माऊलींच्या पालखीचा आळंदी ते पंढरपूर हा पायवारीचा सोहळा होणार नाही हे
ऐकून एकीकडे गलबलून येत आहे, तर दुसरीकडे माऊलींच्या पादुका
हेलिकॉप्टरने पंढरपुरास जाणार याचा आनंदही वाटत आहे. वारकऱ्यांच्या हिताच्या
दृष्टीने तो निर्णय योग्यच आहे. कोरोना साथीमुळे शेतीची कामे खोळंबली आहेत; खाण्यापिण्याची-जगण्याची भ्रांत आहे.
सर्व स्थिरस्थावर होण्यास काही काळ जाणे आणि त्यासाठी सामाजिक बंधन पाळणे
अत्यावश्यकच आहे. कालाय तस्मै नमः!
वारीचे वेध दरवर्षी चैत्री वारी, ज्येष्ठ निर्जला एकादशी येथपासूनच लागलेले
असतात. मला आठवते, मी एम.ए.च्या निमित्ताने ग्रंथश्रेष्ठ
ज्ञानेश्वरी हातात घेतली आणि त्या अनुषंगाने माझ्या मनी एक अभंग कोरला गेला, ‘माझ्या जीवींची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी। जाईन गे माये तयां
पंढरपुरा। भेटेन माहेरा आपुलिया।’ माऊलींनी खांद्यावर पताका घेऊन आळंदीहून पंढरपुराकडे ज्येष्ठ वद्य
अष्टमीला प्रस्थान ठेवले, त्या पायवारीचा अनुभव आपणही
घ्यावा- एकदा तरी, हे मी मनात ठेवून वारीविषयी जाणून घेऊ
लागले.
भारतात आणि महाराष्ट्रात नद्या व नद्यांकाठी तीर्थक्षेत्रे भरपूर,
देवळे अगणित, मठ-मंदिरे खेड्यापाड्यातील
गल्लीबोळांपर्यंत; पण विठोबाची कहाणीच वेगळी. तो
अठ्ठावीस युगे उलटली तरी पुंडलिकाने पुढे सारलेल्या विटेवर उभा राहून त्याच्या भक्तांची
वाट पाहत आहे! आणि भक्तही त्याच्या केवळ स्मरणाने आनंदविभोर होतात, त्यांचे डोळे भरून
येतात, ते त्याच्यासाठी घरादारांवर तुळशीपत्र ठेवून त्याच्या
निमिषमात्र दर्शनासाठी आणि चरणांवर माथा टेकवण्यासाठी व्याकुळ होतात. त्यांनाच
वारकरी म्हणतात. त्यांचा तो ‘चल’भक्तीचा
रोकडा अनुभव-आविष्कार म्हणजे पंढरीची पायवारी. ती महाराष्ट्राची ओळख आहे! बाकीच्या सर्व यात्रा, जत्रा, तीर्थाटने आहेतच; पण वारते ते वारी! वारी वारी
जन्म-मरणांते वारी.... ती पंढरीची वारी- मराठी संस्कृतीची आत्मखूण!
‘आषाढी-कार्तिकी विसरूं नका मज। सांगतसे गूज पांडुरंग।’ जणू विठ्ठलालाच भक्ताला क्षेममिठी द्यायची आतुरता आहे! शांता शेळके यांच्या ‘वाट चालावी पंढरीची’
या लेखापासून ना.धों. महानोर यांच्या पालखीच्या अभंगांपर्यंत आणि
तुकोबांच्या टिपरीच्या अभंगांपासून संतमांदियाळीतील सर्व संतांनी केलेले विठुरायाचे,
सखा ज्ञानेश्वराचे आणि वारीचे वर्णन वाचले; तेव्हाच
जाणवले- तहान नाही, भूक नाही, सोयीसुविधा
नाहीत, घरादाराची आठवण नाही, श्रमांची
पर्वा नाही, उनपावसाची तमा नाही, उद्याची
चिंता तर अजिबात नाही... फक्त विठुनामाचा गजर, माऊलींचा
ममत्वाचा हात आणि तुकोबांची साथ! बहिरंगातून अंतरंगात,
देहभावातून देवभावात लीन-विलीन होण्यासाठी आळंदी ते पंढरपूरपर्यंत
करण्याची ही पायवारी म्हणजे अखंड उग्र तपश्चर्याच! पण एकदा का ते ‘पंढरीचे भूत’ अंगात संचारले आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या लयीत पावले पडू लागली, की अंतर्बाह्य फक्त आणि
फक्त आनंदाचे कल्लोळ! म्हणून तर माऊलींनी ग्वाही दिली आहे ‘आनंदे भरीन तिहीं लोक।’ त्याची प्रचिती-प्रतीती
वारीमध्ये पावलोपावली येत असते.
रस्त्यावरील मैलांचे दगड पाहिले तर आळंदी ते पंढरी हे अंतर
तीन-साडेतीनशे मैलांचे. पण वारकऱ्याचा खरा प्रवास होतो तो ज्ञानोबा ते विठोबा
व्हाया तुकोबा! अंतरंग समृद्धीची भव्य, सुंदर, अलौकिक अनुभूती देणारा तो प्रवास! भाग्योदय होऊन, मी वाचताना जे मनाने
अनुभवत होते ते पायवारीचे सुख याचि देहि याचि डोळा अनुभवले- प्रथम १९९३ साली; आणि मग जवळ जवळ प्रत्येक वर्षी. तसा, मी कार्तिकी एकादशीला
पंढरीच्या वाळवंटातील कीर्तन सोहळा १९९२ ला अनुभवला होता. कार्तिकी वारीला थेट
तेथे जायचे असते- ती वारीदेखील खूप आनंददायी असते. थंडीचे दिवस- हवा छान अशा
वातावरणात वाळवंटातील कीर्तनांचा नेत्रदीपक आणि श्रवणसुखाचा सोहळा म्हणजे आकाश
मंडप पृथीवी आसन! चांदण्यांनी खचाखच भरलेल्या आकाशाखाली, बाजूला चंद्रभागेच्या
शीतल प्रवाहाची झुळझुळ आणि आसमंतात भरलेला विठ्ठलनामाचा उद्घोष! पण आषाढीच्या सोहळ्याची सर त्याला नाही. कारण त्यावेळी अठरा ते वीस दिवस
अखंड ‘जनांचा प्रवाहो’ चाललेला असतो! तितके नामस्मरण भक्ताचे एरवीच्या दैनंदिन धावपळीत नक्कीच होत नाही.
माझी पहिल्या वेळेची आठवण आहे. दिवेघाट चढून गेल्यावर सर्व वारकरी टणाटण उड्या मारत बाजूच्या शेतांत विसाव्याला थांबले; छोटी छोटी रोपे उगवली होती तेथे. मी
आगाऊपणे ती रोपे पायदळी का तुडवता असे विचारले तर मला समजावत ते म्हणाले, “अहो माऊली, ती मुद्दाम लावली आहेत, वारकऱ्यांच्या पायदळी गेली तर पुढील पीक भरघोस येते अशी त्यांची श्रद्धा!” तोपर्यंत तळपायाला फोड आले होते. तर बरोबरच्या आयाबाया म्हणाल्या, “अगो, तू लई भाग्याची! जितके फोड जास्त तितकी तुझी भक्ती जास्त... लई किरपा बघ तुज्यावर इठ्ठलाची!” झाले, म्हणजे तक्रारीला जागाच नाही. फोडांच्या
वेदनांवर विठ्ठलाच्या ‘जादा किरपे’ची फुंकरच घातली जणू! शहरी माणसांना
बाहेरची खुली हवा, पाऊसपाणी, गारवा या
सगळ्याची सवय नसते- जेवणाखाण्यातही तिखट चालत नाही. पण ‘राम
कृष्ण हरि’ म्हणायचे आणि सगळे स्वीकारायचे- सोप्पे होत जाते
सगळे, आपोआप! टँकरच्या पाण्याने दोनचार
तांब्यांत आंघोळ आटोपायची- मध्यरात्रीच काळोखात सर्व आवरून घ्यायचे- पण तरी
प्रत्येक भक्त म्हणेल, वारीइतके सुखाचे दिवस नाहीत! ना कोणत्या सांसारिक विवंचना ना इतर काळज्या. कोठे कोठे उघड्या
माळरानांवर तंबूत मुक्काम. तोही छानच अनुभव.
चांदोबाचा निंब या ठिकाणी उभे रिंगण. म्हणजे वारकरी दोन
बाजूंना होतात- अगदी पहिल्या दिंडीपासून अखेरच्या दिंडीपर्यंत आणि मधून माऊलींचा
घोडा दौडत जातो-येतो. तो पुढे गेला, की त्याच्या टापांखालील माती सर्वजण कपाळी
लावतात. रिंगणातून घोडा दौडत गेला की एकच आनंदकल्लोळ- जल्लोष. साक्षात माऊलीच
विराजमान असल्याने तो घोडाही इतका मवाळ, प्रेमळ की लाखो वारकरी हात लावून त्याचे दर्शन
घेतात, तान्ह्या बाळांना त्याच्या चरणावर घालतात पण तो अश्व
म्हणजे मूर्तिमंत दयेचा सागर... सहनशील. तुकोबांची पालखी भेंडीशेगावला परत येऊन
मिळते आणि दोन्ही पालख्या पंढरीस निघतात. माऊलींसोबत त्र्यंबकेश्वरहून आलेली
निवृत्तिनाथांची, एदलाबादहून मुक्ताबाईंची, सासवडहून सोपानकाकांची, कर्नाटकाहून भानुदास
महाराजांची, पैठणहून नाथांची, देहूहून
तुकोबांची, याबरोबर शेगांवहून गजानन महाराज, पावस- गोंदवल्याहून संतांच्या, तसेच गोरोबा, चोखोबा, गाडगेबाबा अशा सकल संतांच्या पालख्या पंढरीस
येतात. या पायवारीदरम्यान वैद्यकीय सेवा देणारे, दानधर्म-अन्नदान
करणारे, पाणी टँकर पुरवणारे, तंबू-जेवण
व्यवस्था करणारे, ट्रक वगैरेंचीही दाटी असते. वारीतील
व्यवसायांमुळे कितीतरी जणांची पोटापाण्याची तरतूद होत असते. फुलवाले, तुळशीमाळा, हार, बुक्का,
प्रसादाचा व्यवसाय करणारे, वहाणा दुरूस्त
करणारे, इस्त्री करून देणारे, जीवनावश्यक
वस्तू पुरवणारे... सगळ्यांना वारी सामावून घेत असते. आषाढ शुद्ध दशमीला पंढरीच्या
वेशीवर साक्षात विठ्ठलरूक्मिणी आणि नामदेव माऊली वारकऱ्यांच्या स्वागताला येत
असतात.
अठरा-वीस दिवसांच्या पायवारीनंतर पंढरपुरास पोचल्यावरील आनंद अवर्णनीय! चंद्रभागेतील स्नान आणि पुंडलिकाचे दर्शन झाले, की
मंदिराच्या महाद्वाराशी पोचल्यावर नुसता कळस पाहिला तरी पांडुरंगाला उराउरी
भेटल्याचे ओतप्रोत समाधान मिळते. तो सोहळा गुरूपौर्णिमेपर्यंत चालतो. मग माऊली
आळंदीस परत जाण्यास निघतात- तीच परतवारी! परतवारीत मोजके
वारकरी असतात. माऊली आषाढ वद्य दशमीस परत आळंदीस स्वस्थानी येते.
पंढरीची वारी हा केवळ वर्णनाचा विषय नसून अनुभवण्याचा अनिर्वचनीय आनंद
आहे. गावात जसे देऊळ आणि देवळात देवाची मूर्ती तसे संतांनी या शरीराला ‘देह गाव’ मानले आहे. अंतरात्मा हृदयस्थ परमेश्वर.
तोच ज्ञानोबा-तुकोबांचा देव आणि देऊळ. कल्पना इतकी विस्तारली, की माऊली विश्वरूपात्मक होते आणि तुकोबा आकाशाएवढे! तो शोध या जन्मी घेण्याची सोय म्हणजे
वारी! या सोहळ्यावर २०२०
साली बंधने आली आहेत. लॉकडाऊनमध्ये ती इष्टापत्तीच मानू या!
ज्यामुळे आपण बाह्य जगात जे वेड्यासारखे अर्थहीन आणि दिशाहीन धावत होतो ते एका
बिंदूवर येऊन थांबलो आणि आपला आतील प्रवास सुरू झाला!
अष्टमीला
माऊलींचे प्रस्थान होईल तेव्हा तेथूनच आपण मनाच्या खांद्यावर विठ्ठलनामाची पताका घेऊन माऊलींच्या मागे निघू या. मनाचे अवकाश विस्तारून, विठ्ठल नामाचा टाहो फोडू, प्रेमभावाने ये हृदयीचें ते हृदयी घालत त्या पंढरीच्या वाटेवर मनानेच पाऊल टाकत म्हणूया, ‘ज्ञानोबा-तुकाराम। ज्ञानोबा-तुकाराम।’
माऊलींचे प्रस्थान होईल तेव्हा तेथूनच आपण मनाच्या खांद्यावर विठ्ठलनामाची पताका घेऊन माऊलींच्या मागे निघू या. मनाचे अवकाश विस्तारून, विठ्ठल नामाचा टाहो फोडू, प्रेमभावाने ये हृदयीचें ते हृदयी घालत त्या पंढरीच्या वाटेवर मनानेच पाऊल टाकत म्हणूया, ‘ज्ञानोबा-तुकाराम। ज्ञानोबा-तुकाराम।’
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----
0 टिप्पण्या