गोपाळकृष्ण गोखले |
गोपाळकृष्ण गोखले यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान बहुमुल्य आहे. ते बहुविध गुणांनी नावाजले गेले होते - भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे नेमस्तवादी पुढारी, उत्कृष्ट संसदपटू, देशभक्त राजकारणी, तर्कशुद्ध मांडणी शांतपणे करणारे अभ्यासू अर्थतज्ञ, सार्वजनिक सभेचे सचिव, ‘सुधारक’ या वृत्तपत्राचे संपादक, निर्भेळ बौद्धिक सामर्थ्याने प्रभावी भाषणे देणारे, स्वतःची मते ठामपणे मांडून श्रोत्यांमध्ये विचारमंथन घडवून आणणारे, केंद्रीय कायदेमंडळ हे लोकांना राजकीय शिक्षण देणारे खुले विद्यापीठ व्हावे व त्यासाठी प्रयत्न करणारे नम्र- समजूतदार पण स्पष्टवक्ते, भारत सेवक समाजाचे संस्थापक...
महात्मा गांधी व बॅरिस्टर जीना या दोघांनी गोखले यांना राजकीय गुरू मानले. त्यांचे शिक्षण कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथे झाले. गोखले यांनी पुण्याचे न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन कॉलेज येथे शिक्षकाची नोकरी केली. ते अर्थशास्त्र, गणित, इंग्रजी व इतिहास असे विषय शिकवत. ते विद्यार्थिप्रिय शिक्षक होते. न्यायमूर्ती रानडे यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. ते सार्वजनिक सभेच्या कार्यात व त्या सभेतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या त्रैमासिकाचे संपादक झाले. ते राष्ट्रीय सभेच्या कार्यात सक्रिय सहभागी 1889 पासून झाले. गोखले तेथे अल्पावधीतच Star Speaker ठरले. त्यांनी भारतीयांवरील करात कपात करावी, शिक्षणाचा प्रसार करून भारतीयांना क्रमाक्रमाने सरकारी नोकऱ्यांत समाविष्ट करावे हे ठराव पास करून घेतले. त्यांचे शब्द ‘शासकीय सेवांचे क्रमशः भारतीयकरण करा’ असे होते. गोखले यांनी भारतीय अर्थकारणाचे व्यवस्थापन, लष्करी व मुलकी खर्चाचे नियंत्रण या विषयावर सखोल चिंतनयुक्त मांडणी केली. सर्वांना त्यांच्या तर्कशुद्ध विचारसरणीची खात्री वेल्बी कमिशनसमोर मांडलेल्या मुद्यांवरून पटली. त्यांनी त्या विषयी तीन मुद्दे मांडले- 1. भारतीय तिजोरीवर ब्रिटिशांचे नियंत्रण असून त्या बाबत भारतीय नागरिक पूर्णपणे अधिकारहीन आहेत, 2. ब्रिटिशांचा खर्च अमर्याद वाढला आहे, 3. खर्चाचा किती भाग, हिस्सा भारत सरकारने व किती भाग, हिस्सा ब्रिटिश सरकारने उचलावा हे निश्चित करण्याची वेळ आली आहे. त्यांनी ते सांगताना ‘No Representation, No Taxation’ हे शब्द वापरले. ते प्रांतिक विधीमंडळात 21 डिसेंबर 1899 मध्ये निवडले गेले. त्या वेळी त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ व दुष्काळी कामावर राबणाऱ्या मजुरांच्या यातनांवर लक्ष केंद्रित केले. शिलकी अंदाजपत्रक 1902 मध्ये सात कोटी रूपयांचे मांडण्यात आले होते. त्यांनी त्यांच्या भाषणात ते अंदाजपत्रक व देशाची खरी आर्थिक परिस्थिती यांत ताळमेळ नसल्याचे स्पष्ट करून कर्झन यांच्या दडपशाहीला न घाबरता अंदाजपत्रकावरील सडेतोड मुद्दे मांडले. एका देशवासीय नेत्याने सरकारी निवेदनातील चुका ब्रिटिश राजवटीच्या इतिहासात प्रथमच दाखवल्या होत्या! त्यांच्या सूचना 1. भारतीय जनतेवरील करांचे ओझे कमी करावे, 2. लष्करावरील खर्चात कपात करावी, 3. मीठावरील कर, हिंदी विद्यापीठ कायदा, रेल्वे अंदाजपत्रक, सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण अशा अचूक व उपयुक्त होत्या. बी.आर. नंदा यांनी गोखले यांचे चरित्र लिहिले आहे. त्यात त्यांनी राष्ट्रीय वृत्तपत्रांनी गोखले यांच्या भाषणाची स्तुती केली असा उल्लेख केला आहे. कर्झन यांनी बंगालची फाळणी 1905 मध्ये केली. त्यावर गोखले म्हणाले, की “त्या फाळणीविरूद्ध उभी राहिलेली चळवळ ही देशाला कलाटणी देणारी ठरेल. बंगालच्या पाठीशी सारा देश उभा राहील. आमचे अंतिम ध्येय स्वराज्य, बहिष्कार, वसाहतींचे स्वराज हे आहे.” त्यांनी कर्झन यांच्यासारखा साम्राज्यवादी, कट्टर भारतद्वेष्टा, लॉर्ड शासक असतानाही त्यांच्या धोरणावर कडाडून टिका केली. त्याबद्दल त्यांची प्रशंसा करून, ‘देशसेवेबद्दल तुम्हाला C.I.E (Commandar Of Indian Empire) हा सन्मान दिला जात आहे’ असे पत्र कर्झन यांनी दिले. तो सन्मान गोखले यांनी नाकारला. गोखले यांनी 1909 च्या मोर्ले-मिंटो कायद्याला पाठिंबा दिला. त्यांना भारतासाठी अनुकूल धोरणे आखली जातील याविषयी खात्री होती. त्यांनी प्राथमिक शिक्षणाचे बिल कायदेमंडळात तीन वेळा, 1911 मध्ये मांडले. गोखले ब्रिटिश शासक व शासित यांच्यातील मध्यस्थाची भूमिका पार पाडत.
भारतीय जहालगट गोखले यांचे ‘मृदू उदारमतवादी’ असे वर्णन करत असे तर सरकार पक्ष त्यांना जहालवाद्यांचे प्रतिनिधित्व करणारे ‘छुपे राजद्रोही’ असे म्हणत असे. सरोजिनी नायडू यांनी गोखले यांचे वर्णन ‘व्यवहारवादी, परिश्रमी कार्यकर्ते व कल्पनेत रमणारा असे दुर्मीळ मिश्रण असलेले व्यक्ती’ असे केले होते. त्यांनी ‘भारत सेवक समाज’ हा समाज स्थापन करताना काही उद्दिष्टे ठरवली होती- 1. देशसेवा करताना स्वार्थी विचारांना थारा न देणे, 2. स्वत:मधील उत्कृष्ट असेल ते देशाला अर्पण करणे, 3. बंधुभाव विकसित करण्यासाठी पंथ, जात यांचा विचार न करणे, 4 पैशांच्या मागे न लागता निस्वार्थपणे काम करणारी, देशापुढील विविध प्रश्नांचा अभ्यास करणारी तरूण पिढी तयार व्हावी, 5. सनदशीर राजकारणास अनुकूल वातावरण तयार करावे, 6. देशउद्धाराचे कार्य करणारी एक संस्था निर्माण व्हावी.
दुःखनिवारण, समाजसेवा, समाजशिक्षण, सहकारतत्त्व, राजकीय चळवळ हे कामाचे स्वरूप ठरवण्यात आले. समाजाची कोनशिला शिवराम हरि उर्फ आण्णासाहेब साठे यांच्या हस्ते पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या टेकडीवर बसवण्यात आली (12 जून 1905). सदस्यांनी एकनिष्ठतेच्या शपथा सकाळी सूर्योदयाच्या वेळी घेतल्या. त्या संस्थेच्या शाखा देशभर उघडण्यात आल्या. त्या संस्थेच्या सभासदांनी देशहिताची अनेक कामे केली. त्या संस्थेमार्फत पुण्यातून ज्ञानप्रकाश, नागपूरहून हितवाद, लखनौहून हिंदुस्तान ही वृत्तपत्रे प्रकाशित होत. गोखले यांनी त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ एक संस्था उभारली. तिचे नाव ‘रानडे इंडस्ट्रीयल अँण्ड इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट’ असे ठेवले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अनेक शाळा व महाविद्यालये स्थापन झाली. शंभरांहून अधिक संस्था, सतरा केंद्रे, पाच कृषी प्रशिक्षण केंद्रे व चार संशोधन संस्था स्थापन झाल्या. लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या संबंधीच्या मृत्युलेखावर ‘मुहूर्त ज्वलीतं श्रेयो न च घूमायित चिर’ असे सुभाषित लिहिले. त्यांची वृत्ती सौम्यपणे कामे पार पाडण्याची असल्याचे म्हटले. गोखले स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहणारे होते. ते म्हणत, आपले चरित्र लिहिण्यात आणि पुतळे उभे करण्यात वेळ व शक्ती घालवण्यापेक्षा समाजाची अंत:करणापासून सेवा करावी. तरच देशाला सच्चे सेवक लाभतील. ते मवाळवादी होते. तर्कशुद्ध विचारसरणी व नैतिकता यांनुसार आचरण करणारे होते. त्यांचे विचार व तत्त्वज्ञान एका साच्यात बसणारे नव्हते. त्यांच्या विचारसरणीचा खरा अर्थ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समजतो. त्यांचे गुण कर्तव्याबद्दलची निष्ठा, शुद्ध आचरण, शिक्षणावर प्रचंड विश्वास, खुले व स्पष्ट विचार मांडण्याची वृत्ती आणि सहनशक्ती हे होते. नारायण रामचंद्रन यांनी ‘Gopal krishna Gokhale - A Forgotten Nationalist’ या लेखात महात्मा गांधी यांनी गोखले यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार उद्धृत केले आहेत- Gokhlale was as pure as a crystal, as gentle as a lamb, as brave as a lion and most perfect man in the political field. He was not Mass Leader, but he was Class Leader’.
- श्रुती भातखंडे 9273386230 shruti.bhatkhande@gmail.com
श्रुती भातखंडे यांनी एम ए, एम फिल (इतिहास) पर्यंतचे शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. त्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या (गणेशखिंड, पुणे) इतिहास विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. त्यांनी विविध चर्चा सत्रांत ठिकठीकाणी भाग घेतला आहे व शोधनिबंधांचे सादरीकरणही केले आहे. त्यांनी लोकमतमध्ये ओळख इतिहासकारांची हे सदर लिहिले होते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
1 टिप्पण्या
महत्वाचा लेख
उत्तर द्याहटवा