सांगलीचे सायकलिंग जगाशी जोडलेले! (Bicycle is trending in Sangali)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

सांगलीचे सायकलिंग जगाशी जोडलेले! (Bicycle is trending in Sangali)

 


सायकल हा नवा ट्रेंड समाजामध्ये तंदुरुस्तीसाठी म्हणून रुजत, वाढत आहे. सायकलस्वारी (सायकलिंग) हा खेळ, छंद, हौस म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. सायकल हे वाहन अनेक वाहनांच्या गलबल्यात स्थानिक प्रवास, छोट्या जा-ये करण्यासाठीदेखील उपयुक्त ठरत असल्याची जाणीव पुन्हा जनमनावर ठसत आहे. त्याला पर्यावरणरक्षणाचा असा उदात्त, नैतिक पदरपण जोडला गेलेला आहे. ऑटोमोटिव्ह वाहनांचा काही दशकांचा वरचष्मा बदलत्या परिस्थितीत लोपत आहे का? हा बहुधा जगातील सर्वत्रचा प्रत्यय सांगली जिल्ह्यातही येतो. ते कोरोना लॉकडाऊन काळात विशेष लक्षात आले. त्याच ट्रेंडमधून जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिक स्वप्निल कुंभारकर हे फुल आयर्नमॅन या शीर्षकाखाली जागतिक दर्ज्याचे सायकलपटू झाले आहेत. आणखी काहीजण त्यांच्या पाठोपाठ आयर्नमॅनसारख्या, जगभर मान्यता असलेल्या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी तयारी करत आहेत!

दीपक लेले

खरे तर, सांगलीला हौशी सांगलीला हौशी सायकलपटूंची परंपरा मोठी आहे. किशोरवयीन गटापासून ऐंशी वर्षांच्या वृद्धापर्यंत अनेकांनी सायकलिंगच्या विविध मोहिमा वेळोवेळी पूर्ण केल्या आहेत. सांगलीतील काही छांदिष्टांनी नेपाळमधील काठमांडू ते कन्याकुमारी, मुंबई ते कोलकाता, ओरिसातील जगन्नाथपुरीपर्यंतच्या मोहिमांत सहभागी होऊन वेगळा ठसा उमटवला आहे. त्यातील अर्क म्हणावे असे दीपक लेले. त्यांनी 1984 मध्ये, त्यांच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी न्यूयॉर्क ते लॉस अँजेलीस असा, आठ हजार किलोमीटरचा प्रवास सर्कशीत असते तशा एकचाकी सायकलवरून पूर्ण केला, तर त्यांनी त्याच सायकलवरून सांगली ते दिल्ली असा सोळाशेसाठ किलोमीटरचा प्रवास त्या आधी, 1982 मध्ये केला होता! लेले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात अभियंता म्हणून एकोणचाळीस वर्षे सेवा केली आहे. लेले यांच्या छत्तीस वर्षांपूर्वीच्या विक्रमी कामगिरीची आठवण सायकलिंगचा विषय निघाला की हमखास निघतेच. त्याकडे त्या वेळी त्या त्या व्यक्तीचा छंद, हौस म्हणून पाहिले गेले. तो समाजप्रवाह बनला नव्हता. पण सध्याची हकिगत वेगळी आहे. अनेक सांगलीकरांनी ऑनलाइन नोंदणी असलेल्या देशभरातील विविध ठिकाणच्या 50, 100, 200, 300, 500 किलोमीटर अंतराच्या सायकलस्वारींच्या स्पर्धा गेल्या वर्षभरात पूर्ण केल्या आहेत- प्रशस्तिपत्रे व पदके मिळवली आहेत.


सांगलीतील संस्था स्वत:देखील सायकलस्वारीचा छंद जोपासण्यासाठी वेगवेगळे उपक्रम करत आहेत. सांगली सायकल स्नेही’, कर्नाळमधील रोड स्पिन वॉरिअर्स अशी त्या संस्थांची नावे आहेत. ग्रूप मोहिमा स्पर्धांचे आयोजन हा त्यांच्या उपक्रमांतील महत्त्वाचा. त्यांनी योजलेल्या विविध स्पर्धांत राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पाँडिचेरी, हरियाणा, पंजाब अशा भारताच्या बहुतांश राज्यांतील सायकलस्वार भाग घेत आहेत. त्या ऑन लाइन स्पर्धांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या नेटवर्कमधून घडतात. स्पर्धक प्रत्यक्ष त्या ठिकाणी जमत नाहीत. प्रत्यक्ष सहभाग कोणी राष्ट्रीय स्पर्धेतही घेत नाही. नोंदणी ऑनलाइन करायची, स्पर्धेचे निकष स्थानिक पातळीवर पूर्ण करायचे. त्याचे ऑनलाईन रेकॉर्ड विविध अॅपच्या माध्यमांतून आयोजक संस्थेकडे पाठवायचे. आयोजक संस्था ठिकठिकाणांहून आलेल्या तशा विविध डेटाची तपासणी करते व निकाल लावते आणि कुरिअर, पोस्ट आदी मार्गांनी स्पर्धेतील सहभागाबद्दल प्रशस्तिपत्र, स्पर्धेत क्रमांक मिळाला असेल तर त्याचे पदक संबंधित विजेत्याला पाठवून देते. सारा ऑनलाइन कारभार! स्पर्धक त्यांची कामगिरी नंतर विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोचवतात. असे सायकलपटू सांगली जिल्ह्यात तयार होत आहेत. त्यांतील काही नावे सायकलवाले म्हणून लोकांच्या तोंडी रुळलीदेखील आहेत उदाहरणार्थ, शिराळ्याचे शिंगटे बंधू, सांगलीवाडीचा दत्ता पाटील, माधवनगरचे ऐंशीपार गोविंदकाका परांजपे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त हुसेन कोरबू. सांगलीचे भूतपूर्व पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश हे तर त्या क्षेत्रात आयडॉल ठरले आहेत. ते अनेक सांगलीकरांच्या संपर्कात असतात. हाफ आयर्नमॅन हा किताब मिळवणारे किरण साहू, डॉ. श्रीनिकेतन काळे, डॉ.शिल्पा काळे, शरद कुंभार, प्रीतम धामणे, डॉ गणेश चौगुले, अमित पेंडुरकर या व्यक्ती आहेत. सध्या प्रदीप सुतार, सुधीर भगत, मनोज देसाई, दीपक माळी, अमित सोनवणे, प्रेम राठोड  हे हाफ आयर्नमॅन किताबाची तयारी करत आहेत. त्यांचे प्रयत्न किरण साहू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.

सांगलीच्या सायकलस्वारांकडून सायकलस्वार म्हणून काही मागण्या व काही अपेक्षा व्यक्त होतात. सांगली-कोल्हापूर, सांगली-इस्लामपूर, सांगली-तासगाव, सांगली-तासगाव-कवठे महांकाळ परत सांगली असे काही मार्ग सरावासाठी वापरतात. काही जण सांगलीहून कोल्हापूर जिल्ह्यात नृसिंहवाडीला नियमित सरावासाठी जाणारेही आहेत. मात्र सांगलीकरांची खंत सायकलींसाठी मार्ग स्वतंत्र व सुरक्षित उपलब्ध नसणे ही आहे. सांगलीत सायकलिंग करणाऱ्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक असावा अशी मागणी जुनी आहे. त्या संदर्भात पाठपुरावा महापालिकेकडे सातत्याने होत असतो. कोल्हापूरला कागलजवळ पन्नास किलोमीटर लांब, पंधरा मीटर रूंद, बाजूला जाळी असा मार्ग खास सायकलिंगसाठी म्हणून तयार केला जात आहे. सांगलीत चांगला सराव करणारे वीस ते पंचवीस सायकलपटू आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सांगलीत सायकलिंग व रनिंग यांचा समावेश असलेली ड्युएथलॉन अशी स्पर्धा घेता येऊ शकते. आयर्नमॅन किताबासाठी प्रयत्न करणाऱ्यांना ती पूरक ठरू शकते असे त्या खेळाडूंचे म्हणणे आहे असे आयर्नमॅन स्पर्धा विजेते स्वप्निल कुंभारकर यांनी सांगितले.

स्वप्नील कुंभारकर

जगभरातील सायकलनिर्मिती कंपन्या कल्पक शोधांचा अवलंब करून आधुनिक पद्धतीच्या नवनव्या सायकली सतत बाजारात आणत आहेत. मात्र त्यांची देखभाल-दुरूस्ती करणारा कारागीर वर्ग नाही. पुण्यातील एक सायकल विक्रेते सायकलिंग करणाऱ्यांसाठी वर्कशॉप घेतात. तेथे सायकलस्वाऱांकडून साध्या ते अत्याधुनिक सायकली खोलून पुन्हा जोडण्यापर्यंत प्रात्यक्षिके करून घेतली जातात. त्यामुळे सायकलींच्या नित्य देखभालीचा विषय बऱ्यापैकी निकालात निघू शकतो. तशी एकदोन दुकाने सांगलीत होण्याची शक्यता दिसते. सांगलीत वाढणारे सायकलिंग इव्हेंटद्‌वारे पर्यटनाला जोडता येईल अशीही संधी आहे. सांगलीत निसर्गरम्य ठिकाणे यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य, मिरज पूर्व भागातील दंडोबा डोंगर, जुना पन्हाळा ही आहेत. ती डोंगराळ भागातील चढउतारांचे रस्ते असलेली अशी आहेत. तेथे हिल सायकलिंगसारखे इव्हेंट आयोजित केले, त्यांना प्रोत्साहन दिले तर ती जिल्ह्याच्या पर्यटनाची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. सागरेश्वरमध्ये तर मानवनिर्मित अभयारण्यात सायकलिंगद्‌वारे भटकंती करण्याची सोय आहे. निसर्ग, प्राणी, पक्षी यांचे दर्शन घेत वेगळा आनंद मिळवता येऊ शकतो अशी माहिती प्रदीप सुतार यांनी दिली.

-धोंडिराम पाटील 99224 30680 ddpatil2000@gmail.com

धोंडिराम दत्तात्रय पाटील हे सांगली जिल्ह्याच्या बिसूर गावचे. ते त्‍यांच्‍यावर शेती आणि माती यांचे संस्कार झाले असल्‍याचे सांगतात. त्‍यांनी शिवाजी विद्यापीठातून बी ए (हिंदी) बी.जे.सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्‍यांना गारगोटीच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयात बी ए, बी एड करत असताना वाचन, लेखन आणि काव्यरचना यांचा छंद जडला. त्‍यांनी बी ए ची पदवी मिळवल्यावर त्‍यांना पत्रकारिता खुणावू लागली. त्यांनी पत्रकारितेत पंचवीस वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या अभ्यासाचे विषय पर्यावरण, इतिहास, संस्कृती, बदलते जनमानस, देशी खेळ असे आहेत. त्यांनी सायकलिंग करत केलेल्या स्थानिक प्रवासावर आधारीत शंभराहून अधिक लेख लिहिले आहेत. पाटील 'अंनिस' चळवळीशी जोडलेले आहेत. त्‍यांनी गावात ‘लोकजागर’ मंच स्थापन करून त्याद्वारे लोकांचे प्रबोधन करण्‍याचा प्रयत्‍न केला.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रदीप सुतार

प्रदीप सुतार यांनी भटकंतीची आवड असल्यामुळे बाइकवरून भूतान, लेह-लडाख, स्पिती व्हॅली इत्यादी ठिकाणी मनसोक्त भटकंती केली आहे. ते व्यवसायाने प्रेस फोटोग्राफर. पण ते पंचवीस वर्षांपासून भारतातील जंगलांची भ्रमंती करून फोटोग्राफी करत आहेत. त्यांनी त्यांच्या भटकंतीतून पक्षी, प्राणी, वनस्पती यांचा अभ्यास केला आहे; त्यांनी संरक्षण व संवर्धन यांसाठी प्रयत्न केले आहेत. प्रदीप यांनी वन्यजीव छायाचित्रणाची प्रदर्शने सांगली, पुणे, मुंबई, गोवा, दिल्ली येथे व महाराष्ट्रात अन्य बऱ्याच ठिकाणी भरवली आहेत. त्यांचे रौद्रनावाचे  2005 च्या महापुरावरचे पुस्तक गाजलेले आहे. तसेच इस्रायल, इजिप्त, जॉर्डन आणि पॅलेस्टाईन या देशांमध्ये फोटोग्राफी केलेले त्यांचे एक आंतरराष्ट्रीय पुस्तकसुद्धा प्रकाशित आहे. त्यांची बरीच छायाचित्रे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. प्रदीप सुतार यांनी क्रीडा-खेळ या विषयाकडे जास्त लक्ष केंद्रित गेली पाच वर्षे केले आहे. ते अशोक कामटे शहीद मॅरेथॉन संयोजन समितीत संचालक आहेत. ती शर्यत आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलेली आहे. प्रदीप व त्यांचे मित्र यांनी मिळून सांगलीमध्ये मोठा सायकल ग्रूप तयार केला आहे. त्यात दीडशेच्या वर सायकलस्वार सहभागी आहेत.

प्रदीप सुतार 9422613254 pradeepsutar@gmail.com

----------------------------------------------------------------------------------------------

किरण साहू

किरण साहू हे मूळ ओरिसाचे, पण ते सांगलीकर झाले आहेत. ते व्यवसायाने टेक्स्टाईल डिझायनर. त्यांचे वडील भगवान यांचाही तोच व्यवसाय होता. किरण हे टेक्स्टाईल डिझायनिंगमधील डिप्लोमाधारक आहेत. किरण यांचा वावर कुपवाड, जयसिंगपूर, इचलकरंजी या ठिकाणच्या कापड उद्योगात आहे. पण त्यांचे खेळांचे वेड अधिक बोलके आहे. ते आयर्न मॅन स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून काम करतात. ते सांगतात, की त्यांच्या स्वत:साठी आयर्न मॅन खेळाडू व प्रशिक्षक बनणे हे आव्हान होते. ते आव्हान त्यांनी केवळ जिद्द व चिकाटी यांच्या जोरावर साध्य केले आहे. किरण साहू चौतीस वर्षे वयाचे आहेत. ते त्यांच्या जीवनक्रमात ओरिसा राज्यातून निघाले आणि नाशिक, मालेगाव, इचलकरंजी, जयसिंगपूर, कुपवाड असे मुक्काम करत सांगलीत येऊन स्थिरावले. त्यांना दोन मुली आहेत.


          किरण यांना 2013 पर्यंत पोहण्यासदेखील येत नव्हते. त्यांनी वाय.व्ही. कुलकर्णी नावाचे गृहस्थ पंचेचाळीस मिनिटे सतत पोहतात हे पाहून प्रेरणा घेतली. त्यांनी त्याच वर्षी पोहण्यास शिकून सलग पंचेचाळीस मिनिटे पोहण्याचे ध्येय साध्य केले. तेव्हाच त्यांना सायकलस्वारी छंदाची आठवण झाली. ते शाळेत असताना रोज आठ किलोमीटर सायकलिंग करत शाळेत जात. ते साध्या सायकलने सराव 2014-15 मध्ये करू लागले. दरम्यान, कोल्हापूरचे आकाश कोरगावकर आयर्न मॅन बनण्यात 2015 ला यशस्वी झाले. ती बातमी किरण यांच्यासाठी प्रेरणा ठरली व त्यांनी आयर्न मॅन बनण्याचा ध्यास घेतला. त्यांनी हाफ आयर्नमॅन किताब अधिकृत रीत्या प्राप्त केला आहे. त्यांचे लक्ष्य फुल आयर्न मॅन’ किताब मिळवणे हे आहे. आयर्न मॅन स्पर्धा स्प्रिंट, ऑलिंपिक, हाफ व फुल अशा चार प्रकारांत असते. प्रत्येक प्रकारात ठरावीक लक्ष्य पार करावे लागते. किरण पंधराशे मीटर पोहणे, चाळीस किलोमीटर सायकलिंग आणि दहा किलोमीटर रनिंग अशा आयर्न मॅनच्या आँलिंपिक विभागात पात्र 2017 मध्ये ठरले. त्यांनी हाफ आयर्नमॅनचा किताबासाठीचा सराव 2018 मध्ये पूर्ण केला. त्यांनी मुंबईत फुल मॅरेथॉन 2019 मध्ये पूर्ण केली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यांनी गोव्यात 2019 मध्ये एकोणिसशे मीटर पोहणे, नव्वद किलोमीटर सायकलिंग आणि एकवीस किलोमीटर रनिंग पूर्ण करत हाफ आयर्नमॅन हा किताब मिळवला.

किरण साहू 9021482211/8766942484 kiransahu0586@gmail.com

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


         स्वप्नील कुंभारकर
हे सांगलीचे पहिले आयर्नमॅन आहेत. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या आई सुरेखा या शिक्षिका होत्या तर वडील सत्यवान सामाजिक कार्यकर्ते. दोघेही प्रगतिशील विचारांचे. स्वप्नील यांनी सांगली शिक्षण संस्थेच्या सिटी हायस्कूलमध्ये माध्यमिक, तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विलिंग्डन महाविद्यालयात उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेतले. त्यांनी वालचंद महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली. मात्र त्यांची आवड पोहणे, रनिंग, सायकलिंग, ट्रेकिंग; त्याचबरोबर, पर्वतारोहण ही. त्यांना सायकलिंगचा ध्यास आठवी-नववीपासून होता. ते त्या ध्यासातून सांगली ते आळंदी व परत सांगली असे हिरो जेटवरून सात वर्षे फिरले. ते सायकल रपेट इतर अनेक ठिकाणी मारत. त्यांनी सह्याद्रीतील बहुतेक सगळे डोंगरी किल्ले 2010-11 पासून ते 2014 पर्यंत पालथे घातले. त्यांनी हिमाचल प्रदेशातील चद्दर ट्रेक, लेह-लडाखमधील हेमकुंड साहिब, सरपास हा ट्रेकही केला आहे. त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प (नेपाळ) 2015 मध्ये व एव्हरेस्ट सर्किट ट्रेक 2016 मध्ये पूर्ण केला. त्यांनी आयर्न मॅन स्पर्धेसाठी सायकलिंग, पोहणे, रनिंग यांचा सराव 2016 ते 2018 अशी दोन वर्षे केला.


         त्यांनी सातारा येथे होणारी सातारा हिल मॅरेथॉन पहिल्यांदा पूर्ण केली आणि त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला. त्यांनी श्रीलंकेत हाफ आयर्नमॅन स्पर्धा यशस्वी रीत्या 25 फेब्रुवारी 2018 रोजी पूर्ण केली. त्या स्पर्धेत 1.9 किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर सायकलिंग व 21.9 किलोमीटर रनिंग यांचा समावेश होता.

त्यांनी फुल आयर्नमॅन स्पर्धेसाठीचा सराव कोल्हापूरच्या पंकज व आशीष रावळू यांच्या मार्गदर्शनाखाली 'अर्हता' ग्रूपच्या माध्यमातून 2018 मध्ये सुरू केला.

त्यांनी 8000 किलोमीटर सायकलिंग, 2000 ते 2200 किलोमीटर रनिंग आणि 190 किलोमीटरपेक्षा पेक्षा जास्त पोहण्याचा सराव जून 2018 ते जुलै 2019 पर्यंत केला होता. ते ऑस्ट्रिया देशातील क्लँगेनफर्ट येथे फुल आयर्नमॅन किताबाचे मानकरी 7 जुलै 2019 रोजी ठरले. फुल आयर्नमॅन किताब मिळवणारे ते जिल्ह्यातील पहिले खेळाडू आहेत. त्यांनी त्यावेळी 3.8 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग व 42 किलोमीटर धावणे अशी कामगिरी चौदा तास अठ्ठावन्न मिनिटांत पूर्ण केली. निकष सतरा तासांत पूर्ण करण्याचा होता. पावसाने व्यत्यय आणला नसता तर त्यांची ही वेळ आणखी कमी झाली असती अशी चुटपूट ते व्यक्त करतात.

ते डेन्मार्कमध्ये कोपनहेगन येथे होणाऱ्या फुल डिस्टन्स आयर्नमॅन स्पर्धेसाठी सध्या सराव करत आहेत.

त्यांनी आतापर्यंत 27-28 हाफ मॅरेथॉन, चार फुल मॅरेथॉन, 50 किलोमीटरची अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केली आहे.

स्वप्नील कुंभारकर यांच्या टिप्स...

*प्रोटिन, कार्बोहायड्रेटसह, स्निग्ध पदार्थ व फळे असा चौरस आहार महत्त्वाचा आहे.

*आठ तासांची चांगली झोप गरजेची. 

*प्रत्येक व्यायाम वा विशेष क्षेत्रातील टार्गेट पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेल्याने दरवर्षी एकदा ब्लड व स्ट्रेस टेस्ट करून घेतली पाहिजेच.

*शारीरिक वजनानुसार प्रतिकिलो 1.2 ग्रँम प्रोटिन रोज आहारात घेतलेच पाहिजे.

स्वप्नील कुंभारकर 9028804199/9225828325 kumbharkar.swapnil@gmail.com

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आयर्न मॅन या जागतिक स्पर्धेची माहितीदेखील कुतूहल वाढवणारी आहे. आयर्नमॅन ही स्पर्धा स्प्रिंट, ऑलिंपिक, हाफ आयर्नमॅन व फुल्ल आयर्नमॅन अशा चार विभागांत होते. त्यातील आलिंपिक, हाफ आयर्नमॅन व फूल आयर्नमॅन या गटाला जास्त महत्त्व आहे. आयर्न मॅन स्पर्धेसाठी पुऱ्या कराव्या लागणाऱ्या शर्ती -

1. स्प्रिंट डिस्टन्स नऊशे मीटर स्विमिंग, वीस किलोमीटर सायकलिंग, पाच किलोमीटर रनिंग (वेळ साधारणपणे दोन तास)

2. ऑलिंपिक डिस्टन्स दीड किलोमीटर स्विमिंग, चाळीस किलोमीटर सायकलिंग, दहा किलोमीटर रनिंग (वेळ साधारणपणे साडेतीन ते चार तास)

3. हाफ आयर्नमॅन, 1.9 किलोमीटर स्विमिंग, नव्वद किलोमीटर सायकलिंग, 21.1 किलोमीटर रनिंग (वेळ साधारणपणे आठ/साडेआठ तास)

4. फुल आयर्नमॅन, 3.8 किलोमीटर स्विमिंग, एकशेऐंशी किलोमीटर सायकलिंग, 42.2 किलोमीटर रनिंग (वेळ साधारणपणे सतरा तास)

5. अल्ट्रा मॅन, तीन दिवस (प्रत्येकी बारा तास), अ) दहा किलोमीटर स्विमिंग, एकशेचाळीस किलोमीटर सायकलिंग, ब) दोनशेऐंशी किलोमीटर सायकलिंग, क) 84.4 किलोमीटर रनिंग.

महाराष्ट्रात दहा-बारा व्यक्तींनी हे निकष पूर्ण करून आयर्न मॅन किताब मिळवला आहे. तर भारतात आयर्नमॅन स्पर्धा यशस्वी रीत्या पूर्ण करणारे असे तीनशे ते साडेतीनशे खेळाडू असावेत.

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

12 टिप्पण्या

  1. सायकलिंग आणि छान टिप्स या लेखात आहेत भविष्यात नवं युवक युवती साठी उपयुक्त माहिती आहे

    उत्तर द्याहटवा
  2. Jabardast vishay ..maza aaya


    Recently few months ack Inpurchased secondhand cycle at 7000 and am proud of her ....cycling is amazing good article

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सातत्य महत्वाचं. मी स्वत: महिन्यातून किमान पंधरा दिवस व दोनशे किलोमिटर सांगली परिसरात सायकलिंग करतो. सांगलीत सायकलिंग खूप वाढलंय.

      हटवा