रायरंद किंवा बहुरूपी म्हणजे अनेक रूपे घेऊन लोकांचे मनोरंजन करणारा लोककलावंत. रायरंद, रायरंद्र, रार्इंदर हे शब्द मराठी भाषेतील रायविनोदी म्हणजे विदूषक, बहुरूपी, खुशमस्कऱ्या या अर्थाने वापरले जातात. बहु म्हणजे विविध किंवा अनेक आणि रूपे म्हणजे सोंगे. तुकाराम यांच्या एका अभंगात ‘बहुरूपी रूपे नटला नारायण। सोंग संपादून जैसा तैसा’ असा उल्लेख आहे. म्हणजे तुकाराम म्हणतात, भगवान विष्णू बहुरूपी असून त्यांनी दहा अवतार घेतले आहेत. संतांनी ईश्वराला ‘खेळिया’ असेदेखील म्हटले आहे. त्यावरून खेळ करणारा तो खेळिया आणि नानाविध रूपे घेणारा तो बहुरूपी होय. बहुरूपी या संकल्पनेला भारतीय जीवनरीतीत असा धार्मिक, सांस्कृतिक संदर्भ जोडला गेला आहे.
बहुरूपी या शब्दाची व्युत्पत्ती भारतीय संस्कृती कोशात दिलेली आहे, ती अशी- बहुरूपी ही भिक्षेकरी जमात आहे. ती मुख्यत्वे महाराष्ट्रात आढळते. ते लोक नावाप्रमाणेच बहुविध रूपे म्हणजे सोंगे घेऊन लोकांची करमणूक करतात व त्यांनी दिलेल्या द्रव्यातून उदरनिर्वाह चालवतात.
रायरंदमधील राय ही मानाची पदवी आहे, तर रंद, इंद, इंद्र या शब्दांना मराठीत काही अर्थ नाही. ‘रायरंद’ किंवा ‘बहुरूपी’ या नावाने ओळखली जाणारी संस्था ही मूलतः जात नसून, तो करमणूक हीच उपजीविका असलेला कलावंतांचा समाज, समूह आहे. रायरंद हे बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वीचे अस्पृश्यांचे (पूर्वाश्रमीचे महार) मागते आहेत. ते स्वतःला सोमवंशी म्हणवून घेतात. रायरंद मुलूखगिरीसाठी सगळ्या कुटुंबाला सोबत घेऊन जात. ते लोक सवारीसाठी उंट आणि घोडे यांचा वापर करत असत. तो रिवाज राजस्थानमधील भांड जमातीतील लोकांसारखा वाटतो. महाराष्ट्रात रायरंदांची संख्या फारच अल्प आहे. त्यांची वस्ती नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, दोंडाईचा या दोन ठिकाणी दिसते. रायरंद जमातीतील स्त्रिया सौंदर्यवान असतात असे लेखक रुस्तम अचलखांब यांनी नमूद केले आहे. रायरंदांकडे अस्पृश्यांची सात पिढ्यांची नोंद असते. ‘रायरंद’ हा बहुआयामी प्रतिभेचे प्रतीक असून तो उत्कृष्ट वक्ता, गायक, नर्तक आणि शीघ्रकवी असतो.
रायरंद हे 14 ऑक्टोबर 1956 पूर्वीच्या महार (आताच्या नवबौद्ध) या समाजाचे मनोरंजन व प्रबोधन करत; बौद्धवाड्यात बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा उपदेश गीतगायनाच्या माध्यमातून आंबेडकर-अनुयायांसमोर गात आणि बिदागी घेऊन उपजीविका भागवत. रायरंद यांची वतनाची गावे ठरलेली असत. एक रायरंद दुसऱ्या रायरंदाच्या वतनदारीत प्रवेश करत नसे. रायरंदाला वतनातील गावांमधील बौद्धधर्मीय (महार) कुटुंबांची सात पिढ्यांची वंशावळ मुखोद्गत असे. रायरंद हे अस्पृश्यांच्या सर्व सांस्कृतिक घडामोडींचे जणू केंद्र असत. रायरंद समाजातील कुटुंबांची घरे खुराड्यासारखी असल्यामुळे, सगळी वयस्कर मंडळी रात्री चावडीवर येऊन झोपत आणि त्यावेळी अनेक विषयांवर खलबते करत; लग्नाचे, श्राद्धाचे व इतर कार्यक्रम चावडीवरच होत असत. तमासगिरांची ढोलकी चावडीमध्ये खुंटीला टांगलेली कायमची असायचीच. औरंगाबादचे अभ्यासक प्रभाकर मांडे यांनी ‘गावगाड्याबाहेर’ या ग्रंथात रायरंद आणि बहुरूपी यांच्या संदर्भात संशोधनपर लेखन केले आहे.
रायरंदांचे मूळ गाव कोणते? त्यांची उत्पत्ती कशी झाली? याबाबत तेच एक आख्यायिका सांगतात- "आमचं मूळ कुटुंब जगतकरांचं. जगतकर हे मूळचे परळीचे आणि ह्या जगतकरांपासूनच निरनिराळी अशी आडनावं बनली. सिद्धनाथ मायनाक हा आमचा मूळ पुरूष आहे. तोही मूळ परळीचा होता. तो एक लढाऊ महार होता, सत्यवचनी होता. सिद्धनाथाच्या मुलाने एक सोंग आणले आणि त्याच्या जातिबांधवांची करमणूक केली. सिद्धनाथाने सोमवंशी असे बिरूद बाळगण्याचा आदेश दिला. तो समाज त्याचे जीवन एका विशिष्ट पद्धतीने जगतो. सत्त्वाची पूजा करतो, नैवेद्य करतो. त्याने बौद्ध झाल्यानंतरसुद्धा परंपरेने चालत आलेल्या काही रूढी सोडलेल्या नाहीत. ते पाचवीची आणि सतीची पूजा करतात. त्यांनी कान टोचणे, गोंदवून घेणे हेही परंपरेने चालू ठेवलेले आहे. मुलांचे केस उचलणे हेदेखील बौद्ध झाल्यानंतर प्रचलित राहिले आहे. तशा विधीसाठी ते सोदड, आंबा, कुबट, हरडी, रुई या झाडांचा पाला आणतात. ते त्यांचे जन्मदिवस लग्नासाठी वर्ज्य समजतात. ते लोक मढीची जत्रा, माळेगावची जत्रा, वणीची जत्रा, नेवासा तालुक्यामधील वरखेडची जत्रा येथे जमतात. ते शामशिंगी, शमादयी, बाळंतीण, नंदी, शंकर, पार्वती, म्हातारी, वाघ अशी सोंगे आणतात, त्यांच्यापैकी देवीदेवतांची सोंगे आणतात. निरनिराळी सोंगे आणून करमणूक करणे हाच त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे.
"रायरंदांवर आंबेडकरी विचारांचा मोठा प्रभाव आहे. ते त्यांच्या गीतांमधून हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा-परंपरांवर प्रहार करतात." औरंगाबाद येथील अर्जुन खरात या रायरंदाने बाबासाहेब आंबेडकर यांचे गौरवगीत गायले आहे. ते नमुन्यादाखल असे-
गायक-
फारच वाईट होता, पूर्वीचा काळ गं फारच वाईट होता, पूर्वीचा काळ गंबामनाला होत होता, आमचा विटाळ गं
भिमामुळं विटाळ गेला वं माय
भिमामुळं विटाळ गेला वं माय
बामनाचा जावई झाला वं माय
बामनाचा जावई झाला वं माय
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात एका रायरंदाने रचलेले गाणे असे-
मेरे भिमराज ने सबका भला किया-
शुरवीर बहाद्दुरने कलम से जला दिया
भिम ने हमारे वास्ते क्या-क्या न किया-
सब कुछ किया मगर किसी से पैसा ना लिया
तलवारी का धारी, भिम माझा दुधारी होता-
एकटाच भिम माझा माझा हो लाखाला भारी होता
साऱ्याच पुढाऱ्यांना तो बाबाचा धाक होता
भिमराव आमचा हो बापाचा बाप होता
गीत गायनाला जिथे-जिथे जातो-
आधी भिमरावा तुझे नाव घेतो-
अर्जुन जगदेव खरात यांनी त्यांची हकिगत सांगितली. त्यावरून रायरंदांचे अनेक पैलू कळत गेले. अर्जुन म्हणाले, ‘मी राहणार शुलीभंजन, तालुका खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद. मी बाळंतिणीचं, शिवाजीचं, तंट्या भिल्लाचं सोंग काढत असे. रूपचंद खरात या माझ्या काकांनी एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून सुभाषचंद्र बोस यांचा वेष घेऊन सरकारला फसवलं होतं. आम्ही बुद्धाचे मागते झालो. माझ्या वडिलांना बौद्ध झालेल्या जातबांधवांनी सांगितलं, की तुम्ही देवादिकांची सोंगं आता काढू नका. बुद्धाची, आंबेडकरांची गाणी गात तुमची गायन पार्टी सुरू करा. आम्ही बुद्धाची गाणी पेटी, ढोलकी घेऊन म्हणू लागलो. माझे वडील एके काळी ‘बाजीराव नाना, ओ बाजीराव नाना, तुंबडीभर देना, आता तुंबडीभर देना’ असे म्हणत गात फिरायचे-
‘तुंबडीभर देना बाजीराव नाना’ हे बहुरूप्यांचे लोकप्रिय गीत असे-
तुंबडीभर देना, बाजीराव नाना
घरी नाही दाना, हवालदार माना
शशावानी ताना, नाव ठेवा नाना
घवनकि माल बोलो, परभनी का जाना
राजा का घोडा बोले, बैठने का देना
चिंदे कि भाल बोले बुढ्ढे को देना
बहुरूप्यांच्या सामाजिक सोंगांच्या वेळी त्यांनी म्हटलेल्या गीतांमध्ये अद्भुत आणि बीभत्स रसांचे दर्शन प्रामुख्याने होते. 'तुंबडीभर देना'मधील वर्णन असे-
लग्नाला निघा तुम्ही लग्नाला लवकर निघा
लग्नाला जेवायला केली बरबट्याची पोळी
थूक लावून बोटं आंबाड्याची भाजी
मिठाचे लाडू निंबाडचा शिरा
"आम्ही उंटांचा व्यवसाय करतो. उंटांचे कार्यक्रम केले तर आम्हाला हजार रूपये आणि धान्य मिळते. आम्ही बाळंतीण बाईला उंटाच्या लेंडीचा शेक देतो. त्यामुळे तिची तब्येत चांगली राहते. रायरंद आणि बहुरूपी, आम्ही एकच. उंटावरचा सारन (उंटावर उपजीविका करणारा) म्हणजे ती आमची उपजीविका होती. पूर्वीचे सारन जे होते ते इतके जादूगार होते, की ते गावात मारूतीच्या मंदिराजवळ आले तर सगळे लोक त्यांना ‘बाबा आले, बाबा आले’ असे म्हणायचे आणि मग त्यांना धान्य वगैरे द्यायचे. रायरंद हे मुसलमान, बौद्ध आणि मराठा या तीन जातींचे आहेत. जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात येरे गावी मुसलमान रायरंद आहेत. मुसलमान रायरंद वाघ बनून मोहरममध्ये नाचतात. आम्ही मुखवटे वारूळाची माती, चिंचोके, कागदाची रद्दी यांपासून बनवतो."
जोकरचे सोंग |
"आम्ही रंगरंगोटीसाठी मुरदाडशिंग वापरतो. त्याच्यामुळे त्वचेवर वाईट परिणाम होत नाहीत. मुरदाडशिंग हा एक प्रकारचा दगड आहे. तो राजस्थानातून येतो. त्याची किंमत आठशे रूपये प्रतिकिलो इतकी असते. आम्ही स्वतः वेषभूषेमधील मुकुट आणि गळ्यातील माळा तयार करून घेतो. आम्ही तंट्या भिल्ल, शामादायी, साधू-संत, शंकरजी, यमराज, रेडा अशी सोंगे घेतो. यमराज आम्ही दोन प्रकारचे करतो; एक रेड्यावर बसणारा, त्याला रेड्याचे सोंग म्हणतो आणि एक रेड्याशिवाय, त्याला यमाचे सोंग म्हणतो. आम्ही एक शंकरजी खाली फिरणारा व एक शंकर नंदीवर बसणारा अशी सोंगे घेतो. शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून आम्हाला शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसाराची कामे मिळतात. त्यासाठी आमची पथनाट्याची संस्थादेखील आहे. बहुतांश समाज नोकरीधंद्यासाठी गुजरातमध्ये स्थायिक झाला आहे. काही लोक नवसारी, बारडोली, बोडोली, मोहाला, वानगाव येथे स्थायिक झाले आहेत.’
अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडासंभू येथे बहुरूपी समाजाची शंभर कुटुंबे आहेत. राजेश चांदभाई औंधकर हा युवक समाजातील मुलामुलींनी शिकले पाहिजे म्हणून तेथे प्रयत्न करत आहे. विदर्भात त्या समाजाची औंधकर, सातारकर, खेडेकर, फलटणकर, वैद्य, काळे, पठाणेकर, मिरजकर एवढ्याच आडनावांची कुटुंबे आहेत. ती आडनावे त्यांच्या गावावरून व व्यवसायावरून पडली आहेत. बहुरूप्याची सोंगे घेता घेता औषधींचा व्यवसाय करणारे ते वैद्य, औंधहून आलेले औंधकर अशी ती आडनावे पडली. समाजातील कोणालाही त्याचा धर्म-जात माहीत नाही. त्यांची जी भाषा आहे ती मराठी, हिंदी व उर्दू मिश्रित आहे. त्या भाषेत पाण्याला ‘निरमा’, दारूला ‘चिंगई’, तर मटनाला ‘नमाडी’ म्हणतात. ते त्या भाषेला ‘पारसी’ भाषा म्हणून संबोधतात.
राजेशचे आजोबा नजरुद्दीन जहरूभाई औंधकर सोंग घेऊन पुसद्याच्या राममंदिरात प्रत्येक रामनवमीला जायचे. त्यामुळे त्यांना संस्थानाच्या समितीने शेती दिली. बहुरूप्यांना शेती अशी गावा गावांत मिळाली होती. परंतु ती त्यांच्या ताब्यात राहिली नाही. टाकरखेडासंभू येथील गुलाबराव देशमुख (माजी खासदार के. टी. देशमुख यांचे वडील) यांनी जहरूभाईंना मुलांना शिकवण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनीही मुलांना शिकवले. जहरूभार्इंचे ज्येष्ठ पुत्र एन्.जे. औंधकर (एन्.जे.) हे त्या काळी दहा वर्ग शिकले. समाजातील ते पहिले शिक्षक आहेत. त्यानंतर त्यांच्या प्रेरणेने समाजातील काही विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेऊ लागले. समाजातील पहिली महिला शिक्षक होण्याचा मान ज्योती विकास वैद्य (पूर्वाश्रमीच्या ज्योती गफूर उपाख्य गणेश औंधकर) यांना जातो. बहुरूप्यांच्या चालीरीती मराठा-कुणब्यांप्रमाणे असतात. ते लोक बहिरोबा, जनाई-जोखाई, खंडोबा इत्यादी देवतांना भजतात.
रामदासस्वामींचे बहुरूपी म्हणून एक प्रसिद्ध भारूड आहे. ते असेः
खेळतो एकला बहुरूपी रे ।
पाहतां अत्यंत साक्षपी रे ।।धृ.।।
सोंगे धरीतां नानापरी रे ।
बहुतचि कळाकुसरी रे ।।
दाखवी अनेक धाता माता रे ।
बोलतो अभिनव धाता रे ।
सदा पडदे लावितसे रे ।
फौजा सोंगांच्या दावितसे रे ।।
गातो नाचतो वाजवितो रे ।
त्याग करतो देतो घेतो रे ।।
ऐखा हा भूमंडळी थोडा रे ।
पाहतां तयांसि नाही जोडा रे ।।
अखंड खेळतो प्रगटेना रे ।
पाहती उदंड तया दिसेना रे ।।
पाहो जाता अंतचि लागेना रे ।
दास म्हणे खेळता भागेना रे ।।
- प्रकाश
खांडगे
9829913600 prakash.khandge@gmail.com
(ललित, नोव्हेंबर-डिसेंबर
2019 वरून उद्धृत)
प्रा. प्रकाश खांडगे यांनी लोकसाहित्याचे आणि लोककलांचे अभ्यासक म्हणून भारतीय आणि राज्य पातळीवर लोकसाहित्य आणि लोककलांना सैद्धांतिक बैठक प्राप्त करून दिली. तसेच, त्यांनी विद्यापीठ पातळीवर लोककलांच्या अभ्यासाची नवी अभ्यासपद्धती तयार केली. त्यांनी लोकसाहित्य, लोककलेच्या क्षेत्रातील ज्ञानाचा तसेच व्यासंगाचा फायदा राज्यातील सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या दुर्लक्षित असलेल्या लोककलावंतांना करून दिला. खांडगे यांनी शासनाच्या लोककलांच्या संदर्भातील अनेक पथदर्शी विकास योजनांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. खांडगे यांनी 2004 मध्ये मुंबई विद्यापीठात लोककला अकादमीची मुहूर्तमेढ रोवली. ते मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतून प्राध्यापक म्हणून निवृत्त 2017 मध्ये झाले. त्यांनी लोककला अकादमीचे विभाग प्रमुख पद सांभाळताना पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम, प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार केले. खांडगे यांच्या प्रयत्नाने लोककला अकादमीत पीएच. डी. संशोधन केंद्र सरु झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केली. ते लोकसाहित्य, लोककलेच्या संशोधन क्षेत्रात तसेच, मुक्त पत्रकारितेत 1978 पासून आहेत. त्यांनी लोकसाहित्य, लोककला आणि लोककलावंत यांच्या संदर्भात विस्तृत लेखन केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 टिप्पण्या