अनुपमा उजगरे : लेखन आणि कार्य यांची अनोखी वीण (Literary Activist Anupama Ujgare)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

अनुपमा उजगरे : लेखन आणि कार्य यांची अनोखी वीण (Literary Activist Anupama Ujgare)


अनुपमा उजगरे
लेखिका अनुपमा उजगरे या मूळच्या अहमदनगरच्या. त्यांची शैक्षणिक प्रगती लग्नानंतर पती निरंजन उजगरे व सासरे हरिश्चन्द्र उजगरे यांच्या प्रोत्साहनामुळे घडून आली. त्यामुळे त्यांना सामाजिक जीवनात गती लाभली आणि त्यांची साहित्यविश्वात प्रतिष्ठा निर्माण झाली. त्यांनी लेखनच नव्हे तर संपादन आणि संशोधनही केले आहे. त्यांनी अनेक संस्थांमध्ये मानाची पदे भूषवली. त्यांनी व्यवसाय म्हणून शिक्षिकेची नोकरी केली. मराठी भाषा व साहित्य हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होत.
निरंजन उजगरे हे मराठीतील मान्यवर कवी. त्यांचे अकाली निधन झाले. उजगरे घराण्यातच साहित्याचे वातावरण होते. निरंजन यांचे आजोबा भास्करराव उजगरे यांनी रेव्हरंड टिळक यांची कविता भाग 1 व भाग 2 चे संकलन व संपादन केले होते. निरंजन यांचे वडील हरिश्चंद्र हे 'ज्ञानोदय' (स्थापना 1842) या मासिकाचे 1978 ते 1994 मध्ये संपादक होते. त्यांचा 'जागर' हा संपादकीय लेखसंग्रह 1986 साली प्रकाशित झाला. निरंजन यांची आई उषा उजगरे यांचेही 'एक एक वेस ओलांडताना' हे प्रवासवर्णन प्रसिद्ध झाले आहे. अनुपमा म्हणतात, “रेव्हरंड टिळक यांच्याविषयीची व कविता या विषयांवरील बरीच पुस्तकेही घरात होती, त्याबाबत व त्या अनुषंगाने इतर विषयांवर चर्चा होत असत. त्यामुळे त्या विषयाची व एकूण साहित्याची गोडी मला लागली; तसेच, सानेगुरुजींच्या साहित्यामुळे वाचनाची आवड निर्माण झाली.
अनुपमा यांनी शिक्षिका म्हणून नोकरी जे.जे.अॅकॅडमी (मुलुंड-मुंबई) येथे केली. त्यांनी एम ए व पीएच डी ही केले. त्यांच्या पीएच डी चा विषय होता 'रेव्हरंड टिळक यांची कविता'. त्या शाळेत मराठी विषय शिकवत. त्यांनी विद्यार्थ्यांना कवितेच्या माध्यमातून साहित्याची गोडी लावली. त्यांनी शाळेत एक वेगळाच उपक्रम घडवला. ज्या महिन्यात प्रत्येक वर्गातील ज्या मुलाचा वाढदिवस असेल त्याने कमीत कमी एक रुपया व अधिकचे इच्छेप्रमाणे पैसे जमा करावे. अनुपमा त्यात स्वतःच्या कमाईची भर टाकत. मुले त्या पैशांतून मूकबधिर विद्यालयाला हवी असेल ती वस्तू भेट देत. जमाखर्चाचा हिशोबही मुलेच सांभाळत. त्या विद्यार्थ्यांना त्यांचे जुने कपडे आणण्यास सांगत आणि कपड्यांचा तो गठ्ठा गरीब वस्तीत वाटण्यास मुलांना घेऊन जात. त्यांचा तो उपक्रम पालकांनी स्वीकारला आणि मुख्याध्यापकांनी गौरवला. दया-करुणा या भावना मुलांमध्ये निर्माण झाल्या पाहिजेत; तसेच, मुलांना देण्याचीही सवय असली पाहिजे असे त्यांना वाटते. रोटरी क्लब आणि लायन्स क्लब या संस्थांनी त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे. एकदा, निरंजन आणि अनुपमा उजगरे अंधांच्या शाळेत कार्यक्रमासाठी गेलेले होते. त्यांनी शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या कविता ऐकल्या. त्यांना कविता आवडल्या त्यांतील वैचारिक क्षमता जाणवली. उजगरे दांपत्याने त्या कवींच्या कविता संकलित करून 'काळोखातील कवडसे' आणि 'काळोखात तिरीप' या दोन पुस्तकांचे प्रकाशन घडवून आणले.
 अनुपमा व निरंजन उजगरे
निरंजन व अनुपमा उजगरे यांना विविध भाषांमधील साहित्याची, विशेषत: कवितांची ओढ होती. त्यांनी संयुक्तपणे दूरदर्शन व आकाशवाणीसाठी कार्यक्रमांचे लेखन केले. संकल्पना निरंजन यांची व त्या अनुषंगाने आवश्यक असे साहित्य संशोधन व लेखनात मदत अनुपमा करत. त्या उभयतांनी लिहिलेल्या आकाशवाणीवरील 'हिरकणी' या संगीतिकेमुळे, मुंबई आकाशवाणीला विभागीय पुरस्कार मिळाला होता. अनुपमा अभिमानाने नमूद करतात, "माझ्यातील क्षमतांची जाणीव मला निरंजन यांनीच करून दिली व कोणत्याही कामात एकमेकांना सहकार्य करायचे असा आमचा अलिखित रिवाज होऊन गेला." निरंजन यांचा जेव्हा एक मोठा अपघात झाला आणि कुबड्या घेऊन चालण्याची वेळ आली तेव्हा अनुपमा यांनी चक्क त्यांची फॅक्टरी (निरंजन इंजिनीयरिंग वर्क्स) चालवण्यास घेतली. पुढे, निरंजन बरे झाले, तरीही अनुपमा मॅनेजर म्हणून अकरा वर्षे फॅक्टरीत काम करत होत्या.
निरंजन हे जग मध्येच सोडून गेल्यानंतरही अनुपमा यांचा साहित्यप्रवास सुरूच राहिला. त्यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी; तसेच, पंजाबी भाषांमधील साहित्याचा अनुवाद केला आहे. त्यांनी सागर' या हिंदी कादंबरीचा मराठीत, तर कहनया मराठी काव्यसंग्रहाचा हिंदीत अनुवाद केला आहे. मौनदेखील बोलतं’(तेलगु कवी अरुणा गोपी), 'सुरजित पातर यांची कविता' (पंजाबी) हे त्यांचे मराठी अनुवाद गाजले आहेत. मनोहर बाथम ह्यांच्या 'सरहदसे' आणि 'फीर सरहदसे' या दोन संग्रहांचा 'सीमेवरून' हा अनुवाद केला आहे. त्या म्हणतात, “निरनिराळ्या भाषांतील साहित्य हे त्या त्या भाषेमुळे वेगवेगळे भासत असले आणि प्रादेशिक प्रतिमा कदाचित वेगळ्या असल्या तरी स्थायिभाव, प्रेम, वात्सल्य, शृंगार या भावना सर्वत्र सारख्याच असतात.
अनुपमा यांनी निरनिराळ्या साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले आहे. ते उत्तम दर्ज्याचे मानले गेले आहे. 'जाण '(कथासंग्रह), 'सांगी '(काव्यसंग्रह), 'चांदणचुरा' (ललितलेखन), 'तुम्हाला काय वाटतं' (वैचारिक लेख), विष्णुशास्त्री चिपळूणकर, पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, शैलजा बेडेकर, रत्नाकर साळवी (चरित्रलेखन), ‘उगवतीच्या क्षितिजाकडेआणि सांताक्लाज(एकांकिका) असे लेखन अनुपमा उजगरे यांचे आहे. त्यांची कविता नववीच्या (मराठी उच्चस्तर) पाठ्यपुस्तकात होती. पं. रमाबाईहा पाठ इंग्रजी माध्यमाच्या सातवीच्या पाठ्यपुस्तकात आहे. तसेच, मुंबई विद्यापीठाच्या बी ए प्रथम वर्षाला 'वाण' ही कविता आहे. त्यांचे लेखनाचे सातत्य वाखाणावे असेच आहे. परंतु त्याची पुरेशी दखल साहित्यजगात घेतली गेलेली नाही. त्याचे कारण त्यांचे संस्थात्मक काम आणि संशोधनाचा ध्यास हे असावे. त्या मुंबई मराठी साहित्य संघात साहित्य विभागाच्या सदस्य आहेत. त्यांच्यावर पदाधिकारी म्हणून जबाबदारी नसली तरी कार्यक्रम संयोजनात सहभाग, साहित्य दिवाळी अंकाचे संपादनसाह्य असे विविध तऱ्हेचे, पडेल ते काम करतात. त्यांचे संशोधन कार्य मुख्यत: दोन प्रकारचे आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळासाठी महाराष्ट्राचा खाद्यसंस्कृती कोशबनवला. त्या कामासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांत प्रवास करून अनेक जिल्ह्यांतील महाराष्ट्रीयन पदार्थांच्या कृती उतरवून घेतल्या. खाद्यसंस्कृती कोश’ 2016 साली प्रकाशित झाला. विष्णू मनोहर आणि सुनंदा पाटील हे त्यांचे संपादन सहकारी होते. त्यांनी खाद्यसंस्कृतीविषयक म्हणी आणि वाक्प्रचार यांचेही पुस्तक लिहिले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने 2017 18 साली, 'महाराष्ट्राबाहेरील मराठीची सद्यस्थिती' याविषयी संशोधन करण्यासाठी इतर राज्यांचा दौरा करण्याची कामगिरी अनुपमा यांच्यावर सोपवली. महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांची ती कल्पना. अनुपमा यांनी इंदूर, भोपाळ व गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक अशा राज्यांतील मराठीसाठी काम करणाऱ्या संस्थांना भेटी देऊन, लेखकांशी संवाद साधून अहवाल सादर केला.
त्यांना निरनिराळ्या जिल्ह्यांतील साहित्य संस्थांनी लेखनासाठी पुरस्कार जाहीर केले आहेत कुसुमाग्रज पुरस्कार, पुणे (2004) ; विशाखा पुरस्कार, नाशिक; आरती प्रभू पुरस्कार, रत्नागिरी (2005); पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर (2005);  साहित्य गौरव, मुंबई (2006); स्मिता पाटील साहित्य पुरस्कार, शिरपूर; राजाभाऊ गवांदे - कोकण मराठी साहित्य परिषद पुरस्कार, मालगुंड (2012).

अनुपमा उजगरे 9920102089
anupama.uzgare@gmail.com
मेघना साने मुंबई विद्यापीठाच्या एम ए, एम फिल पदवीधारक असून, त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठी रंगभूमीवर नाट्यसंपदाच्या 'तो मी नव्हेच'सुयोगच्या 'लेकुरे उदंड झाली' या नाटकांमधून पाच वर्षे भूमिका केल्यानंतर एकपात्री प्रयोगाची स्वतंत्र वाट चोखाळली आहे. त्यांनी 'कोवळी उन्हे' या स्वलिखित एकपात्री प्रयोगाचे देशविदेशांत दौरे केले आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 



टिप्पणी पोस्ट करा

14 टिप्पण्या

  1. फार छान माहिती आहे. अनुपमा बाईंच्या अफाट कार्याचा संक्षिप्त परिचय
    मंदाकिनी सिंग

    उत्तर द्याहटवा
  2. फारच महत्वाचे संकलन आहे हे मेघना .

    उत्तर द्याहटवा
  3. मा .अनुपमा उजगरे यांचा जीवनपट उलगडणारा हा लेखन प्रवास आहे .अक्षरयात्री प्रतिष्ठानने घेतलेल्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या . साहित्यिक म्हणून हे व्यक्तिमत्व जितका मोठा आहे तितक्याच त्या उत्तम समाजसेविका आहेत पण त्याहून अधिक पटीने त्यांच्यातील माणुसकी जिंदादिल आहे .एकदा भेटलं की माणसाच्या मनात एक घर पक्क होऊन जातं असं हृदय घेऊन वावरणाऱ्या अनुपमाताई माझा तर जीव की प्राण आहेत .
    त्यांच्या हातून उदंड लेखन घडो .

    उत्तर द्याहटवा
  4. कवयित्री अनुपमा उजगरे यांचा परिचय उत्तम करून दिला आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. अनुपमा ताईंचा हा लेखन प्रवास अतिशय सुंदर आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. अनंत य जोशी मुलुंड पूर्व२८ ऑगस्ट, २०२० रोजी १:०४ PM

    अनुपमा ताईंचा सर्व समावेशक असा परिचय. एक दोन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून जुजबी ओळख झाली, परंतु त्यांच्या साहित्यिक कार्याचा एवढा मोठा आवाका आज कळला.

    उत्तर द्याहटवा

  7. अनुपमा ताईंचा साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा समग्र परिचय मेघनाताईंनी नेमक्या शब्दांत करून दिला आहे. जे मागे राहतात त्यांना आपल्या बरोबर कसे घेता येईल अशी शहाणीव बाळगणाऱ्या व्यक्ती फारच दुर्मिळ. अनुपमाताई ह्या त्यापैकी एक.. साहित्यिक कर्तृत्वाबरोबर अनपमाताई यांच्या सामाजिक कार्याचाही मेघनाताईनी उल्लेख करून त्यांच्या व्यक्तीमत्वाचा वेगळा पैलू वाचकासमोर आणला आहे. छान परिचय करून दिल्याबद्दल मेघनाताईंचे आभार...

    उत्तर द्याहटवा

  8. अनुपमा ताईंचा साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा समग्र परिचय मेघनाताईंनी नेमक्या शब्दांत करून दिला आहे. जे मागे राहतात त्यांना आपल्या बरोबर कसे घेता येईल अशी शहाणीव बाळगणाऱ्या व्यक्ती फारच दुर्मिळ. अनुपमाताई ह्या त्यापैकी एक.. साहित्यिक कर्तृत्वाबरोबर अनपमाताई यांच्या सामाजिक कार्याचाही मेघनाताईनी उल्लेख करून त्यांच्या व्यक्तीमत्वाचा वेगळा पैलू वाचकासमोर आणला आहे. छान परिचय करून दिल्याबद्दल मेघनाताईंचे आभार...

    उत्तर द्याहटवा
  9. आपल्या प्रतिक्रिया ऊर्जा देणा-या आहेत, आभारी आहे.
    _अनुपमा निरंजन उजगरे

    उत्तर द्याहटवा
  10. साहित्यिक प्रवास अभ्यासपूर्ण छानच उलगडला आहे.

    उत्तर द्याहटवा
  11. अनुपमा ताई म्हणजे झपाटलेल्या लेखिका आहेत. त्यांच्याबरोबर लेखन करण्याची अनेकदा संधी आली आणि प्रत्येक वेळेला ते सुखद असे अनुभव झाले. त्या म्हणतात, त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांचे जीवन एक शाप आहे; तरीदेखील साहित्यनिर्मितीला आपले जीवन समर्पित करून त्यांनी जीवनाचे सोने केले आहे!त्यांना पुढील आयुष्यात सुख शांती चिंतितो!
    फादर मायकल जी. वसई.

    उत्तर द्याहटवा