घारे यांना छळणारी कोडी (Knowledge - Where it comes from)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

घारे यांना छळणारी कोडी (Knowledge - Where it comes from)

दीपक घारे
दीपक घारे हे चित्रकार सुहास बहुळकर यांना त्यांच्या लेखन-संशोधन कार्यात हक्काचे व प्रेमाचे साथीदार लाभले आहेत. खरे तर, घारे हे स्वयंप्रज्ञेचे लेखक-चित्रकार. त्यांना साहित्यकलेबद्दल आत्मीय आस्था. त्यांचे स्वतःचे शिक्षण चित्रकला व मुद्रण तंत्रज्ञान यांतील, पण त्यांनी साहित्यातही लेखक-समीक्षक म्हणून नाव कमावले. ते 'विवेक' चरित्रकोशात आणि 'पंडोल'च्या महाराष्ट्राच्या कला इतिहासात बहुळकर यांच्याबरोबर गेली काही वर्षे गुंतून गेले होते. त्यांनाही त्या कामातून रिकामे झाले असतानाच, लॉकडाऊन झाल्यामुळे एकदम रितेपण आले. ते म्हणाले, की प्रथम एक विश्रांत अशी अवस्था आली, कारण मनात गेल्या काही वर्षांतील कामाचे संदर्भ असायचे, काही कोडी छळत राहायची. म्हणजे चरित्रकोशावेळी प्र.ग.सिरूर यांच्याबद्दल फार माहिती मिळाली नव्हती. मधल्या काळात त्या संबंधात काही महत्त्वाचे तपशील हाती आले. ते म्हणाले, की इंग्रजी ग्रंथासाठी सत्तावीस नोंदी अधिक लिहून झाल्या. सिरूर यांचा काळ वॉल्टर लँगहॅमरचा, द.ग.गोडसे यांच्या आधीचा. सिरूर फार सिद्धहस्त आणि कल्पक चित्रकार-संयोजक होते. खरे तर, तेच लँगहॅमरनंतर 'टाइम्स ऑफ इंडिया'चे आर्ट डिरेक्टर व्हायचे, पण तेथे गोंधळेकर यांची निवड झाली. सिरूर त्यांची नोकरी सोडून निघून गेले. संशोधन कार्यातील असे मानवी नाट्य बराच काळ मनाला मोहवत राहते - घारे यांनी जोड दिली.
          त्यांनी व मी मिळून 'ग्रंथाली'-ज्ञानयज्ञात सव्वाशे पुस्तके निर्माण केली. त्यावेळी त्यांचे प्रेम व ठामपणा, दोन्ही अनुभवले. पारंपरिक मुद्रणकला अस्तंगत होत असल्याच्या  व डिजिटल प्रिंटिंग येत असल्याच्या काळात त्यांचा जो हक्काचा किल्ला तो कोसळून पडला आहे. ते प्रिंटिंग टेक्नॉलॉजी स्कूलमधील प्राध्यापकाच्या नोकरीतून निवृत्त झाल्यावर गेली आठ-दहा वर्षे विविध तऱ्हांचे सखोल लेखन करत आहेत. त्यामधून त्यांची पुस्तके निर्माण होत आहेत. घारे यांनी विविध तऱ्हांचे लेखन केले आहे - अगदी मुद्रणप्रत कशी तयार करावी येथपासून मोठमोठ्या चित्रकार-शिल्पकार यांच्या कलास्वादापर्यंत. त्यांचे लिओनार्डोवरील पुस्तक प्रसिद्ध आहे. कलाक्षेत्रातील संकल्पना उलगडून सांगाव्या त्या घारे यांनी. त्यांची वैचारिक पुस्तके विचारचिंतनास मोठा आधार असतात. पुन्हा त्यांची पुस्तके 'मौजे'पासून ते 'लोकवाङमय'पर्यंतच्या प्रतिष्ठित प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेली आहेत. परंतु घारे यांना त्यांचे साहित्यकलासमीक्षा क्षेत्रातील विशेष स्थान कधी लाभले नाही, याचे कारण त्यांचा संकोची, अबोल, मागे मागे राहण्याचा स्वभाव.  

          ते म्हणाले, की या सक्तीच्या विश्रांतीच्या काळात दोन पुस्तकांसाठी माझेच लेखन एकत्र करण्याचे काम करत आहे. एका संग्रहात चित्रकला व इतर यांबाबतचे लेख संकलित करत आहे, तर दुसऱ्यात वैचारिक लेख. त्या लेखांतील ताजे संदर्भ, ते एका सूत्रात गोवणे, त्यानुसार त्यांतील पुनर्लेखन असे बरेच काम आहे! ते दोन्ही पुस्तकांना मोठ्या प्रस्तावना लिहीत आहेत.
          त्यावरून विद्वत्ता, प्रगल्भता अशा मानवी गुणांचा विषय निघाला. मला स्वतःला कोणतीही सैद्धांतिक चर्चा माझ्या सभोवतालात, वास्तवात अजमावून पाहावीशी वाटते. घारे यांनी (व मीही) षांताराम पवार व सुहास बहुळकर हे दोन पिढ्यांतील व्यासंगी चित्रकार जवळून पाहिले. मी म्हटले, की बहुळकर माहिती शोधून काढतात, ससंदर्भ स्पष्ट करतात व त्यामधून त्यांची अंतर्दृष्टी स्पष्ट करतात. उलट षांताराम पवार यांचे उत्स्फूर्त, इंट्युएटिव्ह असे सारे प्रतिपादन असायचे. त्यांनी ऐतिहासिक, वैचारिक असे फार वाचले नव्हते, पण स्वयंप्रज्ञेने साऱ्या कलाव्यवहारावर मूलभूत असे भाष्य करायचे आणि त्यामुळेच त्यांचा शिष्यपरिवार त्यांच्याशी बांधला राहायचा व अजूनही आहे. त्यांची प्रज्ञा ऋषीमुनींसारखी होती. घारे यांनी एक समर्पक उदाहरण दिले. ते म्हणाले, की पवार यांना भाषाविज्ञान हा विषय त्या नावापलीकडे अवगत नव्हता, परंतु त्यांनी मिलिंद मालशे यांच्या 'आधुनिक भाषाविज्ञान' या विषयावरील पुस्तकाचे लोकवाड्मय प्रकाशनासाठी केलेले मुखपृष्ठ पाहवे. अचंबा वाटतो. जणू त्या कलाकाराला त्या विषयाची माहिती मुळापासून आहे असे वाटते. मग प्रश्न पडतो हे सारे येते कोठून? बहुळकर-घारे हे स्वयंसिद्ध कलावंत चित्रकलेचा इतिहास संकलित करण्यास का प्रवृत्त होतात?
दीपक घारे 9969411364 gharedeepak@rediffmail.com
- दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
एका चर्चासत्रात बोलताना उजवीकडून दीपक घारे, वसंत डहाके आणि सुधीर पटवर्धन 
 

 
 दीपक घारे यांची पुस्तके


'एनसायक्लोपीडिया ऑफ आर्ट इन महाराष्ट्र' या पुस्तकाचे संपादन बहुळकर आणि घारे या जोडीने केले.
----------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. श्री दीपक घारे त्यांच्या साहित्यातून आणि कलाकारांविषयी लिहिलेल्या लिखाणातून केवळ आताच्या पिढीसाठी नाही तर पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी मोलाचं कार्य करत आहेत.

    उत्तर द्याहटवा
  2. श्री दीपक घारे त्यांच्या साहित्यातून आणि कलाकारांविषयी लिहिलेल्या लिखाणातून केवळ आताच्या पिढीसाठी नाही तर पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी मोलाचं कार्य करत आहेत.

    उत्तर द्याहटवा