणि पायाला चाकं लावून. गुटगुटीत बांधा, लुटुलुटू चालणं, बोबड्या बोलांनी शब्दांशी खेळत हसवत राहणं, जन्मजात निरागस खोडकरपण घेऊन आलेला हा मुलगा 'रोगी पण उद्योगी' असल्याचं वर्णन लक्ष्मीबाई करतात. कराचीत काही काळ वास्तव्य असतानाच्या ह्या नातवाच्या गमती जमती ह्या मुळातून वाचण्यासारख्या आहेत.
वाढत्या वयाबरोबर ह्या नातवाच्या डोक्यातल्या दरदिवशीच्या नवनवीन चमकदार पण काहीशा विक्षिप्त वाटाव्यात अशा कल्पनांनी सारा भोवताल स्तिमित होत असे. प्रत्येक मुलाला अभ्यासासाठी वेगळी जागा वडिलांनी दिली होती. अप्पांच्या वाट्याला बाल्कनी आली. तिथे त्यांनी त्यांची टेबल-खुर्ची मांडली. अभ्यास झाला की, ते त्यांची टेबल-खुर्ची पुली लावून वर छताला अडकवत, त्यामुळे जागा मोकळी राही आणि स्वच्छताही करता येई. लोक मात्र हा लोकविलक्षण प्रकार येता-जाता थांबून बघत. पुढे हीच शक्कल त्यांनी कोसबाडला असताना मुळातच जड असलेल्या पाण्याच्या लोखंडी बादल्या वर उचलून ठेवण्यासाठी वापरली. सामान्य माणसाला जे सुचणार नाही, ते अप्पांना सुचत असे. अप्पा कवी होतेच. जे न देखे रवी ते देखे कवी...एक अजब वल्ली म्हणून अप्पांचे अनेक किस्से सांगता येतील. तो एक वेगळाच विषय होईल. जाताजाता एवढंच सांगते, अप्पांचा हात कलावंताचा होता. खडूवर आणि लाकडावर ते सुरेख नक्षीकाम करत. बघताबघता कागदाच्या आणि पुठ्ठ्याच्या छानशा वस्तू ते बनवून दाखवत. ह्यातल्या काही वस्तू कविवर्य ना.वा.टिळकांच्या वस्तूंसोबत अहमदनगरच्या संग्रहालयास भेट म्हणून देण्यात आलेल्या आहेत.
अप्पांना एखाद्याची फिरकी घेण्याची हुक्की आली, की मग तर विचारूच नका. निरंजनच्या आत्या वारल्या म्हणून आम्ही नाशिकला गेलो होतो. चर्चमध्ये शेवटची प्रार्थना होऊन आम्ही बाहेर आलो. लोक अंत्यदर्शन घेत होते. मी आणि अप्पा एकीकडे उभे होतो. प्रसंगाचं गांभीर्य बाजूला ठेवून एका गृहस्थाकडे इशारा करत अप्पांनी त्यांचे खास कमेंट्स फक्त मलाच ऐकू येतील इतक्या खालच्या आवाजात सुरू केले. मी काहीच प्रतिक्रिया देत नाही पाहून मग त्यांनी विचारलं, “तू ओळखतेस का त्याला ?'' मी नकारार्थी मान हलवली. तर त्यांनी जी ओळख सांगितली ती ऐकून आश्चर्य, अविश्वास आणि असंख्य प्रश्नचिन्हं माझ्या डोळ्यांत -चेहऱ्यावर उमटली असावीत. ती पाहून अप्पा मात्र गालातल्या गालात हसत होते.
एकदा अप्पांनी माझ्याशी बोलताना लक्ष्मीबाईंच्या “ख्रिस्तायना'तल्या लेखनाला दुय्यम दर्जाचं ठरवणारं विधान केलं. मी मुळात अशा वादात न पडणारी. त्यात अप्पांसारखे वडीलधारे आणि अधिकृत टिळकअभ्यासक. तरीही त्यांचं विधान मी माझ्या परीने खोडून काढण्याचा प्रयत्न ठामपणे केला. तेव्हाही ते असेच गालातल्या गालात हसले. अप्पा माझी परीक्षा बघत होते की काय, कोण जाणे! माझी ही शंका नंतर त्यांचे 'मित्रहो' ह्या पुस्तकातील 'ख्रिस्तायन-ग्रंथपूर्ति एक साहित्यिक चमत्कार' ह्या मालिकेतलं त्यांचं व्याख्यान वाचलं तेव्हा अगदी खरी ठरली. अप्पांना अशा फिरक्या घ्यायची फार सवय होती. तेव्हा त्यांचा चेहरा इतका साळसूद असायचा, की समोरचा माणूस पुरता त्यांच्या जाळ्यात फसून हमखास गोंधळलाच पाहिजे.
अप्पांशी खटका उडाला नाही, अप्पांनी कोणाची टोपी उडवली नाही अशी व्यक्ती दुर्मीळच असेल. त्यांनी केलेली कोटी समजायला समोरची व्यक्तीही तितकीच हुशार असली, की त्यांना त्या गोष्टी करण्यात मौज वाटे. आजोबांची बुद्धिमत्ता आणि आजीचा स्पष्टवक्तेपणा अप्पांमध्ये पुरेपूर उतरला होता. “एककल्ली फटकळ वल्ली' म्हणून लोक त्यांना वचकून असत.
पीएच डी संदर्भात असे ऐकिवात आहे, की अप्पांनी पुणे विद्यापीठात त्यांचं संशोधनपर टिळकसाहित्य पीएचडीचा प्रबंध म्हणून सादर करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी ह्या पदवीप्रीत्यर्थच्या लेखनासाठी मार्गदर्शक गुरू नाकारला. एका अर्थी ते योग्यच होतं. ज्या विषयावर त्यांचा आणि केवळ त्यांचा अधिकार आहे, अशा विषयासाठी त्यांचे गुरू कोण असू शकतात? परंतु त्यामुळेच पीएच डी पदवीसाठी त्यांचा प्रबंध स्वीकारण्यात आला नाही. माझ्यासारख्या काहींनी मात्र अप्पांनी जमवलेल्या सामग्रीवर पीएच डी प्राप्त केली!
अप्पांनी कादंबरी लिहिण्याचाही घाट घालून पाहिला. त्याचाही विषय टिळकचरित्र हाच घेतला. 'चालताबोलता चमत्कार' वाचकांना दाखवताना टिळकांबाबत काही गोष्टी अकारण त्यांनी वलयांकित करून दाखवल्या. त्यावर वाचकांचा विश्वास बसणं कठीण होतं. भाषाप्रभू रेव्हरंड भास्करराव उजगरे यांच्यासारख्या आदरणीय व्यक्तींबाबत बेधडक बिनबुडी विधानं केली. त्यावर मी 'महाराष्ट्र टाइम्स'मधून लेख लिहिला तेव्हा त्यांचं 'मुली, मला तसे म्हणायचे नव्हते' असं एका ओळीचं, समजूत घालणारं पोस्टकार्ड मला आलं. मग मीही विषय वाढवला नाही.
अप्पांच्याकडून कौतुकाची थाप मिळणं ही दुर्मीळ गोष्ट. एकदा नाशिकहून परतताना भर दुपारी अप्पांकडे कसं जायचं म्हणून मी माझं ‘चांदणचुरा’ हे ललित लेखांचं पुस्तक त्यांच्या लेटरबॉक्समध्ये एका ओळीच्या चिठ्ठीसह सरकावलं नि ठाण्याची बस धरली. ठाण्याला पोचायच्या आधी अप्पांचा दम देणारा फोन. “तू अशी कशी न भेटताच गेलीस ?'' मी कारण सांगितलं.
“तुझं पुस्तक एका बैठकीत वाचून काढावंसं वाटलं, हाच अभिप्राय! ... पुन्हा अशी न भेटता जाऊ नकोस. वेळ कुठलीही असली तरी!”' अप्पांचं वडीलधाऱ्याच्या अधिकारानं हे दम भरणं कौटुंबिक जवळिकीमुळे तर होतंच; शिवाय, 'चांदणचुरा’ आवडलं होतं म्हणूनही होतं. त्या रणरणत्या उन्हातल्या पुढच्या बसप्रवासात मी चक्क तरंगतच होते. त्यानंतर अप्पांच्या भेटीचा योग आलाच नाही...
वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना इंग्रजीत 'मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे! ह्या वाक्यात देण्याचा प्रघात 1959 सालाच्या सुमारास नुकताच सुरू झाला असावा. 'मे-ह्या-रि-आ-द-डे ' ही एवढीच अक्षरे लिहिलेले शुभेच्छा पोस्टकार्ड अप्पा त्यांच्या सहीनिशी काही खास लोकांना पाठवत असत. त्या काळी नव्यानेच सुरू झालेल्या ह्या रिवाजावरची त्यांनी कवितेतून दिलेली प्रतिक्रिया –
मे-ह्या-रि-आ-द-डे मे-ह्या-रि-आ-द-डे
गर्जन चौकडे आज चाले ।
मे-ह्या-रि-आ-द-डे वाजती चौघडे
वर्षे चोहींकडे आनन्दाश्रू ।
मे-ह्या-रि-आ-द-डे मे-ह्या-रि-आ-द-डे
कानां देई दडे जैघोषु हा ।
मे-ह्या-रि-आ-द-डे विश्वेश आरडे
त्रिभोनीं कडाडे जल्लोष हो ।
मे-ह्या-रि-आ-द-डे मे-ह्या-रि-आ-द-डे
घे घे यांतून धडे मिळती जे जे । (रुप्याची झालर)
अप्पा, आज तुमच्याच शब्दांत आम्ही तुम्हाला तुमच्या जन्मशताब्दीनिमित्त शुभेच्छा देत आहोत- अप्पा, मे-ह्या-रि-आ-द-डे !
– अनुपमा निरंजन उजगरे 9920102089 anupama.uzgare@gmail.com
अनुपमा उजगरे या मूळच्या अहमदनगरच्या. त्यांची शैक्षणिक प्रगती लग्नानंतर पती निरंजन उजगरे व सासरे हरिश्चन्द्र उजगरे यांच्या प्रोत्साहनामुळे घडून आली. त्यामुळे त्यांना सामाजिक जीवनात गती लाभली आणि त्यांची साहित्यविश्वात प्रतिष्ठा निर्माण झाली. त्यांनी लेखनच नव्हे तर संपादन आणि संशोधनही केले आहे. त्यांनी अनेक संस्थांमध्ये मानाची पदे भूषवली. त्यांनी व्यवसाय म्हणून शिक्षिकेची नोकरी केली. मराठी भाषा व साहित्य हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होत. (अधिक माहितीसाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
1 टिप्पण्या
वाह
उत्तर द्याहटवा